☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 4 ☆ श्री आनंदहरी ☆
आई – बाबांनी तिच्याबद्दल विचारलं तर काय सांगणार ? असा प्रश्न पडल्यामुळे गेले दोन दिवस त्याने मनातून गावी जावेसे वाटत असूनही स्वतःला रोखलं होते. दोन दिवस तसे खूपच चांगले गेले असे त्याला वाटत होतं.. पण मनात गावी जाऊन यायची इच्छा प्रबळ होऊ लागली होती. तो ती इच्छा जितकी मनात दाबत होता तितकीच ती उसळी मारून वर येत होती.
आपल्या मनातील, वागण्यातील बदल आपल्यापेक्षा आपल्या समोरच्या, जवळच्या व्यक्तीच्या चटकन लक्षात येत असतो.. दुपारी एकत्र चहा पीत असताना ऑफीसमधला त्याचा जवळचा मित्र म्हणाला,
“काय रे अस्वस्थ दिसतोयस ? काही अडचण आहे काय ?”
क्षणभर तो त्या मित्राकडे पहातच राहिला. पुढच्याच क्षणी म्हणाला,
” काही नाही रे… कधी वाटतंय गावी जाऊन आई- बाबांना भेटून यावे… कधी वाटतंय नको जायला..”
मित्राने जायला नको वाटण्याचे कारण विचारलं नाही पण म्हणाला, “धी कोणता विचार मनात आला होता?”
“गावी जावे असा..”
“मग टाक रजा आणि जा … मी तर तसेच करतो. मला तर असे वाटतं पहिला विचार काळजातून येतो.. आणि दुसरा नकारात्मक विचार मेंदूतून येतो.. हृदय आणि बुद्धी यांच्यातील हे युद्ध नेहमीच चालू असते रे आपल्या मनात..”
मित्रांचे बोलणे ऐकता ऐकताच त्याचे गावी जायचे निश्चित झाले होते.
दुसऱ्यादिवशी बस मध्ये बसताच त्याला त्याच्या आणि तिच्या पहिल्या प्रवासाची आठवण झाली.. क्षणभर मनात आठवणींची मालिकाच सुरू झाली.. आणि शेवटी तिच्या बेंगलोरच्या बदलीच्या वाक्क्यापाशी येऊन थांबली.. व्यथित मनाने त्याने खिडकीतून बाहेर पाहिलं.. बस वेगात धावत होती जवळ पाहिलं तर गती जाणवत होती पण दूरवर पाहिलं तर गती न जाणवता दृश्याची स्थिरता जाणवत होती… पावसाळ्याचे दिवस नसतानाही आभाळ दाटून आले होते.. अवेळी पाऊस येण्याची शक्यता वाटत होती. ‘ असा अवेळी पाऊस सुखावह की दुःखावह ? ‘ अचानक त्याच्या मनात आले..
मनात आलेल्या या प्रश्नाने तो उगाचच दचकला.. त्याने प्रश्न झटकण्याचा प्रयत्न केला पण तो प्रश्न मनातून जाईन.. कोणत्याही प्रश्नाचे, समस्येचे असेच असते, जोवर आपण उत्तर शोधत नाही, उत्तर सापडत नाही तोवर ती सतावत राहते.. मोठी वाटत राहते.. तो क्षण सरला, उत्तर सापडले, उकल झाली की मात्र किरकोळ वाटत राहते. त्याचे मन विचार करत राहीलं..
‘असा पाऊस पीक काढणीच्यावेळी आला तर दुःखदायक वाटतो पण तोच दुष्काळी मुलखात पडला तर सुखावह ठरतो’ त्याच्या मनात उत्तर आले आणि त्याला बरे वाटले… म्हणजे कोणतीही गोष्ट चांगली की वाईट हे भावतालच्या परिस्थितीनुसार ठरते तर. त्याच्या मनात आले.
तो तासाभरात गावी पोहोचणार होता…’आपल्या मनात कधी कोणता विचार येईल काही सांगता येत नाही.. ‘ त्याच्या मनात येऊन तो स्वतःशीच हसला. पुढच्याच क्षणी’ घरी गेल्यावर आई तिच्याबद्दल विचारेल तेंव्हा काय उत्तर द्यावे?’ असे त्याच्या मनात आलं आणि तो विचार करतच मागे डोके टेकून बसला.. त्याने डोळे मिटले.. काही क्षणातच शिणल्यामुळे की रात्री पुरेशी झोप न झाल्यामुळे की खिडकीतून येणाऱ्या गार वाऱ्याच्या झुळुकीमुळे कुणास ठाऊक पण त्याची झोप लागली.
क्रमशः…
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈