डॉ. ज्योती गोडबोले 

? जीवनरंग ❤️

☆ गुड टच बॅड टच… – भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले 

(मला अजून आठवतं, सकाळी मी जी लवकर उठून कामाला जुंपायची ती रात्रीच उशीरा पाठ टेकायची अंथरुणाला. जावा सतत  बाळंतिणी. मी बरी होते  हमाल फुकट राबणारा !) – इथून पुढे — 

“अशाच एकदा  मोठ्या जाऊबाई बाळंतीण होत्या. रात्र झाली की सगळ्यांच्या खोल्यांची दारं लागलेली आणि मी माझ्या अंथरुणावर तळमळत पडलेली ! माजघरात ! शेजारी  लहान मुलगा म्हणजे तुझा बाप!मला कुठली ग वेगळी खोली ! त्या रात्री मला  गाढ झोप लागली होती. अचानक माझ्या तोंडावर कोणीतरी हात दाबला आणि माझ्या लुगड्याशी कोणाचे तरी हात आले.मी जीव खाऊन त्या हाताला चावले.इतकी जोरात की रक्तच आलं. रात्रभर मी जागी राहिले.सकाळी उठून बघितलं तर मोठ्या भावजींच्या हाताला बँडेज बांधलेलं. मी हे सासूबाईंना सांगितलं. त्यांनी काय सांगितलं माहीत नाही पण दोन दिवसात भावजी आणि जाऊबाईंनी वेगळं बिऱ्हाड केलं. सासूबाईंनी मला वेगळी खोली दिली आणि म्हणाल्या लक्ष्मी,आतून कडी लावत जा हो!.उपकार हो त्या माऊलीचे! असे अनेक प्रसंग आले ग बाई. पण मी धीट आणि खमकी म्हणून निभावून गेले त्यातून ! शेवटी बाई ती बाईच ग मानू ! मग ती शिकलेली असो किंवा अडाणी ! तिनेच तिला जपायला नको का? मरताना सासूबाईंनी हा वाडा माझ्या नावावर केला म्हणून मी आज इथे सन्मानाने रहातेय. मला निदान पोटापुरतं भाडं येतं. मी विधवा झाले तेव्हा तुझा बाप 3 वर्षाचा होता. माझं वय असेल पंचवीस का तीस ! कसे काढले असतील दिवस सांग? “ आजीच्या डोळ्यात पाणी आलं. “ मी तुम्हाला फटकळ, बोलभांड वाटते पण त्यामुळेच मी पुरुष जातीला लांब ठेवू शकले. तुम्हीही धडे घ्या “. मानसीला हे सगळं आठवलं. 

आजी कालवश झाली आणि आता मानसी स्वतः आजी झाली. रात्री अक्षी झोपल्यावर अल्पना आणि मानसी  झोपाळ्यावर बसल्या.मानसी म्हणाली,  “अक्षीने ते पत्रक दाखवल्यावर काळजात चर्रर्र झालं बघ अल्पना.  शेवटी कोवळं मूल ग ते. आपण त्याला हे सांगायला हवं, घाणेरडे पुरुष स्पर्श, किळसवाणी जवळीक. इथे तर हा धोका आणखीच आहे. तुमची लांब लांब अंतरं, ही अजाण कोवळी मुलं बस मधून येणार ! ते  काळे गोरे बस ड्रायव्हर, आणि सगळे उतरून गेल्यावर एखादे मागे रहाणारे मूल ! काहीही होऊ शकतं इथं. म्हणून हल्ली भारतात पण बसमध्ये कोणीतरी पालकआई असतेच. नियम केला हा सगळ्या  शाळांनी! मुलांच्या आया हे काम व्हॉलंटरी करतात. म्हणजे मुलं सुरक्षित रहातात आपली. अशा घटना घडल्या असणार ग भारतातही ! तुला आठवतं का अल्पना, तू इंजिनिअरिंगला होतीस. किती तरी वेळा तू रात्री उशीरा घरी यायचीस. तुझे  प्रोजेक्टस असत किंवा काही इतर असेल. आपला बंगला तसा एकाकीच ! तू येऊन गेट बंद करेपर्यंत मला झोप नसायची. मी अनेक वेळा तुला खूप ओरडलेही आहे ना,की सांगून जात जा, फोन करत जा ग !आम्ही काय समजायचं तू कुठेआहेस? ते कॉलेजसुद्धा किती लांब ग घरापासून !

जीव थाऱ्यावर नसायचा माझा तू दिसेपर्यंत ! तुला कुठे त्याचं काय वाटायचं? ‘कोण काय करणारे आई मला? किती ग काळजी करतेस आणि बंधन  घालतेस माझ्यावर’ असं म्हणायचीस ! केल्यावर बोलून काय उपयोग ! पण त्या वेड्या वयात हे समजत नाही.तुलाही आईची कळकळ समजली नाही !आता समजलं का, स्वतःची मुलगी हे पत्रक घेऊन आल्यावर? “ मानसी हसली. अल्पनाला पण हसू आलं.तेवढयात तिथे आमोद येऊन बसला !

“येऊ का? काय चाललंय माय लेकीचं हितगूज?” आमोदला अल्पनाने अक्षीने आणलेल्या पत्रकाबद्दल सांगितलं. आमोद आपल्या लेकीबद्दल अतिशय हळवा होता. “अग अल्पना, तुला मी सांगायला विसरलो. आपली अक्षी बघ पूर्वी त्या  प्रीस्कूल कम डे  केअरला जात होती ना? आपल्याला ते फार लांब पडायला लागलं म्हणून आपण ते बंद केलं बघ ! “ “ अरे हो की ! त्याचं काय?” अल्पनाने विचारलं. “ अग ऑफिस मधल्या विवेकची छोटी मुलगी रिया तिकडे जात होती. मागच्या आठवड्यात सकाळी अचानक विवेकला फोन आला, डे  केअर बंद झालंय आणि तुमची मुलगी पाठवू नका.अचानक सकाळी हा फोन आल्यावर काय धावपळ झाली विवेक आणि त्याच्या बायकोची ! रजा घेऊन बसावं लागलं तिला घरी. मग दुसरं चांगलं डे  केअर मिळेपर्यंत हालच झाले दोघांचे ! आता मिळालं दुसरं.” “ हो का? पण काय झालं रे असं अचानक बंद  व्हायला? “ अल्पनाने विचारलं.  “ अग, तुला आठवतं का ? एक तरुण मुलगा होता बघ तिकडे.. मिस्टर जॅक?चांगला होता तो ! किती प्रेम करायचा मुलांवर! आपल्याला कधी  शंका तरी आली का तो असा असेल? त्याने तीनचार वेळा लहान मुलांना  ऍब्युज केलं म्हणे..त्या मुलांनी आपल्या पेरेन्ट्सकडे तक्रार केली आणि ताबडतोब ते डे केअर एका दिवसात बंद केलं.”  तरीच ऑफिसला जाताना मला तिथे पोलीस,  पोलीस व्हॅनस् दिसल्या. ही अमेरिका आहे बरं ! त्याला लगेच अटक झाली आणि तो जेलमध्ये गेला ! इकडे असल्या गोष्टी खूप गांभीर्याने घेतात आणि ते चांगलंच आहे.त्याला कमीतकमी दहा वर्षाची शिक्षा होणार बघ.” आमोद म्हणाला. मानसी अल्पना म्हणाल्या,” कठीण आहे रे बाबा ! कसं व्हायचं आपल्या या कोवळ्या बाळाचं? समाज किती विकृत आहे ना ! “  “ हो आहेच !” मानसी म्हणाली,” मी मेडिकल कॉलेज मध्ये शिकत होते ना, तेव्हाही किती वाईट रुपं बघितली आहेत ग विकृत लोकांची ! लहान पाच वर्षांच्या मुलीवर बलात्कार करणारे नराधम मी  बघितले. त्या बाळाला इतक्या वाईट रीतीने जखमा झाल्या होत्या की ते वाचू शकलेच नाही ग त्या अत्याचारातून ! मी लहान मुलांवर झालेले अत्याचार, बलात्कार बघितले आहेत.  एवढंच कशाला, कोणत्याही वयाच्या बाईवर अत्याचार करणारे लोक मी बघितले आहेत. इतके वाईट  असायचे ते दृश्य आणि त्या वाईट फाटलेल्या जखमा ! आम्हीही तेव्हा शिकत होतो, पण तेव्हापासून ही पाशवी वृत्ती आहे समाजात ! म्हणून तर आपल्या मुलीला मुलाला सावध करायचं आपणच ! उद्या आपल्या अक्षीला आपण  मानवी शरीराचा तक्ता दाखवू , सगळ्या ऑर्गन्सची चित्रं दाखवू आणि नीट सगळं समजावून सांगू. म्हणजे ती सावध राहील.” आमोद म्हणाला “ आई,हे काम तुम्हीच जास्त चांगलं कराल. मी आणि अल्पना तिथे थांबूच ! पण एक डॉक्टर म्हणून आणि अर्थात अक्षीची लाडकी आजी म्हणूनही हे काम तुम्हीच करायचं.” मानसीने मान डोलावली आणि आमोदला म्हणाली “ हो मी हे करीनच ! मला तेवढे मी सांगते ते चार्ट्स द्या गूगल वरून प्रिंट करून ! “ आमोद आणि  मानसी त्यांच्या ऑफिसमध्ये गेले आणि जिच्यासाठी हे सगळं करणार, ती अक्षी मात्र निरागसपणे गाढ झोपली होती.

– समाप्त –

© डॉ. ज्योती गोडबोले

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
5 1 vote
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments