श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ म्हाई… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – ” दिपू ही यादी घे आणि वासूच्या दुकानात दे, म्हणावं आज  म्हाई येणार आमच्याकडे,.  एवढे द्या आणि पैसे लिहून ठेवा ‘.आता इथून पुढे)

दिपू यादी आणि पिशव्या घेऊन गेला. तिला अंदाज होता वासू वस्तू द्यायचा नाही. कारण गेल्या चार महिन्यापासून त्याचे बिल द्यायचे होते. पाच मिनिटात दिपू धावत आला. ” आई वासू काका म्हणतात, म्हाईच्या दिवशी आम्ही कुणाला उधार देत नाही.’ तिला अंदाज होताच. आता म्हाई यायला पाच तास बाकी होते.  एवढ्या माणसांचे  जेवणखांन व्हायलाच हवे. तिचा डावा हात गळ्याकडे गेला. गळ्यातील मंगळसूत्रात तीन चार ग्रॅम सोने होते. आता हाच एकमेव उपाय. तिला खूप वाईट वाटले. गावातील सर्वात प्रतिष्ठित मानकर यांची ही परिस्थिती. प्रतिष्ठित मानकरी  म्हाईच्या भक्तांना जेवण घालू शकत नाही? ज्या घरात कुळाकडून वसुलीसाठी  घोडे ठेवले होते, रोज दहा वीस बाहेरची माणसे जेवून जात होती, सकाळपासून चुलीवर ठेवलेले चहाचे आधन बंदच होत नव्हते, ज्या घरातील शिल्लक अन्नावर तीन चार कुटुंब रोज जेवत होती, त्या कुटुंबाची आज काय परिस्थिती? घरात रिकामे डबे या कुटुंबाच्या आश्रयावर मोठा झालेला वासू दुकानदार  म्हाईसाठी माल नाही म्हणतो॰ “.

दिपूच्या आईला रडू येत होते. हुंदक्यावर हुंदके येऊन गळ्यावर आदळत होते. पण तिने डोळे पुसले. दिपूला म्हणाली ” दिपू चल माझ्याबरोबर.’

” कुठे आई?

” रघु सोनार कितीपर्यंत दुकान उघडे ठेवतो? तिने गळ्यातील मंगळसूत्राला हात लावत विचारले.

” सहा पर्यंत ‘.

” मग चल चप्पल घाल ‘.

तिने घरात नेसलेली साडी ठीकठाक केली. डोळे कोरडे केले. केसावरून हात फिरविला आणि पायात चप्पल घातली. चप्पल घालून ती आणि दिपू चार पावले चालली एवढ्याच संज्या डोक्यावरून टोपली आणताना दिसला. ती संजय कडे पहात म्हणाली  ” काय हे संज्या?

” आईने पाठवले तुमच्याकडे,’. संजयच्या डोक्यावर जड होणारी टोपली दिपूच्या आईने हाताला धरून खाली घेतली. उतरलेल्या टोपलीकडे दिपूची आई पहातच राहिली. टोपली तीन चार किलो तांदूळ, गव्हाच्या पिठाच्या दोन पिशव्या, तेलाची पिशवी, कांदे बटाटे, वाटाणे, साखर इत्यादी होते.

” अरे हे कोणासाठी संज्या? दिपूची आई आश्चर्याने ओरडली.

” तुमच्यासाठी काकी, तुमच्याकडे म्हाई येणार ना, मग हा दिपूचे बाबा एसटीतून उतरले तेव्हा माझ्या बाबांना वाटेत भेटले. तेव्हा ते रडत होते. माझ्या बाबांना म्हणाले, ” संस्थेने फसवलं, खोटा चेक दिला,  आज आमच्याकडे म्हाई येणार, तिच्याबरोबर वीस पंचवीस लोक असणार त्यांचे जेवण करावे लागणार. घरात अन्न शिजवायला धान्य नाही ‘. माझ्या बाबांनी आईला हे सांगितलं. आई म्हणाली” संजय ताबडतोब हे सामान दिपूच्या घरी पोहोचव, आज त्यांना याची गरज आहे. गावच्या मानकऱ्यांचे घर ते. त्या घराण्याच्या जीवावर अनेक जण जेवले, मोठे झाले, आज त्यांची परिस्थिती खराब आहे. पुन्हा त्यांचे दिवस येतील. माझ्या आईने ही टोपली भरली आणि  तुमच्याकडे हे सामान पोहोचवायला सांगितलं ‘.

दिपू ची आई रडत रडत खाली बसली. ” काय हे संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू मी. म्हाई रात्री येणार खरी पण संज्याच्या आई मला खरी म्हाई तुमच्या रूपात आत्ताच भेटली.’. दिपूची आई चटकन उभी राहिली डोळे पुसले आणि पुढे येऊन संजयला जवळ घेतले. ” बाळा, माझ्यासाठी डोक्यावर टोपलीतून एवढे सामान आणलंस, तुला द्यायला लाडू पण नाही रे घरात ‘. संजाने आणि दिपू ने सर्वसामान घरात घेतले. आईने त्यांना डबे दाखवले त्या डब्यात भराभर भरले.

आता दिपूच्या आईच्या अंगात हत्तीचे बळ आले. तिने भराभर दोन चुली पेटवल्या. वाटाणे पाण्यात फुगत घातले. बटाटे कांदे चिरायला घेतले. कोथिंबीर मोडून ठेवली. एका चुलीवर तेल तापवून पुऱ्या करायला घेतल्या.

इकडे देवळात ढोलांचे ताशांचे आवाज सुरू झाले. ढम… धम..ढम, ताशांचे आवाज ताड ताड ताड, शिंग वाजले पु… उ…. पु……

.म्हाई निघाली, म्हाई निघाली, भक्तांच्या भेटीला  म्हाई निघाली. सगळ्या गावात उत्साह संचारला.

दिपूच्या आईची घाई होत होती. दोन चुली रट्टा रट्टा पेटत होत्या. तिने दोन अडीच तासात सगळा स्वयंपाक पुरा केला. आधी पूजा बाबांनी आंघोळ केली आणि सोवळे नेसून ते तयार राहिले. दिपूच्या आईच्या मदतीला शांती भाजीवाली हजर झाली तसेच शेजारची शोभा काकी पण आली. दिपूच्या आईने अंघोळ करून घेतली, आणि त्यातल्या त्यात चांगले लुगडे ती दिसली. दिपू ही आंघोळ करून तयार झाला.

साडेअकरा वाजले आणि ढोल ताशे जवळ वाजायला लागले. ढम…ढम… ढम, ताड.. ताड… ताड…., शिंग वाजू लागले. दिपूच्या बाबांनी  म्हाईला घरापर्यंत आणलं. दिपूच्या आईने सर्वांच्या पायावर पाणी ओतून त्यांना आत घेतलं. म्हाईची पालखी आत ओसरीवर आली. दिपूच्या आईने तिची ओटी भरली. पुजार्यांनी गाऱ्हाणे घातले. तीर्थप्रसाद सर्वांना दिला. मग सोबतची मंडळी विसावली. गेले कित्येक वर्षे देवीच्या मानकर यांच्या घरी सर्व भक्तांना जेवण असते. त्याप्रमाणे पत्रावळी मांडून त्यांना जेवण वाढले. दिपू च्या मदतीला शांती भाजीवाली आणि शोभा काकी पण होत्या. भराभर वाढून झाले. मंडळींनी  ” पुंडलिक वरदे ‘ म्हणत जेवणाला सुरुवात केली. वरण-भात, वाटाण्याची बटाट्याची भाजी, कोशिंबीर, शेवयाची खीर आणि पुरी. भक्त मंडळी भरपूर जेवली. सर्वांनी दिपूच्या आई-वडिलांना आशीर्वाद दिले आणि म्हाईची पालखी दुसऱ्या घरी जायला निघाली.

रात्री दिपूची आई अंथरुणावर पडली पण तिच्या डोळ्यासमोर संज्याची आई होती. संजय ची आई  म्हाई सारखी धावली म्हणून गावच्या मानकरांची अब्रू वाचली, नाहीतर……

दिपू च्या आईला झोप येईना. आज दिवसभर जो मनस्ताप झाला त्याची तिला एक सारखी आठवण येत होती.

सकाळ झाली. म्हाईच्या ढोलांचा आवाज लांब लांब ऐकू येत होता. दिपूच्या आईने डब्यात शेवयाची खीर, पुरी आणि वाटाणा बटाट्याची भाजी घेतली. आणि ती मागच्या दरवाजाने बाहेर पडली. त्याच अळीत शेवटचं घर संज्याच. संजयच्या घरी मागच्या दरवाजावर तिने टकटक केले. संजयच्या आईने मागचं दार उघडलं. तिला पाहता दिपूची आई पुढे गेली आणि तिने  संजयच्या आईला मिठीच मारली. रडत रडत ती बोलू लागली  ” संज्याच्या आई, तुमचे उपकार कसे फेडू? तुम्ही काल सामान पाठवले नसते तर गळ्यातील मंगळसूत्र मोडाव लागणार होतं. त्यात तरी काय तीन-चार ग्रॅम सोनं. पण गावातील सोनारासमोर घराण्याची अब्रू जाणार होती. सज्यांच्या आई, माझी म्हाई मला काल संध्याकाळीच भेटली.संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई “.

” असं बोलू नका दिपूच्या आई, अश्रू आवरा.’

” कशी आवरू संज्याच्या आई, रात्री आलेल्या म्हाईला आमची काळजी असती, तर आमचे कष्टाचे पैसे त्या संस्थेने बुडवले असते का, आणि ज्यांनी पैसे खाल्ले ते गाड्या घेऊन मजेत. आमची म्हाई त्यांना शिक्षा देत नाही. संज्याच्या आई, तुम्हीच माझ्या म्हाई.’.

संजयच्या आईला मिठी मारून दिपूची आई रडत होती आणि संजय ची आई तिला समजावत होती. त्यांचे बोलणे रडणे ऐकून तेथे आलेले संजय चे बाबा आणि संजय आपले डोळे पुसत होते.

– समाप्त –

म्हाई – गावदेवीची पालखीतून काढलेली मिरवणूक

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments