श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ पाणक्या… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पहिले – रोज सकाळी सहा वाजता विजयरावांना जाग यायची। आज पण त्यांना जाग आली तेव्हा किचन मधून आवाज ऐकू येत होता. बायको वसुधा गेल्यानंतर ते रोज स्वतःचा चहा स्वतः बनवत असत, मग आज कोण आलं? असा प्रश्न त्यांच्या मनात आला. एवढ्यात काल रात्री श्याम आलेला आहे आणि तो हॉलमध्ये झोपलेला आहे हे त्यांच्या लक्षात आलं. – आता इथून पुढे)
ती बाहेर आली तर त्यांना त्यांचं घर आज वेगळंच वाटलं, आपले अस्ताव्यस्त घर आज एवढे व्यवस्थित कसे, असा त्यांना प्रश्न पडला, कोचावरील कापड आज व्यवस्थित बसलेले होते, चप्पल बूट चपलाच्या स्टॅन्ड वर ठेवलेले होते. पेपरांची रद्दी बांधून ठेवलेली होती, हॉलमधील फोटोंचे जुने हार काढलेले होते, ते किचनमध्ये गेले, श्यामने सर्व भांडी धुवायला काढली होती, भांड्याचा स्टॅन्ड पुसून ठेवला होता.गॅसची शेगडी, बर्नर स्वच्छ पुसलेले दिसत होते, डायनिंग टेबल चकाचक दिसत होते, फ्रिज आतून बाहेरून स्वच्छ झाला होता, खिडकीवरची जळमटे नाहीशी झाली होती, बाथरूम टॉयलेट स्वच्छ दिसत होते, विजयरावांना वाटले आज किती दिवसांनी एखाद्या बाईचा हात फिरावा आणि घर स्वच्छ व्हावं तसे घर स्वच्छ दिसत आहे.
विजयरावांना पाहताच श्यामने त्यांच्यासमोर चहा आणि बिस्किटे ठेवली. ” श्याम अरे केवढे व्यवस्थित घर केलेस हे॰ मला असं व्यवस्थित घर ठेवायला जमायचे नाही, तू गेलास की पुन्हा माझा आजागळ संसार सुरु होईल “.
” दादासाहेब आम्ही मुंबईत आलो की तुम्ही आमच्याकडे यायचं, मला युनिव्हर्सिटी कडून मोठा फ्लॅट मिळेल. “
” बघू बघू, तुला जागा तर मिळू दे!”
” दादासाहेब तुमची भेट झाली आनंद वाटला. आता माझं नऊ च विमान आहे. मला आता जायला लागेल, तुमचा मोबाईल नंबर द्या, बहुतेक दोन महिन्यांनी आम्ही सर्व मुंबईत येऊ, मग तुम्ही आमच्याकडे यायचं. “
दादासाहेबांना नमस्कार करून श्याम निघाला. विजयरावांना तो जाताना वाईट वाटले, जेमतेम एक रात्र शामू राहिला, पण लळा लावून गेला, नाहीतर आपला मुलगा सुनील, रोज रात्री नऊ वाजता फोन करतो पण ते कर्तव्य म्हणून, त्यात ओलावा नसतो, आपल्या जर्मन सुनेने आपल्याला एकदाच पाहिले, तिला आपल्या बद्दल प्रेम कसं वाटणार? विजयरावांना आपल्या पुढच्या आयुष्याची पण काळजी वाटत होती, सुनील जर्मनीला बोलावतो पण त्याच्या लग्नाआधी आपण जर्मनीला गेलो होतो, पण पंधरा दिवसात परत आलो, जर्मनीमधील थंडी, जेवण मानवेना. आपल्याला भारताची सवय, आपले हात पाय फिरते आहेत तोपर्यंत ठीक, पण नंतर….., एखादा वृद्धाश्रमच शोधायला हवा.
दिल्लीत गेल्यावर सुद्धा श्यामचा रोज फोन येत होता. त्याची बायको मुलगी पण फोनवर बोलायची, आणि दोन महिन्यांनी एक दिवस त्याचा अचानक फोन आला “आम्ही सर्वजण मुंबईत येतोय, कलिना भागात युनिव्हर्सिटीने मोठा फ्लॅट दिलाय. ” आणि चार दिवसांनी श्याम त्याची बायको आणि मुलगी मुंबईत आले सुद्धा. दोन दिवसांनी शाम भली मोठी गाडी घेऊन आला आणि विजयरावांना आपल्या घरी घेऊन गेला. त्या अत्यंत पॉश वसाहतीमध्ये युनिव्हर्सिटीने शामला सहा खोल्यांचा फ्लॅट दिला होता. दारात शोफर सह गाडी. बाहेर बगीचा, जवळच मोठे गार्डन, या एरियात आपण मुंबईत आहोत असे त्यांना वाटेना, श्यामच्या पत्नीने आणि मुलीने त्यांना वाकून नमस्कार केला. श्यामची पत्नी साधना विजयरावांना म्हणाली ” दादासाहेब मी पण इंदोरचीच, संपूर्ण दाते कुटुंबाबद्दल इंदूर शहराला आदर आहे, दादासाहेब तुम्ही आता इथेच राहायचं, कृपा करून एकटे राहू नका. “
श्याम दादासाहेबांना म्हणाला ” काल मी सुनीलशी बोललो, तो पण म्हणाला बाबांनी एकटे राहण्यापेक्षा तुमच्या सोबत राहणे केव्हाही चांगले, त्यांना या वयात सोबत हवीच,’ विजयराव गप्प बसले, ते पण एकटे राहून कंटाळले होते, संध्याकाळी शामने विजयरावांचे आवश्यक तेवढे सामान त्या घरी आणले.
आता विजयराव मजेत राहू लागले, श्याम आणि साधना रोज युनिव्हर्सिटीत जात होते, पण जाताना किंवा आल्यानंतर त्यांची चौकशी करत होते, श्यामची मुलगी त्यांच्या नातीसारखीच गप्पा मारत होती, कॉलेजमधील गमती जमती सांगत होती, श्यामच्या फ्लॅटमध्ये स्वयंपाकी होता, इतर कामासाठी माणूस होता, त्यामुळे विजयरावांना काहीच करावे लागत नव्हते. रविवारी किंवा सुट्टीच्या दिवशी शाम त्यांना नाटकांना किंवा गाण्याच्या कार्यक्रमाला घेऊन जात असे, विजयरावांना शास्त्रीय संगीताची फार आवड, मुंबईत इच्छा असूनही त्यांना जाता येत नव्हते, आता त्यांना गाण्याच्या मैफिली ऐकण्यासाठी मुद्दाम गाडी ठेवलेली होती.
आपले बाबा आता एकटे नाहीत श्यामच्या कुटुंबात आहेत हे पाहून सुनीलचे फोन अनियमित येऊ लागले. विजयरावांना सुद्धा सुनीलची किंवा सुनीलच्या मुलीची पूर्वीसारखी आठवण येत नव्हती. उलट त्यांना श्यामची मुलगी मिहिरा जास्त जवळची वाटू लागली. आई बाबांना वेळ नसेल तेव्हा मिहिरा त्यांना गाण्याच्या मैफिलीला घेऊन जाऊ लागली.
एकंदरीत विजयराव दाते आता मुंबईत मजेत होते. इंदूर सुटल्यानंतर एवढे सुख त्यांना कधीच मिळाले नव्हते. रोज सकाळी फिरायला जाणे, बागेत मित्रांसमवेत गप्पा, मग घरी येऊन पेपर वाचन, आंघोळ मग नाश्ता त्यानंतर ते त्यांच्या आवडीच्या शास्त्रीय संगीतात रमत असत. कधी किशोरीताई ऐकत, कधी कुमार गंधर्व कधी शोभा गुर्टू. कधीकधी नव्या गायकांनासुद्धा ते ऐकत. दुपारी जेवणानंतर थोडी वामकुक्षी, कधी टी.व्ही.वर इंग्रजी सिनेमा पाहणे, सायंकाळी फिरून येणे, रात्री शाम -साधना आली की एकत्र बसून जेवण.
विजयरावांना ७५ वर्षे पुरी झाली, त्या दिवशी श्यामने एका नवीन गायकाला घरी बोलावून त्याचे गाणे विजयरावांना ऐकवले. श्यामची मुलगी मेहरा पुढील शिक्षणासाठी इंग्लंडला गेली. सारं कसं आनंदात छान चाललं होतं. असेच एकदा रात्र जेवताना साधनाचे लक्ष दादासाहेबांच्या पायाकडे गेले. पायाला सूज आली होती. तिने शामला दादासाहेबांचे पाय दाखवले. शनिवारी श्याम त्यांना डॉक्टरांकडे घेऊन गेला. त्यांनी सुजे वरच्या गोळ्या दिल्या. हळूहळू त्यांचे पोट मोठे दिसू लागले. श्यामला शंका आली त्याने दुसऱ्या दिवशी लीलावतीमध्ये नेऊन सर्व तपासण्या केल्या, डॉक्टरनी “लिव्हर सोरायसिस’ चे निदान केले. पोटात पाणी जमा होऊ लागले होते, ते काढावे लागत होते. श्यामने सुनीलला सर्व कळवले, त्याने बाबांना जर्मनीला नेऊन सर्व उपचार करतो असे कळवले पण विजयराव जर्मनीला जायला तयार झाले नाहीत, पुण्याच्या खडीवाले वैद्यांचे पण उपचार सुरू होते, पण आजार कमी होईना. हळूहळू विजयरावांचे पोट मोठे आणि हातापायाच्या काड्या दिसू लागल्या, त्यांच्या तब्येतीचा वृत्तांत श्याम सुनीलला नियमित कळवत होता, पण सुनीलला भारतात येणे जमेना. कधी त्याच्या मुलीची परीक्षा जवळ येत होती तर कधी पत्नीची तब्येत बरी नसायची, हळूहळू विजयरावांना अन्न जाईना, शेवटी त्यांना लीलावती मध्ये ऍडमिट केले गेले. दर दोन दिवसांनी पोटातील पाणी काढले जात होते. पण विजयराव हॉस्पिटलमध्ये कंटाळू लागले. मग घरीच एका खोली त्यांची हॉस्पिटल सारखी व्यवस्था केली. घरीच ऑक्सिजन लावला, एक नर्स दिवस-रात्र घरी ठेवली. पण विजयरावांची तब्येत दिवसेंदिवस खालावू लागली.
२२ जूनची रात्र, मुंबईत भरपूर पाऊस सुरू होता, विजयराव अन्न पाणी घेत नव्हते, पोटात असह्य वेदना सुरू होत्या, श्याम आणि साधना त्यांच्या आजूबाजूलाच होते. रात्री ११ च्या सुमारास विजयरावांना घरघर लागली, श्यामने फोन करून लीलावतीच्या डॉक्टरांना घरी बोलावले, डॉक्टर आले त्यांनी विजयरावांची तब्येत पाहिली, नर्सला ऑक्सिजन काढायला सांगितला, विजयराव तोंडाने “पा पा ‘करू लागले म्हणून डॉक्टरनी श्याम कडे पाहिले, श्यामने चमच्याने त्यांच्या तोंडात पाण्याचे दोन थेंब टाकले, त्याच क्षणी विजयरावांनी प्राण सोडला.
श्याम ओक्साबोक्शी रडत होता, साधना रडत रडत त्याला सांभाळत होती. साधनाने फोन करून सुनीलला जर्मनीला ही बातमी कळवली. त्याला लगेच येणे शक्य नव्हते. ही बातमी कळताच श्यामचे आजूबाजूचे प्रोफेसर मित्र आणि युनिव्हर्सिटीतील लोक जमा झाले.
त्या रात्री श्यामने विजयरावांच्या प्रेताला अग्नी दिला.
घरी अनेक जण शामला साधनाला भेटायला येत होते. युनिव्हर्सिटीचे कुलगुरू श्यामला भेटायला आले, श्यामने त्यांना दादासाहेबांचा इंदूरचा वाडा, त्या वाड्यात आपण”पाणक्या ” म्हणून आलो, पण दादासाहेबांनी आपल्याला शिक्षण घेऊ दिले एवढेच नव्हे तर शाळेत पालक म्हणून स्वतः उभे राहिले, ती कृतज्ञता आपल्या मनात सदैव राहिली, आपले आई-वडील आपल्याला फारसे माहित नाहीत पण दादासाहेब आई-वडिलांच्या जागी कायमच राहिले. श्याम पुढे म्हणाला ” शेवटची दहा वर्षे दादासाहेब आपल्या सोबत राहिले हे आपले भाग्य, पण त्यापेक्षा दादासाहेबांना शेवटच्या क्षणी या “पाणक्याने ” त्यांच्या तोंडात पाण्याचे थेंब टाकले, हे माझे परमभाग्य.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈