डाॅ. शुभा गोखले
🌸 जीवनरंग 🌸
☆ एकाकीपणा विकत घेणे आहे – लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद ☆ प्रस्तुती – डाॅ. शुभा गोखले ☆
निमिषच्या फोनवर मेसेज आला ‘ फिरायला जायचं आहे, येशील का ? वेळ संध्याकाळी पाच ते सात.’ त्याने चटकन yes रिप्लाय केला. त्याने पत्ता पाठवला. त्याने वॉकिंगच्या स्मायली टाकल्या. आईची चाहूल लागली की फोन बंद केला. आई बघत राहिली. काही विचारावेसे वाटले; पण त्याचा मुड जाईल म्हणून गप्प बसली. चहा घेणार ? विचारले तर मानेनेच नकार दिला. आई निघून गेली.
हल्ली सतत हेच चालले होते. संध्याकाळी 4 नंतर तो जायचा ते 11 पर्यंत यायचा नाही. आईला काळजी वाटायची. सरळ साधा, हळवा, प्रेमळ असणारा निमिष पदवी मानसशास्त्रात घेतली होती. पण नोकरी मिळत नव्हती. कोणताही व्यवसाय करावा तर त्याला भांडवल देण्याची ऐपत नव्हती. नोकरी नाही तर छोकरी नाही हे व्यवहारी गणित त्यांच्याबाबतीत जुळून आलेले. वडीलही कापडाच्या दुकानात काम करत होते. आई डबे करत असे.
त्याच्या बाहेर जाण्याचे गूढ वाढत चालले होते. आईला आता काळजी वाटू लागली की हा रोज कुठे जातो. ह्याला काही वाईट संगत लागली की काय ? असे वाटू लागले होते. आज काल वाट्टेल ते ऐकायला येत होते. अगदी मुले पैसे मिळवण्यासाठी वाट्टेल ते करतात त्या सर्व वाईट गोष्टी वाटून गेल्या. स्मगलिंगपासून जिगेलोपर्यंत सगळ्या शंका डोकावून गेल्या. त्याचे काय चालले आहे ते कळत नव्हतं. आजही तो बाहेर पडला की निमिषची आई, सुहृदाने बाबांना, सुमितला फोन केला. आजही निमिष न सांगता गेला. आजही कुणाचा तरी मेसेज आला आणि तो गेला. मला त्याची फारच काळजी वाटू लागली म्हणाली. बाबा म्हणाले “ तो जोपर्यंत काही सांगत नाही तोपर्यंत आपण ही बोलायचे नाही. तो वाईट मार्गाला जाणार नाही याची खात्री आहे. तू शांत रहा मी आल्यावर बोलूया “आणि फोन ठेवला.
फोन ठेवला खरा पण काळजी तर त्यांनाही वाटत होतीच दुकान मालकाला सांगून आज लवकरच बाहेर पडले. नेहमीची बस मिळाली नाही म्हणून थोडे वाट पहात झाडाखाली थांबले. एवढ्यात त्यांना निमिष दिसला. त्याला हाक मारावी म्हणून तोंड उघडणार एवढ्यात त्यांना त्याच्याबरोबर एक वयस्कर बाई दिसली. तिच्या सोबत हा चालला होता. ती बाई त्याच्यासोबत बरीच ओळख असल्यासारखी बोलत होती. ते गप्प बसले. त्याचे ह्यांच्याकडे लक्ष नव्हते, ती दोघे निघून गेली. बाबांना काहीच कळेना. ह्या बाई कोण ? तसेच घरी आले. निमिष आलाच नव्हता. पत्नीला काही बोलले नाहीत.
दोन दिवस गेल्यावर त्यांचा एक मित्र म्हणाला, “ परवा निमिषला मॉलमध्ये बघितले एका महिलेसोबत. तुझा विश्वास बसणार नाही म्हणून फोटो काढून आणला. बघ जरा ह्या कोण आहेत. तुमच्या बऱ्याच नातेवाईक स्त्रिया मला माहिती आहेत. ह्या वेगळ्याच वाटल्या. त्यांनी फोटो पाहिला. त्या दिवशीच्या बाईपेक्षा ही वेगळीच होती.” आता मात्र ते चक्रावले पण तसे दाखवले नाही. त्याला म्हणाले ? हो, ह्या तुला माहिती नाहीत. पत्नीकडच्या आहेत.” घरी गेल्यावर पत्नीशी बोलायचे ठरवले.
घरी आल्यावर सुहृदाला म्हणाले, “ मला तुझ्याशी बोलायचे आहे;” तर ती म्हणाली “ आधी मला बोलू द्या. आज माझी मावशी नाटकाला गेली होती. तिथे तिला निमिष vip रांगेत बसलेला दिसला. ह्याने तिला ओळख दिली नाही. जाताना मोठ्या गाडीने निघून गेला. तिने बघितले. एवढी मोठी गाडी घेतली आम्हाला बोलली नाहीस असे म्हणून ती रागावली व फोन बंद केला. आता मात्र हद्द झाली. हा काय करतो ते आज कळलेच पाहिजे.” एवढ्यात बाबांचा फोन वाजला मालकांचा होता. घरी अर्जंट पत्नीसह बोलावले होते. बाबा म्हणाले आधी जाऊन येवू मग बोलू.
मालकाच्या घरी मोठी पार्टी सुरू होती. सर्वांना आमंत्रण दिले होते. घरात देखरेखीसाठी विश्वासू असल्याने ह्यांना बोलवले होते. मालकांच्या वडिलांचा सहस्त्र चंद्रदर्शन सोहळा होता. सगळी तयारी झाली होती. आता त्यांची एन्ट्री होणार म्हणून सगळे त्यांच्यावर फुले टाकायला उभे राहिले होते. शानदार गाडी, दाराशी आली त्यातून उतरला तो निमिष. त्याने आजोबांना धरून उतरवले. सुमित व सुहृदा त्याला तिथे बघून चमकले. काहीच बोलले नाहीत. सोहळा पार पडला. सगळे घरी जाण्यासाठी निघाले. निमिषला आजोबा म्हणाले, “ तू आपल्या गाडीने जा, रात्र झाली आहे.” त्याने बाबांना जाताना पाहिले. त्यांना थांबवले. ‘ गाडीतून जाऊ ‘ म्हणाला. सुमितला वाटले ह्याने मालकांच्या वडिलांच्या केअरटेकरची नोकरी पत्करली आहे. त्यांचा स्वाभिमान दुखावला होता.
पण आजोबांनी निमिषचे कौतुक करायला सुरुवात केली. ते म्हणाले, “ तू फार भाग्यवान आहेस की हा तुझा मुलगा आमच्यासारख्या वृध्द एकाकी लोकांचा आधार बनला आहे.” सुमितला कळेना हे काय बोलत आहेत. आजोबा म्हणाले, “ हा तुझा मुलगा जे काम करत आहे, त्याचे खूप मोठे पुण्य त्याला मिळणार आहे.” त्यांनी विचारले, “ तुम्ही ह्याला कसे ओळखता, तुमची ह्याची भेट कशी झाली ?”
त्यावेळी निमिष म्हणाला मी सांगतो बाबा ऐका….. “ मी कामाच्या शोधात खूप फिरत होतो. त्यावेळी मला तऱ्हेतऱ्हेच्या माणसांशी गाठ पडली. मी असेच काम मिळेना म्हणून हताश होऊन बागेत बसलो होतो. तेथे एक आजी येवून बसल्या. सुरुवातीला मला राग आला. त्यांनी माझी चौकशी केली. मी फक्त हो/ नाही करत राहिलो. त्याच त्यांचे काहीबाही सांगत होत्या. बराच वेळ झाला. मग त्या म्हणाल्या ‘ माझा नातू तुझ्याएवढाच आहे. तुला बघून तोच आठवला म्हणून बोलले एवढे. तो परदेशी असतो. पती वारले आहेत. घरी मी एकटीच. दिवसभर कोणाशी बोलणार? कामाच्या बायकांव्यतिरिक्त कोणी येत नाही. कोणाशी बोलू ? मग इथे बागेत येते. कोणाशी तरी बोलत राहते. ऐकून घेणारे कोणीतरी भेटते. बोलले की जीव हलका होतो. नाहीतर खाण्याखेरीज तोंड उघडत नाही दिवसभर. बरं निघते मी. ये उद्या बोलायला असाच.”
त्या आजीशी मी फार बोललो नाही. त्याच खूप काही बोलल्या तरी त्यांना बरे वाटले आणि मला माझे काम सापडले तिथेच. मी विचार केला या जगात अशी एकाकी असणारी अनेक माणसे आहेत. त्यांना फक्त ऐकणारे कुणीतरी हवे आहे. साथ देणारे हवे आहे… सिनेमाला, नाटकाला, खरेदीला, फिरायला, खेळायला, बोलायला आणि त्यापेक्षाही ऐकायला माणूस हवा आहे. मोबाईल, टीव्ही या यांत्रिकी मनोरंजनाचा माणसाला कंटाळा आला आहे. घरात माणसे कमी, असलेली कामावर जाणारी, घरी आली की मोबाईल मध्ये तोंड खुपसून बसणारी, कुणाला कुणाशी बोलायला, बोलणे ऐकायला वेळ नाही. एखादी कलाकृती बघताना सोबत जर समान इंटरेस्ट असणारा असेल तर त्याचा आनंद द्विगुणित होतो. मी मानसशास्त्रात पदवी घेतली असल्याने हे काम करायचं ठरवलं. मग एक जाहिरात तयार केली…..
“ एकटेपणा विकत घेणे आहे…. तुमचे ऐकणे, तुम्हाला खरेदीला, नाटकाला, सिनेमाला, बँकेत जाण्यासाठी सोबत करणारा एक साथीदार मिळेल. कोणतेही अनाहुत सल्ले न देणारा, तुम्हाला जज न करता तुम्हाला सोबत करणारा, गॉसिप न करणारा, विश्वासार्ह साथीदार मिळेल.” – संपर्क क्रमांक दिला.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे मला खूप फोन येवू लागले. ह्यात मी स्वतःला काही बंधने घालून घेतली. वेळ, स्थळ माझ्या मर्जीने ठरवतो. आधी त्यांचा बायोडाटा बघतो आणि मग ठरवतो. ह्यातून अनेक चांगल्या लोकांच्या ओळखी होत गेल्या. पैसे मिळू लागले. त्याचाच एक भाग म्हणून या आजोबांशी ओळख झाली. म्हणून आज कार्यक्रमाला आलो होतो. हे मला तुम्हा दोघांना सांगायचे होते पण तुम्हाला हे आवडणार नाही असे वाटले. ह्यात काही लपविण्याचा हेतू नव्हता. त्यादिवशी मावशीला मी नाटकाला दिसलो ते असेच एका काकूंना नाटकाची खूप आवड. पतीला अजिबात नाही म्हणून सोबत केली. बाबा तुम्हालाही बघितले होते. त्या मावशींना रस्त्यावर खरेदी करायला आवडते पण घरच्यांच्या स्टेटसला शोभत नाही म्हणून करता येत नाही. मग मला बोलावले त्यांनी. आम्ही मनसोक्त खरेदी केली. एका आजीना वाचायचा नाद आहे त्यांना पुस्तके वाचून दाखवतो, तर एका मावशींना खूप बोलायला आवडते. दिवसभर घरी कोणीच नसते ऐकायला सगळे कामाला जातात, मी त्यांचा श्रोता होतो.”
“आई बाबा मी कोणतेही वाईट काम करत नाही. उलट मदतच करत आहे. तुमचे चांगले संस्कारच मला इथे उपयोगी पडतात. कुणाचा सुहृद, कुणाचा सखा, कुणाचा श्रोता, कुणाचा खरेदीचा पार्टनर तर कुणाचा खाबुगिरीतला दोस्त. माझ्याच्याने जेवढे शक्य होईल तेवढे करतो आहे. ह्याला इतका रिस्पॉन्स मिळेल असे वाटले नव्हते. पण मनुष्याच्या एकाकीपणामुळे माझ्या या व्यवसायाला उत्तम प्रतिसाद मिळत आहे.”
आई-बाबा निमिषकडे बघतच राहिले. नव्या युगातील या नव्या व्यवसायाचे कौतुक करावे की, माणूस सगळ्यात असून एकटा पडला ह्याची खंत वाटावी, ह्या द्विधा मनस्थितीत घरी परतले.
लेखिका : सुश्री ज्योती मिलिंद
पंढरपूर.
संग्राहिका : डॉ. शुभा गोखले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ.उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ.मंजुषा मुळे/सौ.गौरी गाडेकर≈