सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चित्रकार… भाग-२ – लेखक : श्री शशांक सुर्वे ☆ प्रस्तुती – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(इतरांच्या दृष्टीने जरी त्या भूत वैगेरे असल्या तरी माझ्या दृष्टीने एक प्रेमळ मायेची ऊब देणारी स्त्रीच आहे…) इथून पुढे …
भूत ही संकल्पना किती क्रूर,नकारात्मक रंगवली आहे ना लोकांनी??….कदाचित ते कधी कमला काकूंना भेटले नसतील….त्यांच्याबद्दल मी थोडी माहिती आजूबाजूला फिरून गोळा केली….त्या एकट्याच ह्या बंगल्यात राहत होत्या….सुधाकर काका 60 व्या वर्षीच कमला काकूंना एकटे सोडून देवाघरी गेले होते….ह्या आधी त्यांचा एकुलता एक मुलगा त्यांना एका अपघातात सोडून गेला….काकू अगदी एकट्या ह्या घरात राहत होत्या…ह्यातच एका दिवशी त्यांना ह्रदयविकाराने गाठले आणि हे घर अगदीच रिकामे झाले…..सुधाकर काका आणि कमला काकूंनी मोठ्या मेहनतीने हे घर बांधले होते ते त्यांनी जिवंतपणी कुणालाही विकलं नाही त्यामुळे अजूनही कमला काकूंचा वावर ह्या घरात आहेत असे आजूबाजूचे लोक म्हणतात…त्यामुळे हे घर कुणी विकत घेत नाही..आणि हे खरेच आहे….खरोखर त्या इथे वावरतात….माझ्याशी बोलतात……मलाही त्या खूप आवडतात…..
त्या दिवशी शाळेतून मी घरी येत होतो तर वाटेत हा बंगला होता….गेटच्या आतल्या बाजूला एका झाडावर एक पोपट बसला होता…..मला तो पोपट निरखून रेखाटायचा होता त्यामुळे विचार न करताच मी आत गेलो आणि इथल्या एका धुळकट पायरीवर बसून तो पोपट रेखाटू लागलो….मी एकदा चित्र काढायला बसलो की माझं कशात लक्ष नसत…..काही दिवसांपूर्वी एका माणसाने मला सांगितले होते इथे जास्त उशीर थांबू नको ही जागा भूतीया आहे…..भूत हा शब्द ऐकून घाबरून मी इथून काढता पाय घेतला होता पण आता त्या पोपटाच्या मागे मी इथे कसा आलो मला कळलंच नाही…..मी चित्र काढू लागलो पण न राहून अस वाटत होतं की मागे कुणीतरी उभं आहे….अचानक कानात एक कुजबुज ऐकू आली….
“खूप छान चित्र काढलं आहेस बाळा”
मी थबकून मागे बघितलं….मागे कुणीच नव्हतं…..नंतर लक्षात आलं आपण तर त्याच भूतीया घरात आहोत….अगदी धावत पळत तिथून आलो…..खूप घाबरलो होतो तेव्हा…..पण नंतर त्या बाळा शब्दाने मला विचार करायला भाग पाडलं…..खूप दिवसांनी तो शब्द ऐकत होतो……कुणीतरी माझ्या चित्राचीही तारीफ केली होती….एकेदिवशी शाळेतून येताना अचानक एक नजर त्या बंगल्याकडे गेली…..आज तो बंगला कमालीचा स्वच्छ आणि नीटनेटका वाटत होता….मी येताच तिथल्या गार्डन मध्ये मंद वाऱ्याची झुळूक वाहू लागली न जाणो अस वाटत होतं कुणीतरी आपल्याला त्या घरात बोलवत आहे….आज्जीच्या घरी आल्यावर जसा आनंद होतो तस काहीसं मनात वाटत होतं त्यामुळे थोडा धीर एकवटून बंगल्यात शिरलो…..परवा कुलूप असलेले दार आज उघडे दिसत होते…..दारात उभं राहून आत जाऊ की नको?? हाच विचार मनात चालू होता…..दारातून मला आतली हॉल मधली मोठी तैलचित्रे स्पष्ट दिसत होती…..ती चित्रे बघून आत शिरलो…..कमालीचा जिवंतपणा होता त्या चित्रात जणू प्रत्यक्ष आपण त्या ठिकाणी उभे आहोत असं वाटत होतं…..सगळी चित्रे फिरून फिरून बघत होतो….चित्राच्या खाली कमला असे नाव आणि सही होती 1996 हे साल देखील होते आपण एका भूतीया घरात आहोत हे जणू विसरूनच गेलो….अचानक थोडी सळसळ जाणवली चमकून तिकडे बघितले तर एका पॅड वर एक कोरा कागद अडकवला होता बाजूला पेन्सिल,ब्रश काही रंग आणि समोर एक खोटे सफरचंद ठेवलेले दिसत होते…..जणू सगळा सेटअप माझ्यासाठीच होता अस वाटत होतं…..कोणताही विचार न करता समोर ठेवलेल्या सफरचंदाचे चित्र रेखाटू लागलो…..ह्या वेळी मला ती भीती नव्हती जी इतर वेळी चित्र काढताना असायची…..माझी चित्रे आगीत फेकणारे माझे पप्पा पाठीत धपाटा मारणारी माझी मम्मी सगळ्यांच्या विसर पडला होता…..माझ्या पेन्सिल पकडलेल्या हातात एक वेगळेच बळ आले होते….समोरच्या सफरचंदाचे हुबेहूब चित्र,आउटलाईन वैगेरे माझ्याकडून रेखाटली जात होती….कानात कुणीतरी मला मार्गदर्शन करत होते….त्या दिवशी पहिल्यांदा मी मुक्तपणे जगल्याचा भास मला झाला…..मन अगदीच प्रसन्न झाले होते…..माझे आवडते काम करायची संधी मला मिळाली होती…..मग काय शाळा सुटल्यावर ITP च्या क्लास ना जाता भूतीया बंगल्यावर जाऊन चित्रे रेखाटू लागलो….रोज रोज माझ्यासाठी नवीन पेपर समोर एखादा नवीन ऑब्जेक्ट आपोआप तयार असायचा…..त्या कमला काकू मला मार्गदर्शन करीत होत्या….त्याची अगदी काळसर आकृती दिसत होती….वाऱ्याबरोबर हलणारी….पण त्यांचा खरवरीत मोठी नखे असलेला हात जेव्हा माझ्या डोक्यावर प्रेमाने फिरायचा तेव्हा मायेचे एक वेगळीच अनुभूती येत होती…..तिथे भय,किळस असले भाव गळून पडत असत….मग त्या मायेच्या स्पर्शासाठी घरी येऊन पप्पांचा मार सुद्धा अगदी किरकोळ वाटत असे……कमला काकू माझ्या चित्रांची खूप तारीफ करायच्या माझं जिथं चुकत असे तिथे आपोआप एखादी आउटलाईन यायची…..माझ्या चुकीच्या वेळी त्यांच्या सांगण्यात कुठेही आरडाओरडा नव्हता….त्यांचा इतरांच्यासाठी भयानक दिसणारा काळा हात माझ्या पाठीत बसत नव्हता… उलट तो हात माझ्या डोक्यावरून फिरवून त्या मला प्रोत्साहन देत होत्या…..जवळपास महिनाभर इथे आलो….आईचा अबोला नको म्हणून ITP चा दिवसरात्र जागून अभ्यासही केला तरी जिल्ह्यात 9 वा आलो……साहजिक मार तर पडणारच होता…..आईनेही अबोला धरला होता पण मी जेव्हा भूतीया बंगल्यात आलो आणि कमला काकूंना रिझल्ट बद्दल सांगितलं तर त्यांनी टाळ्याच वाजवल्या….आपल्या खरवरीत हातात माझा हात घेऊन अभिनंदन देखील केले……खूप बर वाटलं…..दिवसरात्र केलेली मेहनत सफल झाल्याची अनुभूती आली…..दोन वेगवेगळ्या टोकाच्या मध्ये मी होतो….एक माझे जन्मदाते असून सुद्धा मला त्यांची पुढची पैसे कमावण्याची मशीन बनवू पाहत होते आणि एक जी काकू माझी कुणी नसून सुद्धा माझ्या आवडत्या कामात मला साथ देत होती….मुलांनी मोठं व्हावं हे प्रत्येक आईवडिलांचे स्वप्न असते हे मान्य आहे पण मुलांचे छंद,त्यांच्या कला,त्यांची स्वप्ने ह्याचा विचार कोण करणार??…..त्यामुळे मी हा निर्णय घेतला आहे….कायमच कमला काकूंच्या बरोबर रहायचं…..पण त्यांच्या जगात जाण्यासाठी मला हे जग सोडावे लागेल…..हरकत नाही…..तसही ह्या जगात ते वजनदार दप्तर,अभ्यासावरून मारझोड करणारे माझे आईवडील,शाळेचा निकाल टॉप ला रहावा म्हणून मुलांच्यावर सक्ती करणारे दिवसभर शाळेत बसवून घेणारे ते शिक्षक,ज्यादाचे क्लासेस अजून बरच काही माझी वाट बघत असतील……नकोच ते सगळं….आताच मी कमला काकूंचे ते त्यांच्या अमानवी रूपातले चित्र रेखाटले आहे ते बघून त्यांच्या विद्रुप चेहऱ्यावरचा आनंद मला स्पष्ट दिसत आहे….त्यांनी जवळपास मला प्रेमाने मिठीच मारलीय…..हेच प्रेम मला हवं आहे म्हणून आता त्या बंगल्याच्या तिसऱ्या मजल्यावरून खाली उडी मारणार आहे…..ह्या दुनियेतली शेवटची उडी…..सरळ कमला काकूंच्या दुनियेत……तिथे गेल्यावर मला त्या प्रेमळ स्त्रीचे खरे रूप बघता येईल…
— समाप्त —
लेखक:- श्री शशांक सुर्वे
प्रस्तुती : उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈