जीवनरंग
☆ “मज नकोत अश्रू, घाम हवा…” ☆ श्री कौस्तुभ केळकर नगरवाला ☆
हो.. हो.. सगळे सरसोस्तीच म्हणायचे तिला. अगदी एकेरी. पोराटोरांपासून म्हाताऱ्यांपर्यंत. तिच्या नावावर जाऊ नका. वस्तीत तिचा जबरदस्त दरारा होता. बाई कर्तृत्ववान खरी.
लिहण्या वाचण्यापुरतं शिकलेली. तरीही नाव सार्थ करणारी. हजारोंचा हिशोब हाताच्या बोटांवर करायची. काॅम्प्युटरसे भी तेज दिमागवाली, या जगात फक्त दोनच माणसं. एक चाचा चौधरी आणि दुसरी सरसोस्ती. दिमाग आणि जुबान दोन्हीही तेज.
दारूडा नवरा आणि पदरात दोन पोरं. दारू पिवून रोज मारायचा तिला. एक दिवस सहनशक्ती संपली तिची. बांबूच्या फोकानं तुडवला तिनं त्याला. त्या संसाराला लाथ मारली अन् ईथं आली. नाल्याकाठी एकटा बंद जकातनाका. नाक्यापाशी झोपडी बांधून राहू लागली. ऊशाशी कोयता घेऊन झोपायची. काय बिशाद होती कुणाची…?
नाक्यापलीकडं नवीन बिल्डींगा ऊभ्या रहात होत्या. बाई हुशार खरी. भल्या पहाटे मार्केटला जायची. वेचून निवडून भाजी आणायची. सोसायटीवाल्यांना सोईचं झालं. हातगाडीवर लादून दिवसभर भाजी विकली.
मोठं पोर हातगाडीवर दमून तसंच झोपून जायचं. धाकटी पोर खाली झोळीत. प्रत्येक दिवस अंत बघायचा. रडवायचा. बाईनं हिंमत हारली नाही. चार पैसे गाठीशी आले. झोपडीपाशीच भाजीचं दुकान टाकलं. जरा वणवण कमी झाली.
बाई बारा बारा तास दुकानात राबायची. कुणासाठी ? पोरांसाठी. तिला खूप वाटायचं. पोरांनी चांगलं शिकावं. काटकसरीत रहायची. सगळी मौज मारून शाळेची फी भरायची.
पोरगी अभ्यासाला बरी. बारावी झाली अन् तिचं लग्न करून दिलं. पोराचा तेवढा वकूबच नव्हता. शाळेचा निकाल लागला की पोराचाही निक्काल लागायचा. गुरासारखी मारायची पोराला ती. अन् धाय मोकलून रडायची. शेवटी तिनं नाद सोडून दिला. तोही दुकानी राबू लागला.
ते काहीही असो तिचा पोरगा तिच्यासारखाच. तिच्याच हाताखाली तयार झालेला. धंद्याला पक्का आणि व्यवहाराला चोख. बाईनं त्याला किराण्याचं दुकान थाटून दिलं. तेही जोरात चालायला लागलं. कष्टाला कुणीच कमी नव्हतं. पोराचं लग्न लावून दिलं. सूनबाईही कामाची. घरचं सांभाळून भाजीच्या दुकानात, तिला हातभार लावायची.
खरं तर तिची झोपडी , दुकान सगळंच अनधिकृत. सगळी पडीक, ओसाड, नाल्याशेजारची जागा. तरी ही बाईला शांत झोप लागेना. बाईनं रीतसर ती जागाच विकत घेतली. पक्क घर बांधलं. मागे दहा खोल्यांची बैठी चाळ बांधली. तिथलं भाडं सुरू झालं. टेम्पो घेतला. होलसेलनं भाजी घ्यायला सुरवात केली. मार्केट यार्डला पक्का गाळा घेतला. बाईला कष्टाची नशा चढू लागली. अन् पैशाचीही.
हळूहळू आजूबाजूला वस्ती वाढत गेली. बाईनं चांगली माया जमा केली. नेमकी कशी सुरवात झाली कुणास ठाऊक ?
वस्तीतल्या दिवाकरचा पोरगा.
बारावी झाला. आय.टी.आय. ला टाकायचा होता. फी वाचून अडलेलं सगळं. बाई म्हणाली, मी देते पैसे. शीक, मोठा हो. नोकरीला लाग. अट एकच. पहिल्या सहा महिन्याचा पगार माझा. माती खाल्लीस तर तुझी कातडी सोलून पैसा वसूल करीन.
पोरगं हुशार, मेहनती. पास झाला. एम.आय. डी.सी.त नोकरीला लागला. बरोब्बर एक तारखेला बाई वसूलीला जायची. सहा महिने असंच चाललं. बाईनं एक पैसा सोडला नाही. काहीही असो, पोरगं लाईनीला लागलं.
हा सिलसिला पुढं चालू राहिला. वस्तीतली पोरं, त्यांचे नातेवाईक..
कित्येक पोरांच्या फीया बाईनं भरल्या. अगदी पोरींच्याही. बाईचा ऊसूल होता. शिकणाऱ्याचा वकूब किती, मेहनत कशी आहे ? शिकून नोकरी मिळेल की नाही ? सगळं बघून पैसा पुरवायची. बाईच्या भितीनं पोरं शिकली.
आय.टी.आय, डिप्लोमा, बी.एड, नर्सिंग. बाईचा एक पैसा कधी वाया गेला नाही. पोरंगं हुशार असलं तर, एम.पी.एस्सी.च्या कोचींगची फी सुद्धा बाई भरायची. अट एकच. पहिल्या सहा महिन्याचा पगार. बाईनं रग्गड पैसा मिळवला यातनं.
पैसा, सोनं नाणं, जमीन जुमला सगळं स्वतःच्या नावावर. पोराला सांगायची. हे सगळं माझंय. रहायचं तर रहा, नाहीतर वेगळा हो. बाईला फारसं प्रेमानं बोलता यायचंच नाही. कुणावर ही फारसा विश्वास बसायचा नाही. तोंडात सहज शिव्या यायच्या.
चालायचंच.
सहज कानावर आलं. नाल्यापलीकडं बाईनं मोठ्ठी जमीन घेतलीय म्हणे. पैशाकडे पैसा जातो हेच खरं.
बाई थकली आता. साठीच्या पुढचं वय. एक दिवस पोराला, सुनेला, लेकीला बोलावली. वकील बोलावला. पोराच्या नावावर घर, दुकान. चाळीचं उत्पन्न पोरीच्या नावे करून दिलं. “तुमच्या लायकीप्रमाणं दिलंय तुम्हाला. बाकी तुम्ही आणि तुमचं नशीब.” नवीन घेतलेली जमीन, सोनं नाणं, बँकेतली जमा. आकडा खूप मोठा. बाईनं सगळ्यावरचा हक्क सोडून दिला. चांगल्या माणसांना गळ घातली. ट्रस्ट केला.
दोन वर्षात मोठ्ठी बिल्डींग बांधून तयार. चार वर्ष झालीयेत. ‘सरस्वती विद्या मंदिर’ सुरू होऊन. परवडणारी फी, ऊत्तम शिक्षण. फुकट नको, फी हवीच. त्या शिवाय शिक्षणाची किंमत कळत नाही. बाई असंच म्हणायची. त्याशिवाय हा डोलारा चालणार कसा ?
बाई खरंच ग्रेटय. बाईला यात काहीच विशेष वाटत नाही. सरसोस्ती कळलीच नाही कुणाला. बाई आता थकलीये. तिकडच्या वाटेकडे डोळे लावून बसलीय.
कुणी तरी ट्रस्टीं पैकी म्हणालं. शाळेत बाईचं मोठ्ठं पोट्रेट लावू. चित्रकार बोलावला. बाई वसकन् ओरडली, “माजं न्हाई देवी सोरसोस्तीचं चित्तर लागलं पायजेल शाळंत. माज्या घरावर न्हाई किरपा केली तिनं, समद्या पोरांवर किरपा राहू दे तिची.”
बाईपुढे कुणाचं काय चालणार ?
भरल्या डोळ्यांनी, समाधानानं, बाई लांबच्या प्रवासाला निघून गेलीय. तिचं नाव, तिचा फोटो कुठेच काही नाही. हेच ते सरस्वतीचं चित्र. शाळेच्या पोर्च मधे लावलेलं. खरंय. सोरसोस्ती आम्हाला कधी कळलीच नाही.
© कौस्तुभ केळकर नगरवाला
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈