श्री प्रदीप केळुस्कर

?जीवनरंग ?

☆ बोलायचे राहून गेले – भाग-१ ☆ श्री प्रदीप केळूसकर ☆

वंदना बाहेर पडण्याची तयारी करत होती.  एव्हड्यात तिची मैत्रीण सीमा चा फोन आला. सीमाचा खुप दिवसांनी फोन, म्हणून वंदना आंनदीत झाली.

वंदना –” काय सीमे? आज एवढ्या लवकर उठलीस वाटतं?”

सीमा –” म्हणजे काय वंदे? मी लवकर उठत नाही अस म्हणायचंय तुला?”

वंदना –”उठतेस ग, पण कामाशिवाय तू फोन करणाऱ्यातील नाही, म्हणून आश्यर्य वाटलं.”

सीमा –” ते बरोबर ओळखलस, बर वंदे, मी फोन केला म्हणजे तुमची मिता आणि अश्विन यांचा प्रेमप्रकरण जोरात सुरु आहे, तुला माहित आहे ना?”

वंदना –” काय? मिता आणि अश्विन? नाही ग, मला आत्ताच समजतंय, आता खडसवून विचारते मिताला, नोकरीं वगैरे बघायची सोडून प्रेम करते? आणि ते पण अश्विन, तो उनाड पोरगा?”

सीमा –”अग पण अश्विन तुझा मित्र ना?”

वंदना –” हो ना, एका नाटकाच्या ग्रुपमध्ये आहोत आम्ही चार वर्षांपासून. पण मैत्री फक्त ग्रुप मध्ये आणि नाटकात, वैयक्तिक आयुष्यात नाही. तो कसा आहे फुलपाखरासारखा हें मला माहित आहे. आज पर्यत तीन चार मुलीबरोबर दिसायचा. पण आता माझ्या बहिणीबरोबर? थांब विचारते दोघांनाही.”

सीमा –” ए बाई, माझं नाव घेऊ नकोस हा?”

वंदना –”नाही घेणार पण दोघांनाही सरळ करते की नाही बघ.” 

सीमाने फोन खाली ठेवला.

वंदनाचा संताप संताप झाला. जेमतेम वीस वर्षाची ही आपली बहिण, गेल्या वर्षी B. Sc झालेली, पुढे काही शिक म्हटलं तर टाळाटाळ करणारी, आईच्या पेन्शनवर जगणारी प्रेमाचे इष्क उडवू लागली आहे आणि कुणाबरोबर? तर त्या खुशालचेंडू अश्विनबरोबर?

वंदना कडाडली ” मिता, आत्ता माझ्यासमोर ये, ताबडतोब “

तिचे ओरडणे ऐकून त्या दोघींची आई घरातून बाहेर आली 

” काय झालं ग, कशाला ओरडू लागलीस?

“अग आई, ही आपली मिता त्या अश्विनबरोबर प्रेमाचे चाळे करते आहे म्हणे जोरात “

“अग पण तुला कोणी सांगितलं?”

“मला कोणी सांगितले हें महत्वाचे नाही, तिला विचार खरे का खोटे?”

“ती बाथरूममध्ये गेली आहे ‘

आईने हें वाक्य म्हणता म्हणता मिता आंघोळ करून बाहेर आली 

“काय कशाला आवाज वाढवलास वंदनाताई?

“तुझाच विषय, मी तुला म्हंटल पुढे शिक किंवा चांगला कोर्स कर, स्वतःच्या पायावर उभी राहा. आईच्या अर्ध्या पेन्शनवर राहू नकोस,तर तुला जमत नाही आणि त्या अश्विनबरोबर फिरते आहेस म्हणे गावभर “

“कुणी सांगितलं तुला?”

“खोटे आहे का सांग. अश्विनला जाऊन विचारू? बाबा रे, तू कमवतोस किती? दोन वर्षांपूर्वी त्या नयना बरोबर तुझे प्रेमाचे चाळे चालले होते, त्या आधी मामेबहिणीबरोबर, आता तुला माझी बहिण मिळाली का,? विचारू त्याला?”

“आमचं एकमेकांवर प्रेम आहे, आम्ही लग्न करणार आहोत.”

“होय काय?”

“मग तीन वर्षांपूर्वी तो त्याच्या मामेबाहिणी लग्न करणार होता, आता ती कुठे गेली कोण जाणे, मग नयना बरोबर करणार होता, नयना मागे पडली, आता तू मिळालीस?”

“ते सगळे जुने विषय झाले ताई “

“आई बघितलंस, तुझं लाडकं कोकरू कस तुरुतुरु बोलतंय ते? तोंड फोडीन मिते, पहिलं काही कमवायला शिक, मग प्रेम कर, मग लग्न कर, लग्न करून खाणार काय? की परत आईकडे भीक मागणार?”

“ताई, आई आम्ही लग्न करणार आहोत.

“कशी लग्न करतेस तेच पहाते. जिथे असशील तेथे येऊन बडवीन, त्या अश्विनला पण पहाते “

“पण अश्विन तुझा मित्र ना ताई?”

“मित्र नाटकाच्या ग्रुपमध्ये, वैयक्तिक आयुष्यात नाही, तो स्टेजवर कलाकार म्हणून चांगला आहे, तो शाळा कॉलेजमध्ये जाऊन नाटकें बसवतो म्हणून तुम्ही मुली त्याच्या प्रेमात पडता, पण वैयक्तिक आयुष्यात अश्विन कसा आहे तो माझ्याएवढा कुणाला माहित नाही. म्हणून परत परत सांगते मिता, तू अश्विनचा नाद सोड. आई तिला सांग, एवढे मी बोलून सुद्धा तिचे प्रेमाचे चाळे सुरु राहिले, तर माझ्याएवढी वाईट कुणी नाही “

मिता रागारागाने आपल्या खोलीत गेली आणि कॉटवर झोपून रडू लागली.

डोकं गरम झालेलीं वंदना बाहेर पडली, तिने आपली स्कुटी चालू केली आणि कॉलेजला जायच्याऐवजी ती अश्विनच्या घरी पोहोचली. अश्विनची आई स्वयंपाक घरात भाजी चिरत होती. तिला पहाताच ती म्हणाली,

“वंदे, किती दिवसांनी वाट मिळाली? नवीन नाटकाच्या तालमी सुरु होणार की काय?”

“नाही हो काकू, सहज आलेले. अश्विन कुठे गेला?”

“झोपलाय.?”

“झोपलाय? “ वंदनाने घड्याळात पाहिले. साडेनऊ वाजले होते.

“अजून झोपलाय?”

“काय सांगायचं वंदे, रात्री उशिरा येतो बाराला आणि दहापर्यत झोपून असतो, त्याच्यासाठी नोकरी बघ कुठेतरी, घरखर्च कसा चालवायचा? थोडं  भाडं  येत त्याचावर संसार “.

“मग प्रेम करायला कस जमत? नोकरी नाही, दोन पैसे कमवत नाही, पण वर्षाला एक पोरगी पटवायला जमते कशी?”

“आता बाई नवीन कोण? माझ्या भावाची मुलगी रेश्मा तिच्याबरोबर लग्न करायचं म्हणत होता, मग काय झालं कोण जाणे, आता तीच नाव काढत नाही “

“आता माझ्या धाकट्या बहिणीबरोबर मिताबरोबर प्रेमाचे चाळे सुरु आहेत म्हणे, पण त्याला सांग, गाठ माझ्याशी आहे, हातपाय मोडून ठेवीन “

तेवढ्यात खोलीतून झोपलेला अश्विन बाहेर आला. तिला पहाताच चपापला, मग म्हणाला “वंदे, सकाळी सकाळी?”

वंदना एक शब्द पण बोलली नाही. पण अश्विनची आई त्याला म्हणाली,”वंदी चिडली आहे, तू म्हणे तिच्या बहिणीबरोबर सध्या फिरतो आहेस?”

“हो हो.. म्हणजे हो.. प्रेम करायला आणि संसार करायला कुणाची बंदी आहे की काय..”

“प्रेम नंतर कर रे, आधी दोन पैसे कमव, तुझ्या आईला दोन पैसे आणून दे, नुसत्या सिगरेटी ओढून आणि बिअर पिऊन संसार होतं नाही “

“आमच्यात तू पडू नकोस वंदे, मिताची ताई असलीस म्हणून काय झाल.?”.

“मिताची ताई असलीस तर काय झाल? मोडून ठेवीन अश्विन. तो नारायण माहित असेल तुला आपल्या ग्रुपमधला, माझ्यावर लाईन मारू पहात होता, मला जाता येता धक्के मारू लागला, त्याचा हात आणि पाय मोडून ठेवला सर्वासमोर. माझ्यासमोर हुशारी करू नकोस, दरवर्षी नवीन नवीन मुली फिरवतोस चांगल्या घरातल्या. या मूर्ख मुली, डोळयांवर पट्ट्या बांधतात की काय कोण जाणे. स्टेजवरचा हिरो स्वतःच्या आयुष्यात झीरो असतो, हे यांना कळतच नाही.

– क्रमशः भाग पहिला 

© श्री प्रदीप केळुसकर

मोबा. ९४२२३८१२९९ / ९३०७५२११५२

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments