श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
☆ जीवनरंग : लघुकथा – गोमाता (भावानुवाद) ☆ श्रीमती मीनाक्षी सरदेसाई ☆
त्या म्हाताऱ्या गाईचे गल्लीमध्ये जे हाल होत होते, ते सगळ्यांना दिसत होते.पण विरोधी बोलून संकट कोण ओढवून घेणार?
——–ही गाय म्हणजे तीच ,की जिला काही वर्षांपूर्वी ‘पटेल’नी खरेदी करून आणली होती. ते गाईचं खूप खूप कौतुक करत होते अगदी न दमता.10लीटर दूध द्यायची, दूध, दही, तूप सर्वानी भरपूर खाऊनसुध्दा, रतीब घातले नि एका वर्षांतच तिची किंमत पटेलानी वसूल केली.
हळूहळू सगळ्या गल्लीचीच ती लाडकी गोमाता झाली. सगळे तिला लाली किंवा कपिला या नांवाने बोलावू लागले. गल्लीतल्या प्रत्येक चौकात पहिली चपाती लालीच्या नांवानें भाजली जाऊ लागली.पटेल लालीला सकाळ संध्याकाळ गल्लीत फिरवून आणायचे. लाली सगळ्यांची अतिशय लाडकी झाली होती.
पटेलांच्या गोठ्यात गाईला वासरंही खूप झाली. त्यातूनही पटेलाना बराच पैसा मिळाला. परंतु कुठपर्यंत? कालचक्र फिरत असतं.लाली म्हातारी झाली. ती दूध देईनाशी झाली. मग तिला पेंडच काय , हिरवा सुखा चाराही मिळेनासा झाला. अशा तर्हेच्या म्हाताऱ्या जनावरांना भाकड म्हणतात. म्हैस भाकड होते तेव्हा तिला कसायाला विकून शेवटची कमाईही वसूल करून घेतात.पण लाली तर गाय होती. गो माता.
काही संस्कार, बरीचशी लोकलज्जा, त्यामुळे घरातून हाकलून देऊ शकत नव्हते.खुंटाला बांधूनही नाही ठेवल पटेलांनी. तिला कळलं ,तेव्हा ती गोठ्यात बसून रहायची, किंवा गल्लीत फिरत असायची. बिचारी गो माता, लाडकी गो माता. भुकेने आणि तहानेने व्याकुळ गो माता.नुसता हाडांचा सापळा राहिला तिचा. चालताना तिचे पाय लटपटत.थंडी़, ऊन्ह, पाऊसाचा मारा सहन करीत, चारापाण्याचा शोध घेत निराश होऊन ती दिवसातून एकदा तरी मालकांच्या घरी जाऊन येते. पण आता तिथे तिची गरज कोणालाच नाही. पटेल तर ती आली की हाड, हाड करून हाकलून देतात. त्यांचं हाडहाड ऐकून गो माता तोंड फिरवते.—
मूळ हिंदी लघुकथा-‘गौ माता’ – लेखक – सुश्री नीता श्रीवास्तव, महू, म.प्र.
मो.9893409914
मराठी अनुवाद – श्रीमती मीनाक्षी सरदेसाई
मो. – 8806955070
≈ संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈