श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ प्रेमानं मन जिंकावं… भाग-२ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(मुलगी आपल्या नातवालाच पसंत आहे म्हटल्यावर कमलताई काही बोलल्या नाहीत. रोहन आणि रश्मीचं लग्न थाटामाटात पार पडलं.) इथून पुढे —
रविवारी वीस ऑक्टोबरच्या दिवशीही सुहासिनी आणि कमलताई नेहमीप्रमाणे संध्याकाळी पाच वाजता चतु:शृंगी मंदिरात जाण्यासाठी निघाल्या. तिथून दशभुजा गणपतीचे दर्शन घेऊन घरी परत येईपर्यंत त्यांना साडेसात वाजले. पाहतो तर काय, प्रवेशद्वाराजवळच “राणीज किचन-सिल्वर ज्युबिली” असं भलं मोठं बॅनर लागलेलं होतं. कमलताईंचा फोटो असलेला “वुई लव्ह यू कमलाजी” बॅनर झळकत होता. लॉनवर मंडप बांधून तयार होता. रंगीबेरंगी दिवे झगमगत होते. स्टेजच्या समोर पन्नासेक निमंत्रित पाहुणे उत्सवमूर्तीची वाट पाहत बसलेले होते. चोहीकडे उत्साहाचं वातावरण होतं. आपल्या मुलानं, सुधीरनं हा कार्यक्रम आयोजित केला असावा असं त्यांना वाटलं. कमलताईंना हे सगळंच अनपेक्षित होतं पण ह्या सरप्राइजमुळे त्या मोहरून गेल्या.
इतक्यात स्टेजवर सिल्क साडीत, कपाळावर टिकली, हातात चुडा आणि वेणी घातलेली रश्मी हातात माइक घेऊन प्रगट झाली आणि म्हणाली, “उपस्थित मान्यवरांना नमस्कार! पंचवीस वर्षापूर्वी आजच्या दिवशीच माझ्या आज्जेसासू कमलताईंनी ह्या ‘राणीज किचन’ची मुहूर्तमेढ रोवली.
इवलेसे रोप लावियेले दारी।
त्याचा वेलू गेला गगनावेरी । असा तो बहरत गेला. ‘राणीज किचन’च्या ऊर्जितावस्थेचे संपूर्ण श्रेय श्रीमती कमलताईंचेच आहे. अधिक वेळ न दवडता, आजच्या समारंभाच्या उत्सवमूर्ती श्रीमती कमलताईंना मी विनंती करते की त्यांनी आपल्या सुनेसोबत स्टेजवर यावं आणि आपलं मनोगत व्यक्त करावं. धन्यवाद.”
टाळ्यांच्या कडकडाटात कमलताईं स्टेजवर आल्या. रश्मीनं त्यांना शाल आणि श्रीफळ दिलं. त्यांच्या हातात माईक दिला.
कमलताई बोलायला उभे राहिल्या, “आज मला माझे पितृतुल्य सासरे बाळकृष्णपंत आणि माझे पती नरहरपंत ह्यांची प्रकर्षाने आठवण येतेय. माझे सासरे म्हणायचे की मुलांमुलींना सरस्वतीची उपासना करायला शिकवाल आणि सुनेला एखाद्या राणीसारखं, लक्ष्मीसारखं वागवाल तर तुमचं अख्खं कुटुंब आनंदात राहिल.
माझ्या सासू-सासऱ्यांनी मला राणीसारखंच वागवलं. ‘कमल कुठलेही कार्यक्षेत्र उत्तमरीतीने सांभाळू शकेल’ हे त्यांचे शब्द माझ्या मनात वज्रलेपासारखे कोरले गेले आणि त्या दिवसापासून माझ्यातली नकारात्मकता संपून गेली.
‘राणीज किचन’चं निमित्त झालं. नोकरदार मंडळीना स्वच्छ घरगुती जेवण पुरवता येईल आणि काही गरजू लोकांना रोजगार पुरवता येईल ह्या हेतूने मी ह्या व्यवसायात आले. बाहेरच्या ऑर्डरी येत राहिल्या. त्याच्या सोबतच नियमितपणे ऑफिसात दुपारचे डबे पाठवायचं सुरू झालं. पंचवीस डब्यापासून सुरू झालेला हा व्यवसाय आज दोनशे डब्यांपर्यंत येऊन पोहोचला आहे. ठरावीक संख्येनंतर दर्जा बिघडेल की काय, ह्या भीतीने लोकांची मागणी असतानादेखील आम्ही तिथेच थांबलो आहोत.
हे सगळं कर्तृत्व माझं आहे असं मी अजिबात मानत नाही. माझ्या सासऱ्यांनी दाखवलेली सकारात्मकता, माझ्या पतीची अनमोल साथ आणि माझी सून सुहासिनी हिचा ह्यात फार मोठा वाटा आहे. आजवर माझ्या सुनेनं सगळी नाती सांभाळत हे कुटुंब आनंदाने पुढं नेलं आहे. तिच्या रूपानेच आमच्या कुटुंबात लक्ष्मी नांदतेय.
माझे सासरे म्हणायचे, ‘उत्तर भारतीय लोक कन्येला ‘बिटियारानी’ आणि सुनेला ‘बहूरानी’ म्हणतात. मुलीला आणि सुनेला ते राणीचा मान देतात आणि आमच्या इथं काय होतं? माहेरी ‘बिटीयारानी’ असलेली कन्या सासरी आली की ‘नौकरानी’ होऊन जाते. माझी सून ह्या घरची राणी आहे ह्याचा विसर पडायला नको म्हणून मी तिला राणी म्हणूनच बोलावते.
खरं तर, आपली आई आपलं पालनपोषण करून आपल्याला मोठं करते. वयात येताच सासरच्या घरी पाठवणी करते. तिथंही सासूच्या रूपात आपल्याला आई भेटते. सासू आपली काळजी घेते.
कालांतराने आपली सून येते आणि सुनेच्या सहवासात आपण अधिक वेळ व्यतीत करतो. आपल्या वृद्धापकाळात सूनच आईसारखी आपली काळजी घेते, सेवा करते. आईवडिलांचं घर सोडून दुसऱ्या घरची एक ‘बिटियारानी’ आपल्याकडे येते, आपला वंश पुढे नेते तर मग आपणही तिला सुरूवातीपासूनच राणीसारखं वागवायला नको का?
अर्थात ज्या राण्यांनी कुठल्या ना कुठल्या कारणासाठी आपलं स्वत:चं असं वेगळं राज्य स्थापन केलंय मी त्यांच्याविषयी बोलत नाहीये. मी तशी खूप भाग्यवान आहे. देवानं मला खूप छान सून दिली आहे.
उद्यापासून ‘राणीज किचन’चे व्यवस्थापन आमच्या घरची राणी म्हणजेच माझी सून सुहासिनीकडे सोपवतेय. मी ‘राणीज किचन’ पाहत असताना ती घर सांभाळायची पण आता माझी नातसून दुसरीकडे नोकरी करते आहे. बघू या, भविष्यात काय वाढून ठेवलं आहे ते. आमच्या पाठीशी तुम्हा सगळ्या तृप्त जीवांचे आशीर्वाद सदैव असू द्यावेत, एवढीच माझी प्रार्थना आहे. नमस्कार !”
कमलताई स्टेजवरच्या खुर्चीत स्थानापन्न होताच रश्मीने माईक घेतला. आज्जेसासूकडे पाहून हसत म्हणाली, “आज्जी ! मी नोकरी सोडून तुमच्या नातवासोबत इकडेच आलेय. जे काही करायचं ते आम्ही इथंच करू. मी तुमच्या सेवेला आणि माझ्या सासूबाईंच्या मदतीला असेन. कारेकरांच्या पुढच्या पिढीतल्या राणीचा मान माझाच आहे.”
त्यानंतर तिने विनम्रपणे आज्जेसासूंना नमस्कार केला. नातसुनेला तोंड भरून आशीर्वाद देताना कमलताई गहिवरल्या, त्यांच्या डोळ्यांच्या कडा नकळत ओलावल्या.
कमलताईंच्या जवळचे सगळेच नातेवाईक रौप्यमहोत्सवी सोहळ्याला जमले होते. हे सगळं कसं काय शक्य झालं ह्याचं गूढ त्यांना उकलेनासं झालं. तितक्यात कमलताईंच्या हातात पाकिट देत सुधीर म्हणाला, “आई, डिलीव्हरीसाठी ते लोक आले आहेत. हे ऑर्डरचे राहिलेले बाकीचे पैसे !”
“सुधीर राजा, ऑर्डर कुणाची होती ते सांगितलं नाहीस!” पाकिट हातात घेत कमलताईंनी विचारलं.
सुधीरनं हळूच त्यांच्या कानात सांगितलं, “आई, आजच्या ह्या कार्यक्रमाला उपस्थित असलेल्या निमंत्रितांच्यासाठी दिलेली जेवणाची ही ऑर्डर आहे. आणि ही ऑर्डर कारेकरांच्या पुढच्या पिढीतल्या राणीसाहेब रश्मींची आहे. मी त्यात फक्त मदतनीसाचं काम केलं आहे.”
कमलताई कातर आवाजात बोलल्या, “राणी, मानलं ग तुझ्या निवडीला. तुझी सून तर माझ्या सुनेपेक्षाही सरस निघाली आहे! मी तुझ्या सुनेचा विनाकारण दुस्वास केला पण तिनं मात्र ह्या आज्जेसासूचं मन प्रेमानेच जिंकून घेतलं हो..”
कमलताईंच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. त्याचवेळी हॅट्स ऑफ टू कमलताई! हिप-हिप हुर्रे !! ह्या निनादात अख्खा मांडव दणाणून गेला होता.
— समाप्त —
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈