सौ. गौरी सुभाष गाडेकर

☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 1 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆

“एनी प्रॉब्लेम? आज एवढी चिडचिड का करतेयस?”  विकासचं हेच मला आवडतं.  मी त्याच्यावर चिडले,  करवादले तर तो इतरांच्या नव-यांसारखं माझ्यावरच न डाफरता शांतपणे मूळ कारण शोधण्याचा प्रयत्न करतो.

“जाऊ दे. तुला  कळलं, तर तूही वैतागशील.”

“एक तर ‘जाऊ दे’ म्हणून शांत हो,  नाहीतर बोलून मन मोकळं कर.”

“अरे,  ताईचा फोन आला होता. तिचं काहीतरी काम आहे मुंबईत म्हणून आपल्याकडे राहायला येणार आहे.”

“नोsवेs. त्यांना सांग, हॉटेलमध्ये उतरा म्हणून. आमचं घर लहान आहे म्हणावं.”

“मी सांगितलं तिला तसं  पण रडत होती रे ती.”

“वा! पैसेवाली,  बंगलेवाली माणसं रडतात?”

“विकास, प्लीsज.”

“ठीक आहे. येऊ दे त्यांना. मी दादाकडे राहायला जातो .मला तो स्वत:चा मोठेपणा,  दुस-याला सतत खिजवणं वगैरे अजिबात आवडत नाही .त्यात पुन्हा सकाळच्या वेळी त्या बाथरूम अडवून बसणार.”

” आधीच मला एवढं टेन्शन आलंय आणि असं काय काय बडबडून तू ते आणखी वाढवतोयस.”

आता मी रडायला सुरुवात करणार,  म्हटल्यावर विकासने चटकन माघार घेतली, “ओके.ओके. डोन्ट वरी. आय अ‍ॅम विथ यू. आपण दोघं मिळून संकटाचा सामना करू या आणि लवकरात लवकर त्या संकटाला पळवून लावूया. बाकी तुझी ताई पळताना………..”

मग आम्ही दोघंही हसायला लागलो.

अर्थात तेव्हा हसू आलं,  तरी पूर्वीची आठवण डंख मारतच होती.

लग्नाला वर्ष व्हायच्या आतच आम्ही स्वत:चं घर -तेही वन बी-एच-के – घेतलं,  तेव्हा आम्हाला कृतकृत्य झाल्यासारखं वाटलं. आम्ही दोघांनी किती हौसेने सजवलं ते! आमचा स्वर्गच होता तो. मी कौतुकाने आई, बाबा आणि ताईला राहायला बोलावलं.

घरात शिरताक्षणीच ताई वैतागली,  “एवढं अगदी ‘घर घेतलं, घर घेतलं’  करत होतीस, ते हेsघर? आमच्या बंगल्यातली माझी खोलीच तुझ्या अख्ख्या घराएवढी आहे .आणि तुझ्या या बेडरूमएवढं माझं बाथरूम आहे.”

“अग, लग्नापूर्वी तू राहायचीस ते घर केवढं होतं, ते विसरलीस?” बाबा चिडले.

“ते आता जुनं झालं. आता मला ऐसपैस राहायची सवय झालीय. मला नाही बाई जमायचं एवढ्याशा खुराड्यात राहायला.”

माझे डोळे भरले. विकासचाही चेहरा पडला.

“आता तीन-चार तास प्रवास करून आलेय. लगेच परत जायचं त्राण नाहीय माझ्यात. माझा ड्रायव्हरही दमला असेल. पण उद्या सकाळी उठल्या उठल्या मी निघणार.”

सकाळी उठल्याबरोबर ती जी बाथरूममध्ये जाऊन बसली, ती बाहेर येण्याचं नावच घेईना. तासाभराने ती बाहेर आली. मग आरशासमोर पाऊण-एक तास तरी तिचं प्रसाधन चाललं होतं.

ती निघाली, तेव्हा मी तोंडदेखलंही “पुन्हा ये ग” म्हटलं नाही. विकास नाराजच होता. बाबाही चिडलेले होते. आईने मात्र “जाऊ दे. आपल्या संसारात सुखी आहे ना! मग झालं तर,”  म्हणून स्वत:चीच समजूत घातली.

“ड्रायव्हरला कुठे उतरवायला सांगू मी?  चांगल्या पॉश ठिकाणी सांग हं. तिथून तू मला तुझ्या घरी ने. त्याला कळायला नको, तू कसल्या जागी राहतेस ते.”

तिला पेडर रोडला उतरायला लावून आपण तिथे अजिबात न फिरकण्याचा  मला मोह झाला. पण मग कोणाला फोन करायचं तरी  ताईला सुचलं असतं की नाही,  कुणास ठाऊक.

© सौ. गौरी सुभाष गाडेकर

संपर्क –  1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.

फोन नं. 9820206306

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित  ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments