डॉ. ज्योती गोडबोले
जीवनरंग
☆ माझं काय चुकलं ??? — भाग-२ ☆ डॉ. ज्योती गोडबोले ☆
(सासूबाई हळूच म्हणाल्या, बाई ग. करणार का ही नीट सगळं?का पिठलं भात करायची वेळ येतेआपल्यावर?’हसून मोना म्हणाली बघूया. मलाही माहीत नाही हो तिला काय येतं ते’.) –इथून पुढे —
दीड तासाने सीमाने मोनाला आत बोलावलं. सगळं किचन नीट आवरलेलं, ओटा स्वच्छ, टेबलावर सगळी भांडी नीट मांडलेली. “ मोना, उघडून बघ ना! कमी नाही ना पडणार?” सीमाने विचारलं. मोनाने बघितलं, साधा पण खूप सुंदर स्वयंपाक केला होता सीमाने. पोळ्या डब्यात भरलेल्या, उसळ भात कोशिंबीर चटणी आणि खीर. मोना खूषच झाली. “ अरे वा. मस्त केला आहेस ग बेत सीमा. मस्तच झालंय सगळं. चव आहे तुझ्या हाताला. ” सीमाला शाबासकी देत मोना म्हणाली.
सीमा म्हणाली “ मोना, काय करणार ग. आई लवकर गेली माझी आणि लहान वयात खूप जबाबदारी पडली ग माझ्यावर संसाराची. वडील आणि भाऊ किती स्वार्थी आहेत ते तू बघतेसच. तू मला संतोषशी लग्न करायचा प्रस्ताव आणलास ना तर बाबा म्हणाले कशाला करतेस लग्न?इथं काय वाईट चाललंय तुझं?काही नको करू लग्न!’मी गेले की पगार गेला, घरात राबणारी मोलकरीण गेली ना. ‘सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. सगळे जेवायला बसले. सासूबाई सासऱ्यानी सीमाला दाद दिली आणि तिचं कौतुक केलं. सीमाला खूप आनंद झाला. म्हणाली, माझं काही चुकलं तर मला संभाळून घ्या हं. मला माणसात राहायची सवय नाहीये. पण मी आपल्या घरच्या रीतिभाती मोना कडून घेईन समजून.
सासूबाईंना कौतुक वाटले सीमाचे. आता तिची शाळा सुटली की मोनाची मुलं तिच्याजवळ येऊन बसत आणि ती त्यांचा अभ्यास घेई. खूप सुधारल्या मुलांच्या ग्रेडस्! दर शनिवारी सीमा मुंबईला जाई आणि रविवारी रात्री परत पुण्याला येई. कधीकधी संतोष यायचा पुण्याला. पहिली संकोचलेली, जरा ढिली सीमा पूर्णपणे बदलून गेली. आणि रुळून गेली सासरी. बघता बघता दोन वर्षे झाली आणि सीमाला आता व्हॉलंटरी रिटायरमेंट घेता येणार होती.
मोनाला एक दिवस सीमा म्हणाली मोना, तुझ्या मुळे मला संसार मिळाला ग!नाहीतर माझ्या नशिबी कसला नवरा आणि स्वतःचे घर ग. इतके स्वार्थी असतात का ग आपलेच लोक?आणि तू ना नात्याची नातेवाईक पण किती माझं हित बघितलंस ग. किती चांगली माणसं आहात तुम्ही सगळी ग!’ सीमाच्या डोळ्यात पाणी आलं. आता माझ्या बरोबर मुंबईला येशील का?आपण दोघी मिळून घर लावूया आमचं. मोना, आणखी एक विनंती आहे बघ. मी आई अप्पा ना चार महिने मुंबईला नेऊ का. त्यांना जरा बदल होईल आणि तुलाही कुठे ट्रीपला जायचं असेल तर तसे ठरवता येईल. , तुम्हीही कुठे जाऊ शकत नाही मला माहीत आहे. माझेही ते सासूसासरे आहेत की. मागचं काय झालं आणि ते कधी मुंबईला गेले का नाही ते मी नाही विचारलं पण आता येऊ देत ना. चालेल का तुला?’ मोना म्हणाली अग त्यात काय!जरूर जरूर ने. , मला आनंदच होईल की. संतोषलाही वाटत असेल ना आपल्या आईवडिलांनी कधीतरी यावं आपल्या घरीही! जरूर ने त्यांना. मोना आणि सीमा पुढच्या शनिवारी रविवारी जाऊन घर आवरून आल्या. असं दोनतीन वेळा गेल्यावर सीमाच घर छान लागलं. सीमाच्या समोरच्या आणि शेजारच्या फ्लॅट मध्ये ओळखीही झाल्या. लग्नाला चार वर्षे झाली सीमाच्या आणि कधी नव्हे ते सुख डोकावू लागलं तिच्या आयुष्यात. , संतोष चे प्रेम होते तिच्यावर आणि सीमाचेही!
त्यादिवशी ऑफिस मधून संतोष घरी आला तो खूप डोकं दुखतंय म्हणूनच. फॅमिली डॉक्टरने औषधं दिली आणि बरे वाटले त्याला. पण हे वरचेवर होऊ लागल्यावर मात्र त्याला त्यांनी स्पेशास्लिस्ट कडे पाठवले. सगळ्या तपासण्या झाल्या आणि स्कॅन मध्ये लहानसा ट्यूमर दिसून आला.
नशिबाने तो कॅन्सरचा नव्हता पण तरीही ऑपरेशन करून तो काढायचे ठरले. पुण्याहून मोना तिचा नवरा सगळे आले. मोठे ऑपरेशन झाले आणि सर्व ठीक आहे असं डॉक्टर म्हणाले.
संतोषला उठवून बसवले तर तो पडलाच बेडवर. दुर्दैवाने त्याला पॅराप्लेजिआ झाला. कमरेखालचा भाग निकामी झाला आणि लाखात एखाद्यालाच होणारे कॉम्प्लिकेशन त्याच्या नशिबी आले. सगळ्याना अत्यंत वाईट वाटले. आता कायम व्हील चेअरला जखडून त्याचे आयुष्य जाणार हेही सगळ्यांच्या लक्षात आलेच!
फिजिओ थेरपी झाली, सर्व उपचार झाले पण काहीही सुधारणा झाली नाही. संतोषला कामातून निवृत्ती घ्यावी लागली आणि थोडेसेच पेन्शन मिळणार होते. सीमाचेच सगळ्याना वाईट वाटले. जरा कुठे सुखाचे दिवस तिच्या आयुष्यात येतात तर हे येऊन उभे राहिले समोर. असे सहा महिने गेले आणि सीमा सगळं जिवाच्या करारावर निभावत होती.
पैशाची थोडीफार मदत मोना तिचे सासरे जमेल तशी करत होतेच. एक दिवस सीमा मोनाच्या घरी येऊन थडकली आणि सासू सासऱ्यांना म्हणाली’ मला निम्मा वाटा द्या तुमच्या इस्टेटीतला. इकडे सगळे सुखात बसला आहात आणि मी तिकडे कसे दिवस काढतेय कधी विचारलंत का तरी?मला पैशाची गरज आहे आत्ता. आत्ताच वाटण्या करून टाका. मला सगळ्यातला निम्मा हिस्सा हवाय. मुंबईचा फ्लॅट अजूनही सासऱ्यांच्या नावावर आहे तो लगेच माझ्या नावावर करा. या मोनाला काय कमी आहे?सगळं तिला देऊन मोकळे व्हाल. मला लगेचच पैसे हवेत. पुढच्या दोन महिन्यात हे झालं पाहिजे. बेभान होऊन सीमा बोलत होती. कुठून लग्न केलं असं झालंय मला. बरी सुखात होते एकटी. आता जन्मभर हे संतोषला सांभाळणं आलं नशिबाला!
जणू देवाने यांची सेवा करायलाच माझी नेमणूक केलीय. माझा जीव थकून जातो याचं दिवसरात्र करताना. यातून सुटकाच नाही माझी. बघेन नाहीतर सरळ मी इथे आणून टाकेन त्याला. बघा तुम्ही मग. ‘ सीमाचे हे बोलणे ऐकून सगळे हादरूनच गेले.
मोना म्हणाली, ‘असं नको ग बोलू सीमा!असं होईल हे कोणाला वाटलं होतं का?पण तू अशी टोकाची भूमिका नको घेऊ. भावजीना किती वाईट वाटत असेल. हे बघ. तू म्हणतेस तशा वाटण्या आपले बापू नक्की करतील, थोडा वेळ दे. मला काही नकोय त्यांच्या इस्टेटीमधलं. ‘
सीमा म्हणाली ‘हो!नुसतं म्हणायचं असं. हवंय तर सगळं. नुसता तुझा मानभावीपणा घ्या बघून. मला लॉकर मधले दागिने उद्यादाखवा!. आणि निम्मे मी घेऊनच जाणारे. एक शब्द बोलू नकोस मोना!ज्याच्यावर वेळ येते त्यालाच कळतं बरं!कुठून ऐकलं तुझं आणि लग्न केलं असं झालंय मला. माझंच नशीब फुटकं आहे बाई. लहानपणा पासून हात धुवून मागे लागलंय त्यातून सुटका नाही माझी. सीमा तावातावाने बोलून निघून गेली.
सगळ्याना प्रश्न पडला आता काय करावे?म्हातारे बापू तर थरथरायला लागले. मोना आणि तिचा नवरा कुशलने त्याच आठवड्यात वकील बोलावून आणले आणि कायदेशीर वाटण्या केल्या. बापूंच्या सगळ्या पावत्या निम्म्या सीमाला दिल्या. मुंबईचा फ्लॅट तिच्या नावावर करून दिला. जाताना ती दागिने घेऊन गेली.
.. आज या गोष्टीला दहा वर्षे झाली. संतोष आहे तसाच आहे. सीमा त्याची उस्तवारी करून जख्ख म्हातारी आणि आणखीच तिरसट आणि माणूसघाणी झालीय. मध्यंतरी मोना आणि कुशल तिच्या घरी संतोषला भेटायला गेले तर ही त्यांना वाटेल ते टाकून बोलली आणि मोनाला म्हणाली माझं जन्माचं नुकसान तू केलंस. मला तुझं तोंडही बघायचं नाही.
अपमानित होऊन दोघे घरी परत आले. मोनाला अतिशय वाईट वाटते की आपलं काय चुकलं? माझ्याच हाताला यश कसं नाही?मैत्रिणीचं भलं व्हावं हीच इच्छा होती माझी. हे विपरीत घडेल हे स्वप्नात तरी होतं का माझ्या? पण याला तिचा इलाज नव्हता. भल्या हेतूने केलेलं कामही मोनाला वाईटपणा देऊन गेलं आणि एक चांगली मैत्री कोणतेही कारण नसताना मोनाला वाईटपणा देऊन संपूनच गेली.
– समाप्त –
© डॉ. ज्योती गोडबोले
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈