सुश्री वर्षा बालगोपाल 

? जीवनरंग ?

☆ दोन बोधकथा – विकतची डिग्री / आंधळे प्रेम ☆ सुश्री वर्षा बालगोपाल 

(१) विकतची डिग्री 

अतिशय श्रीमंत बापाचा सुमेध एकुलता एक मुलगा. काही म्हणजे काहीच कमी नव्हते त्याला.म्हणेल तेव्हा म्हणेल ते, ज्यावर बोट ठेवेल ती गोष्ट त्याला मिळत होती.

दिवसेंदिवस त्याच्या मागण्या वाढत होत्या आणि त्या तत्परतेने पूर्ण करण्यात आई बाप स्वतःला धन्य मानत होते.

सहाजिकच सुमेध हेकेखोर तर झालाच पण अभ्यासात ही त्याचे लक्ष लागतं नव्हते. कसाबसा पास होत तो दहावीत पोहोचला. पण परीक्षेच्या वेळी तो घाबरला. आता कसे होणार? पण वडिलांनी त्याला फक्त परिक्षा दे म्हणून सांगितले आणि मग पैशाच्या बळावरच तो पास झाला. त्याला सायन्सला ऍडमिशन मिळाली. दहावीचाच कित्ता पुढे गिरवला गेला आणि तो बारावीच नाही तर डॉक्टरही झाला.

पैसा असल्याने त्याला मोठे हॉस्पिटल बांधून दिले. आणि मग काय डिग्री हातात, मोठे हॉस्पिटल नावावर कोणताही पेशन्ट आल्यावर त्यावर स्वतः उपचार न करता या डॉकटरकडे त्या डॉक्टरांकडे पाठवायचे आणि पेशंटला लुटायचे अशी प्रॅक्टिस सुरु झाली.

एकदा सुमेधचे वडीलच खूप आजारी पडले. नातेवाईकांनी त्यांना सुमेधच्याच हॉस्पिटलमध्ये आणले.

वडिलांना पाहून सुमेधला रडू फुटले. रडत रडत तो बाबांना म्हणाला मला माफ करा बाबा. मी तुमच्यावर उपचार नाही करू शकत. तुम्हाला मी दुसऱ्या चांगल्या डॉक्टरांकडे पाठवतो. माझाच मित्र, त्याला माझ्यापेक्षा कमी डिगरी आहे पण त्याचे निदान एकदम बरोबर असते. तो स्वतः त्याच्या पेशंटना बरे करतो. आणि हो मी पाठवलेले पेशन्ट सुद्धा तो अगदी खडखडीत बरे करतो.

बाबांना सुद्धा लक्षात येते.’ केवळ डिगरी मिळवली म्हणजे ज्ञान मिळालेले असतेच असे नाही.’ 

वडील मित्राच्या हॉस्पिटल मधे जाऊन चांगले बरे होतात. मित्राचा हातगुण पाहून म्हणतात हेलिकॅप्टरने अती उंच शिखरावर पोहोचून शिखर सर केल्याच्या आनंदापेक्षा अवघड वाटेने स्वतःच्या मेहनतीने थोड्या कमी उंचीवर पोहोचले तरी ती उंची गाठल्याची किंमत ही वरच्या मुलापेक्षा जास्तच असते. पैशाने डिग्री मिळवता येते. ज्ञान नाही. पैशाने मिळवलेली डिग्री लोकांच्या प्राणासाठी घातकही ठरू शकते.

(२) आंधळे प्रेम 

सुखवस्तु कुटुंबात राहणारा सुशील. खुप हुशार, सगळ्यांचा लाडका पण थोडा खोडकर. त्याचा लहानसहान खोड्यांकडे अजून तो लहान आहे म्हणून दुर्लक्ष केले जाई. आजी तर म्हणे आमचा कृष्ण आहे तो. करू दे खोड्या.

प्रेमाच्या नादात कोणी त्याला समजावून सांगण्याच्या भानगडीत पडले नाही. किंबहुना त्याला समजावयाला गेले तर तो मुद्दाम जास्त खोड्या काढायचा. मग डॉक्टर पण म्हटले काही मुले असतात  व्रात्य, over active, पण नंतर समज वाढली की होतात शांत आपोआप.

असेच दिवस जात होते. मुलाच्या खोड्या काही कमी होत नव्हत्या. अचानक किरकोळ आजाराचे निमित्त झाले आणि सुशीलच्या वडिलांना देवाज्ञा झाली.

कुटुंबावर दुःखाचा डोंगरच कोसळला. आधीच खोडकर असलेल्या सुशीलवर सहानुभूतीचा दयेचा वर्षाव होऊ लागला. त्यामुळे तो निर्ढावू  लागला. छोट्या मोठ्या खोड्यांचे स्वरूप शेजाऱ्या पाजार्यांना त्रासदायक होऊ लागले. तशा तक्रारी त्यांनी आईकडे केल्या.

आई पण मोठ्या कंपनीत कामाला असल्याने आर्थिक बळ खूपच होते. आईला मुलाला आई आणि वडील दोघांचेही प्रेम द्यावे लागतं होते आणि ती ते द्यायचा पूर्ण प्रयत्न करत होती. याच भावनेतून तिला आपल्या मुलाला कोणी काही बोललेले सहन व्हायचे नाही. ती पैशाने त्या व्यवहारावर पाणी फिरवत होती.

मुलाने कोणाची गोष्ट तोडली, दे त्यांना नवी गोष्ट आणून, कोणाच्या घरातून पैसे चोरले, किती पैसे चोरले विचारून पैसे परतफेड करणे, कोणाच्या वळवणात पाणी ओतले एवढे नुकसान झाले का दे भरून…

कोणी काही मुलाला म्हणू नाही म्हणून आई सढळ हात ठेवत होती. त्याने शेजाऱ्यांचे समाधान होत नव्हते पण बाई माणसाला कसे सांगायचे, वडीलाविना पोराला वाढवतीय जाऊदे असे म्हणून सोडून देत होते.

असे करून एक प्रकारे आपण मुलाचे नुकसान करत आहोत हेच मुळी तिच्या लक्षात येत नव्हते. माझ्या मुलाला कोणी काही बोलायचे नाही, आमचे आम्ही पाहून घेऊ अशीच तिची भूमिका असायची.

दिवस, महिने, 5 वर्ष लोटली पण वागण्यात काहीच फरक नव्हता ना सुशिलच्या ना त्याच्या आईच्या. सोसायटीतले लोक पण मांजराच्या गळ्यात घंटा बांधणार कोण असा विचार करून गप्पच होते.

एक दिवस त्याने शाळेतल्या मुलीची छेड काढली. पोलिसांनी पकडून नेले पण वय जास्त नसल्याने कोणी त्याला मारलेही नाही. आईनेही येऊन मध्यस्थी केली पैसे देऊन हे प्रकरण मिटवले. पोलिसांनी कडक शब्दात समज देऊन त्याला सोडून दिले.

सुशील तर अजूनच निर्ढावला.आई त्याला चकार शब्दाने बोलत नव्हती. तिला पण त्रास होत होता पण बापाविना पोर वाढवायच्या नादात ती त्याला घडवत नव्हती.

शेवटी एक वयस्क बाई तिच्या आईसारखी असणारी तिने सुशिलच्या आईला सांगून बघायचे ठरवले.

सुट्टीच्या दिवशी दुपारी निवांतपणे त्या सुशीलकडे गेल्या. गप्पा मारता मारता सुशिलचा विषय काढला मात्र सुशिलची आई चवताळली. ती त्या आज्जीना काही बोलणार एवढ्यात एक शेजारी सुशीलची तक्रार घेऊन आले. पार्किंगमधल्या गाडीचा सायलेन्सर काढून त्याने आईच्या गाडीच्या डिकीत ठेवला होता. हे पाहून तक्रार करत असताना सुशीलही तेथे आला. त्याने मी काही केले नाही असे म्हणून ती गोष्ट उडवून लावली आणि नेहमीप्रमाणे आईने काही पैसे देऊन त्या शेजाऱ्याला गाडी दुरुस्त करून घे. पैसे कमी असतील तर अजून देईन सांगून त्याचे तोंड बंद केले.

शेजारी निघून जाताच आजीने सुशीलला आवाज दिला सुशील येताच त्यांनी आईला दटावायला सुरुवात केली आणि दटावताना एक आईच्या मुखात लगावून द्यायचे धाडसही दाखवले.

अनपेक्षित घटनेमुळे दोघेही सुन्न झाले. ते रागाने आजीकडे पहातच होते पण त्यांना बोलण्याची संधी न देताच आजीच बोलू लागली…

“ मला माहिती आहे तुम्ही माझ्यावर खूप रागावलाय. पण माझाही नाईलाज झाला आणि माझ्याकडून हे कृत्य घडले. सुशील बेटा चूक तुझी होती पण शिक्षा आईला झाली. कसं वाटलं रे तुला?” 

सुशील तर पार चक्रावून गेला होता. पण घाव वर्मी बसला होता आपल्यामुळे आपल्या आईला शिक्षा झाली हे त्याने पहिल्यांदाच पाहिले होते. ते त्याच्या मनाला एकदम लागले. तो फक्त डॊळे मोठे करून पहात बसला.

आई म्हणाली “ काय हो मला का मारलेत? मी काय केलं? “ तसे आजी म्हणाली “ तू आंधळं प्रेम केलंस. आपल्या पोराने चूक केली आहे हे समजून सुद्धा दरवेळी त्याला पाठीशी घातलंस. त्याच्या चुका निस्तरण्यासाठी तुझा कष्टाचा पैसा खर्च केलास पण त्यातून मुलाला काही बोध नाही दिलास. अजून वेळ गेलेली नाही. मुलाला वाढवणे म्हणजे त्यांना त्यांची मनमानी करू देणे नव्हे. त्यांच्या चुकांवर पांघरूण घालणे नव्हे. तर त्यांना घडवण्यासाठी वेळेवर कठोर व्हायलाच हवे. त्यांना शासन आईच करू शकते. कृष्णाला सुद्धा त्याच्या यशोदा मय्याने बांधून ठेवणे, मारणे, अबोला धरणे यातून तो चांगला घडावा म्हणून शासन केलेच होते. जन्म न देता मुलाच्या चांगल्या भवितव्यासाठी माय शिक्षा देऊ शकते तर मग ज्या मुलाला तू जन्म दिला आहेस त्या मुलाला घडवताना सांगून पटत नसेल तर शासन आईनेच करावे लागते ना?  मुलाला वाढवताना त्याला चांगले घडवावे पण लागते. घडवताना थोडे कठोरही व्हायचे असते. आंधळे प्रेम मुलाला पांगळे तर करतेच पण त्याच्या आयुष्याचेही नुकसान करते. सोन्याचा दागिना घडवताना त्याला घाव तर सोसावे लागतातच पण अग्निदिव्यातूनही जावे लागते. ते काम सोनाराला कुशलतेने करावे लागते.

मडके घडवताना त्याला आकार देताना थापटावे लागते, चाकावर फिरावे लागते आकार देताना थोपटले तरी आत आधाराचा हात द्यायला पाहिजे आकार घेताच हळूच हात काढून भट्टीत तावून सुलाखून काढले पाहिजे हे काम त्या कुंभाराला करायला पाहिजे. दागिना नीट नाही झाला, मडके कच्चे राहिले तर दोष सोनार, कुंभारालाच दिला जातो,  म्हणून मी शिक्षा तुला दिली. अजूनही वेळ गेलेली नाही. तू मुलाला सुधार, घडव. त्याच्या दोन कानाखाली वाजवून गांभीर्य समजावून सांग मग बघ…” 

.. .. असे म्हणून आजी निघून गेली आणि आईला प्रेम आणि आंधळे प्रेम यातला फरक कळला 

© सुश्री वर्षा बालगोपाल

मो 9923400506

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments