प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
🌸 जीवनरंग 🌸
☆ वंध्यत्व… भाग – २ ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
☆
(गजाभाऊ काय न्हाय तुझ्या नातवाला बघाय आलो व्हतो. अस गजाभाऊ म्हनला. तस नाम्यांनी चहाची अर्डर सोडली, अन नातवाला बी भैर घेऊन यायल सांगीतलं.) इथून पुढे —-
चहा झाला , नातवाला धुपट्यात गुंडाळून नाम्याच्या बायकोनं सोप्यात आणलं अन त्याला सुपात गजाभाऊ समोर ठेवलं . तस गजाभाऊ न शंभर रुपयांची नोट तीन आठवड्याच्या बाळाच्या मुठीत ठेवली .
बाळाला सरस्पतींन मुलाला सुपासकट आत न्हेल . मग गजाभाऊन प्रश्न केला ? नाम्या तुझ्याबी घरात
चारपाच वर्स पाळणा हलत नव्हता , तू काय केलंस ? तस नाम्या म्हणाला आर माज्या सरस्पतीच्या भावान , माझ्या मेव्हन्यांनं सूनबाईला मिरजला दाखवाय दवाखान्यात नेली . अन औषधांचा मारा चालू केला . तस दोघबी नवरा बायकू मिरजला एक वरीस खेट घालत व्हत ! तवा कुठं हे दिस बघाय मिळालं . गजाभाऊंन मिरजचा पत्ता घेतला . दुसऱ्याच दिशी , गंप्या अन गोदावरीला टकोटाक मिरजचा दवाखाना गाठला . पण गप्प बसला न्हाय .
मरणाचा उन्हाळा ! उन्ह जरा मावळतीला कल्याल ! सावल्या लांब लचक व्हत हुत्या ! कागवाड तस मोठं गाव , शिरमंत पटवर्धन सरकारच संस्थानिक गाव ! पण गावाला यष्टी स्टॅन्ड नव्हतं ! गावच्या येशी भैर मोती तळ ! आता त्याला मोतीतळ का म्हणत्यात कुणाला बी म्हैत नव्हतं ! त्या तळ्याच्या म्होर एक फर्लांगवर , मोठं लिंबऱ्याच झाड , ततच समद्या यष्टी बस थांबत व्हत्या ! झाडाला लागून एक हॉटल , त्याच्या म्होर म्हमद्याच पानाचा ठेला . बाजूला बाजी मोरेच सायकलीच दुकान . दुकानाम्होर भाड्याने द्यायच्या सायकली , तीस पैसे भाड तासाला . पंचर झाली तर पन्नास पैसे ज्यास्त !
तेवढ्यात येक यष्टी मिरजकडून अथणी कड जाणारी आली . गाडी थांबली तस धुरळा उडाला .
गाडीतुन बरीच लोक उतरली . सगळ्याच तोंड घाम्याजलेली . अन मळकट ! मरणाचा उन्हाळा! कसबस धोतर्याच सोगा पकडून गजा भाऊ उतरले . त्यांच्या मागोमाग त्यांची सून गोदावरी अन मुलगा गंप्या पण उतरला .
पडक्या सिनेमा टाकीज मधून गेलेल्या रस्त्याने आडवी वाट करत जाऊ लागले . तस बाजीराव न त्यांना हटकले , म्हनला तात्या असल्या उन्हात कुठं गेला व्हता ? अस म्हनताच गंप्याला राग आला , पण गप्पगार बसला . बोलणार कस ! त्यावर गजाभाऊ म्हनलं काय न्हाय पावण्याच्या लग्नला गेलं व्हतो . गजाभाऊ मनातल्या मनात त्या बाजीला शिव्या हसडत व्हते . नसत्या चांभार चवकश्या लागतात ह्यांना!
येशीतन मारुती देवळा म्होरन चालत वरच्या डांबर कट्ट्यावरून त्यांनी वळसा घातला अन घर जवळ केलं . चार पायऱ्या चढून सोप्यात येऊन बसल . तोंडातील तंबाकू काढली . डोक्यावरील काळी टोपी बाजूला करून , हातानी घाम बाजूला केला . तेवढ्यात राधाकाकू म्हणजे गजाभाऊ च्या पत्नी मठातील गार पाणी आणून गजाभाऊ म्होर ठेवलं . तस गजाभाऊ नी तांब्या तोंडाला लावून गट गट आवाज करत पाणी खतम केलं . अन गार फरशी वर आडवे झाले !
गजाभाऊ कदम म्हणजे मोठी गावची आसामी ! गावात चिरेबंदी दुमजली वाडा , मोठं ऐसपैस आंगण ! अंगणात पडवी त्यात खिल्लारी बैलजोडी ढवळ्या अन पवळ्या . चार म्हसर , दोन गायी , दोन कालवड . अंगणातन वरच्या बाजूला चौसोपी कट्टा अन सोपा . मधोमध मोठा दरवाजा . बाजूला चबुतरा , माजघर , माजघरातल्या आतल्या बाजूस चार खोल्या . कोठीच्या खोलीत धान्यांनी भरल्याली पोती .
मधल्या बाजूला ऐसपैस कडेपाट ! त्यावर राधकाकू बसून हिंदोळे घेऊ लागल्या !
गंप्या नवसाचा पोरगा ! एकुलता एक ! त्याच लगीन होउन बारा वरीस उलटली तरी बी पाळणा हलीत नव्हता ! त्यासाठी राधा काकूंनी लै उपाय केलं , पण गोष्ट काय जमून येत नव्हती !
देव देवरूशी , अंगारे धुपारे , समद करून झालं व्हतंच ! कोण काय म्हणतील ते करत व्हती बिचारी . चोळाप्पा मंत्रिकाकडे तर त्यांनी खेट घातलं ! त्यो सांगिल ते केलं . उलट्या पखाची कोंबडी उतरून टाकली . समद झालं पण वीस एकर रानाला वारस घावंत नव्हता !
यल्लमाचा जग आणून घरी बसवला ! देवीचा गोंधळ झाला पण , काय बी उपेग झाला न्हाय .
गंपू दादा अशी कोणतरी हाळी मारली तस त्या तंद्रीतन भानावर आल्या ! गोदानी चहा आणून हातात ठेवला . मग त्यानी कडेपाटवर बसून चहा घेतला भैर रानातला सालगडी गोप्या अन गोप्याची बायको आली व्हती . दोघांना एकदम बघून गजाभाऊ चमकलेच !
गजाभाऊ म्हनलं आज जोडीने आलायस ? त्यावर काय न बोलता गप्पगुमान आत माजघरात गेले . गोप्या गेली कित्येक वर्स त्यांचा घरगडी व्हताच . वहिवाट पण लै दिसची व्हती . गोदानी समद्याना चहा दिला . तस राधकाकू म्हंल्या आज काय काढलंय बाबा !
त्यावर गोप्याची बायकू म्हणली , काकू एवढं समद करतायसा एकडाव मरगुबाईल का जात न्हाईसा . तस राधकाकू म्हंल्या समद झालाय बघ . तीत बी जाऊन देवीची ओटी भरून पाळणा पण बांधून आले . आता देवच डोळे झाकून गप्प बसलाय तर आम्ही काय करणार . आमच्या हातात जेवढं जेवढं होत ते समद केलं . आता भार देवावर च !
पुढं गंप्या अन गोदा जवळपास वरीसभर, मिरजला औषधाला जात व्हती , हे गावच्या लोकांना बी कळलं . अन एकदिस असा आला की गजाभाऊ अन राधकाकू हंरकून गेल्या . त्यांना काय करावं काय नकु अस झाल्याल .
कारण बी तसच व्हत , गोदाला दिस गेलं व्हत , अन तिची चोर चोळी करायचा घाट गजाभाऊ नी आखला व्हता . तीन महिन्याच्या आत चोरचोळी केली अन आख्ख्या गावाला जेवणाच
आवतान बी दिल !
— समाप्त —
☆
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈