श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ सखी, प्रिय सखी… – भाग-४ ☆ श्री प्रदीप केळूसकर

(मागील भागात आपण पाहिले – तिने आमच्या घरच्या व्यवसायातून निवृत्ती घेतली. आता ती फक्त कवितेच्या विश्वात असते. आता ती कविता करते. थोड्याफार तिच्या कविता छापून पण येतात.  आता इथून पुढे)

प्रविण – आनंद आहे. माझ्या लक्षात येतं, मी म्हटलेल्या कविता तिच्या तोंडपाठ व्हायच्या तेव्हाच मी ओळखलं हिला कवितेत अंग आहे. पण कौटुंबिक व्यापामुळे तिने त्याच्याकडे दुर्लक्ष केलं.

आशु – अत्रे साहेब, मी आपणाला फोन अशा करता केला की, येत्या १५ जुलैला आईची एकशष्ठी वेंगुर्ल्यात साजरी करायची आहे. तिच्या इच्छेनुसार कोणतेही धार्मिक विधी न करता, तुमचे काव्यवाचन वेंगुल्यात व्हावे अशी तिची इच्छा आहे. तेव्हा तुम्ही येऊ शकाल का?

प्रविण – अवश्य येईन. मी पण आता निवृत्त झालोय. खूप दिवसांनी मी माझ्या कविता म्हणणार .आहे.

अशा रितीने प्रविण अत्रेंचे काव्यवाचन १५ जुलैला ठरले. आनंदयात्री ग्रुपने प्रविण अत्रेंचे काव्यवाचन आणि सहभोजन आयोजित केले. सर्व वर्तमानपत्रात ज्योती पारकर यांचा एकशष्ठी कार्यक्रम आणि प्रविण अत्रेंचे काव्यवाचन अशा बातम्या आल्या.

दि. १५ जुलै,

स्थळ – साई दरबार हॉल, वेंगुर्ले

आनंदयात्री ग्रुप यांनी ज्योतीताई पारकर यांच्या एकशष्ठी निमित्त पुण्याचे कवी प्रविण अत्रे यांच्या काव्यवाचनाचा कार्यक्रम आयोजित केला. वर्तमानपत्रात सतत या कार्यक्रमाची बातमी येत होती. त्यामुळे आणि आनंदयात्री ग्रुपच्या मेहनतीमुळे कार्यक्रमास तोबातोबा गर्दी होती. सायंकाळी ४ च्या सुमारास कार्यक्रम सुरु होण्याआधी हॉलमधील सर्व खुर्च्या भरलेल्या होत्या. शिवाय बाहेर व्हरांड्यात पॅसेजमध्ये लोक दाटीवाटीने उभे होते. थोडेफार उशीरा येणार्‍यांना आत प्रवेश मिळण्याची शक्यता नव्हती. परंतु आनंदयात्री ग्रुपच्या स्वयंसेवकांनी श्रोत्यांना कमीत कमी त्रास होईल या दृष्टीने खूप प्रयत्न केले.

व्यासपीठावर ज्योतीताई पारकर यांच्याबाजूला आनंदयात्री ग्रुपच्या अध्यक्षा वृंदाताई कांबळी बसल्या होत्या. एवढ्यात आशु कवी प्रविण अत्रेंना घेऊन आला. तशा जोरदार टाळ्या पडल्या. प्रविण अत्रेंना पाहुन ज्योतीताई उभ्या राहिल्या. जवळ जवळ चार वर्षांनी प्रविण अत्रे समोर उभे होते. ज्योतीताई पुढे आल्या. आणि त्यांनी आनंदयात्री ग्रुपमधील कांबळी मॅडम आणि इतर सर्वांची ओळख करुन दिली. आनंदयात्री ग्रुपमधील सुषमा प्रभुखानोलकर यांनी मान्यवरांचे आणि श्रोत्यांचे स्वागत केले. स्वागत करताना त्या म्हणाल्या, ‘‘ज्योतीताई पारकर यांना आम्ही वेंगुर्लेकर क्लॉथ मर्चंट म्हणून ओळखत होतो. गेल्या २५-३० वर्षांत पारकर एंटरप्रायझेस तालुक्यातील नं.१ चे कापड दुकान झाले आणि ४ वर्षापासून ज्योतीताईंनी घुमजाव केले. सर्व व्यापार मुलाच्या आणि सूनेच्या हातात दिला आणि स्वतःला कवितेमध्ये बुडवून घेतले. आता आम्ही त्यांच्या घरी गेलो तर आजुबाजूला कवी ग्रेस, वंसत बापट, आरती प्रभू, पाडगांवकर पासून ते गुरु ठाकूर, संदिप खरे ठाण मांडून बसलेले दिसतात. आज त्या साठ वर्षे पुर्ण करत आहेत. परंतु कोणतेही धार्मिक विधी न करता त्यांनी त्यांना ज्यांनी कवितेची ओढ लावली त्या प्रविण अत्रे यांचे काव्यवाचन आयोजित केले. आणि अत्रे साहेब आमच्या वेंगुर्लेकरांच्या विनंतीला मान देऊन एवढ्या लांब आले. यानंतर अत्रे साहेबांना मी त्यांच्या कविता वाचायला सुरुवात करावी अशी विनंती करते.
प्रविण अत्रे उठले. त्यांनी चार वर्षापूर्वी एका टूरमध्ये आपली आणि ज्योतीताई यांची भेट झाली हे सांगून त्या टूरच्या प्रवासात आपण म्हटलेल्या कविता ऐकून त्यांच्यातील कवयत्री जागी झाली. एवढेच नव्हे तर गेली ४ वर्षे त्या कवितेत पूर्ण बुडून गेल्या हे ऐकून मला खूप आनंद झाला. प्रविण अत्रेनी काव्यवाचन सुरु केले.

नदीला घरात घ्यावे थेट, एवढी नाही हिंमत माझ्यात…

दारातून वाहत रहा, दूरातून पाहत रहा, इतकेच मी सांगू शकतो.

माझ्याच आदल्या कैक जन्मांची ही पापं,

मी धोपटतोय तुझ्या काठावर…

कर क्षालन धुवून पवित्र या जन्मात

उद्धार अंधार…. सोडीन मी दिवे तुझ्या पात्रात…

अत्रे एका पाठोपाठ एक कविता म्हणत होते आणि श्रोते तल्लीन झाले होते. दिड तासानंतर अत्रे थांबले.

‘‘वेंगुर्लेकर मंडळी, मी गेली दिड तास तुमच्या समोर कविता म्हणतोय, आता मी तुम्हा सर्वांच्यावतीने ज्योतीताई पारकर हिला विनंती करतो की, यापुढील कविता तिने सादर कराव्यात.’’ टाळ्यांचा एकदम कडकडाट झाला. ज्योती कावरीबावरी झाली. छे ! छे ! मला सवय नाही. मी कधी कविता म्हटलेली नाही. मला जमायचे नाही, इतक्या लोकांसमोर मला जमायचं नाही. परंतु श्रोत्यांनी ज्योतीताई ज्योतीताई अशा घोषणा द्यायला सुरुवात केल्या. वृंदाताई, प्रितम ओगले, आणि सीमा मराठेंनी तिच्या हाताला धरुन माईकसमोर उभे केले.

ज्योतीने डोळे मिटून घेतले आणि ती हात जोडून सर्वांना म्हणाली – ‘‘मी आयुष्यात प्रथमच एवढ्या मोठ्या श्रोत्यांसमोर उभी आहे मला सांभाळून घ्या. शाळेत असताना मराठे बाईंनी मला कवितेची आवड लावली. मी कविता तन्मयतेने म्हणते हे पाहून त्या म्हणायच्या – ज्योती कवितेला सोडू नकोस, कविता तुझी सखी होईल.’’ आज मला मराठे बाईंची आठवण येते. मराठे बाई तुम्ही जेथे असाल तेथे माझा नमस्कार. दुसरे हे प्रविण अत्रे. त्यांच्या कविता ऐकून माझ्या लक्षात आले आपला जन्म फक्त व्यवसाय करण्यासाठी नाही. कविता ही माझी पहिली आवड आहे. त्यांच्या भेटीनंतर मी कवितेत रमले. आता आयुष्याची सेकंड इनिंग माझ्या सखीसोबत.’’ असे म्हणून ज्योतीने आपल्या कविता म्हणायला सुरुवात केली.

तू लिंपल्यास भिंती अज्ञानाच्या अन्

रेखलास त्यावर शब्दांचा प्रवास…

विहिरींच्या कडांवर उभे होते जडावलेले जीव

ओटीत घेतलास त्यांना,

आणि प्रकाश दाखवलास या जगातला…

माझ्या मैत्रिणी, त्यांना सांगायलाच हवं

केवळ कुंकूवाची चिरी रेखून कपाळावर

नाही होता येत, चौकटी उधळत व्यवस्था बदलणारी बाई

अर्थ जाणून घ्यावा लागतो प्रतिकांचा

आणि एक एक चिरा रचत

बांधाव्या लागतात भिंती नव्या घराच्या…

ज्योती आत्मविश्वासाने एक एक कविता म्हणत होती आणि श्रोते तल्लीन झाले होते. टाळ्या वाजत होत्या. प्रविण अत्रे सुध्दा व्वा ! व्वा !! अशा शाबासकी देत होते.

व्यासपीठावरील कांबळी बाई, अजित राऊळ, प्रसाद जोशी, शैलेश जामदार सारेजण मंत्रमुग्ध झाले होते. कार्यक्रमाच्या शेवटी –

घरादारासाठी लावतेस दिवा,

अंधाराचा रावा फडफडे

लावताना दिवा सुटलेली हवा,

विझलेली पेटताना तेलामध्ये वात, तशी दिनरात

गुदमरे बाई उंबर्‍यात,

सैपांक रांधला, भुकेला दादला

भाजताना भाकर करपली

तुझ्या पदरात, तुझ्या उदरात वंशाचा दगड रोवलेला

सर्व श्रोते भारावले होते. व्यासपीठावरील सर्वांच्या कौतुकाच्या नजरा ज्योतीवर होत्या. टाळ्यांचा कडकडात सुरुच होता. ज्योतीने सर्व श्रोत्यांना हात जोडून नमस्कार केला. व्यासपीठावरील सर्वांना नमस्कार केला.

कार्यक्रम संपला आणि प्रेक्षकातील लोक ज्योतीचे अभिनंदन करायला व्यासपीठावर यायला लागले. ओळखीचे लोक, अनोळखी लोक तिच्या एकशष्ठी निमित्त आणि काव्य वाचनाचे कौतुक करत होते. एवढ्या कौतुकाची ज्योतीला सवय नव्हती. ती सद्गतीत झाली होती. प्रत्येकाचे पुन्हा पुन्हा आभार मानत होती.

व्यासपीठावरील गर्दी थोडी कमी झाली. एवढ्यात दोन स्त्रिया प्रेक्षकांतून पायर्‍या चढून तिच्या दिशेने येताना दिसल्या. त्या वर आल्या आणि ज्योतीने निरखून पाहिले आणि पटकन ओळखले या तर शाळा मैत्रिणी – सुलभ आणि यमुना. ज्योती धावत त्यांच्या जवळ गेली. शाळा सुटल्यानंतर इतक्या वर्षात दोघी भेटल्याच नव्हत्या. आज कशा काय आल्या ? तिने कडकडून मिठी मारली. तिघांच्याही तोंडातून एकाचवेळी कविता बाहेर आली –

‘‘पाय सोडूनी जळात बसला असला औदुंबर’’

आणि यमुना म्हणाली – ज्योती किती वर्षांनी ही कविता आपण तिघांनी एकत्र म्हटली नाही? सुलभा म्हणाली – ज्योती तुझ्या कविता किती छान गं. अगदी शाळेची आठवण आली. त्यावेळी तू पुस्तकातल्या कविता जोरजोराने म्हणायचीस आणि आता स्वतःच्या कविता म्हणतेस. ज्योती तू केवढी मोठी कवयत्री झालीस गं. एवढं म्हणून त्या दोघी पटकन मागे वळल्या आणि पायर्‍या उतरल्या आणि एका वयस्क स्त्रीच्या हाताला धरुन पायर्‍या चढू लागल्या. ज्योती पाहत होती. कुणाला आणत आहेत या दोघी ? असा विचार येईपर्यंत सुलभा आणि यमुनाने त्या स्त्रीला हळूहळू पायर्‍या चढत वर आणले. ज्योती निरखून पाहत होती. क्षणार्धात तिच्या मेंदूला जाणीव झाली. आणि ती किंचाळली – ‘‘कोण मराठे बाई तुम्ही… ?’’ ज्योती धावली आणि तिने मराठे बाईंचे पाय धरले. डोळ्यात धारा लागल्या होत्या… आनंदाच्या. मराठे बाईंनापण आनंदाश्रू आवरत नव्हते. बाईंनी तिचे खांदे धरुन तिला वर उचलले. ‘‘बाई बाई तुम्ही कशा आलात? मला वाटत होतं माझं पहिलं वहिलं काव्यवाचन ऐकायला तुम्ही हव्या होतात, पण तुम्ही कशा आलात? तुम्हाला कोणी आणलं? सुलभा आणि यमुना एक सुरात बोलल्या – ‘‘आम्ही आणल’’ अगं आम्हा दोघींचीही घर माजगांवात आणि बाई मळेवाड मध्ये राहतात हे माहीत होतं. तुझ्या एकशष्ठीचे आणि काव्यवाचनाची बातमी पेपरमध्ये वाचली तेव्हा बाईंकडे जाऊन तुम्ही येणार का असे विचारले. तेव्हा बाईंनी एका सेकंदात मी येणारच म्हणून हट्ट धरुन बसल्या. म्हणून आज रिक्षा करुन त्यांना घेऊन आलो.

मराठे बाईंनी ज्योतीच्या डोळ्यातले आनंदाश्रू पुसले. ‘‘झालीस गं मोठी ज्योती तू… केवढ्या धिटाईने स्वतःच्या कविता म्हटलेस, मला भारी कौतुक वाटलं. शाळेतील १२-१३ वर्षाची चुणचुणीत ज्योती डोळ्यासमोर उभी राहिली. मी तुला वर्गात सांगत असे. ज्योती, या सखीचा हात घट्ट धर.

‘‘सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी..’’

मागे उभे राहून हे सर्व कौतुक पाहणारे प्रविण अत्रे उद्गारले आणि सर्व एका सुरात म्हणाले –

‘‘नुसती सखी नव्हे, प्रिय प्रिय सखी….’’

 – समाप्त –

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

 

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments