श्रीमती उज्ज्वला केळकर

☆ जीवनरंग ☆ आय लव्ह यू फ्लाय बॉय (पूर्वार्ध) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर

27 जानेवारी : जम्मू-नगरौटा दरम्यान एका ठिकाणचे सैन्याचे हेलीपॅड

दुपारचे चार वाजले आहेत.  दिवसभराची धावपळ झाल्यानंतर, धुकं चिरत सूर्यदेव शेवटचं स्मितहास्य करत आहेत. आपलं हेलीकॉप्टर घेऊन, आर्मी एव्हिएशनचे दोन पायलट, एक मेजर आणि एक कॅप्टन, इथल्या हेलीपॅडवरून, मध्य काश्मीरमधील एका भागात असलेल्या आपल्या एव्हिएशन बेसकडे जाण्यासाठी आपल्या कडक, स्मार्ट युनिफॉर्ममध्ये सज्ज आहेत. इथल्या हेलीपॅडपासून ते एव्हिएशन – बेसपर्यंतचा प्रवास सव्वा तासाचा आहे. हे अ‍ॅडव्हान्स लाइट हेलीकॉप्टर ‘ध्रुव’ घेऊन, पीरपंजालची बर्फमय शिखरांची साखळी ओलांडत परवाच तर दोघे इथे आले होते. 26 जानेवारीला मिळालेल्या अनेक धमक्यांना अनुलक्षून अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी ते इथे आले होते.

हेलीकॉप्टरचे पंखे हळू हळू गती घेऊ लागले आहेत. मेजर वर्मा सगळीकडे धावती नजर टाकून कॉकपीटमध्ये येऊन बसले आणित्यांनी हलकेच मान हलवत कॅप्टनला इशारा दिला. कॅप्टनच्या उजव्या हाताचा जॉय- स्टिकवरचा दबाव त्यांनी वाढवला. फूल थ्रॉटल. धुळीची वावटळ उठली.  पंखांची फिरण्याची गती, एका मिनिटाला तीनशे पंधरापर्यंत पोचली, तेव्हा ते मोठसं पाच टनी वजन असलेलं हेलीकॉप्टर पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणाला वाकुल्या दाखवत हवेमध्ये उचललं गेलं.

थोड्याशा खालच्या बाजूला रेंगाळणारी भटक्या ढगांची टोळी, मेजर वार्मांच्या कपाळावर आधीच उठलेल्या आठयांमध्ये आणखी एक दोन आठयांची भर घालते. भटक्या ढगांशी खेळ करत हेलीकॉप्टरचे पंखे आता हेलीकॉप्टरला एका सुरक्षित उंचीवर घेऊन येतात… दूरच्या क्षितिजावर क्षणोक्षणी जवळ येणारी पीरपंजालची शुभ्रशी शिखरे दिसू लागतात. बस! एवढी शिखरं पार केली की झालं. मग पुढचं व्हॅली फ्लॉवरचं उड्डाण म्हणजे मुलांचा खेळ. तिकडे पीरपंजालवर लटकलेल्या ढगांची गर्दी जशी काही कुठल्याशा षड्यंत्रात सामील होऊन, येणार्‍या हेलीकॉप्टरकडे बघत हसते आहे. कॅप्टन काहीसा बेफिकीर आहे. या बाजूचं त्याचं बहुतेक पाहीलंच उड्डाण आहे.

मेजरच्या ललाटावर इथे तिथे पसरलेल्या रेषांवर उमटलेले घामाचे बिंदू वेगळंच काही तरी सांगताहेत. धुकं आणि ढग यांच्यामुळे हेलीकॉप्टरची गती अगदी कमी आहे. आदेशानुसार संध्याकाळी साडे पाचपूर्वी बेसवर पोचणं जरूरीचं आहे.  या काकडणार्‍या थंडीत दिवसाला लवकर पळून जाण्याची घाई असते आणि रात्र तर जशी कंबर कसून बसलेली असते. सहा वाजतात न वाजतात, तोच येऊन धडकते. म्हणण्यापुरतं हे अ‍ॅडव्हान्स हेलीकॉप्टर आहे, पण रात्री उडण्याची याची क्षमता शून्याबरोबर आहे.

27 जानेवारी :  पीरपंजालच्या खाली द्क्षिण काश्मीरमधील एक जंगल   सकाळचे साडे नऊ वाजले आहेत. पीरपंजालच्या घाटीमधील या जंगलाचा एक भाग अचानक गोळ्यांच्या धमाक्याने गुंजत उठलाय. आदल्या दिवशी रात्री जवळच्याच राष्ट्रीय राइफल्स बटालियनला चार आतंकवादी जंगलात लपून बसल्याची पक्की खबर मिळाली होती. सूर्यदेवाचं पहिलं दर्शनच चकमकीचा बिगुल वाजवत होतं. दोन आतंकवादी मृत झाले आहेत आणि दोघांचा शोध सुरू आहे. ही सगळी कार्यवाही होता होता सात तास होऊन गेले आहेत. आता पाठलाग करणारी सैन्याची एक तुकडी जंगलाच्या खूप आतापर्यंत पोचलीय. उरलेल्या दोघांपैकी आणखी एक आतंकवादी मारला गेलाय. दुसर्‍याची मात्र कुठे चाहूल लागत नाहीये. तुकडीचा लांस नायक जखमी झालाय. त्याला पोटात गोळी लागलीय. प्राथमिक उपचारानंतर रक्त वाहणं थांबलय, परंतु त्याला लवकरात लवकर हॉस्पिटलमध्ये पोचवणं गरजेचं आहे. सगळ्यात जवळच्या रस्त्यापर्यंत जायचं झालं, तरी कमीत कमी चार तास लागतील. एव्हिएशन बेसला लवकरात लवकर हेलीकॉप्टर पाठवण्याविषयी वायरलेसवरून संदेश पाठवला गेलाय.

उत्तरार्ध – उद्याच्या अंकात

मूळ कथा –   आय लव यू फ्लाय ब्वाय     मूळ लेखक – गौतम राजऋषि

भावानुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर

176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.-  9403310170

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments