श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “जरीकाठी पदर !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
“आज्जी,पदर कर पुढं !” असं नातीनं म्हणताच पापड लाटत बसलेल्या सीताबाईंनी मान वर करून पाहिलं. अंगणात त्यांच्यासारख्याच अन्य काही म्हाता-याही पापडाचे गोळे घेऊन पापड लाटण्याची कामं पटापट करीत बसल्या होत्या…त्यांनीही लगोलग वर पाहिलं. हातात कापडी पिशवी घेऊन सीताबाईंच्या थोरल्या मुलाची मुलगी कांता त्यांच्यासमोर हस-या चेह-यानं उभी होती. कांता शाळेत शिक्षिका म्हणून रुजू होऊन वर्ष होत आलं होतं.
सीताबाईंना वाटलं कांतानं नेहमीप्रमाणे त्यांच्या आवडीचा खाऊ आणला असेल… मस्तानी! त्यांच्या शहरातलं हे अत्यंत प्रसिद्ध पिण्याजोगं थंडपेय… आईसक्रीम घातलेलं… पण तसं महाग असल्यानं अगदी केंव्हातरीच मिळू शकणारं आणि ते सुद्धा फुल ग्लास नव्हे तर हाफ. कांता त्या शाळेत रुजू होण्याआधी घरीच मुलांच्या किरकोळ शिकवण्या घ्यायची. वस्तीतल्या लोकांची मोठमोठ्या शिकवण्यांच्या फिया भरण्याची ऐपत तशी नसायचीच…पण कांता पैशांचा फारसा आग्रह धरीत नसे. आलेले पैसे असेच आज्जी आणि तिच्या मैत्रिणींच्या खाऊवर मजेने खर्च करत असे. सीताबाई तशा चांगल्या खात्यापित्या घरच्या कन्या पण लग्नानंतर सासरी आल्या आणि काहीच दिवसांत सासरची आर्थिक घडी विस्कटली. नाईलाजाने वस्तीत रहायला यावं लागलं आणि संसाराचा गाडा ओढण्याची वेळ आली. सीताबाईंचे यजमानही खाजगी नोकरीत होते पण वेतन अतिशय तुटपुंजे होते आणि घरात त्याकाळच्या प्रथेप्रमाणे मुलाबाळांची कमतरता नव्हती. त्यात यजमान आजाराने घरीच बसले तेंव्हा थोरला मुलगा नाईलाजाने शिक्षण अर्धवट टाकून कमवायला जायला लागला. त्यात मुलींची लग्नं निघाली आणि होतं नव्हतं जवळ किडुकमिडुक ते गिळंकृत करून साजरी झाली. मग अशातच थोरल्याचं लग्न उरकून घेतलं. बरी आर्थिक स्थिती असलेल्या सूनबाई मिळाल्या पण त्यांनाही थोड्याच दिवसांत शिलाईच्या कामावर जावं लागलंच…इलाज नव्हता.
सीताबाई मसाला कांडप कामावर जायच्या. तिखट मिरच्यांच्या झोंबणा-या स्पर्शांची त्यांना सवय झालेली होती पण हातांची आग मात्र व्हायचीच. पण पोटाच्या आगीपेक्षा ही आग सुसह्य म्हणायची. सीताबाईंच्या हाताला चव मात्र भन्नाट होती. मालक त्यांच्या कामावर समाधानी असे. सीताबाईंनी मात्र कधी चिमुटभर मसाला घरी आणला नाही. दुस-याचं काही नको असा त्यांचा खाक्या होता. कामावरून घरी येतानाच त्या कंपनीतून पापडाच्या ओल्या पीठाचा गोळा घेऊन यायच्या आणि घरच्या कामातून वेळ वाचवून दीड एक किलोचे पापड सहज लाटायच्या…कामानं माणूस मरतंय होय? असा त्यांचा सवाल असायचा.
गरीबीत कष्टाच्या मानानं पैसं कमी मिळतात हा अजब न्याय आहे. पण कामंच अशी की त्यातून एकावेळी भरपूर रक्कम मिळणं दुरापास्त. शिवाय डोक्यावर अनेकांची छोटी छोटी कर्जे असायचीच. वस्तीतला असा एकही माणूस सापडला नसता की जो कुणाचा देणेकरी नाही. पण एकमेकांच्या आधारावर वस्ती दिवस ढकलत असते हे मात्र खरं. आज उधार आणि उद्या रोख असा इथल्या दुकानदारांचा शिरस्ता पडून गेलेला होता. लोक पैसे मात्र बुडवत नसत. मग त्यांना दुकानदार दहा पैशांऐवजी वीस पैसे दर लावत असला तरी चालत असे…शेवटी वेळ भागणं महत्वाचं. त्याहीवेळी वस्तीत दोन रुपयाचं दूध, तीन रुपयाचं सुट्टं तेल मिळत असे. कोणताही जिन्नस किलोच्या मापात घेणं कठीण असे….पण रात्रीच्या चुली कुरकुरत का होईना पेटत असत. एकमेकांच्या घरांतून भाजी-कालवणांची वाटी वाटी देवाणघेवाण करीत करीत अंगणात पंगती व्हायच्या उन्हाळ्याच्या दिवसांत.
कांताबाई नव्या शाळेत रुजू होऊन बरेच महिने लोटून गेलेले असले तरी नियमित पगार सुरू व्हायला कार्यालयीन कार्यपद्धतीनुसार उशीर लागला होता. पण पगार एकदम जमा मात्र होणार होता. कांताचेही स्व:ताचे काही खर्च असेच उसनवारीवर झाले होते. शाळेत विद्यार्थ्यांसमोर उभं राहायचं म्हणजे उत्तम पेहराव असलाच पाहिजे असा कांताचा कटाक्ष होता. मूळचीच नीटनेटकी राहण्याची सवय असलेल्या कांताला शिक्षिका म्हणून काय घालावं आणि काय घालू नये याची उत्तम जाण होती. तिच्या वडिलांनी त्यांच्या मालकाकडून आगाऊ रक्कम घेऊन तीन चांगल्या साडया घेऊन दिल्या होत्या. बाकीचा खर्च कांताने शिकवणीच्या पैशांतून बाजूला ठेवलेल्या रकमेतून केला. कांताचा स्वत:चा मेकअपचा खर्च तसा अगदी शून्यच म्हणावा असा. थोडीशी पावडर लावली चेह-यावर की झालं. पण साधी राहणी असली तरी व्यक्तिमत्वच उत्तम असल्यानं कांताचं मेकअपवाचून अडत नव्हतं.
आज कांता आज्जीपुढं पिशवी घेऊन उभी होती. आज तिचा पगार जमा झाला होता. तिने स्वत:ही एवढे पैसे एकरकमी कधी पाहिलेले नव्हते आयुष्यात. सीताबाईंनीही नोटांचं बंडल शेवटचं बघून कित्येक वर्षे उलटून गेली होती…आणि ते सुद्धा माहेरच्या श्रीमंतीत. आणि आता तर माहेर जुनं झालं होतं. स्वाभिमानानं जगणा-या सीताबाईंनी कधी माहेरी पदर पसरला नव्हता.
कांतानं आजीच्या पदरात आपल्या हातातली पिशवी रिकामी केली…..शंभराच्या कित्येक नोटा…त्यात काही पन्नासाच्याही होत्या. रक्कम काही फार मोठी नव्हती म्हणा पण सीताबाईचं आणि कांताच्या वडिलांचं किमान किरकोळीतलं तरी कर्ज फेडण्याएवढी निश्चित होती. आणि वस्तीत कुणी कुणाला फार मोठ्या रकमा उसन्या देऊही शकत नाही म्हणा.
एखादं सुवासिनीसारखी सीताबाईंनी आपला पदर सावरून धरला. अलगद उठल्या. त्यांच्या चेह-यावर जग जिंकल्याचा आनंद ओसंडून वहात होता. वाळत घातलेल्या पापडांमधून थरथरती पण अचूक पावलं टाकीत सीताबाई तिथून बाहेर आल्या आणि चाळीतल्या प्रत्येक घराच्या दारांसमोर गेल्या…त्यांना त्यांच्या नातीची पहिली कमाई कौतुकानं दाखवत राहिल्या…..त्यांचा पदर जड झालेला नोटांनी आणि मन हलकं झालेलं कित्येक वर्षांनंतर. सा-या वस्तीनं त्या को-या करकरीत नोटा डोळेभरून पाहून घेतल्या आणि आता आपण सीताबाईंना दिलेले चार दोन रुपये निश्चित परत मिळतील अशी त्यांची खात्रीही झाली. काहींना कौतुक वाटत होते तर काहींना आपल्या पोरांनीही असं काही तरी करून दाखवावं अशा आशा जाग्या झाल्या.
“आज्जी, हे सगळे पैसे तुझे!” कांता म्हणाला तसं सीताबाईंचे आधीच ओले झालेले डोळे भरून ओसंडून वाहू लागले. “अगं, आधी तुझ्या बापाच्या हातात दे हे रुपयं. तु आधी देवाला दाखवले असशीलच.!”
तेवढ्यात कांताचे वडील कामावरून परतले. सायकलवरून येणं जाणं…घामाघुम झालेले…अंगणात एवढी माणसं उभी बघून त्यांनाही आश्चर्य वाटले. सीताबाईंनी त्याच्यासमोर पदर धरला.
खरं तर पोरीचं लग्न लावून द्यावं, ती तिच्या सासरी काय नोकरी धंदा करायचा ते करील. शिकलेल्या पोरींची लग्नं जमणं कठीण असा त्यांचा परिस्थितीतून आलेला विचार होता. त्यामुळे कांताचं असं नोकरी करणं त्यांना फारसं रुचलेलं नव्हतं. पण त्यांच्या आईनं आणि बायकोनं त्यांना गप्प केलं होतं. कांताच्या वडिलांच्या डोक्यावर कुणाचं कर्ज नाही असा गेल्या कित्येक वर्षांतला एकही दिवस त्यांना आठवत नव्हता….आज तो दिवस उगवला होता….किंबहुना दिवस संपता संपता कर्जमुक्तीची पहाट उगवली होती.
कांताबाईंच्या लुगड्याचा विरत आलेला पदर आज जरीकाठी भासत होता!
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈