श्री संभाजी बबन गायके
जीवनरंग
☆ ‘पुनर्मृत्यू…‘ – भाग – १ ☆ श्री संभाजी बबन गायके ☆
एक सैनिक पुनः एकदा मरताना !
(सियाचीनमध्ये शौर्य गाजवल्याबद्दल सैन्यदलातील वैद्यकीय अधिकारी कॅप्टन अंशुमान सिंग यांना मरणोत्तर कीर्ती चक्र प्रदान करण्यात आले. हे कीर्ती चक्र त्यांची पत्नी श्रीमती स्मृती यांनी अंशुमानसाहेबांच्या आईना सोबत घेऊन जात स्वीकारले. त्यानंतर अंशुमान साहेबांच्या पालकांनी सोशल मिडीयामध्ये काही वक्तव्ये केली. त्यावरून श्रीमती स्मृती सिंग यांच्याविरोधात खूप वाईट बोलले,लिहिले गेले. याबद्दल खुद्द अंशुमान साहेबांना काय वाटले असते याची कल्पना करून हा लेख त्यांच्याच भूमिकेत जाऊन लिहिण्याचा प्रयत्न केला आहे. सकारात्मक विचार आणि कृती व्हावी,ही अपेक्षा.)
नमस्कार,
मी अंशुमान…कॅप्टन डॉक्टर अंशुमान सिंग..स्मृती अंशुमान सिंग या नावा मधला अंशुमान! काही ठिकाणी अंशुमन असाही उच्चार करतात. या नावाचा अर्थ ‘दीर्घायु असतो’ असा तो! नावाचा आणि प्रत्यक्ष जीवनाचा आणि किंबहुना मरणाचा संबंध असणे केवळ योगायोग! हा योग मला काही साधला नाही!
हे जग सोडून गेल्यावर याच जगात पुन्हा येता येतं…त्याला पुनर्जन्म म्हणतात,असे ऐकलं होतं जिवंत असताना. पण एकदा मरुनही पुन्हा मरता येतं का हो…पुनरपि जननं असे न होता? एकवेळ मेल्यावर पुन्हा त्याच देहात परतणे शक्य असेल पण एकदा पूर्णत: मृत्यू पावल्यानंतर,देहाची दोन मुठी राख झाल्यानंतर पुन्हा एकदा मरणं?..अकल्पनीय..अशक्य!…पण मी हे मरण गेल्या काही दिवसांपासून रोज मरतो आहे!
सेनेचा गणवेश परिधान केल्या क्षणापासून मरण आणि सैनिक यांचा दोस्ताना आरंभ होत असतो. मी काही रायफल हाती घेऊन लढणारा सैनिक नव्हतो. माझं काम होतं जखमी झालेल्या,आजारी झालेल्या सैनिकांवर जीवरक्षण उपचार करणं. हे काम मी एखाद्या सुरक्षित जागी शहरात करत असलो असतो तर मरणाचा विषयच आला नसता मनात. पण सेनेला माझ्या कौशल्याची गरज पडली ती आभाळाला टेकू पाहणा-या बर्फाळ शिखरांवर. येथे राहणा-या प्रत्येकावर काळाची नजर असतेच..असते! प्राणवायू आणि तिथल्या हवेचं फारसं सख्य नाही. तापमान मोजणा-या यंत्राच्या नावातच केवळ ‘ताप’ अर्थात उष्णता दिसते. या यंत्रावरील पारा नावाच्या पदार्थाने ब्रम्हकमल पाहिल्यासारखा सूर्य सठी-समाशीच पाहिलेला असतो. पण आपल्या सैनिकांना तिथे जागता पहारा द्यावाच लागतो…पलीकडे लबाड शेजारी आहेत…कधीही आपल्या सीमा ओलांडून येऊ शकतात! २९,पंजाब बटालियनमध्ये सियाचीन मध्ये माझी आर्मी मेडिकल कोअर मधून डॉक्टर म्हणून नेमणूक झाली होती. आणि मी कॅप्टन होतो.
आता तर सर्व जगाला माहित झाली आहे…माझे आणि स्मृती यांची प्रेमकहाणी. स्मृतीला माझी नोकरी,त्यातील धोके चांगलेच माहीत होते…तसे ते प्रत्येक सैनिक पत्नीला,सैनिक मातेला माहीत असतातच. सैनिकाशी विवाह म्हणजे वैधव्याची कु-हाड सतत डोक्यावर टांगती असल्याची सवय करून घेणे,मुलाला सैन्यात धाडणे म्हणजे पुत्रविरहाचं दु:ख सोसण्याची तयारी ठेवणं! घरी आला तर माणूस आपला. माझे वडीलही सेनेत अधिकारी होते…माझ्या आईनेही हा ताण सोसला आहे. घरातील आम्हां सर्वांना सारे काही माहीत होते…काहीही होऊ शकते! मात्र सर्वांच्या मनात एकच होते…जवानांचे प्राण वाचवणा-या डॉक्टरांना कसे काय काही होऊ शकेल? आणि सियाचीन सारख्या धोकादायक सीमेवर एका सैनिकाला किती दिवस ठेवायचं हे ठरलेलं असतं. तिथला माझाही कार्यकाळ तसा संपत आला होता. त्याच जोरावर स्मृती आणि मी काही स्वप्नं बघण्याचे धाडस केले होते…..आठ वर्षांच्या मैत्रीनंतर लग्नगाठ तर बांधली होतीच…घर,मुलं…आई-वडिलांसह एकत्र कुटुंबात रमणं…अगदी आवाक्यात होती ही दिवसा पाहिलेली स्वप्नं! पण त्या रात्री या स्वप्नातून जीवघेणी जाग आली आणि मी डोळे मिटले!
मी जिवंत असताना कुणा-कुणाचा होतो? आणि आता नेमका कोणाचा उरलो आहे? सेनेत जाण्यापूर्वी आई-बाबांचा लाडका अंशू होतो,धाकट्या भावाचा,बहिणीचा भैय्या होतो. सेनेत गेल्याबरोबर मी तसा पूर्णपणे देशाचा झालो होतो. लग्न झालं नव्हतं तोवर आई-बाबा नेक्स्ट ऑफ कीन होते. (kin म्हणजे रक्ताचा आणि सर्वात जवळचा नातलग) सेनेच्या नियमानुसार सेनादलातील कर्मचा-याचा त्याच्या रीतसर विवाहानंतर अधिकृत Next Of Kin म्हणून पत्नीचे नाव लागते. पत्नी हयात नसेल तर अपत्य. आणि असा नियम करण्यामागे काहीतरी निश्चित विचार झालेला असेलच.
हे सर्व सांगायचे म्हणजे माझे वडील तर सेवानिवृत्त सैन्य-अधिकारीच होते. त्यांना तर हे नियम माहीत होतेच. आणि लग्नानंतर नव्हे तर लग्नाआधी स्मृतीला मी हे सर्व समजावून सांगितले होते. पण तिला बिचारीला तिच्यावर ह्या सर्व बाबी हाताळायची वेळ येईल, असे स्वप्नातही वाटले नसेल!
मी मृत्यूच्या जबड्यात जात असताना मला आई-वडील,भाऊ-बहिण तर दिसलेच…पण जास्त ठळक दिसली ती स्मृती. आई-वडिलांची जिंदगी जागून झालेली होती निम्मी-अधिक. भाऊ स्वत:च्या पायांवर उभा होताच. बहिणीही सुखात होत्या. पण स्मृतीपुढे सर्व आयुष्य आ वासून उभं होतं!
पण माझी खात्री होती सेना माझ्या रक्ताच्या कुणालाच वा-यावर सोडणार नाही. तसेच माझ्याबाबतीतही झाले…लष्करी इतमामात देहावर आपला तिरंगा ध्वज पांघरून चितेपर्यंतचा प्रवास…वीराला साजेसा अंत्यसंस्कार,कुटुंबियांसाठी नियमानुसार आर्थिक नुकसान भरपाई आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे कीर्ती चक्र…शांतताकाळातील दुसरा सर्वोच्च सैन्य-सन्मान! सैनिक रणात जिंकला तर भूमीचा भोग आणि मरण पावला तर स्वर्ग लाभतो,असं म्हणतात!
मी स्वर्गाकडे प्रयाण करणार होतो तोच घरात काही विचार सुरु झाले होते बहुदा. त्या स्वर्गात जाण्याआधी घराचा नरक झालेला नको होता मला. माझा तेरावा विधी पार पडण्याआधी स्मृतीच्या आणि माझ्या घरच्यांनी स्मृतीचे पुढचे आयुष्य कसे असावे, याबद्दल योजना मांडायला सुरुवात केली. खरं तर एवढी घाई करायला नको होती! ओल्या जखमा…त्यावर खपली धरण्याची वाट पहायाला हवी होती..असं वाटून गेलं. भांबावून गेलेली होती स्मृती!
आपल्याकडे अजूनही स्त्री कुणाच्या ना कुणाच्यातरी मालकीची असते..इज्जत,अब्रू,अभिमान असते. स्मृती तिच्या वडिलांची लेक असण्यापेक्षा माझ्या वडिलांची सून जास्त होती आता. माझे वडील म्हणाले…तिच्यापुढे मोठे आयुष्य आहे…आपण ती म्हणेल त्याच्याशी तिचं लग्न लावून देऊ…दोन्ही घरे मिळून तिची पाठवणी करू वाजत-गाजत! आणि ती म्हणत असेल तर तिचं लग्न अंशुमानच्या धाकट्या भावाशी लावून देऊ…तिने लग्नच नाही करायचं आणि सासरीच रहायचं ठरवलं तर माझ्या धाकट्या मुलाला (त्याच्या लग्नानंतर अर्थात) जे अपत्य होईल ते जर मुलगा असेल तर त्याचं नाव अंशुमान ठेवू…त्या मुलाला स्मृतीला दत्तक देऊ आणि त्या मुलाचा बाप म्हणून अंशुमानचे नाव लावू! त्या मुलाच्या नावे सारी जायदाद करून ठेवू! ऐकायला विचित्र वाटलं ना? पण आपल्या देशात असा विचार केला जाणं काही नवं नाही! राजस्थान आणि पंजाब सारख्या राज्यांत विधवा वहिनीशी दिराने लग्न करणं सामान्य बाब आहे. असे शेकडो विवाह आजवर झालेले आहेत. यात त्या विधवेचे कल्याण किती आणि ती त्याच घरात राहिल्याने तिला मिळणा-या आर्थिक लाभांचा हिशेब किती हा संशोधनाचा विषय आहे. अर्थात असे व्यवहार सर्वसामान्य सैनिकांच्या विधवांच्या बाबतीत होण्याचे प्रमाण सर्वाधिक असते. कुणा अधिका-याच्या विधवेच्या बाबतीत असे सहसा होत नाही. कारण इथे आर्थिक बाजू तुलनेने बरी असते. शिवाय शिक्षणामुळे विचारांत पुढारलेपण असू शकते.
सेनेतली असली म्हणून काय झालं…शेवटी ती माणसेच असतात. समाजात असणा-या चालीरीती,परंपरा,स्वार्थ,मान-सन्मानाच्या कल्पना आणि सोयीस्करवाद यांनी ती बरबटलेली असतातच. अन्यथा वहिनी म्हणजे दुसरी आईच समजले जाते! हल्ली समाजमाध्यमांत दाखवल्या जाणा-या दीर आणि वहिनी यांच्यातील अनैतिक संबंधांच्या ख-या-खोट्या गोष्टी बाजूला ठेवूयात! राजस्थानात पूर्वी एक प्रथा होती….युद्धाला निघालेल्या पुत्राला आई स्तनपान करवीत असे…या दुधाची लाज राख…मरून ये पण हरून येऊ नकोस! अशी शपथ घालत असे. आई नसेल तर तिच्याजागी वहिनी स्तनपान करवीत असे…भाभी म्हणजे भावाची बायको…भाऊ वडिलांच्या ठिकाणी…अर्थात त्याची बायको दिराची आईच नव्हे का? असो.
अर्थात,मला आणि स्मृतीलाही या परंपरा माहित होत्या. पण हे धर्मसंकट आपल्यावर येऊन आदळेल अशी कल्पना सुद्धा केली नव्हती आम्ही कधी! अशावेळी स्मृतीने काय करावे? तिला त्यावेळी सर्वांत जवळचे कोण वाटले असेल….तिचा स्वत:चा हक्काचा माणूस म्हणजे मी जगात नसताना? पाच महिन्यांचे सासर की सव्वीस वर्षे सांभाळलेले माहेर! ती माहेरी गेली यात नवल ते काय?
– क्रमशः भाग पहिला
© श्री संभाजी बबन गायके
पुणे
9881298260
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈