श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ सखी, प्रिय सखी… – भाग-२ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(मागील भागात आपण पाहिले – त्या कवितेनंतर इतर प्रवाशांनीही काही काही कार्यक्रम केले. पण ज्योतीचे त्याकडे लक्ष नव्हते. ती कविता पुन्हा पुन्हा आठवत राहिली. ‘‘बाकी उरण महत्त्वाचं, तेवढीच श्री शिल्लक’’ आहाहा काय विचार आहे सुंदर विचार आहे! आता इथून पुढे )
सर्वांचे कार्यक्रम संपले, तसे गाडीतील इतर प्रवासी डुलक्या काढू लागले. फक्त चौथ्या सीटवरील अत्रे सोडून. तो पुन्हा पुस्तकात मग्न झाला होता. तिने अत्रेंकडे पाहिले. तिच्या सीटवरुन त्याची एक बाजू दिसत होती. गोरा रंग, किंचित पांढुरके झालेले केस, काळा चष्मा, निळी जीन्स आणि पांढरा टीशर्ट. मध्यम उंचीचा असावा. मघाच्या कवितेतील ओळी आणि त्याचे अर्थ काढे काढेपर्यंत गाडी सायंकाळच्या चहा ब्रेकसाठी थांबली. एका रेस्टॉरंटच्या हिरवळीवर छोटी छोटी टेबले आणि सभोवती खुर्च्या. गाडीतील मंडळी आपआपल्या कुटुंबासह टेबलाभोवती बसली. ज्य्ाोतीची कुणाशी फारशी ओळख नव्हती. त्यामुळे ती एकटीच एका टेबलाच्या शेजारी बसली. एवढ्यात अत्रे गाडीतून सर्वात शेवटी उतरले. इकडे तिकडे रिकामी खुर्ची बघता बघता त्यांना ज्योतीसमोरची खुर्ची दिसली. त्यांनी ती खुर्ची मागे ओढली आणि तिच्याकडे पाहत म्हणाले,
‘‘नमस्ते, मी प्रविण अत्रे. मी इथे बसू शकतो का? ’’
‘‘हो, हो. बसा ना. मी ज्योती पारकर. मघा तुम्ही कविता म्हटली तेव्हा तुमचे आडनाव कळले अत्रे. आता तुमचे नाव कळले प्रविण अत्रे.’’
‘‘तुम्ही ऐकली काय कविता? आश्चर्य आहे. सध्या कुणाला कथा, कविता वाचायला ऐकायला आवडत नाही. प्रत्येकजण व्हॉटस्अप, फेसबुकवर बिझी असतो. त्याच्याकडे छोटंमोठं येत असतं ते वाचायचं आणि फॉरवर्ड करायचं.’’
‘‘नाही नाही, मी तुमची कविता लक्षपूर्वक ऐकली. आणि मला जवळ जवळ पाठ पण झाली.’’
‘‘आश्चर्य आहे !’’
‘‘म्हणून दाखवू का?’’ आणि ज्योती कविता म्हणू लागली.
पहिली ठिणगी पडते जेव्हा, विचार व्हावा पाणी
नको नको आलं माझ्या लक्षात. काय खायचं?
कर्नाटकात डोसे इडली छान मिळतात.
डोसा चालेल.
ओके.
अत्रेने दोन डोश्यांची आणि कॉफीची ऑर्डर दिली.
तुम्हाला कविता आवडतात की, तुम्ही कविता करता?
छे हो, गेल्या कित्येक वर्षात मी कवितेची एक ओळ सुध्दा वाचलेली नाही. वेळच नाही मिळाला. आयुष्यभर धावत होते. आता थोडी विसावली.
‘‘सतत धावू नये. अधुन मधून सावलीसाठी बसावे. कोकीळेचे कुहूकुहू ऐकावे, झर्याचे पाणी प्यावे.’’
ज्योतीच्या मनात आले, अत्रे किती छान बोलतात. तेवढ्यात गाडी सुरु होण्याचा इशारा आला. दोघांनी झटपट खाणे संपवले आणि गाडीत आपआपल्या जागेवर जाऊन बसली. उटीला पोहोचे पर्यंत काळोख पडला होता. हवा अतिशय थंड होती. ट्रॅव्हल्स कंपनीने एका तलावाशेजारील लॉज बुक केले होते. सर्व मंडळी झटपट प्रâेश झाली. हॉटेलवाल्याने लॉनवर शेकोटी पेटवली होती. आणि त्या भोवती खुर्च्या मांडून जेवण ठेवले होते. मस्त गरम गरम जेवण घेताना पूर्ण ग्रुप उत्साहीत झाला. ग्रुपमधील मुंबईचे वझे प्रविण अत्रेंना पाहून म्हणाले,
‘‘अत्रे, अरे काय गारवा आहे इथे, मस्त गारव्याची एखादी कविता असेल तर म्हणा.’’
प्रविण अत्रे म्हणू लागला –
तीच प्रित, तीच रात, तोच राग मारवा
तोच श्चास, तीच आस, हवा हवासा गारवा…
कवितेतील गारवा हा शब्द आल्याबरोबर ग्रुपमधील मंडळीनी एकच गल्ला केला. टाळ्याचा कडकडाट केला. ज्योतीला पण आश्चर्य वाटले. प्रविण अत्रेनी एवढ्या झटपट कविता कशी बनविली. आता वझे पुरते पेटले. अत्रे ! गारवा आला आता पुढे काय?
अत्रे पुढे म्हणू लागले –
तेच भाल, गौर गाल, पुनवेचा चांदवा
तेच अधर, अधीर तेच, तोच आहे गोडवा…
हवा हवासा गारवा….
अत्रे कविता म्हणत होते, वातावरण धुंदफूंद झाले. ज्योतीला कविता ऐकत रहायची इच्छा होती. पण हवेतील थंडी खूप वाढली. तशी मंडळी आपआपल्या रुममध्ये गेली. ज्योती झोपण्याचा प्रयत्न करत होती. परंतु मघा अत्रेंनी म्हटलेली कविता तीच्या समोर हात जोडून उभी राहिली.
तोच श्वास, तीच आस, हवा हवासा गारवा….
ज्योतीला वाटले आयुष्यातील पंचावन्न छप्पन वर्षात हृदय असे हळूवार असे झालेच नाही. आसक्ती, प्रेम वाटे पर्यंत लग्न झाले. पत्नीला मन असतं, प्रेम भावना असते हे कळेपर्यंत आई झाले. आणि पोटासाठी, मुलासाठी व्यवसायात उतरले आणि आणखी मोठे होण्याच्या नादात मनातील प्रेम भावना करपून गेली काही कळलेच नाही. ज्योतीला झोप लागली. पण झोपेतही गारवा आणि मारवा तीचा पिच्छा सोडत नव्हते. सहलीत दुसर्या दिवशी ज्योतीची अत्रेंची भेट झाली. तेव्हा ज्योती अत्रेंना म्हणाली – ‘‘तुम्हाला कविता कशा सुचतात?’’ अत्रे म्हणाले – तुम्हालाही सुचतील. तुम्ही मोठ्या कवींचे कविता संग्रह वाचत रहा. एकदा नव्हे, अनेक वेळा वाचा. त्यावेळी मन स्थिर ठेवा. काही कविता पाठ करा. गुणगुणत रहा. हळूहळू शब्द आपल्या ओठात येतात. प्रयत्न करा.
‘‘मग असे कविता संग्रह कोठे मिळतील ? आणि कुणाचे कविता संग्रह वाचायचे?’’
‘‘आपली सहल परत गेली म्हणजे पुण्यात तुम्हाला पुस्तकांच्या दुकानात नेतो. तेथे हवे तेवढे कवी तुमच्या भेटीसाठी येतील. ती पुस्तके घरी न्या. मनापासून वाचा. आणि तुम्हाला खरचं मनापासून कविता आवडत असतील तर तुम्हाला निश्चित सुचतील.’’
‘‘मी शाळेत असताना छान कविता म्हणायचे. सर्व कविता पाठ होत्या. नंतर सर्व काही विसरले.’’
‘‘हरकत नाही, त्या शाळेतील कविता आठवा. त्या मनातल्या मनात म्हणायला लागा.’’
ज्योती गाडीत आपल्या सीटवर बसली. कित्येक वर्षानंतर तिला मराठे बाई डोळ्यासमोर आल्या. त्यांनी म्हटलेली कविता ऐकू येऊ लागली.
ढगांचं घरटं सोडून दूर, पावसाचं पाखरु आलं गं दूर…
अलगद त्याच्या पंखावरुन, येईन भिजून, येईन भिजून…
वर्गातील मैत्रिण सुलभा दिसू लागली. यमुना दिसू लागली. ज्योतीचे मन कातर झाले. कुठे असतील आपल्या मैत्रिणी ? गेल्या कित्येक वर्षात आपण त्यांची चौकशीपण केली नाही. मराठे बाई असतील का हयात ? काल अत्रे म्हणाले – ‘‘कविता तुमच्या आजूबाजूला असतात, मनाचे अॅन्टीना जागृत ठेवा. त्याला कधी सिग्नल मिळतील सांगता यायचे नाही.’’ छान बोलतात अत्रे. आपण आपल्या मनाचे अॅन्टीना बंदच करुन टाकले होते. धंदा वाढविणे आणि पैसे मिळविणे हेच ध्येय ठेवले होते. आपल्या आयुष्यात कवितेला काही स्थान आहे का? नसेल तर अत्रेंच्या कविता का आवडतात आपल्याला? की आपल्यात एक झोपलेली कवयत्री आहे ? तिला उठवायला हवे आहे का ?
माऊली ट्रॅव्हल्सची गाडी दक्षिण भारताचा दौरा करुन पुण्यात आली. प्रविण अत्रेंनी ज्योतीला आप्पा बळवंत चौकात नेऊन पुस्तकांची दुकाने दाखविली. एवढी पुस्तकं दुकाने एका ठिकाणी ज्योती प्रथमच पाहत होती. प्रत्येक दुकानदार अत्रेंना हाक मारत होता. एका दुकानातून अत्रेंनी कुसुमाग्रजांचे विशाखा आणि मंगेश पाडगांवकरांचे सलाम खरेदी केले आणि ज्योतीला भेट म्हणून दिले. ज्योतीने त्यांच्या मार्गदर्शनाखाली आणखी बरीच पुस्तके खरेदी केली. माऊली टूर्स मधील पुण्यातील लोक इथे उतरणार होते. अत्रे पण आपली बॅग घेऊन उतरले. सर्वांना बाय बाय करत गर्दीत दिसेनासे झाले.
ज्योतीने कुसुमाग्रजांचा कविता संग्रह उघडला.
‘‘पुरे झाले चंद्र सूर्य, पुर्या झाल्या तारा,
पुरे झाले नदी नाले, पुरा झाला वारा…
मोरा सारखा छाती काढून, उभा रहा
जाळा सारख्या नजरेत नजर बांधून पहा…
सांग तीला तुझ्या मिठीत स्वर्ग आहे सारा….
आहाहा ! हे कुसुमाग्रजांचे वैभव तिला आपले वाटत होते.
आपली दुकाने विविध मिलची कापडे, रेडिमेड कपडे, नको नको. तिच्या लक्षात आले, हे कुसुमाग्रज, वसंत बापट, कवी ग्रेस हे सर्व आपल्याला आवडतयं, जवळचं वाटतंय…
– क्रमश: भाग २
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈