श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ रंगभूमी… – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
साईनाथ नाट्य मंडळीची वार्षिक बैठक. ऑगस्ट महिन्यातील संध्याकाळ. बाहेर रिमझिम पाऊस सुरु होता. मंडळाच्या नाट्य ग्रुपचा दिग्दर्शक सुदर्शन हजर होता. शिवाय मनोज, अरुणा, ज्योती, उदय, वासंती बाई, सदानंद हजर होते. संस्था संगीत नाटकं करण्यात प्रसिद्ध होती. दरवर्षी शासनाच्या संगीत नाट्य स्पर्धेत भाग घेऊन मग त्याचे प्रयोग अनेक ठिकाणी होत. या आधी संस्थेने अनेक नाटके केली, बक्षीसे मिळविली.
यंदा कुठले संगीत नाटक करावे, यासाठी बैठक होती. सुदर्शनने मागच्या काही वर्षातील संस्थेने केलेल्या नाटकंचा आढावा घेतला, दरवर्षी आपली संस्था प्राथमिक स्पर्धेत पहिला किंवा दुसरा नंबर मिळविते, पण अंतिम स्पर्धेत आपण पहिला नंबर मिळवत नाही, ही सल सुदर्शनने मांडली.
या बाबत काही मेंबर्स नी आपली मते मांडली.
अरुणा – संगीत नाट्य स्पर्धा असल्याने आपण ज्यात संगीताला भरपूर वाव आहें, असे नाटक निवडावे. सुदैवाने या वर्षी ज्योती तिचं शिक्षण संपवून पुन्हा ग्रुपमध्ये आली आहे.
मनोज – आपले संगीत साथीदार बदलावे लागतील. कारण आपण स्पर्धेच्या वेळी पहातो, इतर ग्रुप्स दर्जेदार साथीदार घेऊन येतात.
अरुणा – हे खरे आहे, परीक्षक संगीत साथीकडं बारकाईने लक्ष ठेऊन असतात.
सुदर्शन – मग नाटक कुठलं निवडावं? ज्याला उत्तम लेखन आणि संगीत आहे? आणि आपण ते इतक्यात केलेलं नसावं?
मनोज – यंदा ज्योती सारखी देखणी आणि उत्तम गळा असलेली स्त्री कलावंत आहे, सुदर्शन सारखा दर्जेदार वाचिक कलावंत पण आहेच आणि मनोज पण उत्तम गातो, म्हणून आपण “संगीत मत्स्यगंधा” करावं, अस मला वाटतं.
सर्वजण एकमेकांकडे पाहू लागले. सुदर्शनला पटले. अरुणा, ज्योती यांनी पण मान हलवली. मनोजने पण हो म्हटलं.
यंदा स्पर्धेसाठी “संगीत मत्स्यगंधा” करायचे ठरले. सुदर्शन आणि अरुणा संस्थेचे अध्यक्ष आणि सेक्रेटरींना भेटले. त्यांनी पण मान्यता दिली. नाटकासाठी खर्चाची तजवीज केली.
नाटकाचे दिग्दर्शन दरवर्षी प्रमाणे सुदर्शन करणार होता.
“मत्स्यगंधा ‘” नाटक करण्याच्या दृष्टीने हालचाली सुरु झाल्या. सत्यवती च्या भूमिकेसाठी उत्तम गाणारी आणि देखणी कलाकार हवी होती, त्यामुळे ज्योती सत्यवती करणार हे निश्चित झाले. पराशर साठी पण चांगला गाणारा माणूस हवा होता, मनोज हा अनेक वर्षे काम केलेला आणि खडया आवाजाचा ग्रुप मेंबर होता, त्याला पराशर भूमिका मिळाली, देवव्रत च्या भूमिकेला मोठी मोठी वाक्ये होती, ती पेलणारा कलवंत हवा होता. सुदर्शन तसा होता. त्याचे पाठांतर उत्तम होते आणि शब्दफेक सुरेख होती. त्यालाच ही भूमिका मिळाली, अरुणला चंडोल ची भूमिका. याखेरीज इतर भूमिका इतर ग्रुप मेंबर्स मध्ये वाटल्या गेल्या आणि सुदर्शनने मुहूर्त करून तालमी सुरु केल्या.
स्पर्धेचा फॉर्म भरला. रोज सायंकाळी कलाकार जमू लागले, प्रथम गद्य तालीम सुरु झाली, वाक्ये तोंडात बसली, मग उभ्याने हालचाली दिग्दर्शकाने बांधल्या, मग संगीत साथ करणारे यायला लागले, गाण्याच्या तालमी सुरु झाल्या. हळूहळू प्रकाश योजना करणरा येऊ लागला. दृष्य परिणाम वाढविण्यासाठी त्याचा उपयोग सुरु झाला. नाटक हळूहळू बसू लागले. पाठांतरे झाली. गाणी व्यवस्थित बसली.
स्पर्धेचे वेळापत्रक जाहीर झाले. या ग्रुपचे नाटक स्पर्धेच्या तिसऱ्या दिवशी होते आणि आश्चर्य म्हणजे या ग्रुपचा प्रमुख प्रतिस्पर्धी नटराज ग्रुप, जो दुसऱ्या शहरातील होता, त्यांनी पण यंदा “मत्स्यगंधा ” हेच नाटक स्पर्धेत उतरविले होते.
ही बातमी कळली मात्र ,सुदर्शन खवळला. तालमीच्या वेळी ग्रुप मंडळी भेटली, तेव्हा सर्वांचीच हीच चर्चा.
सुदर्शन – मला वाटते, नटराज ची मंडळी दरवर्षी असेच करतात, आपण हे नाटक बसवतोय, हे अनिलला कळले असेल, म्हणून मुद्दाम तो हे नाटक करतोय.
अरुणा – अरे गेली दोन वर्षे प्राथमिक ला आपण पहिले दुसरे असतो ना, म्हणून ते आपल्याला त्रास देतात, आणि ती तन्वी काही कमी नाही. तीच करत असणार सत्यवती. दुष्ट मेली..
ज्योती – अरे ते करेनात, आपण उत्तम प्रयोग करायचा, आपला प्रयोग तिसऱ्या दिवशी आहे ना, तो करू आणि अन्याचा केव्हा आहें, आठव्या दिवशी आहें ना, तो पहायला सर्वजण जाऊ.
ज्योतीच्या या बोलण्याने सर्व गप्प झाले. पण सुदर्शनला अन्याचा राग आला होता,”साला आपल्याशी स्पर्धा करतो, तरी बरं हा स्टेज वर फापलतो,देवव्रताची भूमिका म्हणजे काय खाऊ वाटला काय याला? मोठी मोठी वाक्ये आहेत, आणि हा अन्या जाडा किती झालाय, दारू मारत असणार आणि बिड्यापण ओढत असतो.
सुदर्शनने तीन रंगीत तालमी आयोजित केल्या. भूमिकेचे कपडे, मेकअप करून, नेपथ्य रचून आणि प्रकाश योजना व संगीत साथीसह तीन प्रयोग. त्याच्या ओळखीच्या आणि नाट्यशास्त्र जाणणाऱ्या लोकांना बोलावून त्यांची मते घेतली. चर्चा केल्या. काही सुधारणा केल्या.
तीन रंगीत तालमी झाल्यामुळे कलाकारांना विश्वास मिळाला. ज्योती आता उठताना,झोपताना, जेवताना, बोलताना सत्यवतीची भूमिका जगू लागली. सुदर्शन देवव्रताचे संवाद मोठया मोठ्याने आरशात पाहून म्हणू लागला. मनोज, अरुण यांच्या पण अंगात भूमिका शिरली होती.
स्पर्धा सुरु झाली आणि तिसऱ्या दिवशी ग्रुप बसने स्पर्धेच्या गावात पोहोचला. दुपार पासून स्टेज मांडणी, लाईट जोडणे, पेटी तबल्याचे सूर मिळविणे, मग मेकअप, कपडे.
परीक्षक आले, आत सर्वाना भेटून गेले. या वर्षीचे परीक्षक नाट्यकला जाणणारे, संगीत उत्तम समजणारे होते, त्यामुळे सुदर्शन खूष होता.
मित्रमंडळी ,अनेक ओळखीचे आत येऊन शुभेच्छा देत होते, नाटक वेळेत सुरु झाले. पहिला अंक संपला. पुन्हा बाहेरून मित्र परिवार आत आला, ज्योतीचे, मनोजचे कौतुक करून गेला.
दुसरा अंक संपता संपता देवव्रत स्टेज वर आला आणि नाटकाने स्पीड पकडला. मग तिसरा अंक देवव्रत आणि सत्यवती, अंबा यांचा.
नाटक संपलं, लोकांनी खूप कौतुक केलं.
परीक्षक सुद्धा आत येऊन भेटून गेले. दुसऱ्या दिवशीच्या सर्व पेपर मध्ये कौतुक केलं गेलं. विशेष करून ज्योती जिने सत्यवती साकारली होती, जिला खुप गाणी आणि संवाद होते. स्पर्धेतील प्रयोग उत्तम झाला पण सुदर्शन आपल्या अभिनयावर खूष नव्हता. आपण या पेक्षा कितीतरी चांगली भीष्माची भूमिका करायला हवी होती, असं त्याला वाटत होतं. भूमिका अत्यंत ताकदीने कानेटकरांनी लिहिली होती, पण आपल्याला सूर लागला नाही हे खरे.
कदाचित दिग्दर्शक असल्याने एका माणसावर खुप लोड पडतो, प्रत्येक गोष्टीत त्याला लक्ष घालावे लागते. त्यामुळे स्वतः च्या भूमिकेकडे म्हणावे तसे लक्ष देता येत नाही, हेही कारण असेल किंवा स्पर्धा नुकतीच सुरु झाल्याने प्रेक्षक सुद्धा कमी आले असतील. काही तरी कारण झाले, पण भीष्म मनासारखा उभा राहिला नाही, हे खरे.
– क्रमशः भाग पहिला
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈