श्री आनंदहरी
जीवनरंग
☆ ‘प्रश्न ???’ – ☆ श्री आनंदहरी ☆
ती अंथरुणावर खिळून होती त्याला चार-पाच महिन्याचा कालावधी लोटला होता. निमित्त झाले होते ते पाय घसरून पडण्याचे.. साठी ओलांडल्यावर सावधपणे वावरावे लागते हे तिलाही ठाऊक होतं. ती तशी वावरतही होती. तरीही पाय घसरून पडली आणि सक्तीची कंटाळवाणी विश्रांती घ्यावी लागली..
असे खिळून, बसून राहणे तिच्या स्वभावातच नव्हतं…पण आताशा तिला उठावं, काही करावं अशी इच्छाच राहिली नव्हती. तशी ती एकटीच राहत होती. मुलं मुलांच्या जागी, मुलगी तिच्या घरी होती. ती घरात एकटी होती पण तरीही कामाच्या रामरगाड्यात दिवस निघून जायचा. सायंकाळच्या वेळी प्रपंचातून निवृत्त झालेल्या गल्लीतील दोन -तीन सासवा पाय मोकळं करायला म्हणून आपापल्या घरातून बाहेर पडायच्या त्या तिच्या दारातल्या कट्ट्यावर येऊन विसावायच्या.. ती ही दारात कट्ट्यावर येऊन त्यांच्या सोबत विसावायची.. पाय मोकळे होताना मनंही मोकळी होऊन जायची. ती एक श्रोता म्हणूनच त्यात असायची. तिला कधी मोकळं व्हावंसं वाटलेच नाही. भरभरून बोलावे, मन मोकळे करावे हा तिचा स्वभावच नव्हता. काय बोलायचे आणि का बोलायचे ? वर्तमानकाळात काही बोलण्यासारखं नव्हतं आणि भूतकाळ ? भूतकाळातले बोलून काही उपयोग नव्हता.
उपयोग नव्हता म्हणजे खरंच काही उपयोग नव्हता. एकतर कितीही बोलले, सांगितले, कुणी ऐकले तरी भूतकाळ काही परतून येत नाही.. त्यामुळे बदलता येत नाही. आणि दुसरे म्हणजे ‘परदुःख शीतल’ न्यायाने तिची वेदना, तिची सल कुणाला उमजतच नाही.. तिला पडलेला प्रश्न हा विचार करण्याजोगा प्रश्न आहे असे पूर्वीही कुणाला, अगदी तिच्या आई-वडिलांनाही वाटलं नव्हतं.. मग इतरांना वाटण्याचा प्रश्नच उरत नव्हता.
“ काय वाईट आहे गं.. राहायला घर आहे, नोकरी आहे, पोटापुरती शेती आहे.. तू अशी सावळी तरीही गोरागोमटा, शिकलेला, राजबिंडा नवरा तुला मिळालाय.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं.. ? “
तिची आई तिचे लग्न ठरवताना आणि नंतरही कितीतरी दिवस हेच म्हणत होती.. नंतर त्यात एक दोन वाक्याची भर पडत गेली होती. तिच्या वडिलांनी तर केव्हापासून कान झाकून घेतले होते. त्यांनी ते उघडलेच नाहीत. तिला काय म्हणायचे आहे ते समजून घ्यायचे सोडाच पण साधे ऐकून घ्यायची तसदी कुणी घेतली नव्हती.. लग्नाचे ठरवण्याआधीपासून तिच्या बाबांनी जमदग्नीचा अवतार धारण केला होता.. त्यांच्यासमोर बोलण्याची कुणाची प्राज्ञा नव्हती.. कुणाचे धाडस होत नव्हतं.. त्यांच्याजवळ नसले तरी एकदा ती आईजवळ म्हणाली होती..
“ पण आई, मला खूप शिकायचंय…”
“ शिकायचंय.. शिकायचंय काय चाललंय गं तुझे.. शिकून तरी काय करणार आहेस ? आणि तुझं भलं बुरं आम्हांला कळत नाही ? आम्ही काय वैरी आहोत का तुझे ? … आणि हे बघ यांच्यासमोर एक शब्दही काढू नकोस यातला.. शिक्षणाचे नाव ही काढू नकोस.. आम्ही चार दिवस जगावं वाटत असलं तर गप्प बस.. ”
“ पण आई.. “
“ तुला गप्प बस म्हणून सांगितले ना एकदा.. “
चिडून आई म्हणाली.. ती गप्प झाली. ओठ घट्ट मिटून घेतले. पण मन ? मन तर स्वतःशी बोलतच होते.. या मनाचे ओठ कसे घट्ट मिटून घ्यायचे.. ? मनात विचारांचे वादळ थैमान घालत होते.. एखादे मरणासन्न जनावर दिसल्यावर त्याच्या मरणाची आणि त्याच्यावर झडप घालण्याची वाट बघत गिधाडे जशी आकाशात घिरट्या घालत राहतात तसा तिच्या मनात एकच प्रश्न घिरट्या घालत होता.. तिच्यावर झडप घालून चोच मारत होता.. तेंव्हापासून.. आयुष्यभर.
काळ पुढं सरकत राहिला.. मुलगा झाला..
आई म्हणाली,
“ भाग्यवान आहेस, घराण्याला कुलदीपक मिळाला.. जन्माचं सार्थक झालं. बाईच्या जातीला आणखी काय हवं असते गं ? “
आईच्या मुखातून बोलल्यासारखे शेजारी-पाजारी, नातेवाईक ही तसंच काहीतरी म्हणाले.
पुढे मुलगी झाली. आई म्हणाली,
“ घरात लक्ष्मी आली.. बाईच्या जातीला आणखी काय हवं असतं गं.. ? “
जगाच्या दृष्टीनं सारं सुरळीत चालू असलं तरी ते तसं असतंच असं नाही. ‘दुरून डोंगर साजरे’ असं म्हणतात तसाच प्रकार असतो तो. तिची सारी स्वप्नं काचेसारखी तडकून, विखरून गेलेली, त्यांचा चुराडा झालेला.. जीवन म्हणजे स्वप्नांच्या चुराड्यावरची बोचरी शय्या. ती बोच दुसऱ्या कुणाला जाणवत नव्हती, दिसत नव्हती पण म्हणून तिला, तिच्या मनाला रक्तबंबाळ करत नव्हती असं नव्हतं.
नवऱ्याला बऱ्यापैकी नोकरी होती. पण त्याच्या मनमानी, लहरी स्वभावामुळे तीही टिकली नव्हती. अतिशय स्वयंकेंद्रीत वृत्ती, बेजबाबदारपणामुळे त्याच्यावर कोणत्याच गोष्टीसाठी विसंबून राहण्यात, अवलंबून राहण्यात काही अर्थ नाही हे तिला लग्नानंतर काही दिवसातच उमगलं होतं.
“ मला पुढं शिकावं वाटतंय.. मी शिकू का ? “
तिनं भीतभीतच नवऱ्याला विचारलं.
“ कशाला ? गप्प घरात बसायचं.. माझ्यासमोर नखरे करायचे नाहीत.. स्वतःचं डोकं चालवायचं नाही.. एकदाच सांगतोय.. पुन्हा सांगणार नाही…समजलं का ? “
ती गप्प झाली. ‘पुढं शिकू का ? ‘ विचारलं त्यात नखरा काय होता ? ‘ हा मनात आलेला प्रश्न मनातच राहिला. असे कितीतरी प्रश्न मनातच राहिले होते. काही मनातून ओठांपर्यंत यायचे पण ओठांच्या दारातून बाहेर यायचे नाहीत.. दाराशी थबकायचे, दाराआडून बाहेर पहायचे.. पण बाहेर पडावे असे वातावरणच बाहेर नसायचे मग ते परत मनात जाऊन खळबळ माजवत बसायचे.. तिच्याबरोबर त्यांचीही चिडचिड व्हायची पण ती ही आतल्या आत..
“ असे पूर्वी नव्हतं नाही.. ”
एखादा प्रश्न तिला म्हणायचा.
‘ हूँ ! ‘ ती स्वतःशीच बोलल्यासारखी हुंकारायची. मग त्याच त्या एका अनुत्तरीय प्रश्नाचा सर्प तिच्या मनाला वेटाळून बसायचा. तिचं मन मात्र भूतकाळात गेलेलं असायचं.
“बाबा, मलाही ताईसारखी सायकल पाहिजे. “
ताई माध्यमिक शाळेत जायला लागल्यावर बाबांनी तिच्यासाठी सायकल आणली तेंव्हा ती बाबांना म्हणाली होती..
ताईची शाळा दूर आहे की नाही.. म्हणून तिला आणलीय सायकल.. तुझी शाळा तर घराजवळच आहे. तू त्या शाळेत जायला लागलीस की तुलाही आणूया नवी सायकल..”
बाबांनी मायेने तिची समजूत घातली. तिला ते पटलंही होतं. ताईची माध्यमिक शाळा गावाच्या दुसऱ्या टोकाला, तेही गावापासून काहीशी दूर माळावर होती. तिची शाळा तर अगदी घराजवळ होती..
सातवीची परीक्षा झाली.. आता आठवीला ती ही ताईबरोबर सायकलवरून जाणार होती. ती खुशीत होती.. ‘ आता सुट्टी संपून शाळा सुरू झाली की बाबांना सायकल आणायची आठवण करून द्यायची.. ’ असं तिने मनोमन ठरवूनही टाकले होते… परीक्षा संपून दोनच दिवस झाले होते. हातात कागद, पेन घेऊन सुट्टीत काय काय करायचं… याचा ती विचार करत, कागदावर यादी करत बसली होती. बाबा आले की ती यादी ती बाबांना दाखवणार होती. बाबा आले तेच तिच्यासाठी नवी सायकल घेऊन.. बाबांनी सुट्टी लागताच आठवणीने आपल्यासाठी नवी कोरी सायकल आणली.. त्यांना आठवण ही करून द्यावी लागली नाही.. याचा तिला खूप आनंद झाला होता. तिने पळत बाहेर जाऊन आधी बाबांना मिठीच मारली होती. बाबांनी तिच्या केसांवरून मायेने हात फिरवत विचारले,
“आवडली का सायकल.. ?“
“ हो.. ! “
“ पण पिलू आधी बघ तरी सायकल…”
बाबा हसत म्हणाले तसं ती सायकलकडे धावली.
“ दोन दिवसांनी ताईची परीक्षा झाली की दोघीही सकाळी लवकर उठून सायकलिंगला जायचं, बरं का ? “
अगदी बारकाईने सायकल पाहता पाहता तिने ‘ हो ‘ म्हणलं होतं.
ती आणि ताई दोघीही सोबतच सायकलवरून शाळेत जात-येत होत्या. ताईचं बारावीचं वर्ष आणि तिचं दहावीचं वर्ष असल्यामुळे शाळेत जादा तास असायचे.. त्यामुळे ती आणि ताई बरोबरच शाळेत जायच्या, कधी कधी शाळा सुटल्यावर ताईचा जादा तास असायचा, त्यावेळी ती ताईसाठी थांबायची. ताईची बारावी झाली.. तिचा दहावीचा निकाल लागला.. तिची अकरावीची शाळा सुरू झाली होती. ती एकटीचं सायकलवरून जाऊ लागली होती.
एकेदिवशी ती घरी आली तर घरातील वातावरण एकदम गंभीर झाले होते. ताई सकाळीच मैत्रिणीकडे जाते म्हणून आईला सांगून बाहेर पडली होती पण अजूनही परतली नव्हती.. आईने मैत्रिणीकडे चौकशी केली तर ताई मैत्रिणीकडे गेलीच नव्हती.
आईने बाबांना बोलावून घेतलं होतं.. ताईचा शोध चालू होता. ताईच्या सगळ्या वर्गमैत्रिणीकडे, इतर मैत्रिणीकडे शोधून झालं होतं. ताई कुठेच नव्हती.. बाबा अस्वस्थ होते, काळजीत होते.. आई रडवेली झाली होती.. तरीही उशिरा का होईना ताई येईल असे वाटत होते..
“ तुला काही बोलली होती का ताई ? “
“ नाही. ”
“ आठवून बघ.. ”
“ काही बोलली असती तर सांगितलं असतं मी.. ”
ताई कुठेतरी गेलीय, हरवलीय या विचाराने ती आधीच रडवेली झाली होती. ‘ कुठे असेल? कशी असेल? कुणी अपहरण तर केलं नसेल ना ताईचं ? ‘ इतरांसारखेच तिलाही हे प्रश्न पडत होते..
“ रात्रीत नाही आली, नाही सापडली तर सकाळी पोलिसात तक्रार देऊया.. ”
संध्याकाळी आलेला तिचा मामा म्हणाला होता. सकाळी समजलं, ताई पळून गेलीय. कुणाच्या तरी गाडीवरून जाताना एकाने तिला पाहिले होते.. हे समजताच आधी काळजीत असणाऱ्या बाबांनी एकदम जमदग्नीचा अवतार धारण केला होता.. ते आईवर ओरडले होते. तिच्यावर ओरडले होते.. दोन-चार मुस्काडीत मारून तिला विचारले होते,
“ तू सारखी बरोबर असायचीस.. तुला ठाऊक असणार.. सांग कुणाबरोबर पळून गेलीय ती ? “
तिला तर काहीच ठाऊक नव्हतं. आईलाही अंदाज आला नव्हता. ताई पळून गेली होती.. जाताना कपाटातले पैसे, घरातले दागिने घेऊन गेली होती.
बाबा जास्तच चिडचिडे झाले होते. त्यांनी तिची शाळा बंद केली होती. शाळेत जाण्यासाठी ती रडली होती, आर्जवं केली होती. आई सांगत होती, मामाने समजूत घालण्याचा प्रयत्न केला होता पण बाबा कुणाचंच काही ऐकून घ्यायला तयार नव्हते. त्यांनी तिची शाळा बंद केलीच, पण घरातून बाहेर पाऊलही ठेवायचे नाही म्हणूनही बजावले.. दोघींच्या सायकलीही विकून टाकल्या.
“ एक तोंड काळं करून गेलीय.. दुसरी जायला नको.. तिचं लग्न करून टाकणार आहे लवकर.. ”
बाबांनी कुणाचं काहीही ऐकून न घेता आईला निर्णय सांगून टाकला होता.
ती रडत होती, आई-बाबांना विनवत होती… ‘ मला शिकू द्या.. मी ताईसारखी वागणार नाही ’ असं म्हणत होती. आई आधी बाबांना सांगायचा प्रयत्न करत होती पण नंतर बाबांच्या निर्णयाला मूक संमती दिल्यासारखी गप्प झाली. काळाच्या औषधानेही जमदग्नी शांत झाला नव्हता. ‘एकीने घराण्याची अब्रू घालवलीच आहे, उरली सुरली नको जायला ‘ म्हणून पहिल्यांदा जे स्थळ मिळाले तिथे तिचे लग्न अक्षरशः उरकून टाकून ते मोकळे झाले होते. तिची इच्छा, आवड-निवड, तिची स्वप्ने या साऱ्याचा बळी देऊन घराण्याची ‘उरली-सुरली ‘ अब्रू वाचवली होती..
“ आम्ही काय वैरी आहोत का तुझे ? तुझं भलं-बुरं आम्ही पाहणार नाही काय ? काय वाईट आहे गं स्थळात.. एवढं चांगलं स्थळ आहे.. आणखी काय हवं असतं गं बाईच्या जातीला ? “ आईचे निर्वाणीचे शब्द होते..
ती बळी द्यायला घेऊन निघालेल्या शेळीसारखी स्वतःच्या मनाला आणि स्वतःला फरफटत घेऊन पुढे पुढे जात राहिली होती.
मनातला प्रश्न तिने रडत-भेकत, कधी रागात आईला विचारला होता, एकदा नव्हे तर दोन-तीनदा बाबांना विचारला होता.. तिला उत्तर मिळाले नव्हतं.. अनेकदा स्वतःला विचारला पण तिलाही उत्तर मिळाले नव्हतं.. प्रश्न अनुत्तरीतच राहिला..
… आजही आयुष्याच्या या टप्प्यावर, अंथरुणावर खिळून असतानाही तिच्या मनात तोच अनुत्तरीत प्रश्न तिला घेरून राहिला होता.
‘ प्रत्येकजण आपापल्या जागी बरोबर असेलही कदाचित.. पण माझे काय ? माझा काय गुन्हा होता ? माझी काहीच चूक नसताना, माझी स्वप्नं, आवडी- निवडी या साऱ्यांचा, माझा बळी दिला गेला.. का ? मी कोणताच गुन्हा केला नसतानाही मला ही शिक्षा का ?’
… प्रश्नाचा सर्प आयुष्यभर तिला वेटाळून बसला होता.. ज्याचे उत्तर कुणीच दिलं नव्हतं.. आणि तिलाही सापडले नव्हते. त्याच निरुत्तर प्रश्नाचा सर्प तिच्या मनात तेंव्हाही फुत्कारत राहिला होता.. तसाच फुत्कारत बसला होता.. आयुष्यभर !
© श्री आनंदहरी
इस्लामपूर जि. सांगली – मो ८२७५१७८०९९
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈