☆ जीवनरंग ☆ क्षणिक ☆ एका घटकेचा खेळ – भाग 5 ☆ श्री आनंदहरी ☆
तो अचानक घरी आलेला पाहून त्याच्या आईला काळजीही वाटली होती आणि खूप आनंदही झाला होता. ‘ती का आली नाही?’ असे आई आपल्याला विचारेल असे त्याला वाटत होतं पण आईने काहीच विचारले नाही की बाबांनी नेहंमीसारखी तिची क्षेम-खुशाली विचारली नाही.. याचे त्याला राहून राहून आश्चर्यही वाटत होते आणि ‘सुंठीवाचून खोकला जातोय’ याचा आनंद ही होत होता.
घरी आल्यावर ज्या एका प्रश्नाने तो अस्वस्थ होता तो उद्भवलाच नव्हता. दुसऱ्या दिवशी कितीतरी वर्षांनी तो गावात फेरफटका मारून गावातच असणाऱ्या काही मित्रांना भेटून गप्पा मारून आला होता. तो आला होता त्या दिवशीच्या अस्वस्थतेचा मागमूसही त्याच्या मनात उरला नव्हता. ‘आपण उगाचंच फार विचार करत होतो, घरी यायचं टाळत होतो.’ असा विचार त्याच्या मनात येत होता.
बाबानी मळ्यात जाताना त्याला ‘येतोस?’ का विचारले आणि तो झटकन तयारही झाला. त्यालाही मळ्यात जाऊन यावे असे वाटत होतंच. तो शाळेत असताना मळ्यात गहू, हरभरा असायचा एखादा तुकडा खपली गहू ही केलेला असायचा.. भाजीचे चारदोन वाफे ही असायचे.. मळ्यात पाऊल ठेवताच त्याला हे आठवलं. आता जास्तीत जास्त ऊसच होता. गहू, हरभरा, खपली केली होतीच पण पोटापूरती. रानातल्या छपरात एक बाजलं टाकलेलं होतं. बाबा म्हणाले, “ऊसातली वैरण काडंस्तवर बस वाईच सपरात निवांत…”
“मी पण येतो ..”
“नगं, तुला सवं न्हाय ऱ्हायल्याली.. आलोच मी ..”
बाबा वैरण काढायला गेले.. तो मळ्यात फिरत राहिला. तो नोकरीला लागल्यावर दुसऱ्याच वर्षी मळ्यात दुसरी विहीर काढली होती. पाईपलाईन केली होती.. तेंव्हापासून बाबांची मोट सुटली होती.. नुसतं बटन दाबलं की साऱ्या मळ्यात पाणी दौडत होतं.. तो फिरून येऊन बांधावरच्या आंब्याखाली जाऊन गार सावलीत बसला. कितीतरी दिवसांनी तो मळ्यात असा निवांत आला होता.. कसलीही घाई नव्हती, गडबड नव्हती.
बाबांनी वैरणीचं ओझं छपराजवळ टाकलं आणि तो आंब्याखाली असणार हे ठाऊकच असल्यासारखे खांद्यावरच्या टॉवेलने घाम पुसत त्याच्याजवळ आले.
“आलास व्हय रं फेरी मारून ?”
“होय. बरेच दिवस जमलंच नाही यायला.. पण मळ्यात आले की जीव रमतो चांगला..” काहीतरी बोलायचं म्हणून पण मनातलं तो बोलून गेला.
“व्हय रं, अजून तुझी नाळ हाय मातीशी .. त् तुला ब्येस वाटणारच रं… आरं, येक डाव नाळ जुळली का मग न्हाय गमत त्येच्याबिगर .. मन ऱ्हातच न्हाय मग माणूस असूदेल न्हाय तर गावची माती. आन नाळ जुळायबी टाइम लागतो. पोरा, माणसाचं कसं असतंय बघ, सुकाळाची धा सालं ध्येनात ऱ्हात न्हाईत पर दुष्काळाचं एक साल तो इसरता इसरत न्हाई बग.. आरं, सुक्यात वलं बी जळून जात असतं..तसेच हाय आयुष्याचे.. आरं आपलीच पाच बोटं सारखी नस्त्यात ततं दोन माणसं सारखी कशी असतीली रं?.. अरं, शेजार शेजारी दोडका न दुधी टोकला तर दोन्हीबी संगच वाढतील, एकमेकांत गुततीली बी पर म्हणून दोडका दुधीगत आन दुधी दोडक्यागत कसा आसंल रं? आरं, तू कायबी बोलला न्हाईस तरी आय-बा ला काईचं उमगत न्हाई असे न्हाई… सूनबाई येत न्हाई ह्येचं वाईट वाटतं.. पर म्हणून ती फकस्त वाईटच हाय आसं नसतंय रं… परत्येक माणसात चांगलं वाईट असायचंच आन ती आस्तय ती बी फकस्त दुसऱ्याच्या नजरंत … परपंचा कुणाचाबी असुदेल त्यो असाच अस्तुय आन फुडबी तसाच ऱ्हाणार हाय.. .. कवा आपुन दोन पावलं माग तर कवा पुढं जायाचं आस्तं.. माणूस एकमेकांच्या दिशेनं चालाय लागलं तर जवळ ईल आन ईरुद्ध दिशेला चालाय लागला तर…? आरं , नाती जुळणं, तुटणं असुदेल न्हायतर माणसाचं असणं, नसणं असुदेल.. येवडंच नव्हं तर जगातलं समदंच एका घटकंचा खेळ असतोय रं.. आरे, परपंचातलं भांडान बी तसंच… तेवढी येक घटका टाळाय पायजे येवडं ध्येयात ठेव पोरा…”
तो बाबांचं ऐकत होता.त्यांना न बोलता, न सांगताही सारेच कळले होते… ते जे म्हणाले ते सारेच खरे होते.. आयुष्यातील सारेच क्षणिक असते ,.. त्याच्या -तिच्यातील राग, लोभ, मतभेद भांडण तंटा सारेच क्षणिक होतं, एका घटकेचाच खेळ होता …. तो क्षण, ती घटका विसरली तर…? तो क्षण तिथेच सोडून दिला तर?
तो उठला त्याने फोन लावला, “उद्या सकाळच्या बसला बस… मी वाट पाहतोय… बसशील ना?”
त्याच्या बाबांना फोनवरचे तिकडचे उत्तर ऐकू आले नव्हते तरी ते उत्तर त्याच्या खुललेल्या चेहऱ्यावरून कळले होते.. ते खुशीत हसले.
◆ कथा संपन्न ◆
© श्री आनंदहरी
इस्लामपूर, जि. सांगली
भ्रमणध्वनी:- 8275178099
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈