☆ जीवनरंग ☆ बोध कथा – मत्सरी असल्लोष्टो ☆ अनुवाद – अरुंधती अजित कुळकर्णी ☆
||कथासरिता||
(मूळ –‘कथाशतकम्’ संस्कृत कथासंग्रह)
बोध कथा
कथा ११. मत्सरी असल्लोष्टो
सुभद्र्पूर नावाच्या नगरात तीनशे घरे होती. त्या घरांमध्ये राहणारे सगळे जण भाग्यशाली होते. मोठे मोठे महाल बांधून तेथे अतिथींचा आदर-सत्कार करीत ते सुखाने जीवन व्यतीत करीत होते. त्याच गावात असल्लोष्टो नावाचा ब्राह्मण राहत होता. त्या अति दरिद्री ब्राम्हणाला अनेक पुत्र, सुना, नातवंडे होती. तो दररोज त्या तीनशे घरी जाऊन भिक्षा घेऊन तिसऱ्या प्रहरी घरी येत असे.
असेच एकदा भगवान शंकर व देवी पार्वती आकाशमार्गाने संचार करत असताना त्या नगराच्या जवळ आले. तेथे विमान थांबल्यावर पार्वतीने पाहिले, की तिथे तीनशे घरांमध्ये राहणारे सगळे भाग्यशाली आहेत व फक्त एका घरात एक ब्राह्मण दारिद्र्यात जीवन व्यक्तीत करतोय. तेव्हा देवी पार्वती “ या ब्राह्मणावर कृपा करा” असे भगवानांना म्हणाली. ते ऐकून हसत परमेश्वर म्हणाले, “हा माणूस दुष्ट प्रवृत्तीचा आहे. ह्याच्यावर कृपा केली तर हा कधीच संतुष्ट होणार नाही. उलट येथील लोकांना त्यामुळे केवळ उपद्रवच होईल.” “तरी पण याच्यावर कृपा करावी” असे पार्वतीने म्हटल्यावर भगवान “ठीक आहे” असे म्हणाले.
जेव्हा देवीसह भगवान भूमीवर अवतरले, तेव्हा असल्लोष्टो नुकताच तीनशे घरी भिक्षा मागून मिळालेले अन्न घेऊन दमून भागून घरी येत होता. त्याला बोलावून भगवान म्हणाले, “ अरे बाबा, एवढे कष्ट का घेतोस? मी तुला एक रत्न देतो. त्याची तू पूजा केल्यावर तू जे मागशील ते तुला मिळेल. पण त्यापेक्षा दुप्पट तुझ्या गावातील तीनशे घरांना मिळेल.” एवढे बोलून व त्याला रत्न देऊन भगवान अंतर्धान पावले.
ब्राम्हणाने घरी येऊन स्नान वगैरे करून रत्नाची पूजा केली आणि धान्याची शंभर मडकी, सुवर्णमुद्रांची दहा मडकी, शंभर गायी व एक सोन्याचा महाल मिळावा अशी प्रार्थना केली. एका रात्रीतच त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण झाल्या व त्याच्या शेजाऱ्यांनाही त्याच्या दुप्पट मिळाले.
ते पाहून आपले भाग्य इतरांपेक्षा कमीच आहे हे जाणून असल्लोष्टो आनंदी तर झाला नाहीच, पण त्याला अतिशय दुःख झाले. शेजारी पूर्वीपेक्षाही धनवान झाले हे पाहून तो मत्सराने जळायला लागला. तेव्हा त्याने पुन्हा रत्नाची पूजा करून “काल प्राप्त झालेले सर्व नष्ट होवो” अशी प्रार्थना केली. तेव्हा त्याला प्राप्त झालेले सगळे भाग्य नष्ट झाले. इतरांचेही सगळे भाग्य तर नष्ट झालेच, पण ते सगळेजण मृत झाले. ते पाहून असल्लोष्टोची ईर्ष्या शमली.
असेच परत एकदा भगवान व देवी पार्वती जेव्हा त्या नगरात आले तेव्हा असल्लोष्टोचे उपद् व्याप जाणून त्याच्याकडून ते रत्न त्यांनी परत घेतले, व तेथील सर्व लोकांना जिवंत करून पूर्वीप्रमाणेच भाग्यवंत केले व अंतर्धान पावले. असल्लोष्टो पूर्वीप्रमाणेच भिक्षाटन करू लागला.
तात्पर्य – दुसऱ्याचे फळफळणारे भाग्य सहन न होणाऱ्या व्यक्तीचे कधीच भले होत नाही.
अनुवाद – © अरुंधती अजित कुळकर्णी