श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “समता सोसायटी …” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
“साहेब,मला आपला फ्लॅट भाड्याने पाहिजे.”
“चाचा,सकाळीच चेष्टा करताय की काय!!,भाडं परवडणारं नाही आणि तुम्ही तर या सोसायटीमध्ये..”
“माझं काम आणि हा व्यवहार दोन्ही गोष्टी वेगळ्या आहेत.आम्हांला भाड्याची अडचण नाही”
“चाचा,स्पष्टच सांगतो.राग मानू नका.तुम्हांला फ्लॅट देऊ शकत नाही.कारण विचारू नका.प्लीज …”
फोन कट झाला.
“बघितलं.हे दुतोंडी सभ्य, शिकलेले लोक.मोठमोठया गप्पा मारायच्या आणि स्वतःवर वेळ आली की…….” हताशपणे चाचा म्हणाले.
दोन महिन्यांपासून सोसायटीत भाड्याने फ्लॅट घेण्यासाठी चाचांची धडपड चालू होती. तीन-चार ठिकाणी विचारणा केली पण सगळीकडून नकार आला. प्रश्न पैशाचा नव्हता तर चाचा करीत असलेल्या कामामुळे नकार मिळत होता. सोसायटीत इतकी वर्षे इमाने- इतबारे काम करून सुद्धा अशी वागणूक मिळत होती म्हणून चाचा दुखावले. या सोसायटीत फ्लॅट घेऊन रहायला यायचेच हे मनोमन ठरवले आणि प्रयत्न सुरु ठेवले. अपेक्षेप्रमाणे नकार मिळत होताच पण चाचांनी हार मानली नाही आणि एके दिवशी अनपेक्षितपणे होकार मिळाला. देशमुख फॅमिली नवीन घरात शिफ्ट होणार होती.चाचा देशमुखांना भेटले आणि कोणतेही आढेवेढे न घेता देशमुख तयार झाले. व्यवहार पक्का झाला. ना हरकत प्रमाण पत्रासाठी देशमुखांनी कमिटीकडे अर्ज केला आणि वादाला तोंड फुटले. देशमुखांच्या नवीन भाडेकरूविषयी संमिश्र प्रतीक्रिया आल्या.जास्त करून नकारात्मकच होत्या. अनेकांना हा निर्णय मान्य नव्हता.सभासदांच्या तीव्र भावनांचा विचार करून अध्यक्षांनी तातडीची मिटिंग बोलावली.
ऐन थंडीच्या दिवसात सोसायटीच्या टेरेसवर मिटिंग सुरु झाली.एका बाजूला विरोध असणारे सभासद तर दुसऱ्या बाजूला देशमुख. काहीजण मात्र तटस्थ होते.
“देशमुख.पुन्हा एकदा सांगतो.विचार करा”एका चिडलेल्या सभासदाने डायरेक्ट विषयाला सुरवात केली.
“आता पुन्हा कशाला विचार करायचा.निर्णय तर केव्हाच झाला.” देशमुख.
“सोसायटीची बाजूपण समजून घ्या.”
“फ्लॅट कोणाला भाड्याने द्यायचा हा तुमचा खाजगी प्रश्न आहे.सगळं नियमानुसार आहे तरीही…”
“पुन्हा तेच.नवीन भाडेकरू सर्वांना चांगलाच माहिती आहे.त्यांच्याकडून सोसायटीला काहीही त्रास होणार नाही.याची खात्री आहे”देशमुख.
“चाचांबद्दल प्रश्नच नाही. इतकी वर्षे झाली त्यांच्या कामाविषयी एकही तक्रार नाही”
“तक्रार,अहो मागे एकदा चाचा आठवडाभर सुट्टीवर होते तेव्हा बदलीवर आलेल्या माणसामुळे किती त्रास झाला हे चांगलंच माहिती आहे. चाचा म्हणजे एकदम भला माणूस. कामाला एकदम चोख”
“हो,ना कोणाच्या अध्यात नाही की मध्यात नाही. आपण बरं की आपलं काम”
“बघा.माझ्या मनातलं सगळं तुम्हीच बोलून दाखवलं. साधा सरळ व्यवहार आहे. अपेक्षित भाडे द्यायला चाचांची तयारी आहे. त्यामुळे आमच्यातल्या व्यवहाराला काहीच अडचण नाही” देशमुखांनी पुन्हा एकदा निर्धार जाहीर केला.
“जगात फ्लॅट भाड्याने घेऊन राहणारे हजारो लोक आहेत. कोणालाही द्या पण चाचांना नको”
“उलट मी म्हणतो अनोळखी माणसांना देण्यापेक्षा चाचांना द्यावा” देशमुख.
“अहो,त्यांच्या घरात भरपूर माणसे आहेत.जागा अपुरी पडेल”
“तो त्यांचा प्रश्न आहे.आपण कशाला त्यात पडायचे”.. देशमुख
“तुम्ही उगीच हट्ट करीत आहात.फायनल सोल्युशन सांगतो फ्लॅट मला भाड्याने द्या.जो व्यवहार ठरला आहे त्यापेक्षा पाचशे जास्त भाडे देतो”एक सभासद भडकले.
“अहो,काहीही काय बोलताय?आपल्याला कशाला हवाय फ्लॅट ??” भडकलेल्या सभासदांच्या सौ.ने त्यांना दटावले.
“या देशमुखांचे वागणं विचित्रच आहे.इथं गोंधळ घालून स्वतः चालले आहेत दुसरीकडे रहायला आणि सगळे एवढं समजावत आहेत पण यांची गाडी चाचांच्या स्टेशनावर अडकली आहे.” सभासद आजी कुरकुरल्या.
थंडी असली तरी मिटिंगमधले वातावरण तापले होते.एकीकडे सभासदांचा पारा वाढत होता तर दुसरीकडे देशमुख नेहमीप्रमाणे शांत होते. कोणीच मागे हटायला तयार नव्हते.
“आपण लोकशाही पद्धतीने मतदान घेऊ”
“नवीन पायंडा पाडू नका. माझा फ्लॅट कोणाला भाड्याने द्यायचा हा निर्णय सोसायटीने घेऊ नये.
सोसायटीचा संबंध फक्त ना हरकत प्रमाणपत्र देण्यापुरता आहे. तेव्हा प्लीज..” .. देशमुख.
“सर्व कमिटीचा विरोध असताना हा हट्ट बरोबर नाही. त्याच्यामुळे सगळ्यांना त्रास होणार आहे.”
“त्रास????मला वाटलं सोसायटी या निर्णयाचे कौतुक करेल. पण इथं भलतंच झालं आणि सगळ्याच सभासदांचा विरोध नाहीये.” .. देशमुख.
“ज्यांना त्रास नाही ते कशाला विरोध करतील. तुमचा फ्लॅट आमच्या मजल्यावर आहे. त्यामुळे सगळ्यात जास्त त्रास तर आम्हांला होणार आहे.”
“आणि आमचं काय हो !! चाचा तर शेजारीच रहायला येणार”
“एक मिनिट. इतकावेळ चाललेली चर्चा ऐकली. कमिटीचा अध्यक्ष या नात्याने माझं मत सांगतो. देशमुखांच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे. सर्वांना विनंती आहे की माणुसकीच्या नात्याने विचार करा”
“अहो,चाचा आपल्या सोसायटीत रात्री वॉचमनचे काम करतात आणि दिवसभर सगळ्या बिल्डींगचा कचरा उचलण्याचे व साफसफाईचे काम करतात.”
‘जसं तुम्ही आयटीमध्ये, तुम्ही बँकेत आणि तुम्ही पेशंट तपासण्याचे काम करता तसंच चाचा काम करतात. त्यांचे काम आणि आमच्यात होणारा व्यवहार याचा परस्पर काहीही संबंध नाही” देशमुख.
“ते माहितीय हो, पण तरीही कचरेवाला सोबत राहायला येणार म्हणजे जरा ….”
“अहो, कचरेवाले आपण आहोत. चाचा तर साफसफाई करतात. दिवसातले जवळपास पंधरा तास चाचा सोसायटीतच असतात. स्वतःच्या घराइतकीच सोसायटीची काळजी घेतात.”
“एकदम बरोबर बोललात, कुठल्या जगात आहात. स्वतःला मॉडर्न समजतो आणि स्मार्ट फोन,लॅपटॉप वापरतो आणि एवढा मागासलेला कद्दू विचार करतो. उलट चाचा आपल्या इथं राहायला येणार ही अभिमानाची गोष्ट आहे,”
“चाचा अनेकवर्षे जवळच्या वस्तीत राहतात. मोठा मुलगा रिक्षा चालवतो तर धाकटा आयटीत आहे. घरात कमवणारे हात वाढल्यामुळेच नातवंडांच्या भवितव्याचा विचार करून चाचांनी घर बदलण्याचा निर्णय घेतला.” .. देशमुख.
“चाचांची परिस्थिती आहे आणि नियमानुसार ते सोसायटीत रहाणार आहेत यात वावगं काहीच नाही. मला वाटतं इथं प्रोब्लेम चाचांचा नाहीये. खरा प्रोब्लेम आपलाच आहे”
“म्हणजे ? ”.. अध्यक्ष
“वर्षानुवर्षे चालत आलेल्या आपल्या मनोवृत्तीचा हा प्रोब्लेम आहे. काळानुसार रहाणीमान,कपडे,खाण-
पिणं सगळं बदललं, पण मनातले विचार, खोलवर रुजलेल्या समजुती त्या बदलल्या नाहीत. बोलण्यात असलेली समता कृतीमध्ये आणायची वेळ आली की मग असे वाद सुरु होतात.”
“प्रामाणिक आणि मेहनती माणूस म्हणून चाचांना अनेक वर्षापासून ओळखतो.कष्ट करून ते आपल्यासारखे आयुष्य जगत आहे अशा माणसाला विरोध कशासाठी???तर ते करीत असलेल्या कामामुळे?? हे योग्य नाही” .. देशमुख.
“हे साफ चूक आहे.देशमुख. मी तुमच्या निर्णयाचं स्वागत करतो. कामाचा निकष लावायचा तर सोसायटी मधील सगळ्याच बिल्डींगमध्ये बरेच बदल घडतील. तेव्हा त्याविषयी न बोललेलं बरं”
“आपल्या एरियातला भाई हा गुंड,उद्या जर त्याने सोसायटीत फ्लॅट विकत घेतला तर आपण विरोध करणार का?? कोणामध्ये हिंमत आहे??आपण सगळे मध्यमवर्गीय मनातल्या मनात चडफड करून निमुटपणे सहन करू. हे चाचा तर आपलेच आहेत.देशमुखांच्या निर्णयाला माझा पाठींबा आहे”
“मी काही फार मोठे आणि जगावेगळ काम करत नाहीये.आपण जसं मुलांच्या भवितव्याचा विचार करतो त्याचप्रमाणे चाचांनी एवढा मोठा निर्णय घेतला आहे. खरंतर ही आपल्यासाठी सुद्धा फार मोठी संधी आहे. जगाला दाखवून देऊ की सोसायटीतील लोक फक्त नावातच नाही तर वागण्यामधून सुद्धा समता पाळतात.” देशमुख बोलायचे थांबले. कोणीच प्रतिक्रिया दिली नाही.सगळे एकमेकांकडे पाहत होते.
“देशमुख,आता चर्चा बस झाली.उद्या ना हरकत प्रमाणपत्र घेऊन जा” अध्यक्षांनी जाहीर केले.
“एक मिनिट. चाचा आमच्या शेजारी रहायला येणार आहेत म्हणून…” पुन्हा एकदा तणावपूर्ण शांतता.
“म्हणून काय????” अध्यक्षांनी विचारलं.
“माझी एक अट आहे.ती सोसायटीला पूर्ण करावीच लागेल. फ्लॅट जरी देशमुखांचा असला तरी चाचांना किल्ली मी देणार आणि हे फायनल आहे. काय देशमुख”
“मान्य. चाचा,अभिनंदन.
सगळे तयार झाले. “ आता चहा पाहिजे” देशमुखांनी मोबाईलवरून चाचांना माहिती दिली.
काही वेळाने साठीपार केलेले, पांढरा पायजमा, फुल बाह्यांचा ढगाळ शर्ट, गांधी टोपी घातलेले, गोल चेहरा आणि मोठाले डोळे, जाडजूड पांढरी मिशी, खुरटी पांढरट दाढी ,जेमतेम पाच फुट उंची आणि भक्कम शरीरयष्टीचे चाचा चहाची किटली हातात घेऊन टेरेसवर आले.
“वा,जियो चाचा, चहाचं नाव काढलं आणि तुम्ही चहा घेऊन आलात. या, माझ्याशेजारी बसा” .. अध्यक्ष.
चाचांना पाहिल्यावर सगळ्या सभासदांनी टाळ्या वाजवून स्वागत केलं.
अनपेक्षितपणे झालेल्या स्वागतामुळे चाचा गडबडले.
“चाचा,वेल कम”सगळ्यांनी चहाचे कप उंचावले. तेव्हा
चाचांनी हात जोडून आभार मानले.
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈