प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी
🌸 जीवनरंग 🌸
☆ जत्रा… ☆ प्रा डॉ जी आर प्रवीण जोशी ☆
तीन वरसात एकडाव भरणारी म्हसोबची जत्रा अगदी तोंडावर येऊनश्यान ठेपल्याली. तस गावच पोलीस पाटील मल्लप्पा काळजीत हुतच ! त्यांनी गजू ला ताबडतोब बोलवून घेतला अन लगोलग गजुला, गावच सरपंच शिवगोंडा पाटील कड निरोप धाडला. गजू पटलांच्या वाड्यावर लै जुना गडी. पन कामात इमानदार ! त्यानं कैक वर्स वाड्याव काम केल्याल. तडक चावडीवर पंचांना निरोप द्याय गेला.
मल्लप्पा पाटील अंकली गावचं लै बडी असामी, मोठं जंक्शन परस्थ ! गडी सहा फूट उंच आडदांड बांधा, गव्हाळ रंग दुटंगी धोतार, बाराबंदी, डोईस मोठा फेटा, फेट्याचा शेमला लांबलचक मागून डाव्या खांद्यावर म्होर आलेला, नाक फेंदारलेलं, नाकाखाली ह्ये लफ्फेदर मिश्या, मिश्याना पीळ, कानां म्होर कल्ले, गडी निबार, खर कडक शिस्तीचा ! घरी नोकर चाकर, जमीन जुमला, ऐसपैस टोलेजंग वाडा, गाई म्हसरांची मोठी दावण, अस सगळं मोठं काम हुत.
गजु सरपंचांना पाटलांचा निरोप देऊन आला, अन म्हणाला ” तुम्हाला सरपंचांनी टकोटक बोलावलं ” तस पाटील बी लगेच उठलं, पटका गुंडाळून शेमला पुढं टाकला व सुपारी कातरुन दाढत धरली, पान पण चुना लावुन तोंडात टाकलं वर अब्दार तामकुची चिमट टाकली घोड्यावर मांड टाकून चावडी जवळ केलीच.
चावडीत गेल्या गेल्या समदी लोक उभारून पाटलासनी नमस्कार केली. आतल्या खोलीत पाटील गेलं, शिवगोंडा पुढं येऊन अदबीने नमस्कार केला व बैठक बसली. तस सरपंचांनी चहाची ऑर्डर सोडली, डायरेक्ट मुद्द्याला हात घालत सरपंच म्हणलं ” काय बी काळजी करू नगा पाटील साहेब !
म्या आजच मिटिंग बोलावतो व जतरची समदी तयारी करून घेतो. अस म्हणल्याव पाटलांचा जीव भांड्यात पडला. चहापाणी झालं तस सरपंच म्हणलं फकस्त तुम्ही बळी द्यायचा रेडा तयार ठेवा. जत्रा भन्नाट भरवितो. पाटील आलं तस घोड्यावरन गेलं.
सांच्याला समद्या पंचांना अवतांण दिल तशी लगोलग समदी जमा झाली.
समद्याना विषय माहीत हुताच ! फकस्त कामाची वाटणी तेवडी शिल्लक हुती.
चहा पाणी झालं तस, सरपंचांनी समद्या कामाची वाटणी बी आधीच करून ठेवल्याली हुती. फकस्त त्यांना ते काम सांगायचं हुत.
तस त्यांनी प्रत्येक पंचाला ते ते काम सोपवलं व मिटिंग सम्पली.
गण्या उठला अन म्हनला पंच रेड्याच काय ? त्यावर शिवगोंडा म्हनले रेड्याचा मान खायम पाटलांच्याकडे अस्तुया नव्ह ? तस न्हाय म्हणायचं मला गणू विनाकारण खाकरत म्हनला, एक रेडा माझ्या बी घरी हाय नव्ह ! मुद्दाम त्याला मी बाजार दाखवला न्हाय.
शिवगोंडा- मग तस जाऊन पाटलासनी सांग की. हाय काय न्हाय काय.
गणू – तस नव्ह पंच तुम्ही संगीतल्याल जरा येगल पडतंय ! पंच हसत म्हनलं जा जा सांगतु मी त्यांना !
त्यावर गणू म्हनलं न्हाई म्हंजी त्यांना तसा सांगावा द्या की, म्हंजी दुसरीकडं बाजार हिंडाय नगो त्यासनी.
ते बी खरच म्हणा ! अस पंच म्हटले अन समदीजन उठून जतरच्या कामाला लागली.
गावच्या गटारी साफ करायला यल्लप्पा, मल्लपा रुजू झाले. रस्ता साफ कराया गावकुसाबाहेरच्या बायका कामाला लागल्या.
इजेच्या डांबवर नवीन बलब घालण्यात आले.
गावात डांगरा पेटवून, समद्याना कळवण्यात आलं.
म्हसोबाच्या देवळा म्होर स्वच्छता करण्यात आली. आजूबाजूला मंडप घालून कनाती बांधण्यात आल्या.
बैलगाडीत हौद घालून पिण्याच्या पाण्याची सोय करण्यात आली. जवळपासच्या गावात आवतान धाडण्यात आलं. माहेरवाशिणी अन पै पाव्हन जमलं तस वाहनांन येऊ लागली ! गावात समदीकडे फरफर्या लावण्यात आल्या म्हसोबाच्या देवळाला बाहेरून आतून रंगरंगोटी करण्यात आली. गावात कस निस्ता उत्साह संचारला व्हतंच ! पोर बाळ रस्त्यावर हिंदडू लागली. दिवस जवळ येईल तस. प्रत्येकानं मागून घेतलेला नवस फेडीत व्हता.
म्हसोबाचा पुजारी रात अन दिस भर बसू लागला ! त्याला मदत घरच्याची बी मिळू लागली ! भानुदास पुजारी वयान तस म्हातर पन तस त्यांच्या अंगाकड बघितलं तर जाणवत नव्हतं! धोतर अन गळ्यात मुंडीछाट कपाळावर भंडारा ! त्याची कैक डोई म्हसोबाच्या सेवा करण्यात गेल्याली ! चेहऱ्यावर कायम हसत बोलणं. त्याला देवस्थानची दहा एकर जमीन बी कसून खात व्हता. तस त्याला काय बी कमी नव्हतंच !
देवा म्होर रोज वाजत गाजत लोक येत अन आपला बोलेला नवस पुरा करत ! मग कोण देवाच्या नावं गाय सोडीत कोण वासरू ! कोण बैल ! अस हे रोज चाल्याल हुतच!
रस्त्याच्या दोन्ही बाजून जागा मिळेल तस दुकान सजत व्हतीच ! त्यात देवा म्होर नारळ, कपूर, उदबत्त्या, प्रसाद म्हणून बेंड बत्तास, पेढे चिरमुर ! त्याला लागून देवाच्या मूर्तीच अन टाक असल्याला दुकान ! त्यांच्या खालत देवच फोटू असल्याला फ्रेमच दुकान ! मग ओळींन बांगड्यांची दुकान त्याच्या खालोखाल भांड्याची दुकान, मग शेवटी मुलांच्या खेळण्याची दुकान.
बाजूला मोठं पटांगण त्यात मुलांना बसायला पाळण ! गोल फिरत्याल घोड खुर्च्या. अन घसरगुंडी !
अस समदी जत्रा भरल्याली !
लागून पाच सात होटेल चहाच गाडे, भेळ, वडा पाव, त्यातच गारेगारची सायकल, रंगीबेरंगी बर्फाचा गोळा, उसाचा रस, सोडालेमनच दुकान ! अस हे समद वरश्या परमान झ्याक जुळून आल्याली जत्रा.
त्यात हावसे नवसे गवसे लोक हिंडत व्हतीच ! बाया बापड्या लेकरं चिल्ल पिल्लं समदी जण मजा घेत व्हते.
शाळेच्या माग तमाश्या पण आलेला, येक टुरिंग टाकीज पण बसकण मारल्याली व्हतीच की ! जे जे पाहिजे ते ते वरसा प्रमान झाल्याल व्हत ! आता फकस्त भंडारा उधळयाच व्हता, रेड्याचा बळी दिला की झालं ! जतरा पार पडणार व्हती.
घरोघरी पक्वांन्न शिजत व्हती, त्याचा वास गल्लीतन फिरत व्हता. जत्रेचा मुख्य दिवस उजाडला. जो तो आनंदात व्हता, ठेवणीतील कपड घालुनश्यान जो तो घरातील निवद देऊन येत व्हता. गर्दी ज्याम वाढल्याली, भंडारा जो तो उधळत व्हता, समदी रस्ते, गल्ल्या पिवळधमक झाल्याल !
देवळा म्होर तर नारळाच्या भकलाचा खच पडलेला ! भानुदास पूजऱ्याच्या कणग्या निवदान
काठोकाठ भरलेल्या व्हत्या ! हाताखाली घरची समदीजन मदत करत व्हतीच. तरी बी लोकांना आवरण जिकिरीचं झालं व्हत ! आवंदा तर गर्दी इपरित जमल्याली. समदिकड भांडऱ्यांन पिवळा चिखल झाल्याला ! भंडारा अन नारळाचं पाणी घ्या की !
सांच्याला रेड्याचा बळी बरुबरीन सहा वाजता द्यायचा व्हता ! चालरीतच तशी व्हती. हिकडं गण्याचा रेडा गावच्या पाटलांनी चांगली बोली देऊन इकत घेतला हुता ! त्यापायी गण्याबी लै खुषीत हुता !
त्या रेड्याला स्वच्छ धुवून श्यान पाठीवर झुल घाटलेली ! गळ्यात मोठा झडूंच्या फुलांचा हार ! घातला. डोईला भंडारा फासलेला गळ्यात दोन्ही बाजूला दोरखंड बांधलेलं.
दोघा रामोश्यानी त्याला गच्च धरलेल् ! त्याला गावातून मिरवत नन्तर मग देवीम्होर बळी द्यायचा व्हता !
शेवटचा घास म्हणून पाटलीनबाई आल्या, त्याला पाच पुरणाच्या पोळ्या खाऊ घातल्या ! बादलीभर पाणी पाजलं अन त्याला पाच सवाष्णीन ओवाळल !
दुपारचं 3 वाजता पाटलांचा रेडा वाड्या भैर पडला ! म्होर ढोल ताशा, अन सुंदरी वाजवणार कोर्वी लोक हुतच ! त्याच्या म्होर धनगराच् ढोल पथक ! त्याच्या म्होर गावठी बँड वाजवणंर लोक ! मध्येच कोणतरी नाचत हुता, त्याच्या अंगावर चिरमुर अन चिल्लर टाकली जात हुती !
भंडारा तर पोत्यानी फेकला जात व्हता !
मिरवणूक एकेक गल्ली तुन भैर पडत हुती मध्येच काही घरातल्या बायका रेड्याला पुरण पोळी चारवत हुत ! अशी ही जंत्री कसबस गावातून मिरवत देवाम्होर आली तवा सांच्याला दिवस मावळतीला कलला व्हता.
सांच्याला सहाला काही अवधी हुता, तस म्हसोबा म्होर रेड्याला उभं केलं ! सगळी कडे शांतता पसरली ! वाद्य बँड ढोल समद बंद पडल ! भानुदास पुजारी लगबगीनं म्होर झाला. त्यानं रेड्याच्या पायावर पाणी घातलं. म्हसोबच्या अंगावरील हार रेड्याच्या गळ्यात घातला ! बुट्टी भरून ठेवलेल्या निवदाच्या पुरण पोळ्या रेड्याला खायला दिल्या. त्याच्या अंगावरची झुल काढून त्याच्या वर समदिकड भंडारा उधळला ! तस इतर जमलेल्या लोकांनी बी इतका भंडारा उधळला की, रेडा बिथरला ! अन एकदम मानेला जोरात हिसका दिला ! तस त्याला दोरखंडानी धरलेलं रामोशी उत्तान पडलं ! त्यांच्या डोळ्यात भंडारा गेल्यान त्यांना बी काय झालं ते कळलं न्हाय ! जनावर बिथरल्याल त्यांनी जी मुसंडी मारली ती दहापाच जणांना तुडवून अंगात वार शिरल्यावनी पळून गेल ! — त्याच्या माग गावाची लोक काही पैलवान पळत व्हत पण —- ते कुठं पळून गेल ते शेवट पत्तर कळलं नाही ! पूजाऱ्याला तर भोवळ आली अन ते एका कोपऱ्यात पडलं !
झालं जो त्यो गण्याचा नावानं बोंब मारत व्हता ! एवढमातूर खर !
© प्रो डॉ प्रवीण उर्फ जी आर जोशी
ज्येष्ठ कवी लेखक
मुपो नसलापुर ता रायबाग, अंकली, जिल्हा बेळगाव कर्नाटक, भ्रमण ध्वनी – 9164557779
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈