श्री व्यंकटेश देवनपल्ली
जीवनरंग
☆ कन्यादान— भाग – २ ☆ श्री व्यंकटेश देवनपल्ली ☆
(आणि…” ते बोलतच होते. आपल्याभोवती कुणीतरी घट्ट दोरी आवळताहेत असं रेवाला भासत होतं. ती स्तब्ध झाली.) — इथून पुढे
“हे बघ रेवा, ही आमच्या स्वामीजीने मंत्रून दिलेली ही पुडी आहे, ती सदैव जवळ बाळगायला हवंस. समजलं?” या वाक्यानं ती भानावर आली आणि म्हणाली, “होय मामंजी, समजलं. येऊ मी?” असं म्हणून ती तरातरा आपल्या खोलीत निघून गेली. फक्त आमच्याकडून आहेर म्हणून दिलेले कपडे आणि दागिने तिने एका सूटकेसमध्ये भराभर भरले. तितक्यात नवरदेव तिच्या खोलीत आला. “रोहित, बरं झालं तुम्ही आलात ते. पाठराखीण म्हणून थांबलेली माझी आत्या निघायचं म्हणतेय. मी त्यांना सोडून येते आणि येताना माझे नेहमीचे ड्रेसेस घेऊन तासाभरात येते.” म्हणून त्या दोघी टॅक्सी बुक करून तडक इकडे आल्या. पुन्हा त्या घरी पाऊल ठेवणार नाही हा रेवाचा निर्णय ठाम होता.”
“मग काय रोहित अन तिची सासरची मंडळी तिला न्यायला आलीच नाहीत काय?” हरीशने शंका विचारली.
वहिनी पुढे म्हणाल्या, “आले होते. नंतर पंचायत बोलावली गेली. कन्याच नांदायला जाणार नाही म्हटल्यावर कोण काय करणार? काय असेल तो दंड भरू पण आमची मुलगी त्या घरी येणार नाही असं आम्ही उभयतांनीही आग्रह धरला. खूप मनस्ताप झाला. सगळं एकदाचं मिटलं. रेवा आणि आम्ही दोघे मात्र त्या धक्क्यातून अजून सावरलेलो नाही.”
हरीश शांतपणे म्हणाला, “खरं आहे वहिनी, माझ्या लेकीचा साखरपुडा होऊन लग्न मोडलं होतं, तेव्हा साहेबांनीच मला धीर दिला होता. परंतु रेवाविषयीचं त्यांच्या मनात असलेले दु:ख मला आज कळलं. ‘तुझ्या बाबतीत त्या विधात्याने चूक वेळीच दुरूस्त केलेली दिसतेय’, असं त्यांनी म्हटलेल्या वाक्याचा उलगडा मला आज झालाय. रेवाची काळजी करू नका, निश्चितच तिचंही चांगलं होईल या शक्यतेवर विश्वास ठेवा.”
तितक्यात रेवा आली.
रेवाकडे पाहत हरीश म्हणाला, “रेवा, एखादा अपघात घडला म्हणून रडत कुढत बसणं, नैराश्याच्या गर्तेत जाणं, आपलं भवितव्य अंधारात लोटणं हा त्यावरचा तोडगा नसतो. भविष्यात आणखी काही तरी चांगलं वाढून ठेवलेलं असेल, त्यामुळेच असा प्रसंग ओढवला असावा असा सकारात्मक विचार करायला हवा.”
तितक्यात दारावरची बेल वाजली. रेवानं दार उघडलं. सतीशची अन रेवाची नजरानजर झाली.
साहेब वहिनींच्याकडे पाहत म्हणाले, “सतीशसाठी चहा आणताय ना?”
सतीश नम्रपणे म्हणाला, “नको सर आताच झालाय, पुढच्या वेळी आलो की दोन कप घेईन.”
असं म्हटल्यावर लाटकर साहेब प्रसन्नपणे हसत म्हणाले, “नक्की येशील ना?”
हरीश आणि सतीशने साहेबांचा निरोप घेतला.
हरीशच्या मनात काय शिजत होतं कळत नव्हतं. काही तरी कारण काढून तो सतीशला वारंवार साहेबांच्या घरी पाठवत होता. कधी साहेबांना ही कागदपत्रे देऊन ये तर कधी हा रिपोर्ट नेऊन दे. या निमित्ताने सतीशची अन रेवाची वरचेवर भेट होत होती.
बेल वाजताच रेवाने दार उघडलं. सतीशला तिने दारातच सांगितलं, “आईबाबा चेकअपसाठी हॉस्पिटलला गेले आहेत. तासाभराने परत येतील.”
सतीश मिश्किलपणे हसत म्हणाला, “म्हणजे मी आत यायचं नाही की काय? माझ्यासाठी चहा टाकावा लागेल म्हणून बाहेरच्या बाहेर कटवताय की काय?”
ती दारातून बाजूला सरकताच काही रिपोर्ट्स आणि मिशेल ओबामाचं ‘बिलीव्ह इन दि पॉसिबिलीटी’ शक्यतेवर विश्वास ठेवा हे पुस्तक तिच्या हातात देत तो म्हणाला, “काकांनी हे पुस्तक तुम्हाला द्यायला सांगितलं आहे.” आणि आत जाऊन सोफ्यावर बसला. “तुम्ही हे पुस्तक वाचलंत काय?” रेवाने सतीशला विचारलं.
सतीश पटकन म्हणाला, “वाचलं नाही. परंतु माझाही शक्यतेवर खूप विश्वास आहे. एखादी गोष्ट शक्य वाटत असेल तर मी त्याचा पाठपुरावा करतो.”
“उदाहरणार्थ एखादी शक्य वाटत असलेली अशी किंवा संभाव्य गोष्ट सांगाल काय?.” रेवानं विचारलं.
“मी एमपीएससी परीक्षा चांगल्या गुणाने उत्तीर्ण होईन या शक्यतेवर माझा प्रचंड विश्वास होता.”
“घडून गेलेली गोष्ट नव्हे, भविष्यकाळातील संभाव्य किंवा शक्य वाटत असलेली गोष्ट सांगा. मग तुमचा विश्वास कितपत खरा ठरतो ते मी पाहीन !”
“पण त्यासाठी मला तुमची मदत हवी आहे. कराल मदत? तरच मी ती शक्य वाटत असलेली गोष्ट सांगेन.”
“माझ्याकडून ती मदत होत असेल तर मी नक्की करीन. आधी ती शक्य वाटत असलेली गोष्ट कोणती ते तरी सांगा.”
“माझ्याशी लग्न कराल? पहिल्या भेटीतच मला ही गोष्ट शक्यता असलेली वाटली म्हणून मी विचारतोय. सांगा ना.”
“सतीश तुम्हाला माझा भूतकाळ माहीत आहे ना?”
“मला तुमच्या भूतकाळाशी काही देणं घेणं नाही. तुम्हीच माझं वर्तमान आणि माझे भविष्य आहात.”
“तुमच्यासाठी चहा आणते.” असं म्हणत रेवा पटकन निघून गेली.
दार उघडंच होतं. लाटकर दांपत्य सरळ आत आले. त्यांनी सतीशची विचारपूस केली. सतीश चहा घेऊन बाहेर पडला. पहिल्यांदाच रेवाच्या चेहऱ्यावर मंद स्मित झळकलेलं सतीशनं पाहिलं. त्याला त्याच्या प्रश्नाचं उत्तर सापडलं.
सतीशने काकांच्या कानांवर ही गोष्ट घातली. हरीशला बहुधा हेच अपेक्षित असावं. लाटकरसाहेबांना भेटून हरीशने पुढील बोलणी केल्या. पंधरा दिवसाच्या आत तालुक्याच्या मंगल कार्यालयात अतिशय साधेपणाने सतीश आणि रेवाचा मंगल विवाह संपन्न झाला.
रेवाची पाठवणी करताना हरीशचे हात हातात घेत, भावविवश होऊन लाटकर साहेब म्हणाले, “हरीश, अगदी मनापासून सांगतो. आम्ही उभयता तुमचे खूप खूप ऋणी आहोत.”
हरीशदेखील भावुक होत बोलला, “साहेब, ‘कन्यादान’ तुम्ही केलंत. दान देणाऱ्या दात्याचे, दान स्वीकारणाऱ्याने ऋण मानले पाहिजेत. रेवासारखी सुशिक्षित, सुसंस्कृत, गुणी मुलगी आमची सून म्हणून आली हे आम्ही आमचं भाग्य समजतो.” लाटकरांनी सगळ्या वऱ्हाडी मंडळींचा निरोप घेतला.
‘सकारात्मक शक्यतेवर विश्वास ठेवायला हवं, मग ते फलद्रूप होतं’ हे विधान खरं ठरल्यानं रेवाचा चेहरा प्रसन्न फुलासारखा उमललेला दिसत होता.
ही सुफळ कथा संपूर्ण झाली नाही, चांगुलपणाचं बीज रोवत, ती कथा पुढच्या घरी मंगल संदेश घेऊन पुढे पुढे निघाली आहे… !
– समाप्त –
© श्री व्यंकटेश देवनपल्ली
बेंगळुरू
मो ९५३५०२२११२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈