डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ ॥अरे माणसा माणसा॥ – भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
हे डॉक्युमेंट करायला आल्यावर कांचन अगदी अस्वस्थ होऊन गेली. कांचन शहरातली निष्णात वकील म्हणून ओळखली जात होती आणि आता तर ती व्यवसायात किती छान स्थिरावली होती.कांचन एलएलएम,, ही लॉ मधी उच्च डिग्री अतिशय चांगल्या ग्रेडस् घेऊन पास झाली होती आणि मुद्दामच तिनं बाकीच्या रुळलेल्या वाटा सोडून कायद्याची वाटच आपल्या करिअर साठी निवडली होती. कांचनने बारावीनंतर लॉ करायचे ठरवले तेव्हा तिच्या पपांनी तिला विचारलं सुद्धा, ‘अग, इतके छान मार्क्स आहेत कांचन तुला,तुला वकिलीचं क्षेत्र का निवडावंसं वाटलं एकदम? आपल्या घरात तर कोणी वकील नाही.’ कांचन म्हणाली, “ तसं खास काही कारण नाही पपा!पण मला वाटलं खरं वकील व्हावंसं. आणि मग मी तुमचे मित्र आहेत ना, पुण्यातले निष्णात लघाटे काका,त्यांच्याकडे काही वर्षे इंटर्नशिप करीन आणि मग बघेन पुढं!“
आपल्या अत्यंत हुशार आणि काय करायचे आहे ते नक्की ठाऊक असलेल्या लेकीकडे कौतुकाने बघत पपानी मान डोलावली. ममी म्हणाली, “अहो,तुमच्या या लाडक्या लेकीला वकील झाल्यावर नवरा मिळेल का? लोक बिचकतात बरं का, वकील सून घरात आणायला ! “
“ ममी,तू नको ग काळजी करू. ज्याच्या नशिबात मी असेन ना तो समोर येऊन उभा राहील बघ ! “
ममीनं मान उडवली – “ तुम्हा बापलेकीसमोर कोणाचं कधी चाललंय का?करा काय हवं ते ! मी ऐकलंय ते सांगतेय. जन्मभर बेगम का ठेवायचीय लाडक्या मुलीला?”
ममी तणतणत आत निघून गेली. कांचनने लॉ कॉलेजला ऍडमिशन घेतली. कांचनला ते कॉलेज, तिथलं वातावरण अतिशय आवडलं. चारही वर्ष पहिल्या श्रेणीत मार्क्स मिळवून कांचन एलएलबी झाली.
“ पपा, मी सिव्हिल कोर्टातच काम करायचं ठरवलंय. अर्थात, मी कामं करणार. म्हणजे प्रॉपर्टी ट्रान्सफर,रजिस्ट्रेशन, सगळं सगळं. फक्त मी बाकीची कामं नाही घेणार. म्हणजे फौजदारी खटले. किंवा फॅमिली कोर्टस् ! पण माझ्या विषयाच्या अनुषंगाने मला भरपूर कामं मिळतील. बघा ना पपा, आता नवीन किती कन्स्ट्रक्शन्स होतात ना, त्या बिल्डरांना आमच्यासारखे वकील तर लागतातच. सर्व वकिली सल्ले आणि बाकीची जमिनीची कागद पत्रे नीट बघून ती निर्वेध आहे ना ते पाहून, प्रॉपर्टी सर्च घेऊन, पुन्हा फ्लॅट्सचे कागदपत्र करण्यापर्यंत माझी गरज लागते. त्यासाठी मामलेदार कचेरीच्या फेऱ्या मारणे आलेच. मी हेच क्षेत्र निवडायचं ठरवलंय.”
त्याप्रमाणे, कांचनने सनद घेतली आणि एका प्रख्यात बिल्डरचं काम ती बघू लागली. थोड्याच अवधीत कांचनला अनेक मोठी कामं मिळाली आणि कांचन झपाट्याने उच्च वकिलांच्या श्रेणीत जाऊन बसली. किती लहान वयात हे यश मिळवलं कांचनने !
त्या दिवशी कांचन कोर्टात गेली होती .कोणाच्या तरी जमिनीच्या सिव्हिल मॅटरची तारीख होती म्हणून. अजून तिला वेळ होता म्हणून सहज कांचन एकटीच कॅन्टीन मध्ये चहा प्यायला गेली. सतत कोर्टात जाऊन तिच्या बऱ्याच ओळखीही झाल्या होत्या कोर्टात ! एकीकडे फाईल्स बघत असताना चहाही घेत होती ती.
“ हॅलो,तुम्ही कांचन रानडे ना? मी निनाद भाटे ! तुम्ही सध्या ज्या भाटे कन्स्ट्रक्शनचं लीगल काम बघताय ना, त्या भाटे फर्मचा मी पार्टनर..आपलं सध्या युनिव्हर्सिटी रोडवरचं रीडेव्हलपमेंटचं काम चालू आहे ना, ते मी बघतोय ! फार कटकटी आहेत हो ! जुने लोक अडून बसलेत त्यामुळे सगळं काम ठप्प पडलंय. दोन लोक अगदी अडवून धरत आहेत. बाकी सगळे तयार आहेत बघा ! “ निनाद हताश होऊन म्हणाला. “तुम्हाला ओझरतं बघितलंय मी ऑफिस मध्ये… glad to meet you.” निनाद म्हणाला.
पूर्वीच्या वकील मुलींसारखा हल्लीच्या स्मार्ट मुली तो काळा कोट घालत नाहीत. तर सुंदर फिटिंगचे ब्लॅक जॅकेट घालतात ड्रेसवर ! कांचनने आज जीन्सवर शर्ट आणि वर हे रुबाबदार जॅकेट घातले होते. सडसडीत बांधा, सुरेख उंची आणि आधुनिक रहाणी यामुळे किती सुंदर दिसत होती ही मुलगी ! पुन्हा बुद्धीचं तेज तर होतंच तिच्या चेहऱ्यावर ! निनादला फार आवडून गेली ही मुलगी ! तिने त्याचं ऐकून घेतलं आणि म्हणाली, “ होईल हो सगळं ! मी पेपर बघितले आहेत,.क्लिअर आहे टायटल सगळं ! होईल होईल. चहा घेणार का पुन्हा?” तिला कॉल आल्यावर ती उठली आणि निरोप घेऊन गेली.
निनाद मुद्दाम तिच्या वेळेवर ऑफिसमध्ये येऊ लागला. थोरले भाटे म्हणाले, ” काय चिरंजीव, तुमचं काय काम असतं हो हल्ली ऑफिस मध्ये? सिव्हिल इंजिनिअर ना तुम्ही? साईटवर जायचं सोडून इथं काय घुटमळताय ? “ निनाद म्हणाला, “ डॅडी, मुद्द्याचंच बोलतो. मस्त आहे हो तुमची वकील बाई !आपल्याला एकदम पसंत आहे ! विचारा की माझ्यासाठी ! असली अजून रिकामी तर माझं नशीब म्हणायचं ! “
डॅडी हसले आणि म्हणाले ‘ बघतो विचारून !’ सहज कांचनशी बोलताना थोरले भाटे म्हणाले, “ कामाचं झालं असेल बोलून तर एक विचारू का हो वकील बाई?”
“ काय हे काका ! वकीलबाई काय ! तुम्ही कांचन म्हणा मला ! “
“ बरं, कांचन, लग्न ठरलंय का कुठे तुझं?”
“ नाही हो काका !अजून तसा कोणी भेटलाच नाही.” हसून कांचन म्हणाली.
भाटे म्हणाले “ भेटलाय की ! निनाद सांगत होता,कोर्टात तुम्ही दोघांनी चहा घेतलात म्हणे ! माझा मुलगा आहे निनाद ! बघ पसंत असला तर ! तू आवडली आहेस त्याला. बघ. भेटा चार वेळा. मग तू ठरव. माझा आग्रह नाही बरं का कसलाच !”.. कांचन एकदम गोंधळून गेली. तिला निनादचा फोन आला आणि ते दोनचार वेळा भेटले. कांचनला निनाद अतिशय आवडला. ममी पपाना तर आभाळच ठेंगणे झाले.
एवढ्या नावाजलेल्या बिल्डरकडून आपल्या लेकीला मागणी आली आणि असा उमदा जावई दारात चालत आला ! पपांनी अतिशय हौसेने लेकीचं लग्न अगदी मोठ्या कौतुकाने लावून दिलं आणि माप ओलांडून कांचन भाटे घरात सून म्हणून आली. दुर्दैवाने निनादला आई नव्हती. त्याच्या लहानपणीच त्या गेल्या होत्या. एकटाच होता निनाद . लग्न झालं, सुखाचं माप अगदी शिगोशिग भरलं आणि कांचनचा संसार दृष्ट लागण्यासारखा चालला होता.
तिच्या पायगुणामुळेच जणू नवीन नवीन काम मिळायला लागली भाटे कंपनीला. असंच नवीन काम आलं होतं, तेव्हा कांचन त्या बिल्डिंगमधल्या जुन्या ओनर्सना भेटायला गेली होती. त्यांच्या काही लीगल अडचणी सोडवायला, त्यांना मदत करायला ! कांचनचं इम्प्रेशन फार छान पडे लोकांवर ! तिचं मृदु बोलणं, लोकांचं शांतपणे ऐकून घेणं, आणि मग सल्ला देणं आणि लोकांना विचार करायला वेळ देणं ! कांचन त्या लोकांना भेटून आल्यावर तिला त्या बिल्डिंगमधल्या नाडकर्णीकाकांचा फोन आला. “ मिसेस कांचन, आम्ही तुमच्या ऑफिसमध्ये भेटायला येऊ का? आमचं दुसरंच काम आहे ! फ्लॅट संदर्भात नाही.येऊ का? “ त्यांनी कांचनची वेळ ठरवून घेतली आणि ते दोघेही तिला भेटायला आले. अतिशय सुसंस्कृत, सभ्य आणि श्रीमंतही असं ते जोडपं कांचनला भेटायला आलं. “ कांचनताई, आमचं तुमच्याकडे वेगळंच काम आहे. तुम्ही वकील आहात म्हणून मुद्दाम विचारायला आलोय.” नाडकर्णी काका म्हणाले.
– क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈