सौ राधिका माजगावकर पंडित
जीवनरंग
☆ नणंद माझी लाडाची… ☆ सौ राधिका माजगावकर पंडित ☆
वऱ्हाड कार्यालयात आलं.. शारदा इकडून तिकडे नुसती धावत होती. कितीतरी कामांची, मोठी सून म्हणून तिच्यावर जबाबदारी होती. कारण तिच्या लाडक्या नणंदेचं समीराचं लग्न होत नां! सहज समीराच्या खोलीमध्ये ती डोकावली, तर हे काय! ती हमसून हमसून रडत होती. तिला जवळ घेत शारदा म्हणाली. “समीरा नको ग रडूस. सासरी परक्या घरी जातांना अशीचं स्थिती होते, प्रत्येक मुलीला वाईट हे वाटतंच. आणि साहजिकच आहे गं तें!एका जागेवरून उपटलेल रोपंट दुसऱ्या जागी लावतांना त्रास हा होणारच. मी नाहीं का माझ माहेर सोडून तुमच्याघरी आले. आणि आतां सासर हेच माहेर असं समजून तुमच्या घरात रुळले पण. सासरच्या अनोळखी माणसांच्या प्रेमाची ओळख मला पटली. आणि तुझ्यासारखी जिवलग, नणंदेच्या रूपांतली मैत्रिणी पण मला मिळाली. हे बघ,. आई आण्णा व ह्या घराची काळजी अजिबात करायची नाही. अग मी आहे नां !. तुझ्या सारखीच काळजी घेईन हॊ मी त्यांची. समीराचे डोळे आपल्या पदरानें पुसत शारदा पूढे म्हणाली “ए समीरा हास ना गं!आतां फक्त एकच गाणं गुणगुणायचं. ‘ ” “साजणी बाई येणार साजण माझा “. आणि हो ! घोड्यावरून येणाऱ्या सागरच रुप आठवतंच मस्त स्वप्ननगरीत जायच. काय?
समीरा गालात हसली आणि खुदकन् लाजली, सागरच्या आठवणीने. तशी शारदा पुढच्या कामासाठी चटकन् उठायला लागली. तर.. तिचा पदर ओढत समीरा म्हणाली. जरा- थांब ना वहिनी. मला तुला काही सांगायचय. “हसतंच शारदेने चिडवलं ” पूरे हं समीरा. आतां मला नाही,. जे काय सांगायच तें सागर रावानाच. सांगायच. चल बाई उठू दे मला “.. “प्लिज थांब ना वहिनी, “ काकुळतीला येऊन समीरा परत मुसमुसायला लागली. थरथर कांपतच होती ती.. शारदाने तिला जवळ घेतल्यावर ती घडाघडा बोलायला लागली.
” वहिनी सागर मला मनापासून आवडलेत. पण. – पण हे लग्न सुखरूपपणे पार पडेल की नाहीं ? ह्या भितीने जीव घाबरा होतोय ग माझा !”
तिला प्रेमानें गोंजारून शारदा म्हणाली “समीरा काही झालय का ? अगदी मोकळे पणी सांग any Problem? ”
थरथर कापतच समीरा पूढे सांगु लागली. : “ कसं सांगु वहिनी तुला? एक गोष्ट लपवलीय मी तुमच्यापासून.. प्रकरण. तसं गंभीरच आहे “. हे ऐकल्यावर. आता मात्र थरकांपच उडाला शारदाचा. काय सांगणार आहे ही? काही भानगड, प्रेम प्रकरण? की बलात्कार ? असा कांही अत्याचार झालाय का हिच्यावर ?
‘ नाहीं नाहीं माझ्या सासरच्या अब्रुचा प्रश्न आहे हा!’. असंख्य प्रश्नाच्या विचाराने घशाला कोरड पडली कसबसं स्वतःला सावरून ती म्हणाली ”समीरा बोलना ! सांग लौकर. काय झालयं ?सांग गं! पटकन सांग.
“ऐक नां वहिनी. गेले कित्येक दिवस एक मवाली, गुंड मुलगा माझ्या मागे लागलाय. सुरुवातीला, लाडीगोडीनें अघळ पघळ बोलून त्याने मला खूप विनवलं, आमिषे दाखवली. पण मी बधले नाही. कारण माझं त्याच्यावर प्रेमच नव्हतं. तसं सांगूनही त्यानी माझा पिच्छा सोडला नाही. उलट त्याचा मवाली पणा जास्तच वाढला. खूप त्रास व्हायचा मला त्याचा. कधीकधी भिती वाटायची. हां हात टाकेल की काय माझ्यावर? अतिप्रसंग करेल कां ?या विचाराने घराबाहेर पण पडायची नाही मी. आणि शेवटी त्यानी मला धमकी दिली. ” माझ्याशी लग्न केल नाहीस तर मी दुसऱ्या कुणाशीही तुझ लग्न होऊ देणार नाही. मग सुखाचा संसार तर दूरच राहिला. गुंड आणून पळवीन मी तुला “. मला खूप भिती वाटतेय ग वहिनी. तो लग्नात काही विघ्न तर नाहीं ना आणणार ? तसं झाल तर… तर सगळाच डाव उधळेल. माझ्या स्वप्नांचा, आणि माझ्या आयुष्याचा… आई अण्णांच काय होईल गं ? आणि माझा दादा? केवढया मोठया आजारातून उठलाय तो नुकताच. तुझ्यामूळे तो लौकर बरा झालाय त्याच B. P. वाढून त्याला काही त्रास झाला तर. ?वहिनी रात्र रात्र जागून काढतेय गं मी, हया सगळ्या विचारांनी झोपच उडालीय माझी० आणि काय सांगू वहिनी. काल तो आपल्या घराभोवती घिरट्या घालत होता. आणि कहर म्हणजे खिडकीतून त्याने ही चिठ्ठी फेकलीय. हे बघ यांत त्यांनी लिहीलय –” उद्या बघच तू. गुंड आणून तुझं लग्न मी मोडणारच. लग्न कसं होतयं बघतोच मी. ”
शारदा क्षणभर गांगरली. पण दुसऱ्या क्षणी स्वतःला सावरत तिनें समीराचें घळघळ वहाणारे अश्रु पुसले.
तिला खूप किंव आली तिची. किती तरी दिवस मानसिक ताणाचं भलं मोठ्ठ ओझं उरावर बाळगून, आनंदाचे दिवस किती ताण तणावात गेले बिचारीचे. आपल्या आई वडिलांना दादाला त्रास होऊ नये म्हणून केविलवाणी धडपड चालली होती इतके दिवस समीराची. तिला आधार देत शारदा म्हणाली,
“घाबरू नकोस समीरा मी आहे तूझ्या पाठीशी. आपल्या घराची अब्रू अशी चव्हाट्यावर नाही येऊ देणार मी. तू निर्धास्त रहा. मी बघते काय करायच तें. “ तिचा आधार घेत समीरा म्हणाली “ पण — पण वहिनी दादा ! तो किती संतापी आहे रागाच्या भरात त्यांनी काही केले तर? आणि पण मग त्याला किती त्रास होईल माझ्यामुळे. मला काही काहीचं सुचत नाहीये, काय करू मी?” तिला शांत करुन ठामपणे शारदा म्हणाली, ” नाही समीरा ह्यातलं ह्यांना आई अण्णाना काहीच कळता कामा नये. नाहीतर परिस्थितीला वेगळंच वळण लागेल. तू शान्त रहा.. “
आणि मग खरोखरचं शारदाने आपल्या भावाला मदतीला घेऊन परिस्थितीशी लढा दिला. आणि तिचा पाठीराखा भाऊ अविनाश तिच्या पाठीशी उभा राह्यला.. पोलीसांच्या मदतीने बंदोबस्त करून रंगे हात त्या मवाल्याला पकडून त्याला शिक्षा झाली. आणि नंतर मग ‘.. झाले मोकळे आकाश. ‘….. कार्य निर्वीघ्नपणे पार पडलं होतं. अशी ही बाहेरची व घरांतली आघाडी सौ. शारदानें अविनाशच्या मदतीने खंबीरपणे सांभाळली होती.
कु. समीरा, चि. सागरची अर्धांगिनी,… सौभाग्यवती समीरा सागर साने झाली.
सासरी निघताना सौ. समीराच्या डोक्यावरून हात फिरवीत शारदा म्हणाली, ” सागर एक गुणी, सुशील, भाबडी मुलगी आम्ही दिलीय तुम्हाला. सांभाळून घ्या हं तिला. ” गम्भीर वातावरण हसरं साजरं करीत सागर म्हणाला ” मंडळी समीराचं नांव आम्ही सरिता ठेवणार आहोत आणि हीं सरिता आता सागराला मिळालीय. तिच्या सुख दुःखात मी तिच्या पाठीशी आहेच… तुम्ही दिलेलं हे खणखणीत नाणं आम्ही केव्हाच पारखून घेतल आहे हं. माझे आई बाबा खूप चांगले आणि सुशिक्षित व समंजस आहेत. त्यांच्या छत्राखाली समीरा आणि मी सुरक्षित राहू. एकमेकांच्या विश्वासावरच आमचा संसार सुखाचा होईल. तेव्हा आता कुठलीही काळजी करायची नाही. आणि हो! आईचे, अण्णांचे आणि दादांचे तुमचेही आशीर्वाद आहेतच कि आमच्या पाठीशी. ” असं म्हणून ती लक्ष्मीनारायणाची जोडी थोरांच्या पायाशी वाकली. सगळं निर्विघ्नपणे पार पडलं होतं. कोपर्यात उभ्या राहयलेल्या भाऊरायाचे, अविनाशचे शारदेने नजरेनेच आभार मानले.. अगदी कृतज्ञतेने प्रेमळ नजरेने..
☆☆
© सौ राधिका माजगावकर पंडित
पुणे – 51
मो. 8451027554
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈