सौ राधिका माजगावकर पंडित

? जीवनरंग ?

तीन लघुकथा (१) कर्तव्यदक्ष पोलिसांना सलाम… (२) लेकीची माया (३) प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित

(१) कर्तव्यदक्ष पोलिसांना सलाम..

फिरायला जातांना तिची पावलं नकळत सुनसान रस्त्या कडे वळली. बापरे ! इथे तर वर्दळच नाहीय्ये. घाबरून ती मागे वळली तर , दोन माणसं तिच्या मागून येत होती. तिला घाम फुटला. घाबरून ती किंचाळणार  होती,  इतक्यातं ती व्यक्ती म्हणाली, ” घाबरू नका,आम्ही  गुप्त पोलीस आहोत. केव्हापासून तुमच्या मागून चाललो आहोत .

“अहो पण का? मी–मी –काहीच गुन्हा केला नाही.”

” ताई तुम्ही नाही काही गुन्हा केलात , पण एक गुन्हेगार तुमच्या मागावर असून तुमच्या गळयातल्या   मंगळसूत्राकडे त्याचं लक्ष आहे .तुमच्या संरक्षणासाठी आम्ही तुमच्या मागे केव्हापासूनच चालत आहोत .तिचा हात गळ्याकडे गेला.खोटं मंगळसूत्र तिने चाचपलं. खुलासा करण्यासाठी ती काही बोलणार होती,पण ती थबकली.पोलिसांच्या दक्षतेच, स्रिदाक्षिण्याचं  तिला फार कौतुक वाटलं. ती म्हणाली, “तुमच्या कर्तव्य तत्परतेच आणि स्रि दाक्षिण्याचं  कौतुक करावं  तेवढं  थोडचं आहे. खूप आभारी आहे मी तुमची. असं म्हणून पुढचं काही न बोलता खोटं मंगळसूत्र तिने पदराड लपवलं . “धन्यवाद “असं म्हणून ती पुढे झाली.

(२) लेकीची माया 

दमून भागून कामावरून घरी आली होती ती.अजून मजूरी मिळाली नव्हती. घरात शिरतांना फाटक्या फ्रॉकच्या घेरात कसला तरी पुडा लपवतांना चिंगी दिसली तिला. इथं पैन पै वाचवतेय मी. आणि ही बया चोरून खाऊचे पुडे आणून खातीय.डोकं फिरलं तिचं.तिने दणकन लेकीच्या पाठीत धपाटा मारला .घाबरून पोरगी स्वयंपाक घरात पळाली. तिरिमिरीत माय  भिंतीला टेकून बसली. स्वतःची, साऱ्या जगाची, आपल्या परिस्थितीची चीड आली  होती तिला. डोळे भरून आले.तिच्या समोर चिंगी उभी होती.”,म्हणत होती, “रडू नकोस ना गं माय.भूक लागलीआहे ना तुला? सकाळपासून उपाशी आहेस. घरात काहीच नव्हतं. म्हणून टपरी वरून चहा आणि बिस्किट पुडा आणलाय तुझ्या साठी.माझ् ऐकून तर घे मगासारखं मारू नकोस ना मला! आई पैसे चोरले नाहीत मी.बाबांनी खाउला दिलेल्या पैशातून तुझ्यासाठी पुडा आणायला गेले होते. एका हातात मघाशी लपवलेला बिस्किटाचा पुडा,आणि दुसऱ्या हातांत कपबशी घेऊन लेक विनवत होती. घे ना !खरच हे चोरीचे पैसे नाहीत  माय. आवेगाने तिने चिंगीला मिठीत घेतलं  आईच्या माराने कळवळून आलेले डोळ्यातले अश्रू चिंगीच्या चिमुकल्या गालावर सुकले होते. तिला भडभडून आलं.उगीच मी लेकरावर परिस्थितीचा राग काढला. एका हाताने चिंगी आईला बिस्कीट भरवत होती.आणि फ्रॉकनें आईचे डोळे पुसत होती. आता लेक झाली होती माय. आणि माय झाली होती लेक. खरंच लेक असावी तर अशी. मित्र-मैत्रिणींनो  आपल्या लेकीवर भरभरून माया करा.खूप खूप भरभरून प्रेम द्या मुलांना ..  धन्यवाद 

(३) प्रेम द्यावं आणि प्रेम घ्यावं…

मुलाचे लग्न कालच झालं.आणि आज ऋतुशांती पण झाली.  सगळीकडे निजानीज झाली होती. इतक्यात खोकल्याचा आवाज  आला.

‘अगोबाई हे काय? हा तर रूम मधून येणारा नव्या सुनबाईंच्या खोकल्याचा आवाज!. येणारी खोकल्याची ढासं थांबतचं नाही  .

घड्याळाचे कांटे पुढे सरकत होते कोरडा खोकला   कसा तो थांबतच नाहीय्ये  बाई!    काय करावं?”!.नवी नवरी बिचारी, कालच आलीय आपल्या घरात. कुणाला आणि कसं सांगणार बापडी, सगळंच नवखं.    स्वतःशी  पुटपुटत, असा विचार करत असतानाच सावित्रीबाईना एकदम आयडिया   सुचली.लगबगीने त्या स्वयंपाकघरात शिरल्या.लवंग काढून त्यांनी, ती भाजून कुटून बारीक केली. मधात कालवली. दरवाज्यावर टकटक करून,अर्धवट उघडलेल्या दरवाज्यातून त्यांनी ती वाटी  अलगद आत सरकवली.आणि म्हणाल्या” सूनबाई हे चाटण चाटून घे हो ! खोकल्याची ढासं थांबेल. वाटी घेतांना नवपरिणीत नवरीच्या डोळ्यातून कृतज्ञता ओसंडून वाहत होती .जरा वेळाने ढासं कमी होऊन खोकल्याचा आवाज बंद  झाला .आणि खोलीतून शांत झोपेच्या,घोरण्याचा आवाजही आला. सावित्रीबाई गालांतल्या गालात हसून मनांत म्हणाल्या’ प्रेम आधी द्याव लागतं.मग ते दुपटीने आपल्याला परत मिळतं .  माझ्या आईचा  सासूबाईंचा  वसा आपण  पुढे  चालवायलाच  हवा नाही कां? सकाळी  लवकर उठून, न्हाहून, फ्रेश होऊन, उठल्यावर सूनबाई सासूबाईंच्या पाया पडताना हसून म्हणाली, “आजपासून मी तुमची सून नाही.तर मुलगी झालें, लेकीच्या मायेने विचारते, मी …. ए आई म्हणू का तुम्हाला?” असं म्हणून ती लाघवी पोर अलगदपणे   सासूबाईंच्या कुशीत शिरली .

लेक नव्हती नां सावित्रीबाईंना ! जन्म दिला नसला म्हणून काय झालं?  सूनही  लेक होऊ शकते नाही कां?

दोन्ही बाजूनी  सकारात्मक विचारांनी , समजूतदारपणे,  प्रेमाची देवाण-घेवाण झाल्यावर सासु सुनेच विळा आणि  भोपळा अशा नावाने बदनाम झालेलं नातं  दुध साखरेसारखे एकरूप  पण होऊ शकत   हो नां?     आणि मग साध्या गोष्टीतून उगवलेलं त्यांचे हे प्रेम चिरंतन कालपर्यंत टिकलं  त्यामुळेच त्या घराचं नंदनवन झालं आणि  मग घरचे पुरुषही निर्धास्त झाले.  कौटुंबिक कथा असली तरी प्रत्येक घराघरांतली ही कहाणी सुफळ संपूर्ण होवो.  ही सदिच्छा .  

© सौ राधिका माजगावकर पंडित

पुणे – 51  

मो. 8451027554

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print

0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments