श्री मकरंद पिंपुटकर
🌸 जीवनरंग 🌸
☆ माने काकांचे निवृत्तीनंतरचे प्लॅन… ☆ श्री मकरंद पिंपुटकर ☆
माने काका खुशीत होते. आठवड्याभरातच ते कंपनीतून निवृत्त होणार होते. आयुष्यभर अकाऊंटस् विभागात आकडेमोड केली, आता कोणतेही हिशेब न ठेवता ‘मित्रमंडळींकडे जायचं, मनसोक्त गप्पा मारायच्या, पत्त्यांचे डाव रंगवायचे, घरी गरमागरम कांदा भजी खायची, महिन्याभरात एखादा चित्रपट पाहायचा – नाटक पहायचं’ अशा अगदी साध्यासुध्या अपेक्षा उरी बाळगून ते येत्या जीवन प्रवासाची स्वप्नं रंगवत होते.
आणि अगदी त्याप्रमाणेच, प्रत्यक्ष निवृत्तीच्या दिवशी पत्नीने औक्षण केलं, मुलाने – सुनेने छान भेटवस्तू दिल्या, मित्रमंडळींबरोबर हॉटेलात मस्त पार्टी झाली, आणि मुख्य म्हणजे दुसऱ्या दिवशी उठून कामावर जायची कसलीही घाईगडबड नव्हती.
सुरुवातीचे दोन चार दिवस मस्त मजेत गेले. मित्र, नातेवाईकांना काकांनी फोन केले, मनमुराद गप्पा मारल्या, मिश्राकडे गरमागरम कांदाभजी खाल्ली, सगळं कसं छान चाललं होतं.
पण आठवड्याभराने या सुखी संसाराच्या स्वप्नाला पहिला तडा गेला. कुठेतरी जाण्याचा कार्यक्रम ठरवायला, मित्राला फोन केला, तर त्याने “अरे, तू निवृत्त झाला आहेस पण आम्हाला अजून कामधंदे आहेत” असं म्हटलं आणि पहिला विसंवादी सूर लागला.
कांदाभजी खाल्ल्यावर पोट बिघडलं, ते निस्तरण्यात दोन चार दिवस गेले. आताशा नातेवाईकही फोनवर टाळत आहेत असं वाटू लागलं. वर्षानुवर्षे धावपळ करणाऱ्या माने काकांना वेळ कसा घालवायचा हा यक्षप्रश्न पडू लागला.
माने काका कोमेजू लागले. घरात आवराआवरी कर, जुनी गाणी ऐक, वगैरे करून ते तात्पुरता टाईमपास करत पण रिकामा वेळ आता त्यांना खायला उठू लागला.
बायको, मुलगा, सून यांना काकांची होणारे कुचंबणा दिसत होती, पण उत्तर सुचत नव्हते.
आज घरी माने काकांच्या नातवंडांना शाळेतील गणिताच्या गृहपाठ करताना काहीतरी अडचण येत होती. सुनेला जमत नव्हते, मुलगा ऑफिसमधून यायला खूप अवकाश होता.
“बघू रे, काय प्रॉब्लेम आहे ते ?” म्हणत काकांनी पुस्तक हातात घेतले आणि बघता बघता त्या प्रश्नाचं उत्तर कसं काढायचं ते त्यांना मोठ्या खुबीने शिकवले.
नातवंडं खुश झाली. आणि मग तो प्रघातच झाला. अडचण असो वा नसो, मुलं आता आजोबांकडे येऊन अभ्यास करू लागली. तर्खडकरांचे इंग्रजी व्याकरणाचे पुस्तक काका कोळून प्यायलेले आणि गणितं करण्यात आयुष्य गेलेलं, त्यामुळे इंग्रजी आणि गणितावर काकांचं प्रभूत्व. आणि मुलांना याच विषयांची सगळ्यात जास्त भीती.
काका खेळीमेळीच्या वातावरणात, रोजच्या जीवनातील – अगदी चित्रपट, मालिका यांची उदाहरणे देत देत नातवंडांना हे विषय समजावून सांगत. मुलांना या विषयांची वाटणारी भीती दूर झाली, ते आवडीने अभ्यास करू लागले आणि पहिल्या घटक चाचणीत त्यांना सुंदर गुण मिळाले. माने काकांची कॉलर टाईट !
एके दिवशी गंमत झाली, नातवाच्या आणि नातीच्या वर्गातली दोन तीन मुलं, “आजोबा, आमचाही अभ्यास घ्या ना, आम्हालाही शिकवा ना,” म्हणत शिकायला आली. मग नातवापेक्षा दोन वर्षे मोठा असलेला एक मुलगा आला आणि हा सिलसिला चालूच राहिला.
माने काका आता नाममात्र शुल्क घेऊन शिकवण्या घेऊ लागले होते. ते आता छान busy राहू लागले होते, नोकरीत होते त्यापेक्षाही जास्त.
सगळं कसं छान चाललं आहे, सुख म्हणजे याहून आणखी जास्त काय असतं?असा तृप्त प्रश्न काका स्वतःलाच विचारणार होते, तेवढ्यात या दुधात आणखी साखर पडली.
दोन दिवस काकांच्या लक्षात येत होतं, काका मुलांना शिकवताना, घरातली धुणी भांडी करणारी रखमा दाराआड उभी राहून घुटमळत होती. आज न राहवून, त्यांनी तिला हाक मारून बोलावून घेतलं. “काय झालं रखमा ? काही काम आहे का माझ्याशी ?”
“काका, येक विचारू का ? माज्या पोरांचा थोडा अब्यास घ्याल का तुमी ? दर म्हयन्याला म्या फी द्येईन तुमास्नी,” चाचरत चाचरत रखमाने विचारलं, आणि काकांच्या ज्ञानयज्ञाला नवी दिशा मिळाली.
आता काकांच्या शिकवण्या दोन सत्रांत सुरू झाल्या. रखमाच्या मुलांबरोबर सोसायटीत धुणीभांडी करणाऱ्या अन्य बायका, सिक्युरिटीवाले यांची मुलंही शिकायला येऊ लागली. काका प्रत्येक मुलाचे दर महिन्याला वट्ट ११ रुपये फी म्हणून घ्यायचे.
त्यांच्या लक्षात आलं की या मुलांना इंग्रजीबद्दल भयंकर न्यूनगंड आहे, मग काकांनी शालेय अभ्यासक्रमाव्यतिरिक्त त्यांना दैनंदिन वापरातील इंग्रजीचे धडे द्यायला सुरुवात केली. काकांनी या मुलांची आणि नातवंडांच्या शाळेतल्या इंग्रजी माध्यमातील मुलांच्या सायन्स सेंटर, संग्रहालय, प्राणी संग्रहालय, वाचनालय अशा ठिकाणी एकत्र सहल न्यायला सुरुवात केली.
ज्यांचे आईवडील सोसायटीत घरकाम करायचे, अशा बऱ्याच मुलांकडे smartphone होते, काकांनी त्यांना ऑनलाईन transactions कशी करायची, त्यातले धोके कुठले असू शकतात या गोष्टी समजावून सांगायला सुरुवात केली.
त्यांनी या मुलांना सांगितलं की “तुम्ही रोज १३ सूर्यनमस्कार घातलेत, तुमच्या आई वडिलांना मोबाईल – गरजेपुरते लिहायला वाचायला, आकडेमोड करायला शिकवलंत, तर मी स्वतः तुम्हाला बक्षीस देईन – शिष्यवृत्ती म्हणा ना !”
मुलांना आणखी मजा येऊ लागली. त्यांच्या आई वडिलांनाही आता हळू हळू शिक्षणाची गोडी लागू लागली होती.
काका आता सगळ्याच मुलांना स्पर्धात्मक परीक्षा, वैदिक गणित, प्रयोगातून विज्ञान, भारतीय स्वातंत्र्य सैनिक, ऋषी, गणितज्ञ, वैज्ञानिक, आदिंची माहिती द्यायला सुरुवात केली. त्या मुलांच्या मनात देशप्रेमाची ज्योत जागवयाला सुरुवात केली. त्यांना सभाधीटपणा यावा म्हणून त्यांची वक्तृत्व स्पर्धांची तयारी करून घ्यायला लागले.
काकांना आता बिलकूल फुरसत नव्हती. शतकपूर्तीनंतर फलंदाजाने पुन्हा नव्याने गार्ड घ्यावा, आणि जणू नव्या दमाने, नव्या उमेदीने परत पहिल्यापासून खेळायला सुरुवात करावी, तद्वत, माने काकांची निवृत्तीनंतरची दुसरी इनिंग बहारदारपणे सुरू झाली होती.
काकांच्या मित्रांची मात्र आता एक तक्रार होती, त्यांनी कधी कुठे जायचा कार्यक्रम ठरवायचं म्हटलं, की आताशा माने काकांना वेळ नसायचा, ते त्यांच्या मुलांच्या गराड्यात मग्न असायचे.
© श्री मकरंद पिंपुटकर
चिंचवड
मो ८६९८०५३२१५
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈