श्री मंगेश मधुकर
जीवनरंग
☆ “धाकटा…” ☆ श्री मंगेश मधुकर ☆
बा-बापूजींच्या लग्नाचा पंचेचाळीसावा वाढदिवस दिमाखात साजरा झाला.रात्री झोपण्याच्या तयारीत असताना बापूजी म्हणाले “खुश”
“बहोत.”
“एकदम भारी वाटतय.काय पाहिजे ते माग,आज मूड एकदम हरिश्चंद्र स्टाईल आहे“
“सगळं काही मिळालं फक्त एकच..”बांच्या बोलण्याचा रोख समजून बापूजींचा चेहरा उतरला.
“कशाला तो विषय काढलास.आज नको.”
“उलट आजच्या इतका दुसरा चांगला दिवस नाही.”
“तो एक डाग सोडला तर सगळं काही व्यवस्थित आहे.”
“असं नका बोलू.तुम्ही असं वागता म्हणून मग बाकीचे सुद्धा त्याच्याशी नीट वागत नाहीत.”
“त्याची तीच लायकी आहे.थोरल्या दोघांनी बघ माझं ऐकून पिढीजात धंद्यात लक्ष घातलं,जम बसवला,योग्य वेळी लग्न केलं अन संसारात रमले.सगळं व्यवस्थित झालं आणि हा अजूनही चाचपडतोय.”
“उगीच बोलायला लावू नका.तुम्ही हॉस्पिटलमध्ये होता तेव्हा थोरल्यांना दुकानाची जास्त काळजी होती.लोक लाजेस्तव दिवसातून दोनदा भेटून जायचे.दिवसरात्र तुमच्यासोबत फक्त धाकटाच होता.बाकीचे पाहुण्यांसारखे. तेव्हाच थोरल्यांचा स्वार्थीपणा लक्षात आला.हॉस्पिटलचं बिल तिघांनी मिळून भरलं पण नंतर त्या दोघांनी तुमच्याकडून पैसे मागून घेतले.धाकट्यानं मात्र विषयसुद्धा काढला नाही.”
“बापासाठी थोडफार केलं तर बिघडलं कुठं?
“थोरल्यांना पैसे देताना हेच का सांगितलं नाही.”
“ते जाऊ दे.झालं ते झालं”
“का?,ते दोघे आवडते आणि धाकटा नावडता म्हणून ..”
“काहीही समज.”
“उद्या गरजेला तर फक्त धाकटाच आधार देईल हे कायम लक्षात असू द्या.”
“पोरांकडे पैशासाठी हात पसरावे लागणार नाहीत एवढी सोय केलेली आहे”
“प्रत्येक ठिकाणी पैसा कामाला येत नाही.माणसाची गरज पडतेच”
“आज धाकट्याचा फारच पुळका आलाय.”
“पुळका नाही काळजी वाटते.बिचारा एकटाय”
“स्वतःच्या कर्मामुळे.बापाचं ऐकलं नाही की अशीच गत होणार.”
“बिनलग्नाचा राहिला याला तो एकटा नाही तर तुम्ही पण जबाबदार आहात”
“हे नेहमीचचं बोलतेस”
“तेच खरंय”
“काय करू म्हणजे तुझं समाधान होईल”बापूजी चिडले.
“तुमच्यातला वाद संपवा.”
“त्यानं माफी मागितली तर मी तयार आहे..”
“पहिल्यापासून सगळ्या पोरांना तुम्ही धाकात ठेवलं. स्वतःच्या मनाप्रमाणं वागायला लावलं पण धाकटा लहानपणापासून वेगळा.बंडखोरपणा स्वभावातच होता.बापजाद्याच्या धंद्यात लक्ष न घालता नवीन मार्ग निवडला आणि यशस्वी झाला हेच तुम्हांला आवडलं नाही.ईगो दुखवला.याचाच फार मोठा राग मनात आहे.”
“तोंडाला येईल ते बोलू नकोस.मी त्याचा दुश्मन नाहीये.भल्यासाठी बोलत होतो.तिघंही मला सारखेच”.
“धाकट्याशी जसं वागता त्यावरून अजिबात वाटत नाही”
“तुला फक्त माझ्याच चुका दिसतात.पाच वर्षात माझ्याशी एक शब्दही बोललेला नाही.”
“बापासारखा त्याचा ईगोसुद्धा मोठाच…कितीही त्रास झाला तरी माघार नाही.”
“एकतरी गोष्ट त्यानं माझ्या मनासारखी केलीय का?”
“तुमचा मान राखण्यासाठी काय केलं हे जगाला माहितेय.”
“उपकार नाही केले.त्यानं निवडलेली मुलगी आपल्या तोलामोलाची नव्हती.ड्रायव्हरची मुलगी सून म्हणून..कसं दिसलं असतं.घराण्याची इज्जत …..”
“तरुण पोरगा बिनलग्नाचा राहिला तेव्हा गेलीच ना.थोडं नमतं घेतलं असतं तर ..”
“मला अजूनही वाटतं जे झालं ते चांगलं झालं.”
“त्या दोघांचं एकमेकांवर प्रेम होतं.मनात आणलं असतं तर पळून जाऊन लग्न करणं अवघड नव्हतं परंतु केवळ तुमची परवानगी नव्हती म्हणून लग्न केलं नाही.”
“त्यानंतर एकापेक्षा एक चांगल्या मुलींची स्थळ आणली पण..यानं सगळ्यांना नकार दिला.”
“तुम्हा बाप-लेकाचा एकेमकांवर जीव आहे पण पण सारख्या स्वभावामुळे ईगो आडवा येतोय.”
“काय जीव बिव नाही.मुद्दाम बिनलग्नाचं राहून माझ्यावर सूड उगवतोय.आपल्या लग्नाच्या वाढदिवसालाच तो जन्मला तिथूच पणवती लागली”बापूजींच्या बोलण्यावर बा प्रचंड संतापल्या.तोंडाला येईल ते बोलायला लागल्या. बापूजीसुद्धा गप्प नव्हते.दोघांत कडाक्याचं भांडणं झालं.ब्लड प्रेशर वाढल्यानं बा कोसळल्या. आय सी यू त भरती करावं लागलं.बापूजी एकदम गप्प झाले पण डोळ्यातलं पाणी थांबत नव्हतं.एक क्षण बांच्या समोरून हलले नाहीत.
—-
“बा,तुझं बरोबर होतं.शेवटी धाकट्यानंच आधार दिला.मी त्याला माफ केलं.माघार घेतो पण तू रुसू नकोस.लगेच धाकट्याला बोलवं.त्याच्याशी मी बोलतो.आता आमच्यात काही वाद नाही.सगळं तुझ्या मनासारखं होईल.धीर सोडू नकोस.धाकटा कुठायं.त्याला म्हणावं लवकर ये.बा वाट बघातीये.तिला त्रास होतोय.माफी मागतो पण ये.मी हरलो तू जिंकलास.”खिडकीतून पाहत हातवारे करत बोलणाऱ्या बापूजींना पाहून रूममध्ये आलेल्या नर्सनं विचारलं
“काय झालं.बाबा कोणाशी बोलताहेत ”.
“माझ्या आईशी”
“त्या कुठंयेत ”
“आठ दिवसांपूर्वीच ती गेली.तो धक्का सहन न झाल्यानं बापूजी बिथरले.आपल्यामुळेच हे घडलं या ठाम समजुतीनं प्रचंड अस्वस्थ आहेत.काळचं भान सुटलंय.सतत आईशी बोलत असतात. हातवारे,येरझारा आणि असंबद्ध बोलणं चालूयं.मध्येच चिडतात,एकदम रडायला लागतात म्हणून इथं आणलं.आता सकाळपासून सारखं धाकट्या मुलाला भेटण्यासाठी जीव कासावीस झालाय.त्याला बोलाव म्हणून हजारवेळा मला सांगून झालंय”
“मग त्यांना बोलवा ना.”नर्स
“मीच तो धाकटा.”
© श्री मंगेश मधुकर
मो. 98228 50034
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈