श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ मुलगी – भाग – २ ☆ श्री दीपक तांबोळी

      “दुकानात सफाई कामासाठी त्वरीत मुलगा पाहिजे” अशी पाटी वाचून तो दुकानात शिरायला लागला तसं सिक्युरिटी गार्डने त्याला अडवलं. “काय पाहिजे?”

      त्याने शांततेने बोर्डाकडे बोट दाखवलं. गार्ड समजला. आत हात दाखवून म्हणाला “राजू शेठ समोरच बसलेत त्यांना भेटून घे.”

      अस्वस्थ मनाने तो आत शिरला. समोरच काऊंटरवर राजूशेठ कस्टमरकडून पैसे घेण्यात गुंतले होते. कस्टमर गेल्यावर त्यांची नजर त्याच्यावर पडली. “बोला..”

       “ते… तुम्हांला सफाई कामासाठी मुलगा पाहिजे आहे ना?”

        “हो. तू करणार आहेस का?”

त्याने मान डोलावली. राजूशेठने त्याच्याकडे निरखून पाहिलं. पंधरासोळा वर्षाचा गोरागोमटा स्मार्ट मुलगा. कपडे मात्र साधारण होते. दुकानाच्या सफाईसाठी योग्य आहे असं त्यांना वाटेना. “तुझं नांव?”

“प्रदीप”

“वडील काय करतात?”

“रिक्षा चालवतात”

“कुठे रहातोस?”

“समता नगर”

“ठिक आहे .तीन हजार देऊ तुला महिन्याला.खाडे करायचे नाहीत.खाड्याचे पैसे आम्ही कापून घेतो”

” हो चालेल “

तेवढ्यात ग्राहक आल्यामुळे राजशेठ ओरडून म्हणाले “अरे भास्कर. याला दुकान दाखवून दे.काम समजावून सांग”

भास्कर आला.त्याने प्रदीपला ते तीन मजली दुकान फिरुन  दाखवलं

” तुला सकाळी आठ वाजताच यावं लागेल.फ्लोरींग, काचेची कपाटं,काऊंटर्स,वाँशरुम सगळं साफ करावं लागेल.हे कपड्याचं दुकान आहे.इथे थोडीही धुळ चालत नाही. ग्राहक येतांना धुळ घेऊन येतात.त्यामुळे वारंवार झाडू मारणं,कपड्याने पुसणं करावं लागतं.रात्री आठनंतरच तुला घरी जाता येईल”

प्रदीपने मान डोलावली.

“जा आता.सकाळी आठ वाजताच ये”

प्रदीप गेला.त्याला जातांना पाहून राजूशेठला परत एकदा तो सफाईकामाला योग्य नाही असंच वाटून गेलं.”ठिक आहे.पाहू दोनचार दिवस.नाही पटला तर हाकलून देऊ” ते मनाशीच बोलले.

प्रदीप दुसऱ्या दिवशी आला.त्याने काम करायला सुरुवात केली पण त्याने कधीच सफाईचं काम केलेलं नाही हे त्याच्यासोबत आलेल्या नोकरांच्या लक्षात आलं.ते त्याला वारंवार सुचना देऊ लागले.दहा वाजले.दुकान उघडण्याची वेळ आली तरी त्याची सफाई झाली नव्हती.ते तरी बरं शेठ अकरा वाजता यायचे.नाहीतर त्यांनी प्रदीपला फाडून खाल्लं असतं.दुकान सुरु झालं.साडेअकराला भास्कर वाँशरुमकडे जायला निघाला तर वाँशरुमच्या दाराजवळ बसून प्रदीप रडत होता.

“काय रे काय झालं?का रडतोय?”

“नाही.काही नाही” प्रदीपने डोळे पुसले

” तुला काम जमत नाही असं मनोज सांगत होता.कधी काम केलं नाही वाटतं?”

“नाही”

“गरीबी वाईट असते बाबा.काहीही कामं करायला लावते.जमेल जमेल.तीन चार दिवस हाल होतील.मग सवय होऊन जाईल.काही रडू नको.घरी कोण काम करतं?”

” आई आणि बहिण”

” तरीच.कळलं ना कसा त्रास होतो ते?”

प्रदीपने मान डोलावली.

दुपारी भास्कर कस्टमर नाही असं पाहून जेवायला बसला त्याचं लक्ष प्रदीपकडे गेलं.

” काय रे जेवायचं नाही का?”

प्रदीपने नकारार्थी मान हलवली.

“का?डबा नाही आणला का?”

” नाही”

” ये मग इकडे.आपण दोघंही जेवू”

” नको.मला भुक नाहिये”

“अशी कशी भुक नाही.सकाळपासून काम करतोय.चल मुकाट्याने ये खायला”

तेवढ्यात दोन सेल्समनही डबा घेऊन आले.प्रदिपचा डबा नाही हे पाहून त्यांनी दोन दोन पोळ्या आणि भाजी प्रदिपला एका ताटलीत काढून दिल्या.भुक नाही म्हणणाऱ्या प्रदीपने पाच पोळ्या खाल्ल्या.

“उद्यापासून डबा आणत जा.काय!” भास्करने दम भरला.

“ते…आई आजारी असते त्यामुळे आणता येत नाही”

तिघा सेल्समननी एकमेकांकडे पाहिलं.एक जण म्हणाला

” काळजी करु नको.आम्ही आणत जाऊ तुझ्यासाठी पण”

प्रदीप काही बोलला नाही.

चारपाच दिवस प्रदीपला काम जमत नाहिये हे पाहून बाकीच्या सेल्समननी त्याला बरीच मदत केली .कुणी काऊंटर पुसून घेतले ,कुणी काचेची कपाटं साफ केली,तर कुणी पंखे,लाईटस्.आठवडाभरात प्रदिपला बऱ्यापैकी काम जमायला लागलं.पण बाकीच्यांनी मदत करणं सोडलं नाही. राजूशेठला ही गोष्ट माहित नव्हती त्यामुळे प्रदीपच्या कामावर ते समाधानी होते.भास्करला त्यांनी दोनतीनदा त्याच्याबद्दल विचारलं तेव्हा भास्कर म्हणाला “चांगला आहे पोरगा कामाला.मेहनती आहे “

लग्नाचा सिझन होता.ग्राहकांची वर्दळ प्रचंड वाढली.प्रदीपचं कामही वाढलं.वारंवार दुकान झाडणं,पुसणं यात दिवस कसा निघून जायचा कळायचं नाही.पंधरा दिवस झाले आणि अबोल प्रदीप दुकानात रुळला.आता तो मोकळेपणाने बोलत होता.फुरसत असली की तो सेल्समनना मदत करायचा.ढिगाने पडलेल्या साड्या,बेडशीट्सच्या घड्या करुन ठेवायचा.ग्राहकांना पसंत न पडलेले रेडिमेड कपडे बाँक्सेसमध्ये व्यवस्थित पँक करुन ठेवायचा.महिना झाला.राजूशेठने प्रदीपच्या हातात तीन हजार ठेवले तेव्हा त्यांना प्रदिपचे डोळे भरुन आल्याचं जाणवलं.

” काय रे काय झालं?”

” काही नाही. पहिला पगार आहे ना म्हणून…”

“अच्छा..”

त्याने डोळे पुसले.शेठजींना आठवलं या महिन्यात प्रदिपने एकही दिवस खाडा केला नव्हता.उलट सिझनमुळे कधी रविवारीही दुकान सुरु असायचं तेव्हा तो स्वतःहून दुकानात येऊन काम करायचा.त्याच्या कामावर खुश होऊन राजूशेठने त्याचा पगार चार हजार करायचं ठरवलं.

सोमवार उजाडला.राजूशेठ दुकानात आले.देवांच्या फोटोंची पुजा करुन ते कँशकाऊंटरवर बसत नाही तोच प्रदीप त्यांच्याकडे आला.नमस्कार करुन म्हणाला

“शेठजी माझे बारावीचे क्लासेस पुढच्या आठवड्यापासून सुरु होताहेत तर मी हा आठवडाभरच काम करु शकणार आहे”

शेठजींना धक्का बसला.

“अरे पण तू दुकानात काम करुनही क्लासेस करु शकतो.संध्याकाळी लवकर सोडत जाऊ आपण तुला”

“नाही शेठजी.क्लासेस सकाळी आणि संध्याकाळीही असतात”

आता मात्र शेठजी रागावले.आता पुन्हा दुकानाच्या सफाईसाठी मुलगा बघणं आलं.याच गोष्टीचा त्यांना तिटकारा होता.एकतर माणसं मिळायची नाहीत. मिळाली तरी पैसा देऊनही टिकायची नाही.

“तुला असं एकच महिना काम करायचं होतं तर तसं बोलला का नाहीस?आता या आठदहा दिवसाचा पगार तुला मिळणार नाही” ते रागावून म्हणाले

प्रदीप हसला

“काही हरकत नाही शेठजी”

शेठजींना आश्चर्य वाटलं.एक एक दिवसाच्या पगारासाठी भांडणारी,खाड्याचे पैसे कापले म्हणून वादविवाद घालणारी माणसं त्यांनी बघितली होती.या पोराने तर सहजगत्या त्यावर पाणी सोडलं होतं.नाहीतरी आजकालच्या तरुण पोरांना पैशाची किंमत असतेच कुठे!

नशिबाने शेठजींना दुसरा माणूस मिळाला.पण तो चार हजार पगारावर अडून बसला.शेवटी राजूशेठना त्याचं ऐकावं लागलं.येत्या सोमवारपासून तो कामावर येणार होता.

– क्रमशः भाग पहिला  

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments