डॉ. शैलजा करोडे
🌸 जीवनरंग 🌸
☆ ऑक्सिजन… ☆ डॉ. शैलजा करोडे ☆
मटार धुवून चाळणीत निथळत ठेवले . बटाटे उकडून घेण्यासाठी कुकरला लावले . कढीपत्ता , कोथिंबीर , हिरव्या मिरच्या , आलं , लसूणाचं वाटण केलं .पीठ मळण्यासाठी परातीत घेतलं .हे सगळं करतांना दमछाक व्हायला लागली . अशावेळी पाणी प्यावं म्हणे , कारण पाण्यातून आँक्सिजन मिळतो .So water is the first remedy for any health issue .माझी मैत्रिण डाॅ.वृषाली जोशी मला नेहमी सांगायची ” कामं तर कधी संपायचीच नाहीत , पण त्रास व्हायला लागला तर थोडावेळ बसायला हवचं . एक दीर्घ श्वास घ्यायचा , क्षणभर डोळे मिटायचे . आपली श्वासाची गती स्थिर झाली कि पुढील काम हाती घ्यायचं . लक्षात असू दे , श्वासाची गती स्थिर होणं म्हणजे आँक्सिजन लेव्हल स्थिर होणं , ह्रदयाची गती स्थिर होणं ” .एक मंद स्मित माझ्या चेहर्यावर आलं , आता पन्नाशीच्या उंबरठ्यावर याची गरज पडते वेळोवेळी, पण ऐन तारूण्यात तर , ” लाथ मारीन तिथे पाणी काढीन ” अशी परिस्थिती . क्षणाची उसंत नसली तरी थकवा कधी जाणवला नाही . दहावीच्या शालांत परीक्षेत मिळालेल्या घवघवीत यशाने अनेक माध्यमांनी माझ्या मुलाखती घेतल्या होत्या . ” कसा अभ्यास केला ? वेळेचं नियोजन कसं केलं ? कोणते क्लासेस लावले होते काय ? त्याचा कितपत फायदा झाला ? वगैरे
मी क्लासेस तर लावले नव्हतेच , शाळेत जे शिकवलं ते ज्ञान व काही स्वतः अभ्यास करून आत्मसात केलेलं ज्ञान उपयोगी आलं . अंगी एक झपाटलेपण होतं तेव्हा .वेळेचं नियोजन म्हणाल तर एका विषयाचा कंटाळा आला तर दुसरा विषय घ्यायचा हाती .change of work is my rest .तिच विश्रांती , तोच आँक्सिजन होता माझ्यासाठी .” “वाह ग्रेट , खूपच छान .तुझ्याकडून प्रेरणा घ्यावी असं तुझं यश तरआहेस पण ते साध्य करण्यासाठी तुझं साधनही प्रेरकचं .” म्हणत पेढ्यांचा बाॅक्स माझ्या हाती दिला होता .
आयुष्यात असा वेळोवेळी ऑक्सिजन लागतोच … प्रेमाचा , मायेचा , कौतुकाचा ..
चला थोडी वामकुक्षी घेऊया म्हणत मी पलंगावर लवंडले . झोप यावी म्हणून सकाळचं वर्तमानपत्र दुपारी हाती घेतलं . आज शनिवार चित्रपट व नाटकांची वेगळी पुरवणी होती .” नृत्य हा माझा प्राणवायू ” अभिनेत्री अर्चना जोगळेकर शीर्षक वाचलं आणि 1980 ते 1990 च्या दशकातील नितळ चेहर्याची , घार्या डोळ्यांची , गौरवर्णाची , शेलाट्या बांध्याची अर्चना डोळ्यासमोर तरळली .चित्रपट , नाटक करीत असतांनाच नृत्याचेही धडे तिने गिरवलेले . ” अर्चना नृत्यालय ” ची स्थापना आई नृत्यांगना आशा जोगळेकर यांचे समवेत करून न्यू जर्सी ( अमेरिकेत ) इथे तिने शाखा उघडली . यातून अनेक विद्यार्थी प्रशिक्षण घेऊन नृत्यात पारंगत होत आहे .खरंच माणसाच्या अंगी असे झपाटलेपण हवं , डेडिकेशन हवं .हा प्राणवायूच आम्हांला ऊर्जा देतो , लक्ष्यपूर्तीत सहाय्यक ठरतो .वाचता वाचताच वर्तमानपत्र हातातून गळालं , मी निद्रेच्या आधीन झाले होते .
” आई , चहा घेतेस काय ? मी बनवलाय ? इथे किचनमध्ये येतेस की तिथे आणून देऊ “
सुरेखा , माझी मुलगी विचारत होती
” नको , इथे नको , मी येते किचनमध्ये .नसत्या सवयी लावून घेऊ नये माणसानं . उद्या तू सासरी गेल्यावर कोण देणार आहे मला “
” काय आई , किती विचार करतेस . मी काही कोठे जात नाही. नवर्यालाच येथे घेऊन येईन “
” वेडी कुठली ” आणि आम्ही दोघी खळाळून हसलो .
मनावरची मरगळ जाऊन मन प्रफुल्लित झालं . खरंच हसण्याने किती गोष्टी साध्य होतात .रक्तदाब नियंत्रणात राहातो . स्वतः आनंदी असल्याने इतरांनाही आनंदीत करता येते , दुःख हलके होते . जगण्यासाठी नवी ऊर्जा मिळते . चिंता , तणाव दूर होतो .या सकारात्मकतेचे परिणाम शरीरावरही दिसून येतात .पचनसंस्था सुधारते. शांत झोप येते . बापरे किती फायदे आहेत हसण्याचे .उगाचच कोणी हास्यक्लब नाही काढत . कारण हसणे हा जीवनदायी प्राणवायूच तर आहे ना .
मनाच्या या प्रसन्नतेनं मन हलकं फुलकं झालं .आणि कवितेच्या प्रदेशात हिंडावसं वाटू लागलं . होय , कविता ही त्या कवीचा जीव कि प्राण असते . जीवात प्राण ओतणारी ती कविता म्हणजे कवीचा आँक्सिजन म्हटली पाहिजे .क्षणात आकाशात भरारी घेणारी तर क्षणात समुद्राचा तळ गाठणारी , कधी क्षितिजावर हिंदोळे घेणारी तर कधी मनाच्या खोल डोहात दुःखाने बुडालेली , अशी ब्रम्हांडाची सफर घडविणारी कविता कवीला दुःखात सोबत करणारी , आनंदाने उचंबळणारी ,संकटकाळात धैर्य देणारी , काळोखातही प्रकाशकिरण शोधण्याची शक्ती देणारी .. प्राणवायूच म्हणायला पाहिजे टेबलवरचं रायटिंग पॅड घेतलं आणि काव्यकामिनीची मी पूजा आरंभली .जीवन मार्गातील खाच खळगे , काट्यांवरुन वाटचाल करतांना मनोधैर्य खंबीर हवं .मार्ग सुगम होतो , फक्त तो सुखाचा पासवर्ड शोधता आला पाहिजे .
ऊन सावलीचा खेळ
शिकवण निसर्गाची
दुःखामागे येई सुख
धरी कास ही आशेची
निराशेत दडलेला
शब्द असतो आशेचा
मना खंबीरता देई
पासवर्ड तो सुखाचा
काव्य प्रदेशात हिंडतांना मला अशी नवऊर्जा मिळत असते .
डोअरबेल वाजली . कोण असेल , विचार करतच मी दरवाजा उघडला .माझी मैत्रीण आरती तिचा मुलगा सुहाससह आली होती .सुहासचं पदवीपर्यंतचं शिक्षण झालं होतं, पण तो नोकरीपेक्षा स्वतःचा काही व्यवसाय सुरू करू इच्छित होता आणि या इच्छेला मूर्तरूप देण्यासाठी त्याने माझ्या बँकेतून मुद्रा योजनेअंतर्गत कर्जही घेतलं होतं .त्याने उद्योग सुरू केला पण ज्या कंपनीला तो पुरवठा करणार होता तो वेळेत करू शकला नाही . एक तर अकुशल कामगार , कामगारांची काम करण्यातील दिरंगाई , सुहासचं poor management , बाजारातील गळेकापू स्पर्धा .यामुळे हे घडत गेलं . त्या कंपनीला पुरवठा दुसर्यानेच केला . कामगारांचे पगार , बँकेचे EMI मात्र चालुच होते . सुहासला हे सगळं नवीन होतं किंबहुना त्याच्या प्लॅनप्रमाणे झालेलं नव्हतं . तो भांबावला होता .
” शोभना यासाठीच आज सुहासला घेऊन आलेय . बघ तुला काही मार्गदर्शन करता आलं तर . मदत कर बाई माझ्या मुलाची” .
“ अग होय , पण तू चिंता नको करूस आणि पॅनिकही होऊ नकोस . सुहास व्यवसाय करतांना प्लॅनिंग , मार्केट स्ट्रॅटेजी महत्वाची तर आहेच , पण वक्तशीरपणाही तितकाच महत्वाचा. किंबहुना वक्तशीरपणा हा प्राणवायू आहे उद्योग व्यवसायातला . प्रत्येक उद्योगामध्ये उत्पादन, वाहतूक, विक्री किंवा वसुलीसारख्या प्रत्येक कामासाठी वेळेचं एक गणित असतं. ते गणित मिनिटांनी जरी चुकलं तरी व्यवसायाचं गणित लाखांनी चुकण्याची ती सुरुवात ठरू शकते. वेळा पाळण्याचं काम जसं उद्योजकाला करावं लागतं तसं त्याच्याकडे काम करणार्या प्रत्येक कर्मचार्यालाही करावं लागतं. ‘इंडियन टाइम’ नावाचा एक विचित्र प्रकार आपल्याकडे आहे. तो उद्योग-व्यवसायासाठी अतिशय घातक असतो. असा घात होऊ नये अशी इच्छा असणार्या सर्वच उद्योजकांनी आणि त्यांच्या कर्मचार्यांनी वक्तशीरपणा अंगी बाणवण्याला पर्याय नाही; अन्यथा, काळ कोणाहीसाठी थांबत नाही हे लक्षात असलेलं बरं. वक्तशीरपणा बाणवण्यासाठी वेळेचं नियोजन आवश्यक असतं. त्यासाठी आपल्या कामाचा प्राधान्यक्रम ठरवता यायला हवा. म्हणजे वेळेच्या नियोजनाचा विचार करताना दोन महत्त्वाचे प्रश्न स्वतःला विचारायला हवेत. एक म्हणजे माझ्या आयुष्यात मला जे साध्य करायचं आहे आणि दुसरा म्हणजे रोजच्या जगण्यातला वेळ मी कसा वापरतो? थोडक्यात वेळेचं नियोजन करायला शिकायचं असेल तर आधी वेळेबद्दल आणि स्वतःबद्दलही आदराची भावना हवी. नाहीतर कल करे सो आज कर, आज करे सो अब हे वचन सगळ्यांनाच माहिती असतं. पण ते अमलात आणणारे मात्र कमी असतात. वेळेवर कामं निपटायची सवय अनेक बाबतीत फायदेशीर ठरते. कामात सुटसुटीतपणा येतो, गोंधळ टळतात, मनावरचा ताण नाहीसा होतो. गेलेला वेळ परत येत नाही ही ध्यानात घेऊन कामातल्या व्यक्तशीरपणाची सवय अंगी बाणवणं म्हणूनच आवश्यक असतं.
आता तुझ्या काय चुका झाल्या , कोठे आणि केव्हा झाल्यात याचं बारकाईने निरीक्षण आणि विश्लेषण कर . मेहनत तर तू करतोच आहेस . पण हिंमत हारू नकोस . एकदा आलं अपयश . पण यातून तुला खूप शिकायला मिळणार आहे हे लक्षात घे आणि पुढील वाटचाल करत राहा . मग यश तुझंच आहे .”
“ होय आँटी ” सुहासच्या चेहर्यावर हास्य उमललं आणि नकळत माझ्या आणि आरतीच्याही चेहर्यावर हास्य आलं .
” अग शोभना तुझ्या कानावर काही आलंय काय ग ” माझ्या शेजारच्या फ्लॅटमधील वीणा बोलत होती
” नाही ग , आणि कशाबद्दल म्हणत आहेस तू .” अग त्या मातृरक्षा बिल्डिंगमधील कालिंदीचा मुलगा अशोक अमेरिकेत मिशिगनला होता बघ . छान नोकरी मिळाली , तिकडेच स्थायिक झाला . लग्न झालं , दोन मुलं झाली . सगळं कसं सुरळीत चालू होत. ” .. ” बरं मग झालंय तरी काय “.. ” जागतिक मंदीची लाट आली आणि अशोकची नोकरी गेली . उच्चपदस्थ असुनही त्याला ही झळ बसली कारण तो परदेशातील होता . स्थानिकांना झुकतं माप मिळालंच . अशोकने जवळची जमापुंजी खर्च करुन सहा महिने काढले . नोकरीसाठी खूप प्रयत्न केले पण अपयशच आलं आणि त्याचा व्हायचा तोच परीणाम झाला .अशोकने आत्महत्या केली ” .. ” काय ? आत्महत्या ? हे कसं शक्य आहे?” . “ होय , असेलही कारण आपण मुलांना यशाचे मार्ग दाखवतो .प्रेरणा , प्रोत्साहन देत राहतो .यशस्वीतेच्या वाटेवरील तो झगमगीतपणाही सुखकर वाटतो . पण आपण अपयश पचवायला शिकवित नाही .परिस्थितीला सामोरं जाण्यासाठी आपणच धैर्य , हिंमत धरली पाहिजे , प्रतिकूलतेवर मात कशी मात करायची आपणच शिकवत नाही .त्याने हे दुःख आपल्यापुरतं मर्यादित न ठेवता आपल्या आई वडिलांना , आपल्या माणसांना सांगायला हवं होतं .होय आपली माणसं .. आपल्या जगण्यासाठी ज्या प्राणवायूची गरज असते तो प्राणवायु म्हणजे आपली माणसं .. …. रक्ताच्या नात्याचीही आणि आपल्याशी ऋणानुबंधानं जुळलेलीही ..अशा कठीण प्रसंगी हीच माणसं कामाला येतात . भावनांचा निचरा होतो . मनातलं मळभ नष्ट होऊन लख्ख उजाडतं आणि अशा अप्रिय निर्णयापासून माणूस परावृत्त होतो . हा प्राणवायू हवाच .जाऊ आपण कालिंदीकडे ..”
ऊं ऊं ऊं ऊं हाताने डोळे पुसत आजी आजी करत अक्षय माझा नातू झोपेतून उठला होता , मला शोधत दरवाज्यापर्यंत आला होता . ” ओ ले माझ्या राजा , झोपा झाली वाटतं ,रडू नाही , काय हवं तुला .मी त्याला उचलून कडेवर घेतलं .” माझा आँक्सिजन माझ्या कुशीत होता .
© डॉ. शैलजा करोडे
नेरुळ नवी मुंबई मो. 9764808391
ईमेल – [email protected]