श्री सुनील शिरवाडकर

? जीवनरंग ❤️

☆ दीनु… ☆ श्री सुनील शिरवाडकर ☆

दिनुचा काही वेळ जात नव्हता. रोज आपलं सकाळी उठायचं.. बाहेर एक चक्कर मारुन यायचं.. येतांना बीडीचं बंडल घेऊन यायचं.. खायचं.. प्यायचं.. आणि बीडीचं ते बंडल संपवायचं. नातवाशी खेळायचं.. सुन पुढे ठेवील ते खायचं.. बस्स.. दुसरं आयुष्यच नव्हतं त्यांचं.

आयुष्यभर दिनुने सुतारकाम केलं. गावात एका जुन्या वाड्यात भाड्याच्या खोलीत तो रहात होता. आजुबाजुला सगळे जुने वाडे. कोणाकडे ना कोणाकडे काही तरी काम निघायचंच. आणि त्या वेळी हमखास आठवण यायची ती दिन्याची.

हो.. दिन्याच. त्याला कधी कोणी दिनकर म्हणून हाक मारलीच नाही. दिनकर नाही.. आणि दिनु पण नाही. तो सगळ्यांचा दिन्याच होता. कुणाकडे काही काम असो.. नसो.. दिनु आपला हत्यारांची पिशवी घेऊन.. तोंडात बीडी ठेवून सकाळी बाहेर पडणारच. गल्लीच्या कोपळऱ्यावर असणाऱ्या चहाच्या टपरीवर जाऊन उभा रहाणारच.

पण आता ते सगळं संपलं होतं. दिनुचा एकुलता एक मुलगा आता एका कंपनीत नोकरी करत होता. जुन्या वाड्यातली खोली कधीच सुटली होती. पोरानं गावाच्या बाहेर एक छोटंसं रो हाऊस घेतलं होतं. तळमजल्यावर बापासाठी एक सेपरेट रुमही होती. साठी उलटुन गेली होती. आता फक्त आराम.. आणि आराम. आणि तेच दिनुला नको झालं होतं. 

आज समोरच्या बाजुच्या एका रो हाऊस मधुन वेगवेगळे आवाज येत होते. हातोडीचे.. ड्रीलींगचे.. लाकुड कापण्याचे.. त्या आवाजांनी दिनुची तगमग वाढली. कपाटावर ठेवलेल्या हत्यारांच्या पिशवी कडे सारखी नजर जात होती.

काढावी.. का न काढावी.. अश्या विचारात असतानाच त्याने ती पिशवी खाली ओढलीच. ओढताना ती खाली पडली.. आणि धप्प असा आवाज झाला. त्या आवाजानेच बाहेर खेळणारा नातु आत आला. त्यानं पाहीले.. आपले आबा..‌ म्हणजे.. आजोबा त्या पिशवीतुन काही काही बाहेर काढताहेत.

त्यानं कधी ती हत्यारं पाहीलेलीच नव्हती. कुतुहलाने तो आपल्या आबांजवळ गेला. “आबा..काय आहे हे?”

दिनुला असा प्रश्न विचारणारं कोणीतरी हवंच होतं. त्याला आयताच चांगला श्रोता मिळाला. तो सांगु लागला.. “अरे ही पिशवी.. ही हत्यारं म्हणजे माझं सर्वस्व आहे. ही करवत.. हा रंधा.. ही हातोडी.. बघ.. बघ.. आता कशी गंजुन चाललीय. या हत्यारांना माझा घाम.. माझं रक्त लागलंय..”

दिनु बोलत होता.. आणि नातु ऐकत होता.. त्याला काही समजत होतं.. बरंचसं समजत नव्हतं.. दिसत होते फक्त आपल्या आबांचे पाण्यानं भरलेले डोळे.

“जा बरं.. एका वाटीत पाणी घेऊन ये..” दिनुनं असं सांगताच नातवानं एका वाटीत पाणी आणलं. दिनुच्या अंगात आता उत्साह संचारला. त्यानं धार लावायचा दगड पिशवीतुन काढला. मग पटाशी घेतली. दगडावर पाणी टाकुन तो पटाशीला धार करु लागला.

तल्लीन होऊन तो पटाशी घासत होता. नातु जरा वेळानं कंटाळून बाहेर निघून गेला. दिनु कितीतरी वेळ ते काम करत होता. आता त्या गंजलेल्या पटाशीचं रुप बदललं होतं. एकदम चकचकीत.. धारदार.. दिनुनं त्या पात्यावरुन हळुच बोट फिरवलं.. तर बोटातुन टचकन एक रक्ताचा थेंब आला. दिनुला त्यांचं काहीच वाटलं नाही.. वाटला असेल तो आनंदच.. मनासारखी धार झाल्याचा.

मग त्याच मुडमध्ये त्याने हातोडी घासली.. करवतीचे एक एक त्रिकोण घासले.. हत्यारं ठेवलेली ती ताडपत्रीची पिशवी रिकामी करुन झटकली. लाकडाचा भुसा.. बारीक तुकडे बाजुला काढले.. त्यातल्या चुका.. खिळे.. स्क्रु.. असंच काहीसं कामाचं असलेलं वेगळं काढलं.. पुन्हा पिशवी भरून ठेवली.

त्याच्या बापानं त्याला एक गोष्ट सांगितली होती.. काम असो.. नसो.. रोज हातोडी स्वच्छ करायची.. पटाशीला धार करून ठेवायची. ही हत्यारं म्हणजे आपली लक्ष्मी.. तिच्यावर गंज चढु द्यायचा नाही.. तिला स्वच्छ ठेव.. तुला काम मिळत राहील.

आणि या गोष्टीचं प्रत्यंतर इतक्या लवकरच येईल ही अपेक्षा दिनुनं केलीच नव्हती. दुपारी पिशवी काढली.. हत्यारांची साफसफाई केली.. आणि रात्री पोरांनं बापाला विचारलं.. “आबा.. ते आपल्या वाड्यात शिंदे रहायचे आठवतात का?”

“हा.. माहीत आहे ना.. आता ते शिंदे साहेब झालेत.. त्यांचं काय?”

“काही नाही.. त्यांच्या बंगल्यावर काही किरकोळ काम होतं. आज सहज भेट झाली.. तर विचारत होते.. दिनकर काम करतो का म्हणून.”

“मग? तु काय सांगितलं?”

“विचारतो म्हटलं. बऱ्याच वर्षात त्यांनी काम केलेलं नाही.‌. जायची इच्छा आहे का तुमची? होईल का काम तुमच्याकडून आता?”

“जाईन ना मी.. तेवढाच माझाही वेळ जाईल बघ.”

आणि मग दोन दिवसांनी दिनु शिंदे साहेबांच्या बंगल्यावर गेला. नवीनच बंगला होता, फर्निचर पण सगळं नवीनच होतं.. पण बरीच किरकोळ कामं बाकी होती. कुठे हुकस् लावायचे होते.. फ्रेम लावण्यासाठी काही खिळे ठोकायचे होते.. बरीच कामं होती. आणि या अश्या छोट्या कामांसाठी शिंदे साहेबांना कोणी माणूस मिळत नव्हता.

दिनुनं सगळी कामं अगदी मनापासून केली. कामात दिवस कसा गेला हेही त्याला कळलं नाही. संध्याकाळी कामं आटोपली. दिनुनं आपली सगळी हत्यारं गोळा केली.. पिशवीत भरली.. शिंदे साहेबांनी खुशीने त्याला त्याची मजुरी दिली.. चहापाणी झाला.. आणि दिनु बाहेर पडला.

शिंदे साहेबांचा बंगला तसा रोडपासुन बराच आत होता. ‌बरंच अंतर चालायचं होतं.. खिशातुन त्यानं बीडीचं बंडल काढलं. त्यातली एक बीडी ओठात धरुन त्यानं काडी लावली‌. एक खोलवर झुरका मारला. दिवसभराच्या कामानं आलेला शिणवटा थोडा कमी झाला.. हातात जड पिशवी होती. त्या पिशवीत असलेली करवत.. वाकस.. पटाशी.. अंबुर.. हे सगळे त्यांचे जीवाभावाचे सोबती. आजचा पुर्ण दिवस त्यांचा सोबत गेला होता.. 

खिळे ठोकतानाचा तो ठोक ठोक आवाज.. लाकुड कापताना अंगावर उडालेला भुसा.. पटाशीने उडवलेल्या ढलप्या.. या सगळ्यांनीच त्याला आपलं तरुणपण आठवलं होतं. पुर्वीसारखं.. पुर्वीइतकं काम आता आपण करु शकणार नाही हेही त्याला माहित होतं.. पण आजच्या कामामुळे त्याला एक गोष्ट लक्षात आली.. आपण अजुनही काम करु शकतो.. 

काम करुन दिनुचं शरीर जरुर थकलं होतं.. पण मन मात्र खुपच टवटवीत झालं होतं. संपत आलेलं बीडीचं थोटुक पायाखाली दाबत तो मोठ्या आनंदात घराच्या दिशेने निघाला.

© श्री सुनील शिरवाडकर

मो.९४२३९६८३०८

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments