सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
जीवनरंग
☆ शून्याच्या आत… – भाग 1 – डॉ हंसा दीप ☆ भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ ☆
डॉ हंसा दीप
शहराजवळ एक पशु-पक्षी विहार होता, ज्याची स्तुती अनेकांकडून ऐकली होती. भारतातून एक मित्र आले होते, तेंव्हा विचार केला, की त्यांना आधी तिथेच घेऊन जावं दाखवायला. सकाळी नाश्ता करून आम्ही तिथे पोचलो, तर गेटवरच एक मोठी पाटी दिसली. तिथे लिहिलं होतं, की “पशु पक्ष्यांना काहीही खायला घालू नये. प्रवेशासाठी काही तिकीट नाही. आपण देणगी देण्यास उत्सुक असाल, तर देऊ शकता, पण या विहाराची कथा जरूर ऐका किंवा वाचा”
आम्ही आत जाऊन पुढे चालू लागलो. मधे बनवलेल्या लांब-लांब गोलाकार रस्त्यांवरून जाताना कित्येक प्राण्यांची एक वेगळीच दुनिया दिसत होती. उजवीकडे तारांच्या कुंपणापलीकडे वेगवेगळ्या जातींचे प्राणी समूह आपापल्या सीमांमध्ये विहरताना दिसत होते. आणि डाव्या बाजूला कित्येक वृक्षांवर अगणित पक्षी बसलेले दिसत होते. त्यांच्यासाठीच खास बनवलेल्या त्या जंगलात ते त्यांचं नैसर्गिक जीवन जगत होते. या पक्ष्यांचा कलकलाट, शिवाय आणखीही वेगवेगळे आवाज मिळून एक वेगळंच वातावरण निर्माण झालेलं होतं
पक्ष्यांची, प्राण्यांची मस्ती बघून असं वाटत होतं, की इथे त्यांची चांगली काळजी घेतली जात असणार. प्रत्येक प्रकारच्या प्राण्यांसाठी वेगवेगळी घरे केलेली होती. मांजरांसाठी वेगळी, कुत्र्यांसाठी वेगळी आणि रॅकून या प्राण्यांसाठी वेगळी घरे होती. या अतिशय सुंदर अशा नैसर्गिक ठिकाणी वेगवेगळ्या प्रजातीच्या इतक्या साऱ्या प्राण्यांना एकाच वेळी बघणं हा एक वेगळाच अनुभव होता.
चालून फिरून दमल्यावर मग एका ठिकाणी बसून आम्ही बरोबर आणलेले खाण्याचे पदार्थ खाऊन घेतले. इथे प्राणी बघत फिरणं हा फार आनंददायक अनुभव होता, पण फिरून फिरून आता आम्ही थकलो होतो. हे तर आधीच ठरवलं होतं, की या प्राणी संग्रहालयाची कथा वाचून मगच तिथून परत फिरायचं. काही लोक तिथे तो ऑडिओ ऐकत होते, तर काहीजण वाचत एकमेकांशी त्यावर बोलत होते. माझ्या मित्राने ऑडिओ ऐकायला सुरुवात केली आणि मी वाचू लागले.
तिला सर्वजण कुमुडी म्हणत असत. कुमुडी हे नाव ऐकायला विचित्रच वाटतं, पण आपल्याकडे चांगल्या नावांची तोडमोड करून, टोपणनावं कशी तयार होतात, याचं हे एक चांगलं उदाहरण होतं. ही कुमुडी श्रीलंकेत जन्मली होती. लहान असतानाच आई-वडिलांबरोबर न्यूझीलंडला जाऊन राहिली होती. आणि नोकरी लागल्यामुळे कॅनडामधल्या टोरांटो शहरात येऊन स्थिरावली होती.
कुठे उगवलेलं बी, कुठे जाऊन रुजलं आणि कुठे जाऊन त्याचा वृक्ष फोफावला, त्याचा विस्तार झाला पहा!
वेगवेगळ्या देशांच्या विविधतेला साजेशी रूपं तिच्या नावाने धारण केली. कौमुदी चं कोमुडी, आणि कोमुडीचं शेवटी कुमुडी! तिची मूळं श्रीलंकेशी जोडलेली होती त्यामुळे हे कळणं सोपं होतं, की तिच्या घरात तामिळ भाषा बोलली जात असणार. हे नाव संस्कृत, तामिळ किंवा हिंदी मधून आलेलं असणार, हे भाषा विज्ञान सांगेल. पण तिचं कुटुंब मूलतः तामिळभाषीच होतं. किती एक भाषा आणि संस्कृतींच्या मिलाफाने तयार झालेल्या या सुंदरशा नावाने अनेक देशांच्या सीमा पार करत हे नावाचं नवंच रूप धारण केलेलं होतं. हिंदी-तामिळ भाषिक लोकांची इंग्लिश बोलण्याची ढब थोडी वेगळी असते, त्याला हे लोक हसत असतात, त्यांची चेष्टा करतात. पण अशा सुंदर नावांचा कचरा करण्यात या लोकांचा कोणी हात धरु शकत नाही. तर, कौमुदीचं आता कुमुडी झालेलं होतं.
असो, तर या बदललेल्या नावाचं तिला स्वतःला काही फार वाईट वाटत नव्हतं. कारण, शाळेपासून तर करिअरच्या या उच्च शिक्षणापर्यंत तिला अशाच वेगवेगळ्या नावांनी बोलावलं जात होतं. आणि तसंही नावात एवढं काय ठेवलेलं होतं! ती तर नेहमीच तिच्या कामासाठीच ओळखली जात असे. तिचं व्यक्तिमत्व तिच्या कौमुदी नावाला साजेसं होतं. अत्यंत शालीन, सौम्य, साधा, सरळ स्वभाव तर होताच तिचा, शिवाय, ती एक समर्पित, निष्ठावान डॉक्टर होती. जे काही करायची, ते पूर्ण मनापासून करायची. आपल्या स्वतःच्या खास अशा पद्धतीने, दहा मिनिटांच्या कामासाठी अर्धा तास सुद्धा घालवत असे. मग पुढचं काम, मग त्याच्या पुढचं, अशा प्रकारे तिची अनेक कामं तिची वाट बघत असायची. एका पाठोपाठ एक उरत गेलेल्या कामांची यादी वाढतच जायची.
यात कोणी तिची चूक आहे, असे मानत नसे. कारण जेंव्हा ते काम संपायचं तेंव्हा ते परिपूर्ण झालेलं असायचं. तिचे सगळे पेशंट तिच्यावर खुश असायचे. ती नेहमीच आपलं सर्वोत्तम द्यायची आणि त्या बदल्यात तिला जी तृप्ती मिळायची, ती अनमोल असायची. वेळाच्या या मारामारीत तिला रात्री उशिरापर्यंत जागून कामं निपटावी लागत असत. शरीर थकून जात असे, आणि मेंदूची विचार करण्याची क्षमता नष्ट होण्याची वेळ येत असे, तेंव्हा कुठे ती जाऊन झोपत असे. यामुळे तिची तब्येत, शरीरातला प्रत्येक अवयव बंड करून उठत असे, पण तिची कामं काही संपायची नाहीत. तिच्या विभागात “आज कुमुडी आली नाही” “परत आली नाही” “अजबच आहे, इतकी कशी आजारी पडते?” “आजारी आहे, सांगितलं होतं की” असे संवाद नेहमी ऐकू येत असत.
हॉस्पिटलमधल्या एका समर्पित डॉक्टरसाठी हे असे प्रश्न विचारणाऱ्यांनाही त्यांचं उत्तर माहितीच असायचं. सगळे तिचे प्रशंसकच होते. तिची काम करण्याची मंद गती तिच्या सहकाऱ्यांना त्रासदायक वाटायची, तरीही त्या सगळ्यांना ती आवडत असे. तिचं समर्पण स्वतःच बोलत असे. एकदम निस्वार्थी आणि दृढ होतं ते समर्पण! सगळे तिच्यावर प्रेम करत असत. त्यांनी एक हात जर तिला मदतीचा दिला, तर ती दोन्ही हातांनी त्यांच्या मदतीस धावून जात असे. टेक्निक फार जलद गतीने बदलत होतं. तिला कित्येक वेळा आपल्या तरुण अशा दुय्यम सहकाऱ्यांना बरंच काही विचारावं लागत असे, पण नवं शिकताना तिला कधी संकोच वाटत नसे.
तिच्या सहकाऱ्यांना एकाच गोष्टीचं वाईट वाटत असे, की ती अगदी एकटी होती, तरी ती कधीच काही बोलत नसे. आपल्या पंचविसाव्या वर्षापासून पन्नासाव्या वर्षापर्यंत आपल्या खांद्यांवर सगळ्या कुटुंबाचा भार घेऊन वाटचाल करत राहिली होती ती. घरातली सगळ्यात मोठी मुलगी असल्यामुळे घराची सगळी जबाबदारी तिने स्वतःवर घेतलेली होती. वयस्क आई-वडिलांबरोबरच वाढत्या वयाच्या भावा बहिणींची पण काळजी घ्यायला लागत होती. टोरंटोहून न्यूझीलंडला कित्येकदा महिन्यातून दोन वेळा जावं लागत असे. खरं तर तिला न्यूझीलंड मधेही नोकरी मिळू शकली असती, पण तिला कॅनडा आणि तिथली कार्यपद्धती खूप आवडू लागली होती. या जमिनीत तिची मूळं जणू घट्ट रुजली होती, इतकी, की या देशाचा तिने आपली कर्मभूमी म्हणून जन्मभरासाठी स्वीकार केलेला होता. हा देश तिच्यासाठी जणू सोयी-सुविधांचा वर्षाव घेऊन आला होता. म्हणून तिला तो देश सोडायचा नव्हता. कुटुंबाबद्दलची तिची काळजी बघून सगळे थक्क होत असत. एक पाय टोरंटोमधे तर एक ऑकलंडमधे असायचा तिचा. एक वरिष्ठ डॉक्टर असल्याने चांगला पैसा कमवत असे ती, परंतु, तिला कायमच पैशांची तंगी जाणवत असे. कारण, तिच्या पगाराचा मोठा हिस्सा कॅनडा ते न्यूझीलंड या प्रवासातच खर्च होत असे. तिच्या खांद्यांवरचं हे शारीरिक व आर्थिक ओझं काही वेळा तिला पेलतही नसे. आपल्या क्षमतांकडे दुर्लक्ष करून ती एका पाठोपाठ एक जबाबदाऱ्या पार पाडत गेली आणि प्रत्येक पावलाबरोबर आपलं शरीर या भाराने दमत चाललं आहे, हे जाणवूनही त्याकडे दुर्लक्ष करत राहिली. आई-वडिलांच्या मृत्यू नंतरही दोन्ही बहिण भावांना स्थिर-स्थावर करून देण्यात पुढची पाच वर्षं गेली तिची. आता मात्र तेच भाऊ बहिण आपापल्या मुला-बाळात, आपल्या परिवारात गुन्तून गेले आहेत.
– क्रमशः भाग पहिला
मूळ कथा : शून्य के भीतर – डॉ. हंसा दीप. कॅनडा
मराठी भावानुवाद – सुश्री साधना प्रफुल्ल सराफ
संपर्क – 1565, सदाशिव पेठ, ‘लक्ष्मी सदन’, पी. जोग क्लास लेन, पुणे, ४११०३०. मो. 7709014058.
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈