श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ “माऊली घरी आल्या !” ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
मुंबईहून मागवलेले कापडाचे तागे भरून आलेली बैलगाडी मनोहरपंतांच्या वाड्यासमोर उभी राहिली. संध्याकाळची सात-साडेसातची वेळ होती. मनोहरपंत हरिपाठात मग्न होते. त्यांनी खुणेनेच गाडीवानाला “पार्सल आतल्या खोलीत ठेवून जा…उद्या बाजारात आल्यावर गाडीभाडं अदा करतो” असं सांगितलं. गाडीवानानं ती पाच सहा पोती,एक लाकडी खोकं अलगद आत आणून खोलीत ठेवलं आणि तो मनोहरपंतांना नमस्कार करून निघून गेला. त्याचे मनोहरपंत हे नेहमीचे ग्राहक,त्यामुळे गाडीभाड्याची चिंता त्याला नव्हती!
पोटापाण्यासाठी मनोहरपंतांचा पिढीजात वस्त्रालंकार शिवून देण्याचा व्यवसाय होता. मात्र व्यवसाय आता केवळ नावालाच करीत असत. त्यांचे वडील विष्णुपंत हे पंचक्रोशीत नेमाचे वारकरी म्हणून प्रसिद्ध होते. त्यामुळे मनोहरपंतही जन्मापासून माळकरी झाले होते. थोरला चिरंजीव लवकरच कमावता झाल्याने त्यांच्यावरील प्रपंचाचा भार नाही म्हटलं तरी काहीसा कमीच झाला होता. त्यामुळे ते आपला बहुतांशी वेळ देवाधर्माच्या कार्याला देत असत.
त्यांच्या शहरातल्या अतिशय प्रसिद्ध गणपती मंदिरातल्या मूर्ती,हत्ती आणि पालखीसाठी आवश्यक अशा मखमली वस्त्रांची निर्मिती करावी ती मनोहरपंतांनीच. देवाचं काम म्हणून तर मनोहरपंत अतिशय मन लावून काम करीत. एरव्ही अगदी पहाटेपासून सुरू झालेलं देवदर्शन दिवस अगदी वर येईस्तोवर सुरूच असे. खाकी अर्धी विजार,अनेकानेक खिसे असलेली पांढरी कोपरी, पायात साध्याशा वहाणा,डोक्यावर पांढरी टोपी असा त्यांचा पोशाख. चालणे अतिशय निवांत. बोलणे मऊ. आयुष्यात कुणाशी तंटा,वाद,भांडण असा विषयच नव्हता.
कापडाचे तागे उद्या सकाळी उघडून पाहू, असा विचार करून मनोहरपंत जेवण आटोपून झोपी गेले. नित्यनेमाने पहाटे उठून देवदर्शन आटोपून आले. आल्यावर सामानाच्या खोलीत गेले. देवांसाठी विशेष दर्जाचं कापड मागवलं होतं. गणेशोत्सव तोंडावर आला होता. देवांना सजवायला हवं.
कापडाच्या पार्सलशेजारी ठेवलेल्या लाकडी खोक्यावर त्यांची नजर पडली. कापड लाकडी खोक्यात पाठवायचे कारण काय मुंबईच्या दुकानदाराला? असा त्यांना प्रश्न पडणं साहजिकच होतं. पण खोक्यावर नाव-निशाणी तर काहीच नव्हती. स्क्रू ड्रायवरने त्यांनी ते लाकडी पार्सल उघडलं…..माउली! माउली! मनोहरपंत काहीशा मोठ्या आवाजात उद्गारले! खोक्यात छान रेशमी कापडाने झाकलेली मूर्ती होती..पद्मासन घातलेल्या अवस्थेतील…..ज्ञानोबा माऊलींची! बोलके डोळे,प्रमाणबद्ध शरीर,गळ्यात तुलसीमाला…साक्षात कैवल्य साम्राज्य चक्रवर्ती माऊली ज्ञानोबाराय घरी आलेले होते! मनोहरपंत काही क्षण भांबावलेल्या अवस्थेत उभे होते…हात जोडायचे भानही त्यांना राहिले नव्हते !
आपण तर कधी कुठलीही मूर्ती मागवली नव्हती. कुणी पाठवलं असेल पार्सल? तोवर सारं घर आणि शेजारची माणसं गोळा झालेली होती. चुकून आपल्या पत्त्यावर आलेले असेल पार्सल असे मनोहरपंत मनात म्हणाले. पण माऊलींना असंच कसं ठेवायचं म्हणून त्यांनी अलगद ती मूर्ती उचलली आणि पुंडलिकवरदा हरिविठ्ठलच्या गजरात देवघरात नेऊन ठेवली! त्या दिवशी दसरा आणि दिवाळी असे दोन सण एकमेकांच्या हातांत हात घालून घरात अवतरले होते!
मूर्ती ज्याची असेल त्याची त्याला देऊन टाकू असा त्यांचा विचार झाला. त्याकाळी मुंबईत संपर्क साधायचा म्हणजे एकतर पत्र धाडणे किंवा स्वत: जाऊन धडकणे हाच पर्याय असायचा. मनोहरपंत पेठेत गेले. गाडीवानाला विचारताच तो म्हणाला “पार्सल आलं तुमच्या मालासोबत म्हणून तुमच्या घरी टाकलं. आता कुणी पाठवलं,कधी पाठवलं हे काही मला सांगता यायचं नाही!”
एका मोठ्या पेढीतून मनोहरपंतांनी मुंबईच्या व्यापा-याला फोन लावला. त्यालाही या पार्सलविषयी काही खबर नव्हती. तो दिवस निघून गेला. माऊली आता नव्या घरात स्थिरावल्या होत्या. मनोहरपंतांनी त्यांच्यासाठी खास मखमली वस्त्रं शिवली. गावातल्या विठ्ठल मंदिरात होणारं ज्ञानेश्वरी पारायण आता मनोहरपंतांच्या घराच्या ओसरीत सुरु झालं…अशी एक दोन नव्हेत…दहा बारा वर्षे निघून गेली…वर्षातून किमान दोन तरी पारायणे होत असत या मूर्तीसमोर. माऊलींवर हक्क सांगायला कुणीही आलं नाही. मात्र ज्याने कुणी मोठ्या प्रेमाने ही मूर्ती घडवून घेतली असेल, त्या भक्ताविषयी मनोहरपंतांना कळवळा वाटत असे! पण आता तो भक्त खरंच आला आणि त्याने माऊलीवर हक्क सांगितला तर…? पंत आतून हलून जात असत. मातीची मूर्ती ती..पण हृदयात मोठी जागा पटकावून बसली होती. आता मूर्तीचा उल्लेख मूर्ती असा न होता केवळ ‘माऊली’ असाच होऊ लागला होता…जणू संजीवन वास्तव्य नांदत होतं घरात. भोळ्या माणसांच्या मनात अशी खूप विस्तीर्ण पटांगणे असतात…कितीही दिंड्या उतरू द्यात!
दरवर्षीच्या आषाढीला पंत माऊलीसोबत वाटचाल करू लागले! ते अगदी त्यांच्या शेवटच्या वारीपर्यंत!
त्यावर्षी दिंडी गावात परतली. परतवारी करून आल्यावर जसं आळंदीत माऊलींचं स्वागत होतं..तसंच गावात स्वागत होई!
त्या रात्रीचं कीर्तन मोठं रंगतदार झालं. खास आळंदीहून मातब्बर कीर्तनकार बोलावले होते गावाने. जुन्या विठ्ठल मंदिराचा जीर्णोद्धार करायचं मनात होतं गावाच्या. यावर्षीच्या हरीनाम सप्ताहात वर्गणीही गोळा करायला प्रारंभ झाला होता. पंत माऊली नव्या मंदिरात स्थापन करायला परवानगी देतील का? असाही विचार काहींच्या मनात असावा. माऊली…माऊली जयघोषात कीर्तन संपलं आणि लोक घरी जायला निघाले. पंत नेहमीच मंदिराच्या दगडी खांबाला टेकून बसून कीर्तन ऐकत असत. बहुदा डोळे मिटलेले असत. मंदिर रिकामं झालं तरी पंत डोळे मिटूनच बसलेले होते. काही वेळाने कुणीतरी त्यांना हात लावून हाक मारली…तर प्रतिसाद शून्य! झोप लागून गेली असेल..लोकांना वाटलं. जोरात हलवलं तर पंत एका कुशीवर कलंडले! अकालीच असले तरी पंतांना मरण तर मोठे भाग्याचे आले, हरिनामाच्या चिंतनात आले!
पंत गेल्यानंतर माऊलींचे काय होणार अशी चिंता करावी लागली नाही. मनोहरपंत यांच्या घरातील मुक्काम आवरता घेऊन माऊली आता नव्या घरात आल्या आहेत…तेच सौंदर्य,तेच पावित्र्य,तेच डोळे आणि त्यातील मार्दव!
पन्नास वर्षे उलटून गेलीत….अजून कुणी माऊली मागायला आलेलं नाही…आणि आता कुणी आलं तरी स्वत: माऊलीच इथून प्रस्थान करणार नाहीत !
“ठायीच बैसोनी करा एक चित्त.. आवडी अनंत आळवावा ! “ असं सांगत माऊली विराजमान आहेत! रामकृष्णहरि!
(सत्यघटनेवर आधारित)
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈