श्री प्रदीप केळुस्कर
जीवनरंग
☆ रंगभूमी… – भाग-३ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆
(हॉस्पिटलमध्ये मी फोन करून सांगितलंय, मी सोबत आहे. तुम्ही नाटक सुरु ठेवा, ही तुमची दोन माणसे गाडीत आहेत, ती त्याच्या सोबत राहतील .”) – इथून पुढे
डॉक्टरांची गाडी अनिलला घेऊन गेली, आता परीक्षकांना पण देवव्रताची भूमिका केलेल्या नटाला हार्टअटॅक आला, ही बातमी समजली, ते पण स्पर्धक काय पुढे सांगतात, हे पहाण्यासाठी थांबले.
प्रेक्षकांना पण हळूहळू हे कळले, काही प्रेक्षक आत भेटायला आले.
आता त्यांची तब्येत बरी होईल म्हणाले ना डॉक्टर, मग दुसरा कलाकार घेऊन नाटक सुरु करा, आम्हाला नाटक पहायचे आहे, पुढील अंकातील गाणी ऐकायची आहेत.
काही प्रेक्षक बोंबाबोंब करत म्हणाले “आम्ही तिकीट काढलंय की राव,आमास्नी नाटक बघायचं हाय.”
काय करावे अजितला सुचेना. आता आयत्यावेळी देवव्रतासारखी महत्वाची भूमिका कोण करेल?
एव्हढ्यात सत्यवती झालेली तन्वी अजितकडे आली “अजित, सुदर्शन आलेला आहे ना, त्याने या वर्षी देवव्रताची भूमिका केली आहें, त्याला गळ घाल, तो नाही म्हणणार नाही.”
अजितच्या लक्षात आले, होय, सुदर्शन देवव्रत करू शकेल, तसं स्पर्धेच्या नियमात बसतं की नाही कोण जाणे, पण नाटक पुढे चालू राहील, प्रेक्षक नाराज होणार नाहीत. तेथेच बाजूला उभ्या असलेल्या सुदर्शनला अजित म्हणाला “सुदर्शन, नाटक रद्द करावे लागता कामा नये. कारण रंगभूमीचा आणि प्रेक्षकांचा तो अपमान होईल.”
“होय खरे आहे, पण आता काय करणार?”
“तूच करू शकतोस सुदर्शन, तूच करू शकतोस, तू येथून पुढील देवव्रताचा रोल करायचा, नाही म्हणू नकोस दोस्ता, स्पर्धेत पहिला दुसरा नंबर मिळवायचा म्हणून नव्हे, हे मायबाप प्रेक्षक तिकीट काढून आलेत, त्यांना पुढील नाटक पहायचे आहे म्हणून आणि आपल्या रंगभूमीसाठी.”
सुदर्शन भांबावला, असे कधी या आधी झाले नसेल, आपण ते करावे काय?
तो आपल्या सोबत्याकडे धावला. त्याना पण अजितचा प्रस्ताव आश्रयकारक वाटला आणि नटराज ग्रुप त्याचाही प्रतिस्पर्धी होता गेल्या कित्येक वर्षाचा. पण..ज्योती म्हणाली “सुदर्शन, तू आत्ता काम करावंसं, नाटक थांबता कामा नये, नटराज ग्रुप आपला नाटकातील दुश्मन असला तरी प्रेक्षक नाटक अर्धवट पाहून नाराज होऊन परत जाता कामा नयेत. तू हो म्हण .”
मग सर्वच सोबती नाटक करावं असं म्हणू लागले आणि सुदर्शन भूमिका करायला तयार झाला.
सुदर्शन देवव्रत म्हणजेच भीष्मचा पुढचा भाग करणार हे निश्चित झाल्यावर अजितने परीक्षकांना त्याची कल्पना दिली, ते म्हणाले “नाटक थांबवू नका, आम्ही सरकारला या नाटका दरम्यान घडलेली परिस्थिती आमच्या अहवालत कळविणार पण स्पर्धेसाठी नाटक पुरे होणे चांगले”.
तो पर्यत बऱ्याच प्रेक्षकांना दुसरा नट देवव्रताची भूमिका करणार हे कळले होते. जे नवखे होते, ते म्हणत होते, हा आयत्यावेळी काय करेल? प्राॅम्टींग वर बोलेल, धा मिनिट बघू नायतर सटकू..
पण काही नेहमी स्पर्धेची नाटके पाहणारे त्या शहरातील सुज्ञ प्रेक्षक होते, त्याना आपल्या प्रतिस्पर्धी ग्रुप मधील माणूस आयत्या वेळी नाटक रद्द होऊ नये म्हणून, भूमिका पुढे न्यायला तयार झाला याचे कौतुक वाटत होते, आता सुदर्शन या दुसऱ्या ग्रुप मध्ये कशी भूमिका करतो, याचे पण कुतूहल वाटत होते.
आत मध्ये सुदर्शन रंगायला बसला. मनातल्या मनात देवव्रताचे संवाद आठवू लागला. या ग्रुप मधील इतर साथीदार डोळ्यासमोर आणू लागला. आज आपली परीक्षा आहें हे त्याने जाणले. त्याने मनातल्या मनात आई वडिलांना नमस्कार केला, आज मला यश द्या, अस मनात म्हणत राहिला. .
सुदर्शनने देवव्रताची वेशभूषा केली आणि तो स्टेज वरील त्याच्यासोबत काम करणाऱ्या कलाकारांना भेटायला गेला, त्याचे जास्त संवाद तन्वी म्हणजेच सत्यवती सोबत आणि चंडोल झालेल्या मोहन सोबत होते. सर्वांनी एकमेकांचे हात हातात घेतले आणि एकमेकांना शुभेच्छा दिल्या आणि तिसऱ्या अंकाची बेल दिली गेली आणि पडदा उघडला.
तिसऱ्या अंकातले सत्यवती आणि भिवरा मधील संवाद सुरु होते, तेंव्हा पाठीमागच्या विंगेत सुदर्शन आपल्या एन्ट्री साठी श्वास रोखून तयार होता. त्याचा सेनापती सत्यवतीला “राजपुत्र देवव्रत इकडेच येत आहेत,यावर भिवर काही म्हणणार एव्हड्यात देव व्रत प्रवेश करत म्हणतो, “देवव्रताच्या तोंडातून बाहेर पडलेला प्रत्येक शब्द म्हणजे देवव्रताचा निर्धार असतो”.
सत्यवतीची भूमिका करणाऱ्या तन्वीच्या शरीरावर हे धारदार वाक्य ऐकून शिरशिरी आली, अनिल या भूमिकेत असे वाक्य एवढ्या परिणामकरक कधीच म्हणत नसे.
आणि मग सुरु झाली देवव्रतची पल्लेदार वाक्ये. कानेटकरानी एवढी जबरदस्त वाक्ये देवव्रतला लिहिली आहेत, ती उच्चारणे येणे नटाचे काम नव्हे.
“देवी मी कुणाला जन्मालाच घातलं नाही म्हणजे या राज्यात वाटेकरी नसेल “.
“भीष्म हा स्वतः उदगारलेल्या प्रतिज्ञेचा बंदी आहें “.
“भीष्माचे वर्तन धर्माच्या चौकटीत बसत नसेल तर धर्माची चौकट बदलेल पण भीष्म बदलणार नाही “
एकापाठोपाठ एक शब्दसरी प्रेक्षकांच्या अंगावर कोसळत होत्या आणि प्रेक्षक ओलेचिंब होत होते. स्टेज वरील आणि विंगेत राहून पहाणारे इतर कलावंत सुदर्शनाच्या या अनोख्या भीष्म दर्शनाने आश्चर्यचकित झाले होते.
आज स्वतः सुदर्शन खूष होता, त्या दिवशी तो मूड मध्ये आला नव्हता पण जी मोठी जबाबदारी पडली, त्याने त्याच्यातल्या कलाकाराला चॅलेंज दिले होते. तो एका पाठोपाठ एक संवादाच्या फैरी झाडत होता.
शेवटी लावण्यवती अंबा, भीष्म तिचा स्विकार करत नाही म्हणून धिक्कार करते, आणि त्याचे त्याच्या आप्तेष्टांसमोर सैरावैरा धावताना मरण येईल असा शाप मागते आणि भीष्म तो देतो.
पडदा पडला, प्रेक्षक डोळे भरलेल्या अवस्थेत आत येऊन भेटत होते.
आज काहीतरी विलक्षण पाहिले असे प्रत्येक प्रेक्षकाला वाटले, आयत्या वेळी भूमिका स्वीकारून आणि एक अंक दुसऱ्या नटाने केला असताना, शेवटचा अंक या नटाने विलक्षण उंचीवर नेला, असे कदाचित नाटकाच्या इतिहासात प्रथमच घडले असेल.
नटराज नाट्यग्रुप चे सर्व कलाकार सुदर्शनला मिठी मारून रडत होते. आज शेवटी रंगभूमी जिकंली होती.
Show must go on म्हणजे काय ते आज नाट्यरासिकांना कळलं.
सुदर्शनचे नेहमीचे साथीदार पण नाटक पहात होते, आजची सुदर्शनची भीष्मची भूमिका पाहून ते पण भारावले होते. त्यांचे कंठ दाटून आले होते.
दुसऱ्या दिवशीच्या सर्व वर्तमानपत्रात कालच्या संगीत स्पर्धेत घडलेली घटना म्हणजे रंगभूमी वर पहिलीच, असा उल्लेख करून सुदर्शनने आपल्या स्पर्धक ग्रुप मध्ये नाटकाच्या शेवटच्या अंकात नाटक रद्द होऊ नये म्हणून भूमिका फारच उच्च अभिनीत केली, म्हणून कौतुक झाले.
नाटक मधेच सोडून हॉस्पिटल मध्ये भरती झालेल्या अनिलची एंजिओप्लास्टी झाली, हे सुदर्शनला समजले
आठ दिवसानंतर तो अनिलला भेटायला गेला, तेव्हा अनिल त्याचा हात पकडून सद्गदित स्वरात म्हणाला,
“दोस्ता, माझ्यासाठी जे केलंस ते अमूल्य आहे.”
त्याचा हात थोपटत सुदर्शन म्हणाला “दोस्ता, मी तुझ्यासाठी नाही केलं, केलं ते त्या रंगभूमीसाठी, ती आहे म्हणून आपण आहोत.”
“होय दोस्ता, रंगभूमी आहे म्हणूनच आपण आहोत “.
– समाप्त –
© श्री प्रदीप केळुसकर
मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈