श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ लंच टाईम… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(पण आपल्याला केदार आवडायचा कारण तो मदन मोहन, अनिल विश्वास, खैय्याम अशा संगीतकारांची गाणी म्हणायचा.) — इथून पुढे –
त्याच्या गावामध्ये त्याचे गुरु राहुल देव बर्मन यांच्याकडे वादक होते. आता ते मुंबई सोडून त्याच्या गावी स्थायीक झाले होते. स्वर, ताल, आलापी सर्व काही व्यवस्थित समजवत होते. त्यानी सर्व ज्ञान केदारला दिले होते. विश्वास मनात म्हणायचा, मी जशी राजापूरच्या खेड्यातून इतपर्यंत मजल मारली तसाच केदार. —शहरातील मुलं खूप नशिबवान. त्यांना हवी ती वाद्ये सहज उपलब्ध होतात. नाहीतर पालक वाद्य विकत घेऊन देतात किंवा आजूबाजूला हवे तेवढे क्लासेस आहेतच. शहरातील मुलांना इच्छा असेल तर मार्ग सहज मिळतो. आपल्याला हार्मोनियमवर बोटे फिरवायला वयाची १२ वर्षे लागली. त्यानंतर विविध राग. आणि तबला पेटी सोडून इतर वाद्ये फक्त लांबून बघायची. मुंबईत येऊन गुरु चरणदास यांच्या गुरुकूलमध्ये मात्र सगळी वाद्य सतार, संतुर, व्हायोलीन, बासरी, इलेक्ट्रीक गिटार, सिंथेसायझर हवी ती वाद्ये हात जोडून उभी होती. विश्वासला आपले रत्नागिरीतील गुरु ताम्हणकर बुवा आठवले. एकदा राजापूरात कीर्तन करायला आलेले. पेटीच्या साथीला कोणी नाही म्हणून आपण साथीला बसलो. लहान वयातील आपली बोटे स्वर बरोबर काढतात हे पाहून त्यांना आनंद वाटला. आपल्या वडिलांशी बोलून ते शनिवार रविवार रत्नागिरीत शिकवू लागले. वडिलांना एसटीचे भाडे देणे कठिण म्हणून आपण एसटीचे भाडे देऊ लागले. विश्वासच्या डोळ्यासमोर ताम्हणकर बुवा आले. असे गुरु अजून जगात आहेत म्हणून विद्यादान गरीबांना मिळते.
विश्वासने आपला अंतिम रिझल्ट लिहायला घेतला. एवढ्यात केबिनचे दार उघडून सरदेसाई आत आला. या हिंदी चॅनेलवर सारे हिंदी भाषीक. फक्त रखवालदार मनोहर आणि या प्रोग्रॅमचा मॅनेजर सरदेसाई तेवढे मराठी बोलणारे.
‘‘गुड मॉर्निंग जाधव’’
‘‘यस गुड मॉर्निंग सरदेसाई. अंतिम रिझल्ट पाच मिनिटात देतो. ’’
‘‘जाधव, त्यासंबंधातच मी बोलायला आलोय.’’
‘‘बोला.’’
सरदेसाईंनी केबिनचे दार आतून बंद केले आणि जाधव समोरच्या खुर्चीवर बसला.
‘‘जाधव, चॅनेलची इच्छा आहे, या स्पर्धेत निकिता पहिली यावी.’’
‘‘व्हॉट नॉनसेन्स, अरे निकिता माझ्याकडे सर्वात शेवटी आहे. तिचा स्कोअर ऐंशीच्या खाली आहे.’’
‘‘असू दे, अंतिम पाच मध्ये आलेला कोणीही विजेता किंवा विजेती होऊ शकतो.’’
‘‘बरोबर, पण गेल्या एक महिन्याचे मार्क निकिताला सर्वात कमी आहेत. आणि पहिल्या नंबरवर….’’
‘‘कोणीही असू दे, निकिताच विजेती होणार असे चॅनेलचे म्हणणे आहे.’’
जाधव ओरडला – ‘‘अरे का पण ? केदारवर हा अन्याय आहे.’’
‘‘याचे कारण, एन चॅनेलला दक्षिण भारतात विशेषतः ओरीसा, आंध्रप्रदेश या भागात हातपाय पसरायचे आहेत आणि निकिता ही ओरीसाची आहे. या स्पर्धेत ती विजेती झाली म्हणजे त्या भागातील लोक एन चॅनेल घरोघरी घेतली. आणि हा अंतिम फेरीचा कार्यक्रम पुन्हा पुन्हा पाहतील.
‘‘चॅनेलच्या धंद्यासाठी खर्या गायकावर अन्याय? मग स्पर्धा घेता कशाला ? आणि परिक्षक हवे कशाला ? चॅनेलला वाटेल त्याला बक्षिसे देऊन मोकळं व्हायचं.’’
‘‘असे कार्यक्रम असले तरच टिआरपी जास्त मिळतो. लोक तहान भूक विसरुन टिव्ही पाहत राहतात. आम्हाला पण अशाच कार्यक्रमांना प्रायोजक मिळतात. विशेषतः लहान मुलांच्या स्पर्धेत लोक जास्त इमोशनल होऊन कार्यक्रम पाहतात. चॅनेल घरोघरी पोहचते. चॅनेलला खूप पैसे मिळतात. आणि परिक्षकांना पण मिळतात. ’’
‘‘अशा पैशांवर थुंकतो मी. मी पण कोकणातून गरीब घराण्यातून आलोय. दुर्गम भागात विद्या मिळवायची याला किती त्रास असतो ते मला माहिती आहे. मी केदारला ९० टक्केपेक्षा जास्त मार्क दिलेत. आणि निकिता ऐंशी टक्केच्या खाली आहे. माझ्या मार्कलिस्टवर केदारच पहिला येणार.’’
जाधवने पुन्हा मार्कलिस्ट समोर घेतली आणि तो अंतिम रिझल्ट तयार करु लागला.
‘‘जाधव एक मिनिट थांब, हे फोटो पहा. मी पाच मिनिटांनी येतो. मग बोलू आपण.’’ त्याच्या समोर फोटोचे इनव्हलप ठेवून सरदेसाई केबिन उघडून बाहेर गेला. जाधवने इनव्हलप हातात घेतले आणि एका बाजूने उघडले. आतमधून चार फोटो बाहेर पडले. कसले फोटो म्हणून जाधव पाहू लागला आणि तो चमकला, त्याचे आणि एका कॉलगर्लचे एकामेकाच्या मिठीतले फोटो होते. त्याच्या लक्षात आले गेल्यावर्षी एक अल्बम लाँच व्हायचा होता त्यावेळी अलिबागच्या हॉटेलमध्ये पार्टी होती. पार्टीनंतर त्याच मध्ये हॉटेलमध्ये रहायचे होते. तो पार्टी संपवून त्याच्या रुमवर गेला तेव्हा त्याच्या रुममध्ये ही कॉलगर्ल आधीपासून हजर होती. त्याला पाहताच ती त्याच्या गळ्यात पडत होती. पण त्याने तिला ढकलले. हा ‘‘हनीट्रॅप’’ आहे आणि यापासून लांब रहायला हवे हे त्याच्या लक्षात आले. म्हणून त्याने आरडाओरड करुन इतरांना बोलावले. ती कॉलगर्ल चडफडत पळाली. तसे आपण पोलीसात कळविणार होतो पण अल्बमची मंडळी हात जोडू लागली. तसेच त्या हॉटेलची माणसेपण आमचे नाव खराब होईल पुन्हा येथे कोण येणार नाही तेव्हा पोलीसांना बोलवू नये म्हणून आग्रह करु लागली म्हणून आपण गप्प बसलो. पण हे फोटो या चॅनेलकडे कसे आले? की, गेल्यावर्षीपासून या चॅनेलचे आपल्यावर लक्ष होते ? आपल्याला परिक्षक बनवायचे आणि हवा तसा रिझल्ट नाही दिला तर हनीट्रॅपमध्ये अडकवायचे. जाधवने पुन्हा फोटो पाहिले. प्रत्येक फोटोत ती कॉलगर्ल त्याच्या हातावर पडलेली दिसत होती. जाधवला वाटलं आपण त्याच वेळी पोलीस कंम्पलेंट करायला हवी होती. आता असे फोटो पाहून आपल्यावर कोण विश्वास ठेवणार ? त्याला त्याची पत्नी अनिताची आठवण झाली. तिला पण हा प्रसंग सांगायला हवा होता. पण ठिक आहे. अनिताचा आपल्यावर विश्वास आहे. अशा फोटोंवर विश्वास ठेवणारी ती नाही. या झगमगत्या दुनियेत अशा गोष्टी नेहमीच्याच. विश्वास ने मनात म्हटले, ‘ सरदेसाई असल्या फोटोनी माझा रिझल्ट बदलणार नाही. मी तुझ्या चॅनेलला पुरुन उतरेन. ‘
– क्रमशः भाग दुसरा
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈