श्री संभाजी बबन गायके

? जीवनरंग ?

☆ “हे दान देऊ कसं ?” – भाग – १ श्री संभाजी बबन गायके 

“अलख !” तिच्या दारात तिला हा आदेश ऐकू आला आणि ती दचकली. ती सकाळची कामं उरकायच्या गडबडीत होती. चुलीवर एका बाजूला कालवण रटरटत असतानाच तिचे हात भाकरी बडवण्यात गुंतले होते. ज्वारीच्या पीठाने पांढुरक्या झालेल्या उजव्या हाताच्या उपड्या बाजूने तिने कपाळावर येत असलेले आपले पांढरे केस मागे सारले. तिने वयाचा मध्य गाठला होता, केसांनी आपला काळा रंग हळूहळू सोडायला सुरूवात केली होती आणि ते पांढ-या रंगाचा हात धरायला लागले होते.

सकाळी सकाळी भिक्षेकरी दारावर येणं तिच्यासाठी काही नवं नव्हतं.पण आजच्या अलख आवाजात तिला तिच्या ओळखीचं काहीतरी जाणवलं. पण तरीही ज्वारीचं पीठ भरलेलं एक मध्यम आकाराचं भांडं घेऊन ती उठली. उठताना चुलीमधलं लाकूड थोडंसं मागं ओढून घ्यायला ती विसरली नाही. ती लगबगीने दाराच्या उंब-यात पोहोचली. भिक्षेक-याने आपली झोळी पुढे केली. त्याच्या मागे आणखी एक संन्याशी उभा होत…वयाने बराच मोठा. बहुदा याचा गुरू असावा. तिने पीठाचे भांडे त्याच्या झोळीत उपडं करायला हात पुढे केले पण आज का कुणास ठाऊक तिला त्या भिक्षेक-याच्या तोंडाकडे पहावंसं वाटलं. एरव्ही सर्व भिक्षेकरी सारखेच. तिने आपला चेहरा वर करून त्याच्याकडे पाहिले आणि झटकन झोळीकडे जाणारे हात मागे घेतले!

भगवी कफनी,गळ्यापर्यंत रुळणारी कोवळी दाढी,पायांत खडावा,काखेत झोळी…वेष तर संन्याशाचा…पण डोळे? डोळे अजूनही तिच्या बाळाचे….काळेशार. वीस वर्षांनंतरही तिने ते डोळे ओळखले. त्या डोळ्यात तिने दोन वर्षे आपल्याच बोटांनी काजळ घातलेले होते…ती कसे विसरेल? आणि तिला तर त्या दोन वर्षांत त्या डोळ्यांत खोलवर पहायची सवयच झाली होती की! किती नवसा सायासांनी जन्म झालेला होता त्याचा. असाच कुणी बैरागी आला होता दारी…तिने मापटंभर दाणे घातले होते त्याच्या झोळीत तर त्याने पुत्रवती भव असा आशीर्वाद दिला होता. एवढ्याशा दाण्यांच्या मोबदल्यात खूप मोठा आशीर्वाद दिला होता त्याने…तसा ते प्रत्येकीलाच देत असावेत, असं तिला वाटलं. पण बारा महिन्यांतच तिची झोळी भरली! पण तो बैरागी काही पुन्हा तिच्या दारी आला नाही!

आणि आज तसाच एक जण उभा होता तिच्यासमोर. ती त्याच्या झोळीत दान टाकणार होती पण तो तिला पुत्रवती भव असा आशीर्वाद देऊ शकणार नव्हता…तो स्वत:च तिचा पुत्र होता.तिच्या तोंडून शब्द फुटेना….ती कशीबशी म्हणाली…लल्ला! तुम? हो, तिचा लल्लाच होता तो…वीस वर्षांपूर्वी त्याला शेवटचं पाहिलं होतं…आणि आज तोच तिच्यासमोर उभा होता…नखशिखान्त संन्याशाच्या रुपात.

तो तरूण संन्याशी पुन्हा म्हणाला,”माई,भिक्षा घालतेस ना झोळीत?” तिच्या हातून पीठाचं भांडं गळून पडलं आणि तिने मोठ्या आवेगाने त्या संन्याशाला मिठी मारली….लल्ला! का सोडून गेला होतास? किती शोधलं तुला! आणि तिनं हंबरडा फोडला. ते ऐकून तिचं सारं घर दारात धावलं. आया-बाया हातातली कामं टाकून बाहेर आल्या. कामावर जाण्याच्या गडबडीत असणारी माणसं थबकून राहिली.

वीस वर्षांनी तो परतला होता. चांगलं अंगणात खेळणारं दोन वर्षांचं पोर..आई घरात स्वयंपाक करीत होती….कसं कुणास ठाऊक कुठं हरवून गेलं एकाएकी. कुणी नेलं,कसं नेलं, आणि हे पोर तरी कसं गेलं असावं कुणासोबत? काही एक समजलं नाही. पाडस हरवलेली हरिणी त्याला शोधण्यासाठी काय नाही करत? अगदी श्वापदांच्या समोरही जाऊन उभी राहते…माझ्या बदल्यात माझ्या बाळाला सोडा अशी मूक विनवणी करीत!

गावोगावीच्या जत्रा,देवळं धुंडाळून झाली,अंगारे धुपारे,ज्योतिष सर्वकाही अजमावून झाले. पण नाहीच मिळून आला तिचा लल्ला! कुणी म्हणे भिकारी बनवण्यासाठी कुणी पळवून नेलं असेल, कुणी म्हणे विनापत्य बाईला विकलं असेल कुणीतरी नेऊन. कुणा आईच्या पदराखाली असेल तरी चालेल…पण भिकारी? नको रे देवा ! पण आयुष्य थांबलं नाही…वीस वर्षे निघून गेली.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री संभाजी बबन गायके 

पुणे

9881298260

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments