सौ. गौरी सुभाष गाडेकर
☆ जीवनरंग ☆ दोन ध्रुवांवर दोघी …. – भाग 4 ☆ सौ. गौरी सुभाष गाडेकर ☆
“ताई, तुला आठवतं? आपण लहानपणी आई-बाबांबरोबर मुंबई बघायला आलो होतो…….”
“मला लहानपणचं काही सांगू नकोस. मी विसरलेय सगळं.”
“असं थोडंच विसरता येतं मागचं?” मीही हट्टालाच पिटले होते.
“मी प्रयत्नपूर्वक विसरलेय ते. मला पुन्हा आठवायला लावू नकोस.”
“असं काय वाईट होतं ग तेव्हा?”
“ते एवढंसं घर. बाबांचा तुटपुंजा पगार……”
“पण आपण तर समाधानी, सुखी होतो ना?”
“कारण आपल्याला मोठं घर, भरपूर पैसा म्हणजे काय असतं, तेच माहीत नव्हतं ना तेव्हा. तुला ठाऊक आहे? माझ्या सासरच्या बायका मला कमी लेखायची एकही संधी सोडायच्या नाहीत. माझं अर्धवट राहिलेलं शिक्षण, माहेरची बेताची परिस्थिती…. खूप अपमान करायच्या त्या. मग साहेब माझी समजूत घालायचे-तुझ्या रूपावर जळतात त्या. म्हणून तर मी माझ्या दिसण्याची एवढी काळजी घ्यायला लागले. तेवढी एकच तर गोष्ट होती माझ्याकडे. दुसरं म्हणजे…. ”
बोलू की नको ,असा विचार करून मग तिने सुरुवात केली.
“साहेबांच्या सुलभाकाकी आहेत ना-. आहेत म्हणजे होत्या. गेल्या बिचा-या पाच-सहा वर्षांपूर्वी. तर काय सांगत होते, त्या काकांनी एक बाई ठेवली होती. ते तिला घेऊन दुसरीकडे घर करणार होते; पण त्यांच्या आईंनी सांगितलं-इथेच राहू दे तिला. मग काय , ती घरातच राहायला लागली.
सासूबाई सांगायच्या ना, त्या सुलभाकाकी रोज रात्री नटूनथटून बसायच्या नव-यासाठी. पण काका, त्यांच्याकडे ढुंकूनही न बघता त्या बाईच्या खोलीत जायचे. मग सुलभाकाकी सगळं विसकटून टाकायच्या .बिचा-या!
मला नेहमी भीती वाटायची, म्हणजे अजूनही वाटते, माझ्यावर तशी पाळी आली तर?”
“पण हे घरातल्या इतर बायकांच्या बाबतीतही घडू शकलं असतं की.”
“त्यांच्या बाबतीत घडलं असतं, तर त्यांच्या माहेरचे आले असते जाब विचारायला आणि तशीच वेळ पडली असती, तर त्यांना माहेरी घेऊन गेले असते. एकेकीची माहेरं बघशील तर अशी श्रीमंत आहेत ,माहीत आहे? सुलभाकाकीचं माहेर मात्र माझ्यासारखं. फाटकं.
म्हणून तर सासूबाई मला सांगत राहायच्या-‘डोळ्यांत तेल घालून जप नव-याला.”
मला आतापर्यंत ताईचा राग येत होता पण आता मात्र दया येऊ लागली तिची.
© सौ. गौरी सुभाष गाडेकर
संपर्क – 1/602, कैरव, जी. ई. लिंक्स, राम मंदिर रोड, गोरेगाव (पश्चिम), मुंबई 400104.
फोन नं. 9820206306
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈