सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ दोन अनुवादित कथा – १. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप २. संस्कार – श्री सीताराम गुप्ता ☆ सौ. उज्ज्वला केळकर ☆
१. त्या ग्रोसरी शॉपमध्ये – डॉ. हंसा दीप
त्या ग्रोसरी शॉपमध्ये पीटर नुकताच कामाला लागलाय. डेली नीड्स विभागाकडे लक्ष देण्याचे जबाबदारी त्याच्यावर देण्यात आलीय. मार्था रोज तिथे येते. सामान नीटपणे रचलेल्या शेल्फांमधून असलेल्या वाटेमधून ती जाते. तिथली प्रत्येक वस्तू हाताळते. उलटी-पालटी करून बघते. त्याची किंमत , त्याचा ब्रॅंड बघते. गेल्या आठवड्यातल्या किमती आणि या आठवड्यातल्या किंमती यात काय आणि किती फरक पडलाय, याचा शोध घेते. तासाभराने ती शॉपमधून बाहेर पडते.
मार्था करणार तरी काय बिचारी? ऐंशी वर्षाची मार्था घरी एकटीच असते. वेळ तरी कसा घालवणार? बाहेर थंडीचा कहर. भरभुरणारं बर्फ. त्यामुळे निसरडी झालेली वाट. पण व्यायाम नसेल, हता-पायांना चलन – वलन नसेल, तर झोप तरी अशी लागणार? त्यावर मार्थाने उपाय शोधून काढलाहे, या ग्रोसरी शॉपमध्ये रोज येऊन इथल्या वस्तू, फिरत फिरत बघून जायचा. इथे तासभर फिरताना तिचा व्यायाम होतो.
पीटरला मात्र पहिल्या दिवसापासूनच मार्था आवडली नाही. तिचे साधे खरबरीत, मळकट कपडे, विस्कटलेले केस, ठराविक वेळी येऊन वस्तू निरखून पहाणं, हाताळणं, तिथे घुटमळणं… त्याला काहीच आवडत नाही तिचं. रागच येतो. त्याला वाटते, ती चोर आहे. रोज चोरी करण्याच्या उद्देशानेच इथे येत असणार. हळू हळू त्याची खात्रीच झालीय याबद्दल. तो सतत तिच्यावर पाळत ठेवून आहे, पण ती अजून तरी कुठे सापडली नाही. आपण तिला पकडू शकलो नाही, हा आपला पराभव आहे, असा त्याला वाटतय. त्याच्या मनात कधीपासून एक विचार कुलबुलतोय. आज काही झालं, तरी तो तो उपाय अमलात आणणार आहे.
नेहमीप्रमाणे मार्था तासभर त्या शॉपमध्येफरून वस्तू हाताळून दोन-तीन वस्तू घेऊन, पेमेंट करण्यासाठी कौंटरजवळ गेली. घेतलेल्या वस्तूंचे पेमेंट केले आणि ती दुकानाबाहेर पडू लागली.
ती दाराशी पोचेपर्यंत पीटर तिथे उभा आहे. ‘मॅम, मला आपलं सामान आणि पावती दाखवा.’अतीव सभ्यतेने पीटर म्हणाला, ‘हे रूटीन चेक अप आहे.’ मार्थाने आपली पावती आणि सामानाची थैली पुढे केली. पीटरने सामान तपासले. त्यात बीन्सचे तीन डबे जास्त होते. त्याचं पेमेंट केलेलं नव्हतं. तो म्हणाला, ‘या तीन डब्यांचं पेमेंट केलेलं नाही.’
‘पण मी हे सामान मी घेतलेलच नाही. मी कधीच टीनमधले बीन्स कधीच खात नाही.’
‘चोरी सापडली की प्रत्येक चोर असंच म्हणतो.’ रागारागाने डोळे वटारत तो मनाला. त्याने मॅनेजरला आणि मॅनेजरने पोलिसांना बोलावले.
दहा मिनिटात पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. त्यांनी मॅनेजरची तक्रार ऐकून घेतली. मग कार्यालयातील सीसीटीव्ही.चे फूटेज तपासले. त्यात आक्षेपार्ह काहीच दिसले नाही. मॅनेजरचे आभार मानून आणि मारठला घेऊन पोलीस गाडी निघून गेली. पीटरचा भाव आता वाढला होता. त्याला आता तिच्यापासून मुक्ती मिळाली होती. मोठ्या खुशीत होता तो.
अर्ध्या तासाने पुन्हा पोलिसांची गाडी त्या शॉपसमोर उभी राहिली. दोन पोलीस खाली उतरले. मार्था मात्र गाडीत तशीच बसून राहिली होती. पोलीस मॅनेजरशी काही बोलले. मॅनेजर त्यांना आपल्या रूममध्ये घेऊन गेले. दहा मिनिटांनी ते तिघे बाहेर आले. मॅनेजरनी पीटरला हाक मारली आणि कामावरून ताबडतोब काढून टाकल्याचा निर्णय सांगितला.
‘ का पण? चोरी पकडली म्हणून?’ त्याने तणतणत विचारले.
‘ नाही. चोरी केली म्हणून!’ मॅनेजर म्हणाला.
पोलिसांनी त्याला मॅनेजरच्या खोलीत असलेल्या सीसीटीव्ही.चे फूटेज दाखवले. त्यात पीटर मार्थाने पेमेंट केल्यानंतर दाराशी जाताना तिच्या थैलीत बीन्सचे डबे टाकताना स्पष्ट दिसत होतं. पीटरला या सीसीटीव्ही.ची काही कल्पना नव्हती. त्याने मार्थाच्या थैलीत टीन टाकताना कार्यालयातल्या सीसीटीव्ही.चा स्वीच ऑफ केला होता. पण दुकानात मॅनेजरच्या खोलीत आणखी एक सीसीटीव्ही.असू शकेल,याचा त्याला अंदाज आला नाही. पोलिसांनी मार्थाची क्षमा मागत तिला गाडीतून खाली उतरवलं आणि पीटरल ते घेऊन गेले. पीटरला मार्थापासून मुक्ती हवी होती. त्याला ती मिळालीही. पण कशी? त्याला दोषी ठरवून त्याचा सोनेरी भविष्यकाळ कळवंडत मिळालेली मुक्ती होती ती.
मूळ कल्पना – डॉ. हंसा दीप
लेखन – सौ. उज्ज्वला केळकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
२. संस्कार – श्री सीताराम गुप्ता
रमेश कुमारांचा मुलगा रजत पिंपरीला राहून इंजिनियरिंगचा अभ्यास करत होता. योगायोगाने रमेश कुमारांच्या मित्राने तिथे एक फ्लॅट विकत घेतला होता. तो रिकामाच होता. रजत वर्षभर हॉस्टलमध्ये राहिला. मग वडलांच्या मित्राच्या फ्लॅटवर राहू लागला. रजतने आपल्या आणखी तीन मित्रांना तिथे राहायला बोलावले. एकूण चार विद्यार्थी तिथे राहत होते. तिथे त्यांना घरासारखाच आराम वाटायचा.
रमेश कुमार आग्र्याचे. त्यांनी स्वैपाक – पाणी आणि इतर कामे करण्यासाठी एका माणसाला नेमले. तो तिथेच राहत असे. एकदा मुलाची ख्याली-खुशाली बघण्यासाठी रमेश कुमार स्वत:च तिथे गेले. संध्याकाळची वेळ झाली, तेव्हा रजतचे अनेक मित्र तिथे आले. सगळे जण तिथेच जेवले. रमेश कुमार जोपर्यंत तिथे होते, तोवर रोज रोज हेच दृश्य ते पाहत होते. रोज संध्याकाळी मुले तिथे यायची. जेवायची. गप्पा-टप्पा व्हायच्या. थोडा दंगा-धुडगूसदेखील घातला जायचा. मग ती निघून जायची. त्यांचं अस्तित्व, गप्पा-टप्पा यामुळे मोठं चैतन्यपूर्ण वातावरण तिथे तयार व्हायचं.
रजतचे सगळे मित्र त्यांच्याशी अतिशय आदराने वागायचे. त्यांचा मान ठेवायचे. रमेश कुमारांना बरं वाटायचं. पण एक दिवस रजतचे सगळे मित्र निघून गेल्यावर त्यांनी रजातला विचारले, ‘रजत, तू इथे इंजिनियरिंगचा अभ्यास करण्यासाठी आला आहेस, की ढाबा चालवायला?’ त्यांच्या प्रश्नाने रजतचा चेहरा उतरला. तो जड आवाजात म्हणाला, ‘पापा, हेसुद्धा माझ्यासारखेच घरापासून दूर रहातात. बाहेर कसं जेवण मिळतं, आपल्याला कल्पना आहेच. हे कधी कधी यासाठीच इथे येतात, की घरी बनवलेलं चांगलं जेवण त्यांना कधी तरी मिळावं. इथे त्यांना घरी बनवलेलं चांगलं जेवण मिळतं. ‘
त्यावर रमेश कुमार म्हणाले, ‘पण त्यामुळे तुझा खर्च वाढत जातो, त्याचं काय? आणि तुझ्या अभ्यासावरदेखील त्याचा परिणाम होतो. अशा फालतू मुलांचं इथे येणं आणि रात्री दंगा घालणं बंद कर.’
रजत रोषपूर्ण आवाजात म्हणाला, ‘नाही बाबा, मी असं नाही करू शकणार! मुलं आली की जेवणासाठी त्यांना विचारावंच लागेल आणि ती जेवूनच जातील. खर्चाचं म्हणाल, तर मी माझ्या खर्चात तेवढी काटकसर करतोच आहे. आता मुले जमल्यावर थोड्या गप्पा-टप्पा, दंगा होणारच. ती काही रात्र रात्र दंगा करत नाहीत. त्यांनाही त्यांचा अभ्यास आहेच. ‘
राजतच्या या उत्तराने रमेश कुमार प्रसन्न झाले. ते एक प्रकारे रजतची परीक्षाच घेत होते. तो म्हणाला असता की पापा त्यांना उद्यापासून येऊ नका, म्हणून सांगतो, तर त्यांना वाईट वाटलं असतं. रमेश कुमारांच्या परिवारात ज्या काही चांगल्या गोष्टी होत्या, दुसर्याचा विचार करणं, त्यांचा आदर-सत्कार करणं, मान-सन्मान ठेवणं हे संस्कार बाहेर राहूनही किंवा काळाचा प्रभाव पडूनही रजतच्या बाबतीत बदलले नव्हते.
आता रमेश कुमार म्हणाले, ‘मी काही मनापासून बोललो नव्हतो. तुझी प्रतिक्रिया काय होते आहे, हेच मला बघायचं होतं. आता उद्या मला आग्र्याला परत जायला हरकत नाही.’ हे ऐकल्यावर राजताच्या चेहर्यावर आलेल्या प्रसन्न भावाने रमेश कुमारांची प्रसन्नता आणखी वाढवली.
मूळ कथा – संस्कार
मूळ लेखक – श्री सीताराम गुप्ता
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
♥ ♥ ♥ ♥ ♥
अनुवाद – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈