डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ क्लेप्टोमॅनिया — भाग-१ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
सुरुचीला आई रागावत होती ,अग सुरुची,हे काय आणलं आहेस खिशातून घरी? कोणाची बाहुली आहे ही? सुरुची गप्प उभी होती. “ ममा, रागावू नकोस ना ग.. मला ही खूप आवडली.. शेजारच्या माहीची आहे ही. मला खूप खूप आवडली ग पण मी चोरी नाही केली.” हे बघ सुरुची,तू चोरी नाही ना केलीस? मग आता माहीच्या घरी जा आणि तिला म्हण,सॉरी माही! ही तुझी बाहुली .मी चोरली नाहीये पण मला खूप घ्यावीशी वाटली. घे ही परत. मला माफ कर.. सुरुची,हे तू तिच्या घरी जाऊन तिला म्हणालीस तरच मी तुला माफ करीन.” सुरुची तशीच उभी राहिली. आपली आई आपल्याला घरात घेणार नाही हे तिला चांगलंच माहीत होतं..
हळूहळू चालत सुरुची माहीच्या घरी गेली. “माही,ही घे तुझी बाहुली..मला खूप आवडली म्हणून मी खेळायला घरी नेली ग, पण मी चोरली नाही.” माहीने सुरुचीचे भरून आलेले डोळे पुसले. “सुरुची, मला माहीत आहे ग,तुला ही बाहुली खूप आवडली होती,पण अशी न विचारता न्यायची नाही हं. मी दिली असती तुला खेळायला. आपण सख्ख्या मैत्रिणी ना? असं कोणालाही न विचारता वस्तू नेणं बरोबर नाही सुरुची.” गंभीरपणे माही सांगत होती. सगळं विसरून दोघी पुन्हा खेळायला लागल्या.. तो प्रसंग सुरुची , तिची आई विसरून गेल्या.
सुरुची खूप हुशार, गुणी मुलगी. आईवडिलांची एकुलती एक मुलगी. खूप प्रयत्न करूनही सुरुचीच्या आईला सुरुचीनंतर दुसरं मूल झालंच नाही. सुरुची त्यांची अत्यंत लाडकी.
सुरुचीला अत्यंत विख्यात शाळेत प्रवेश मिळाला आणि माही आणि सुरुची एकाच स्कूल बसने शाळेत जाऊ लागल्या. हळूहळू बस मधून मुलांच्या तक्रारी येऊ लागल्या. आज मिहिरची कंपास बॉक्स गेली उद्या शिरीषचे पेन सापडत नाही.. ह्या तक्रारी शाळेत प्रिंसिपल कडे गेल्या. माहीने सुरुचीला विचारलं,”सुरुची,या मुलांच्या अशा तक्रारी आल्या आहेत. मला खरं सांग,हे सगळं तू तर नाही ना घेतलंस?” सुरूचीने आपलं दप्तर माही समोर पालथं केलं. या सर्व वस्तू इकडे तिकडे विखुरल्या. शिरीषचं पेन,मिहिरची कंपास बॉक्स सगळं दिसलं माहीला. सुरुची स्तंभित होऊन उभी होती.हे आपणच केलं आणि कसं आणि कधी,हे तिला समजेचना. ”माही,मी मुद्दाम नाही ग हे करत. पण मला एखादी गोष्ट हवीशी वाटली की ती घेण्याची तीव्र इच्छा मला होते. मग ती घेतल्याशिवाय मला चैनच पडत नाही.. मी ती घेते आणि मग दुसऱ्याच क्षणी मला ती नकोशीही होते. मग मला आठवत पण नाही,की मी हे कधी केलं आणि का केलं”.
सुरुची हुंदके देऊन रडायला लागली. माही आणि तिची आई सुरुचीच्या घरी गेल्या.. सुरुचीचे आईवडील हे ऐकून स्तंभित झाले आणि ही गोष्ट वाटते इतकी साधी नाही हेही त्यांच्या लक्षात आले. दुसऱ्या दिवशीच सुरुचीला बाबांनी त्यांच्या फॅमिली डॉक्टरकडे नेले. डॉक्टर म्हणाले,हा क्लेप्टोमॅनिया नावाचा मानसिक आजार आहे. हा का होतो,याचे उत्तर नाही.. ही मुलं किंवा माणसं चोरी करण्याच्या हेतूने हे करतच नाहीत. ज्या क्षणी ते हे करतात त्याच क्षणी ते हे विसरून जातात आणि ती उर्मी नाहीशी होते. बरं हे लोक रोजही असं करत नाहीत. मला वाटतं, सुरुचीला क्लेप्टोमॅनिया असावा. मी माझ्या चांगल्या मित्राकडे ,जो सायकीएट्रिस्ट आहे त्याच्याकडे हिला न्यायचा सल्ला देईन. “ दरम्यान तुम्ही प्रिंसिपलनाही भेटा. त्यांना सत्य परिस्थिती सांगा. या लहान मुलीवर याचा विपरीत परिणाम होता कामा नये. एरवी किती हुशार मुलगी आहे ही! तुम्हीच सांगितलंत ना,शाळेत ही सतत पहिली असते म्हणून?” डॉक्टरांनाही या निरागस मुलीबद्दल वाईट वाटले. बाबा प्रिंसिपलना भेटले . त्यांनी शांतपणे सगळं ऐकून घेतलं आणि सांगितलं, “मिस्टर मोघे, काळजी करू नका. ही गोष्ट तुमच्या माझ्यातच राहील. वस्तू गेलेल्या माझ्या ऑफिसमध्ये तुम्ही आणून देत जा आणि आम्ही त्या ज्याच्या त्याला परत करू. यात कुठेही सुरुचीचे नाव येणार नाही याची काळजी आपण घेऊ.”. बाबांकडचे मनोविकार तज्ञांचे रिपोर्ट्स बघत प्रिंसिपल बाबांशी बोलत होते. त्यांनाही या मुलीबद्दल वाईट वाटलं. कधीतरी मुलांच्या तक्रारी येत . कधी किरकोळ गोष्टी नाहीशा होत पण त्या सापडत देखील दुसऱ्याच दिवशी.. ही गोष्ट फक्त माहीलाच माहीत होती. माही आणि सुरुचीची मैत्री इतकी घट्ट हाती की शाळा संपेपर्यंत ही गुप्त गोष्ट कोणाला समजली नाही आणि सुरुचीचे शाळेतले स्टार स्टुडन्ट हे स्थानही अबाधित राहिलं.
मुली मोठ्या झाल्या.. कॉलेज मध्ये जाऊ लागल्या. सुरुचीच्या ग्रेडस् अत्यंत उत्तम होत्या. माहीसुद्धा अतिशय जिनिअस होती. दोघींची मेडिकलला जाण्याची तीव्र इच्छा होती. सुरुची माही ला म्हणाली,”माही, मी नियमाने सगळी औषधे घेते, पण मला माझ्या वस्तू घेण्याच्या जबर उर्मीवर मात करता येत नाही ग. मी चांगली डॉक्टर कशी होऊ शकेन ग माही?”
सुरुचीच्या आणि माहीच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. ”का नाही होणार तू चांगली डॉक्टर सुरुची? मी कायम तुझ्याबरोबर आहे आणि असेन. हा आजार हा तुझा दोष नाहीये ..तरी हे बरंच कंट्रोल मध्ये तू आणलं आहेसच. ध्यान, प्राणायाम साधना योग करून.. होईल सगळं मस्त ग.” त्या वर्षी दोघीनी जीव तोडून अभ्यास केला. . परीक्षा संपल्या आणि दोघीनी जरा चार दिवस कुठेतरी विश्रांतीला जायचं ठरवलं.
माहीच्या मावशीचं पानशेत जवळ मस्त फार्म हाऊस होतं तिकडे ती आग्रहाने बोलावत होती.. सुरुचीच्या आईनं माहीला सांगितलं,”माही,तू आहेस म्हणूनच मी सुची ला पाठवते आहे ग. नाहीतर काय होईल ?” काकू नका काळजी करू. मी सतत आहे सुरुची जवळ लक्ष ठेवून.. हसत हसत म्हणाली,” ही माझी लिपस्टिक तेवढी नेते हं. कालच सुरूचीने नेली होती..तिनेच सांगितलं मला..” पण हल्ली हे खूप खूप कमी झालंय काकू सुरुचीचे ..खूप महिन्यांनी हे होतं कधीतरी आणि ते सुरुचीच्या लक्षात आलं की ती माझ्याजवळ आणून देते. किती हो गुणी मुलगी आहे सुरुची. देवाने हा असला दुर्मिळ आजार या सोन्या सारख्या मुलीला का द्यावा?” माहीच्या डोळ्यात पाणी आलं..
— क्रमशः भाग पहिला
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈