श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सखी, प्रिय सखी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात  आपण पाहिले – आपली दुकाने विविध मिलची कापडे, रेडिमेड कपडे, नको नको. तिच्या लक्षात आले, हे कुसुमाग्रज, वसंत बापट, कवी ग्रेस हे सर्व आपल्याला आवडतयं, जवळचं वाटतंय… आता इथून पुढे )

गाडी मुंबईच्या दिशेने धावत होती. ज्योती कवितेत रमली होती. तिला शाळेत म्हटलेल्या कविता आठवू लागल्या. एका सुरात सुलभा, यमुनासह म्हटलेल्या.

देवा तुझे किती सुंदर आकाश

सुंदर प्रकाश…’

मोठ्या वर्गात गेल्यानंतर बालकवींची कविता –

‘ऐल तटावर, पैल तटावर हिरवाळी घेऊन

निळा सावळा झरा वाहतो बेटा बेटातून…

चार घरांचे गाव चिमुकले, पैल टेकडीकडे…

शेतमळ्याची दाट लागली, हिरवी गर्दी पुढे…’

बालकवींची ही कविता कित्येक वर्षानंतर तोंडात आली. कसे झाले हे ? राजापूरच्या गंगेचे झरे अचानक उसळतात म्हणे, तशा कविता उसळल्या का आपल्या मनातून ? ज्योती मुंबईत पोहोचली. रात्रीच्या जगदंबा ट्रॅव्हल्सने वेंगुर्ल्याला यायला निघाली. इकडे आई येणार म्हणून आशु आणि प्राजक्ता दहा दिवसांचा हिशोब घेऊन तयार होती. आई आली की दहा दिवसांतील रोजची विक्री, आलेला माल, संपलेला माल, बँकेचे पासबुक, नोकरवर्गाची हजेरी गैरहजेरी आई सर्व पटापटा विचारणार यात काही हयगय झालेली तिला चालत नाही. प्राजक्ता आलेला माल पुन्हा पुन्हा तपासत होती. आईच्या नजरेतून जरा काही सुटायचे नाही. आलेला माल कोणत्या मिलचा हे ती बरोबर ओळखेल. पंचवीस वर्षे या व्यवसायात काढली तिने. आईने सही करुन दिलेले चेकबुक आशु तपासत होता. यातील किती चेक वापरले किती नाही हे पुन्हा पुन्हा बघत होता.

गाडी वेंगुर्ल्यात आली. आशु स्कुटर घेऊन तयार होता. गाडी जवळ जाऊन आईचे सामान उतरुन घेतले. सर्व सामान खांद्याला लावून स्कुटरवर ठेवले. आता स्कुटर सुटली की आई धंद्याच्या एक एक गोष्टी विचारणार हे त्याला माहित होते. पण आश्चर्य घर येई पर्यंत आईने त्याला पारकर एंटरप्रायझेसची एकही गोष्टी किंवा हिशेब विचारला नाही. आशु मनातल्या मनात म्हणाला आता घरी पोहोचलो की आई विचारेल. घरी गेल्यावर त्याने सर्व सामान तिच्या खोलीत ठेवले. त्याने पाहिले जाताना आईच्या दोन बॅगा होत्या. आणखी भरलेली बॅग नवीन दिसते. काय आणले असेल एवढे ? त्याला वाटले घरात आणि दुकानच्या सर्व स्टाफसाठी खाऊ आणला असेल. आता प्रâेश होईल, चहा घेईल आणि आणलेला खाऊ दाखवेल. प्राजक्ताने चहा आणून दिला. ज्योतीने चहा घेतला आणि नवीन बॅग उघडून त्यातील कवितेची पुस्तके कौतुकाने आशु आणि प्राजक्ताला दाखवू लागली. टुरमध्ये प्रविण अत्रे नावाचे कवी कसे भेटले, त्यांच्या कविता ऐकल्या आणि त्यांच्यासोबत जाऊन पुण्यात एवढी कवितेची पुस्तके खरेदी केली.

आशुला आपली आई कोणी वेगळीच वाटली. एवढी वर्षे पारकर एंटरप्रायझेस हे तिचे आयुष्य होते. त्याच्यापासून एक सेकंद ती लांब राहत नव्हती. आणि आता येऊन दोन तास झाले तरी एकदाही पारकर एंटरप्रायझेसचे नाव नाही. आल्यापासून तिची कवितेची पुस्तके आणि कविता यांचेच कौतुक. रात्रौ प्राजक्ताने जेवण वाढले तेव्हा आशुने दहा दिवसातील पारकर एंटरप्रायझेस मधील एक एक गोष्टी आईला सांगायला सुरुवात केली. सुरवातीला फक्त हु हु करणारी ज्योती आशुला म्हणाला, ‘‘आशु, पुरे कर तो हिशोब. आता यापुढे सर्व व्यवसाय तुम्ही दोघांनी बघायचा आहे. मी आता त्यातून अंग काढून घेणार. खरं म्हणजे मी याआधीच त्यातून बाहेर पडायला हवे होते. पण माझ्या मनाचा आनंद कोठे आहे हे लक्षात येत नव्हतं. या टुर दरम्यान लक्षात आले की माझी प्रिय सखी कोठे आहे? शाळेत असताना मराठे बाई सांगायच्या – ‘‘ज्योती, तू अत्यंत तन्मीयतने कविता म्हणतेस, तुझी आवड कवितेत आहे. कविता तुझी सखी आहे तिला जप.’’ पण आयुष्यात पायावर स्थिर होण्यासाठी धडपडले आणि सखीला विसरले. पण आशु आणि प्राजक्ता माझ्या आयुष्याचा पुढचा काळ ह्या सखी समवेत घालवणार. तुम्ही दोघे पारकर एंटरप्रायझेस सांभाळा. कधी कळी अडचण आली तर मी आहेच.’’ आशु आणि प्राजक्ताने मान हलवली.

दुसर्‍या दिवशी ज्योतीने बॅगेतील पुस्तके बाहेर काढली. कवी ग्रेस, शांता शेळके, इंदिरा संत, पाडगांवकर ते नव्या पिढीतले सौमित्र, निलश पाटील, महेश केळुसकर, संदिप खरे तिच्या अवतीभवती जमले. इंदिरा संतांचे पुस्तक तिने उघडले.

किती वाटा, चुकल्यामुळे चुकलेल्या…

चुकल्यामुळे न भेटलेल्या… राहूनच गेलेल्या…

किती योगायोग… हुकलेले आणि न आलेले…

येऊनही न उमजलेले… धुक्यात किती राहून गेलेले…

ठरवलेले न ठरवलेले….

मग कवी ग्रेस –

‘भय इथले संपत नाही, मज तुझी आठवण येते

मी संध्याकाळी जातो, तु मला शिकविलेले देते

भय इथले संपत नाही…’

मग सुधीर मोघे यांचे पक्ष्यांचे ठसे मधील –

‘माझे मन तुझे झाले, तुझे मन माझे झाले…

माझे प्राण तुझे प्राण, उरलेल्या वेगळाले…’

पुन्हा सुधीर मोघे यांची दुसरी कविता –

‘काही वाटा आयुष्यात उगीचका येतात ?

चार घटका सोबत करुन कुठे निघून जातात ?

एक वाट येते मिरवीत चिमणी पाऊल ठसे

शंख शिंपल्यानी भरुन वाहतात

काही वाटा आयुष्यात उगीच का येतात ?’

ज्योतीला वाटले, शब्दांशी खेळण्यात किती गंमत आहे? प्रत्येक वेळी प्रत्येक शब्दाचा अर्थ वेगळाच लागतो. ज्योतीने कित्येक कविता तोंडपाठ केल्या. दिवाळी अंकात येणार्‍या नवनवीन कविता ती वाचू लागली. नवकविता पण समजून घेता यायला हवे. वेंगुर्ल्यातील ‘‘आनंदयात्री’’ म्हणून एक साहित्य ग्रुप होता तिथे आठवड्यातून एकदा कथा, कविता याबाबत चर्चा होत. खर्डेकर कॉलेजमधील प्रोफेसर्स, आजुबाजूचे शिक्षक, नवोदित लेखक, कवी या ग्रुपमध्ये असत. ज्योती या ग्रुपमध्ये जॉईन झाली. तिथे ती कवितेबद्दल चर्चा करु लागली. वेंगुर्ले कुडाळ भागात अनेक काव्या कार्यक्रम होत. ती कार्यक्रमात हजर असायची. ही मंडळी कविता कशा वाचतात, कुठल्या शब्दावर जोर देतात यावर तिचे बारीक लक्ष होते. सहा महिन्यानंतर ज्योतीला आत्मविश्वास वाटू लागला की, मी आता कविता करु शकेन. तिने पेपर समोर ओढला –

जेव्हा जेव्हा तुम्हाला हताश वाटेल,

किंवा उदास वाटेल

तेव्हा,

तुम्ही तुमच्यातल्याच दुसर्‍याला आवर्जुन भेटा

शेवटी तो तुमच्यातलाच दुसरा आहे, तुम्ही नाही…

१५ जुलै हा ज्योतीचा वाढदिवस. आशुचे लक्षात आले. या १५ जुलैला आई साठ वर्षे पूरी करणार. आशु प्राजक्ताने ठरविले. आईची एकशष्ठी साजरी करायची. आशुने आईला विचारले. काय काय करायचे तुझ्या एकशष्ठीला? ज्योती म्हणाली – माझ्या एकशष्ठीला कोणतेही धार्मिक विधी नकोत. फक्त काव्य वाचन ठेवायचं, ते पण

एकाचचं. आशु म्हणाला, कुणाचं काव्य वाचन ठेऊया? ज्योती म्हणाली, प्रविण अत्रेचं. ज्यांच्या प्रेरणेने मी कविता करु लागले, म्हणू लागले. त्यांना वेंगुर्ल्यात बोलवुया.

त्यांच्या कविता मी कित्येक वर्षात ऐकल्या नाहीत.

माऊली ट्रॅव्हल्सच्या ऑफिसमधून आशुने प्रविण अत्रेंचा फोन मिळविला. दुसर्‍याच दिवशी आशुने फोन लावला.

आशु – हॅलो ! प्रविण अत्रे का ?

प्रविण – हो, हां, बोलतोय, कोण आपण ?

आशु – मी आशुतोष पारकर, वेंगुर्ल्याहून बोलतोय. माझी आई ज्योती पारकर, चार वर्षापूर्वी माऊली टूर्सच्या सहलीत गेली होती. त्यावेळी तुम्हीपण त्या सहलीत होता. तुमच्या कविता तीला फार आवडायच्या. तुम्ही तिला पुण्यात कवितेंची पुस्तके घेऊन दिलात.

प्रविण – हो, हो, आठवलं. मग ती कविता वाचते का?

आशु – अहो त्यापासून तिचे आयुष्य बददले. तिने आमच्या घरच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. आता ती फक्त कवितेच्या विश्वात असते. आता ती कविता करते. थोड्याफार तिच्या कविता छापून पण येतात.

– क्रमश: भाग ३ 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments