प्रा. विजय काकडे

? जीवनरंग ❤️

☆ शीरखुर्मा… – भाग – १ ☆ प्रा. विजय काकडे 

शीरखुर्मा  हे एक वर्षातून एकदाच मिळणारे दुर्मिळ असे पक्वान ! रमजान ईदच्या दिवशी मुस्लिम बांधवांच्या घरी मोठा उत्सव असतो त्यांच्या आनंदाला त्यादिवशी उधान असते. त्यादिवशी मुस्लिम बांधव आपल्या सर्व नातेवाईकांना,शेजाऱ्यांना, प्रतिष्ठित, निमंत्रित, मित्रपरिवार, जमातवाले इत्यादी सर्वांना अतिशय प्रेमाने आणि आग्रहाने आपल्या घरी बोलावतात आणि शीरखुर्मा खाऊ घालतात.

त्यादिवशी शीरखुर्मा हे जगातले सगळ्यात मोठे पक्वान असते. ती केवळ एक शिरखुर्माची वाटी नसते… तर ती वाटी असते बंधुत्वाची…! ती वाटी असते समतेचे प्रतीक…! एवढेच नव्हेतर ते असते समाजा समाजातील माणसांच्या प्रेमाचे अलोट प्रतिक…!   म्हणूनच तर गावातील कुठल्याही जातीचा माणूस असो तो वर्षातून एकदा आपल्याला शीरखुर्मा खायला मिळणार याची वाट पाहत असतो आणि तो खायला मिळाल्यावर स्वतःला भाग्यवान समजत असतो.

तसे पाहिले तर शीरखुर्मा म्हणजे  एक शेवयांची खीर असते जी मुस्लिमेत्तर लोकांच्या घरी सुद्धा खूप छान पद्धतीने बनवता येते. त्यामध्ये सुद्धा दूध, केशर आणि महागातले ड्रायफ्रूट्स घातलेले असतात. तरीपण त्याला शीरखुर्माची गोडी येत नाही कारण शिरखुर्म्यात मुस्लिम बांधवांचे प्रेम असते… त्याचा गोडवा खिरीमध्ये मिसळलेला असतो.तर त्याची सर दुसऱ्या कशाला कशी येईल?

खूप वर्षापूर्वीची माझ्या बालपणीची एक गोष्ट आहे. त्यावेळी मी साधारणपणे 11ते 12 वर्षांचा असेन. तो एक रमजान इदचा दिवस होता.  सकाळचे नऊ साडेनऊ वाजले होते. आम्ही आंघोळ करून चावडीपुढे खेळत असताना पोपटदादा अचानक तिथे आला. तो खूपच खुशीत दिसत होता. दररोज याच वेळी तो अर्धी पावशेर घेऊन टाईट असायचा. त्यामुळे त्याच्याकडे कोणी फारसे लक्ष देत नसे. कोणाची तरी दारू पिऊन दुसऱ्याच कोणालातरी शिवीगाळ करणे,  कोणाबरोबर तरी भांडण करणे हे त्याचे रोजचे ठरलेले असे परंतु त्यादिवशी मात्र तो एकदम खडकमध्ये होता. विशेष म्हणजे तो आपल्या दोन्ही पायावर सरळ उभा होता…!

आपल्या ओठावरून जीभ फिरवत आमच्याकडे बघून तो म्हणतो कसा, ”  पोराहो, जावा… शीरखुर्मा पिऊन या, मी आत्ताच चार वाट्या शीरखुर्मा पिऊन आलो. ” एवढे बोलून त्याने एक जोरकास ढेकर दिला.

आम्ही त्याला विचारलं, ” दादा शीरखुर्मा म्हणजे काय असतं?”

“अरे येड्यांनो, आज  ईद आहे ना? त्यामुळं मुसलमानांच्या घरी प्रसाद म्हणून सगळ्यांना शीरखुर्मा देत्यात.”

तुम्हाला मोठ्या माणसांना देत असत्याला आम्हाला बाराक्या पोरांना कोण देणार?मी विचारले.

“अरे पोरांनो, ते लहानांना,थोरांना सगळ्यांनाच देत्यात जावा तुम्हाला बी देत्याल, आजच्या दिवशी कोण न्हाय म्हणणार न्हाय. ” 

 “पण,कुणाच्या घरी जायचं आम्ही? ”  मी विचारलं. 

“अरे, कोणाच्या बी घरी जायचं… समशेर,ताया, रमजानभाई, बरकतभाई जाफरभाई,मुन्नाभाई नाहीतर आपला बाळूभाई आहेच की..! त्याच्या घरी जा. सगळी आपलीच हाईत.

पोपटदादांनी आम्हाला अगदी सविस्तर माहितीदेवून आम्हाला शीरखुर्मा खायला जाण्यासाठी प्रोत्साहीत केले.

मग मी हळूच म्हटलं,” आम्हाला सोडा की कुणाच्यातरी घरी, तुमच्या वशिल्याने.”

“अरे,त्याला वशिला कशाला लागतोय?कोणीबी जातय कोणाच्याबी घरी आज सण आहे त्यांचा कोणी कोणाला नाही म्हणत नाही.जावा, पळा लवकर… “

“आईला ‘लईच भारी झालं की! मग जाऊ का मी समदीच ?%

” अरे जावा जावा लवकर नाहीतर सगळा शीरखुर्मा संपून जाईल… “

संपून जाईल म्हटल्याबरोबर आम्ही सणाट पळालो…

सगळेजण वाडा ओलांडून मशिदीकडे गेलो. तिथे माशिदीवर भलमोठ्ठा स्पीकर लावला होता.  स्पीकरवर बहारदार  कव्वाली ऐकायला येत होती.

सगळे मुस्लिम बांधव नवनवीन कपडे घालून डोक्यावर अर्ध चंद्राकर टोप्या घालून आनंदाने इकडून तिकडे धावत होते. समोर आल्यावर एकमेकांच्या गळाभेटी करत होते. त्यांच्या भाषेत एकमेकांना काहीतरी म्हणत होते. सगळेजण आपापल्या घराच्या विरुद्ध दिशेला जात होते. ते एकमेकांकडे शीरखुर्मा खायला जात होते असा त्याचा अर्थ होता. आम्ही ते सगळे लांबून पाहत होतो. तर गावातले बरेच लोक सुद्धा मुसलमानाच्या वाड्यातून अगदी मिटक्या मारत बाहेर येत होते. शीरखुर्मा खाऊन आलो म्हणजे गावात आपला किती वट आहे, आपली किती पथ आहे, मुसलमान लोक आपल्याला किती मानतात.हे प्रत्येकाच्याच देहबोलीतून जाणवत होते.

आमच्यातले दोघेजण समशेर भाईच्या वाड्याकडे गेले. दोघे आताराच्या घराकडे गेले. बरकत भाईच्या घराकडे मी आणि भूषण वळलो. बरकत भाईंचे घर खूप मोठे होते. इकडे गावी त्यांचा मटणाचा धंदा होता. घरातल्या महिलांचा बांगड्याचा धंदा होता. त्यामुळे घरात चांगलीच बरकत होती. परंतु त्या घरी माणसांची खूपच गर्दी असल्यामुळे आम्हाला आत जाण्याची डेरिंग होत नव्हती.

पांढराशुभ्र कुर्ता पायजमा घातलेले मोठमोठाले, दाढीवाले लोक,पान खाऊन लालसर तोंड झालेले ते मोठे लोक पाहिल्यावर आम्ही त्यांच्या दारातूनच काढता पाय घेतला.

बरकत भाईच्या शेजारीच एका मिलिटरीमनचे घर होते पण तिथे भाभी  घरी एकटीच होती. लहान पोरं कुठेतरी खेळायला गेली होती.  आम्ही तिच्या घरात डोकावल्यासारखं केलं तर आतून आवाज आला, ” कोण पाहिजे रे इनको? किसके लडके है तुम?” भाभींचा  असा आवाज कानावर पडताच आम्ही तिथून कलटी मारली अन थेट मशिदीच्या मागे उभे येऊन उभे राहिलो… मनात विचार केला आज काय आपल्याला शीरखुर्मा मिळत न्हाय. पण शीरखुर्मा न खाता घरी परत जायचं तरी कसं? मन माघर घ्यायला तयार होत नव्हते. मग मी भूषणला म्हटलं, ” काय होईल ते होईल आपण आता माघार घ्यायची नाही. ” भूषणही म्हणाला होय चाललं. ” शिरखुर्मा खाल्ल्याशिवाय आज घरी जायचं नाही. असा आम्ही चंगच बांधला होता. तेवढ्यात समोरून रामूसवाड्यातून आमचा नाना आला. तो स्वभावाला एकदम भारी आणि दिलदार माणूस होता. त्याच्याजवळ पैसे असल्यावर कोणी काही मागावं तो कोणाला नाही म्हणायचा नाही. प्रेमाच्या माणसावर तर तो  पैशांची उधळण अगदी मुक्तपणे करीत असे परंतू त्याचा एक वीक पॉइंट होता तो असा की तो अत्यंत स्वाभिमानी होता. त्याला कुणी कुणापुढे हात पसरलेलं आवडायचं नाही. आता आम्ही शीरखुर्मा पिण्यासाठी दारोदारी फिरतोय हे त्याला कधीच आवडलं नसतं. त्याला तसं कळलं तर तो आम्हाला फोकाने मारल्याशिवाय राहणार नाही. त्या भीतीनेच मग आमची गाळण उडाली! नानाला समोर पाहताच भूषण पळाला. मी ही त्याच्या मागे पळालो. बाकीचेही वाट दिसेल तिकडे पळाले.भूषण पुढे आणि मी मागे मशिदीला वेडा मारून रस्त्याने सरळ नळापर्यंत जाऊन नळापासून बोंदऱ्याच्या  बागेतून थेट धोंडीरामनानाच्या दुकानाला वळसा घालून गावात शिरलो…! पुढे भिमजी नानांच्या दुकानासमोरून तेली नानाच्या दारातून जाफर भाईंच्या दारात आलो.

जाफरभाई आपला गरीब मनुष्य होता.टेलरिंग काम करायचा. तो एक साधा टेलर होता. त्याच्याकडे नवीन कपडे कमी पण जुनेच कपडे जास्त शिवायला यायचे. तो आणि त्याची बहीण कसेबसे दिवस काढत होते. त्याची ती परिस्थिती आम्हाला माहीत असल्यामुळे त्यांच्या घरी शीरखुर्मा खाण्यासाठी जाताना मला वाईट वाटायला लागले.त्यामुळे आम्ही ते टाळले. त्याच्या पुढचं घर माझा वर्गमित्र असलेल्या फरीदचं होतं म्हणजे ते बंदच असायचं कारण ते सगळे लोक मुंबईला असायचे. फक्त झेंड्याला म्हणजे यात्रेला सगळे गावात यायचे.

फरीदचे घर ओलांडून आम्ही पुढे आलो पुन्हा त्या भाभीच्या दारात आलो जिने मघाशीच आम्हाला हाकललं होतं. आता त्यापुढे एकच घर होतं ते म्हणजे बाळू भाईचं. तेवढा एकच पर्याय आता आमच्याकडे होता. बाळूभाई सुद्धा अत्यंत गरीब मनुष्य होता.  त्याला चार मुली आणि दोन मुलगे होते. त्यांचा सायकल दुरुस्तीचा व्यवसाय असल्याने संसार कसाबसा तरी चालत होता. आम्हाला तर आता कशाचाच विचार करून चालणार नव्हतं कारण ते आमच्या दृष्टीने शेवटचं घर होतं.

– क्रमशः भाग पहिला 

© प्रा. विजय काकडे

बारामती. 

मो. 9657262229

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments