श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ दोष ना कुणाचा… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
‘‘आई, उद्या मी बेंगलोर ला निघतो.’’
आई आणि मी डायनिंग टेबलावर जेवायला बसलो असताना मी म्हणालो. आई आश्चर्यचकित झाली. ‘‘अरे काल तर आलास बेंगलोरहून, आठ दिवसांची रजा घेऊन आलास असे म्हणालास?’’ मी गप्प. हळूच म्हणालो, ‘‘कंपनीचे केबल आलीय. परवा जॉबवर यायला कळवले.’’ पण तुझी बँकेची कामे राहिली होती ना? ‘‘ ती उद्या पुरी होतील. उद्या रात्रौच्या प्लेनने निघणार.’’ आई हळूच पुटपुटली, आणि शुक्रवारचे मिताचे लग्न? मला एकदम ठसका बसला. आई म्हणाली, अरे ! हळू हळू. पाणी पी. कुणीतरी आठवण काढली.
आई आणि मी अन्न फक्त चिवडत होतो. दोघांचेही जेवणात लक्ष नव्हते. हसतमुख मिताचा चेहरा डोळ्यासमोर आला. मी हात धुवायला उठलोच. पाठोपाठ आईपण ताटे आवरत उठली. मी म्हणालो, बॅग भरतो उद्याची. दिवसभर खूप कामे आहेत.
मी माझ्या खोलीत आलो. पाठोपाठ आई पदराला हात पुसत आली. ‘‘मिता आलेली परवा. वल्लभला लग्नाचे कळले काय ? हे विचारत होती. तशी ती येत असते नेहमीच आली की, घराची सर्व आवराआवर करुन देते. मुन्नीची खोली स्वच्छ करते. तुझीही खोली ठीकठाक करते. मला स्वयंपाकात मदत करते. आता चालली लग्न करुन.’’ मी गप्प.
“वल्लभ, मिताला तुझ्याबद्दल फार वाटायचं रे, मलाही वाटायचं मिता या घरची सून होईल. तशी बातमी तू किंवा मिता द्याल अशी वाट पाहत होते. पण शनिवारी मुन्नीचा फोन आला. ती म्हणाली, मिताचे लग्न ठरले. मिताने तिला पहिला फोन केला. शेवटी गेली दहा वर्षे त्यांची मैत्री. मुन्नी फोनवर म्हणाली, दादाने बहुतेक मिताला लग्नाचे विचारले नाही शेवटी. या दादाच्या मनातले काही कळत नाही. स्पष्ट काही बोलत नाही. माणूस घाणा आहे नुसता.’’
“मुन्नीला पण वाटत होते, तुझे आणि मिताचे लग्न होईल. तिला पण आश्चर्य वाटले. तुझ्या मनात मिताबद्दल होतं ना वल्लभ? तस मला तर वाटत होतं. मग का नाही विचारलस तिला? “ आईचे एकापाठोपाठ एक प्रश्न.
मी काहीही न बोलता बॅग भरायला सुरुवात केली. आईला काय उत्तर द्यावे कळेना. माझे चित्त कुठे ठिकाणावर होते? मिताच्या लग्नाची बातमी ऐकली आणि वाटले सार्या स्वप्नांची राख रांगोळी झाली. चार वर्षात कंपनीत जीव तोडून मेहनत केली. गेली दोन वर्षे एक्सटर्नल एम.बी.ए. सुरु होतं. ते दोन महिन्यात संपेल की मग मी कंपनीचा असिस्टंट मॅनेजर होईन. आणि मिताला लग्नाचे विचारीन असे मनात मांडे घातलेला मी, मिताच्या लग्नाच्या बातमीने उद्ध्वस्त झालो. बॅगेत थोडे कपडे, लॅपटॉप टाकून मी बॅग बंद केली. लाईट बंद करुन बेडवर पडलो. डोळे मिटले तरी झोप कुठली यायला. डोळ्यासमोर १६ वर्षाची मिता दिसायला लागली. इंजिनिअरिंग पहिल्या वर्षात अॅडमिशन मिळाली तो दिवस. व्हि.जे.टी.आय. सारख्या मुंबईतील प्रख्यात इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये सहज अॅडमिशन मिळाली म्हणून आईबाबा खुश. मुंबईत जेमतेम दोन इंजिनिअरिंग कॉलेज. त्यात व्हि.जे.टी.आय. चे नाव मोठे. आमच्या कॉलनीत गेल्या कित्येक वर्षात व्हि.जे.टी.आय. मध्ये अॅडमिशन मिळाले नव्हते. पण यंदा मला अॅडमिशन मिळाली म्हणून कॉलनीतले सर्वजण माझ्याकडे कौतुकाने पाहत होते. सकाळपासून फुले आणि पेढे घेऊन लोक येत होते. आई आणि मी ते आनंदाने स्वीकारत होतो. लोकं थोड कमी झाली, आई आणि मी माझी आवडती कडक कॉफी घ्यायला बसलो. एवढ्यात दरवाजावरची बेल वाजली. आई म्हणाली, मुन्नी आली बहुतेक जा दार उघड. मी उठून दार उघडले. बाहेर मुन्नी होती. ‘‘अरे दादा किती वेळ बेल वाजवतेय मी, ऐकायला येत नाही काय?’’ असे नेहमी प्रमाणे बडबडत मुन्नी आत येताना मागे वळून म्हणाली, ‘‘अग, ये ग, आत ये.’’ मी बाहेर पाहिलं. हातात वह्यापुस्तके घेऊन एक मुलगी उभी. मुन्नीच्याच वयाची. निमगोरी, लाजाळू. खाली मान घालून वह्यापुस्तके सावरत होतील. मुन्नीने हात धरुन तिला आत घेतले. आईला ओरडून म्हणाली, ‘‘आई ही बघ मिता, अगं ही शेजारच्या रामनगर मध्ये राहते. गेल्या आठवड्यात माझी ओळख झाली.’’ मुन्नी आणि तिची मैत्रीण माझ्या समोरच बसल्या. आईने कॉफीचे कप त्यांच्या हातात दिले. आई मुन्नीला आज कोण कोण माझे अभिनंदन करुन गेले ते सांगत सुटली. मुन्नी कॉफी घेता घेता आणि कौतुकाने माझ्याकडे पाहत होती. एवढ्यात मुन्नीच्या काहीतरी लक्षात आले. ती तिच्या मैत्रिणीला म्हणाली, मिता, तू काय आणलस दादाला? मिताने हळूच पर्समधून गुलाबकळी काढली आणि माझ्या हातात ठेवली. ‘‘अभिनंदन’’ म्हणाली. हे म्हणताना किती घाबरली होती, हे तिच्या चेहर्यावरुन आणि थरथरणार्या हातावरुन समजत होते. मिताला पहिल्यांदा बोलताना मी पाहिले ते असे. मग मिता मुन्नीबरोबर वारंवार घरी येत राहिली. दोन महिन्यानंतर आलेल्या माझ्या वाढदिवसाला आई, मुन्नी आणि मिता यांनी मोठा बार उडवून दिला. त्या दिवशी रोज आपल्या व्यवसायात अडकलेल्या वडिलांना सक्तीने घरी थांबविले. मी कॉलेजमधून आलो, तर माझी खोली फुलांनी सुशोभित केली होती. माझ्या टेबलावर ‘हॅपी बर्थ-डे’ चे ग्रीटिंग चिकटवलेले होते. माझ्या शाळेतील, कॉलेजमधील वेगवेगळे फोटो भिंतीवर चिकटविलेले होते. खोलीत माझ्या प्रिय किशोरी ताईंची कॅसेट मंद आवाजात सुरु होती आणि माझ्या आवडीचा गोड शिरा आणि कडक कॉफी तयार होती. मी आश्चर्यचकित झालो. एवढे वाढदिवस झाले माझे पण अशी वाढदिवसाची तयारी पाहिली नव्हती. मी आईला म्हणालो, अगं केवढं हे कौतुक माझे? एवढ्या वर्षात कधी नाही आणि आज? मुन्नी म्हणाली, अरे दादा – ही सगळी मिताने केलेली तयारी. तिनेच बाबांना घरी थांबायला लावले. आणि तुझ्या खोलीची सर्व तयारीपण तिचीच. तिने लवकर येऊन मला उठवले. आणि हे सर्व तुझे फोटो वगैरे मागून घेतले. नाहीतरी आपल्या घरात कुणाचे वाढदिवस असे साजरे करतो का आपण? आणि बाबा कधी दुकान सोडून वाढदिवसाला थांबतात का? मी मिताकडे पाहिले. ती हळूच हसली आणि मला प्रचंड आवडून गेली. कोजागिरी साजरी करायला जुहू बिचवर मी, मुन्नी आणि मिता गेलेलो तेव्हा मी आणि मिता जास्त जवळ आलो. मी घरी असलो आणि माझ्या खोलीत अभ्यास सुरु असला तर मुन्नी कधीकधी मोठ्याने बोलायची. मग मिता मुन्नीला ओरडायची, मुन्नी! दादांचा इंजिनिअरिंगचा अभ्यास सुरु आहे, हळू बोल. मग मुन्नी तिच्यावर चिडायची. माहिती आहे गं, चार महिन्यापूर्वी या घरात यायला लागली आणि दादाच्या अभ्यासाची काळजी करायला लागली. या सर्व गोष्टी मी आणि मिता एकमेकांच्या जवळ यायला कारण होत होत्या. पण माझे मन म्हणत होते – प्रेम, लग्न हे नंतरचे आधी करिअर महत्त्वाचे. नुसते इंजिनिअरिंग नाही, पोस्ट ग्रॅज्युएशनपण करायचे. लहान वयात मोठ्या पदावर पोहोचायचे. त्याकरिता मनावर लगाम हवा. तेव्हा प्रेम वगैरे सर्व काही मनात.
इंजिनिअरिंग पूरे झाले आणि कॅम्पसमधून बेंगलोर मधील कंपनीत माझी निवड झाली. आमच्या घरातून मुंबईबाहेर कोणी राहिले नव्हते. त्यामुळे आईबाबा नर्व्हस झाले. पण माझा बेंगलोरला जायचा निर्णय पक्का होता. एकतर बेंगलोर आय.टी.चे मुख्य केंद्र होत होते. त्यामुळे बेंगलोरमध्ये एक से एक हुशार माणसे जमा झाली होती. दुसरं म्हणजे, बेंगलोरमध्ये पुढील शिक्षणासाठी चांगली सोय होती. आणि अतिशय महत्त्वाचे कारण – मुंबईच्या घामट हवेपेक्षा बेंगलोरची थंड हवा मला मानवणारी होती.
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈