☆ जीवनरंग ☆ बोध कथा – फसवणूक ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा १०. फसवणूक
‘याचवर’ नावाच्या गावात ‘सिकतामायी’ नावाचा मनुष्य होता. तो गरिबीतच जीवन व्यतीत करत होता. एकदा त्याला दुसऱ्या गावी जाण्याची इच्छा झाली. त्याने एका वस्त्रात वाळू भरून ती उत्तम प्रकारे गुंडाळून तो प्रवासाला निघाला. त्याच्या गावाच्या जवळच ‘माचवर’ नावाचे गावात होते. तेथे ‘गोमयमायी’ नावाचा दुसरा एक दरिद्री मनुष्य रहात होता. त्यालाही दुसऱ्या गावी जायचे होते. जातांना त्याने चाळीस-एक गोवऱ्या एका वस्त्रात बांधून घेतल्या होत्या.
दैवयोगाने सायंकाळच्या सुमारास दोघेही एकाच धर्मशाळेत मुक्कामाला उतरले. तेव्हा सिकतामायीने गोमयमायी जवळचे वजनदार गाठोडे पाहून ते खाद्यपदार्थाचे गाठोडे असावे असा विचार केला. ते गाठोडे कपटाने हरण करण्याच्या इराद्याने सिकतामायीने विचारले, “अरे मित्रा, तुझ्या गाठोड्यात काय आहे?” तत्पूर्वीच गोमयमायीने सिकतामायी जवळचे वजनदार गाठोडे पाहून त्यात नक्कीच तांदूळ असणार या समजुतीने ते मिळवण्याचा पक्का निर्धार केला होता. म्हणून गोमयमायीने “माझ्या गाठोड्यात अन्नपदार्थ आहेत” असे सांगून “तुझ्या गाठोड्यात काय आहे?”असे सिकतामायीला विचारले असता “माझ्या गाठोड्यात तांदूळ आहेत” असे त्याने प्रत्युत्तर दिले व पुढे म्हणाला, “ मी तुझ्या प्रमाणे भात वगैरे आणला नाही म्हणून मला दुःख होत आहे. मला खूप भूक लागली आहे. आता काय करावे ते कळत नाही.” ते ऐकून गोमयमायी म्हणाला, “ मला आता भूक नाही. माझे खाद्यपदार्थांचे गाठोडे तू घे व मला तुझे तांदळाचे गाठोडे दे.” “ठीक आहे” असे म्हणून दोघांनी एकमेकांची गाठोडी घेतली.
आपली लबाडी दुसऱ्याला कळू नये म्हणून क्षणभरही न थांबता दोघेही निघाले. काही अंतर पार केल्यावर दोघांनी गाठोडी उघडली. आतील वस्तू पाहून दोघेही आश्चर्यचकित झाले.
तात्पर्य –दुसऱ्याला फसवण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना दैवच फसवते.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी