☆ जीवनरंग ☆ लोककथा – पिसाची करामत ☆ डॉ.  मंजुषा देशपांडे ☆

एका जंगलात एक आजी आणि तिचा नातू रहात असे.  आजी दिवसभर फिरुन रानातून फळे,  बिया, मूळ्या गोळा करी  आणि थोडे घरासाठी ठेवून बाकीचे जवळच्या गावात विकून टाकी.  तिचा माल शेलका असल्याने लवकर विकला जाई.

तिचा नातू मात्र भयंकर आळशी होता. सूर्य डोक्यावर येईपर्यंत लोळत पडे आणि फारतर जवळपासच्या काटक्या वेचून आणी. दिवसभरही तो उगीचच इकडे तिकडे करी.  जेवायची वेळ झाली की तो आजीला लाडीगोडी लावी.

आजीच काय पण आसपास रहाणारेही त्याला समजावत. त्याने आता कामधंदा केला पाहिजे म्हणून बजावत.

या आजीचे एक छोटेसे शेत होते,  डोंगराच्या पलिकडे आणि ओढ्याळ ओढ्याकाठी… तिथे ती धान आणि कुटकी, डाळी लावे.  तिथे जायचे म्हटलं की मात्र नातवाला उत्साह येई.  त्या दिवशी मात्र तो लवकर उठे आणि लवकर आवरूनही बसे.

तो तिथेही काही कामे करत नसेच पण तिथे त्याची मैत्रीण होती जीवा.  जीवा  अगदी त्याच्या विरूध्द …शहाणी आणि कामसू..

हा नातू लंब्या चवड्या बाता मारी,  तो म्हणायचा.. ‘तो काही हलकीसलकी कामे नाही करणार तर म्हणे तो एकच काम असे करेल की.. ‘ ..मग तो जीवासाठी काळा अबलख घोडा आणेल.  पाटलाच्या वाड्यापेक्षा टोलेजंग घर बांधेल.. जरीकाठी मुंडासे बांधून घुंगराच्या माळा घातलेल्या पांढ-या शुभ्र बैलजोडीच्या गाडीत बसेल.. आणि शेजारी लाडूचे मोठे ताट..असेल.. . मनात येईल तेवढे लाडू खाईल.

एकट्या जीवाचा त्याच्या या असल्या बोलण्यावर विश्वास होता..

बाकी सगळेजण त्याचे बोलणे करमणूकीसाठी ऐकत आणि टाळ्या वाजवून हसत.  त्याला लोक हसतात ते पाहून आजीला वाईट वाटे.

एक दिवस त्याची आजी त्याला खूपच रागवली,  तिने त्याला कामधंदा शोधण्यासाठी घरातून जवळ जवळ हाकलूनच काढले.

नातू हिरमुसून चालायला लागला,  खिशात बोरं होती..  एकेक बोरं खात खात जंगलात निघाला…असं फिरता फिरता उन्हं डोक्यावर आली.  पोटात भूक जाणवायला लागली.

तो थकून एका झाडाखाली मोठ्या दगडावर बसला तितक्यात त्याला..तिथे जवळच एका दुसऱ्या झाडाखाली त्याला एक मोठे निळ्या रंगाचे पीस दिसले.  हात लांबवून त्याने हातात घेतले तर काय… पीस त्याला म्हणाले… “आज दिवसभर चालून कसं वाटतंय तुला, रोज नुसता लोळत पडतोस ते… ” नातू त्याला म्हणाला… ‘एवढी बोलण्याची अक्कल आहे तर मला खायला घेऊन ये काहीतरी.. पीस म्हणाले, काय हवयं सांग,  लगेच आणतो.. नातू म्हणाला, “चार रोट्या आण आणि भाजी आण बरबटीची.”  लगेच ताट हजर.. वर पाण्याचा गडू पण.. नातवाने आजूबाजूला पाहिलं.

मग तो पिसाला म्हणाला… “लाडू आण बरं.”!. थोडे का चांगले ताटभर लाडू आले.

एवढे खाऊन आणि गटागट पाणी पिऊन नातवाला गाढ झोप लागली.

त्याला स्वप्नात त्या पिसाने त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण केलेल्या दिसल्या.  त्याला जाग आली तेव्हा चांगलीच संध्याकाळ झाली होती.

त्याच्या आजूबाजूला मात्र आणखी  काही निळीभोर पिसे पडली होती. त्याला एकदा वाटले, उचलावी सगळीच.. पण तो आळशी असला तरी लालची नव्हता.. पण त्याचे पीस कसे शोधावे… सगळी पिसे एकसारखीच होती.

मग त्याने त्यातल्या त्यात आठवून एक पीस उचलले आणि भराभर.. जवळ जवळ पळतच घरी पोचला.  घरी आजी काळजी करत होती,  त्याला म्हणाली, “हात पाय धुवून ये गरम भाकरी खायला..”.

तो म्हणाला,  भाकरी!  अगं लाडू,  पुरणपोळी काय हवं ते सांग.

हा नातू गोष्टी मोठ्या छान सांगे.

आजीने काही एक न बोलता एका थाळीत भाकरी आणि भाजी वाढली.  इकडे नातवाने पिसाला सांगितले.. पुरणपोळी,  लाडू आणि पाण्याचा गडू.. एक नाही दोन नाही.. काहीही आले नाही.

तो अगदी रडकुंडीला आला.

आजी म्हणाली, ” अरे तू ते जादूचे पीस समजून दुसरेच पीस घेऊन आला असशील.

त्या रात्री नातवाला कशीतरी झोप लागली. अगदी पहाटे उठून तो परत जंगलात गेला. सगळीकडे फिरूनही पिस काही दिसेना, शेवटी  आदल्या दिवसासारखेच एका झाडाखाली थकून बसल्यावर त्याला ते निळे पिस दिसले.

त्याने त्या पिसाला सगळी कहाणी सांगितली. तो पिसाला म्हणाला, “आता मी तुला माझ्या जवळच ठेवतो बघ.

पीस म्हणाले,” असं नाही चालत! “मला कुणीच पकडून ठेवू शकत नाही. “बाकीच्या पिसातून तुला मला शोधून काढावं लागेल” पण त्या दिवसाचे त्याला जेवण मात्र मिळाले. पण घरी नेण्यासाठी लाडू घ्यावे म्हटले तर ते पिसाबरोबर गायब.

त्याही  संध्याकाळी परत तसेच .झाले.. बघता बघता महिना उलटला.  हा मुलगा महिनाभर रोज पहाटे उठून जंगलात जाई,  मग जाता जाता फळे,  फूले,  बिया गोळा करी,  एकदा तर भलं थोरलं मधमाशांचे पोळेही घेऊन आला. जंगल एवढे देखणे आहे हे त्याला प्रथमच कळले. किती झाडे… किती फळे …किती पक्षी,..  किती प्राणी!

प्रत्येकाच्या नाना त-हा…हळूहळू त्याला प्रत्येक फूला फळाचे उपयोग कळू लागले. रोज दुपारी झोप येईनाशी झाली.  कोणत्या झाडाखाली ते पीस होते हे ही तो विसरून गेला.

आजी मात्र खूश होती.  आळशी नातू सुधारला.

एक दिवस  जंगलातून त्या गावचा राजा चालला होता.  राजाला जंगलात सुंदर फूले दिसली.  राजा स्वतः घोड्यावरून उतरला.

हया मुलाने डोंगरावरून पाहिले..तो ओरडला.. “अहो ती विषारी फूले आहेत…

पण त्याचा आवाज राजाला ऐकायलाच आला नाही. राजाने एक फूल तोडले आणि तो बेशुद्ध  पडला.  राजाबरोबर त्याचे सगळे मंत्रीमंडळ होते पण नेमके राजवैद्य त्या दिवशी आले नव्हते.

हा बाकीच्यांना म्हणाला.. घाबरु नका… त्याने राजाला थोड्या सपाट जागेवर वाळल्या औषधी पानांच्या गादीवर झोपवले. त्याने कसलासा पाला,  मुंगुसाच्या लाळेत मिसळून वाटला आणि त्याचा रस राजाच्या नाकात थेंब थेंब असे सोडत राहिला.

दोन दिवसानंतर राजाला शुध्द आली तोपर्यंत राजवैद्यही तिथे पोचले होते.

सर्वांनी या मुलाचे कौतुक केले.  राजाने मोठे बक्षीस दिलेच आणि राजवैद्यानी तर त्याला त्यांचे सगळे ज्ञान देऊन त्यांचा वारसच ठरवले.

आता तो आळशी राहिला नव्हता. राजवैद्य म्हणून  त्याचा मोठा लौकीक झाला होता.  त्याची सगळी स्वप्ने खरी झाली.

पण अजूनही कधी तो एकटा जंगलात जातो.  तो त्या झाडाखाली बसला की पीस येतेच. पण घरी मात्र जाताना नेमके पीस सापडत नाही..

खरे तर आता तो मुलगा नाही चांगला उंच निंच माणूस आहे.  त्याला आणि जीवाला चार गोड मुले आहेत.. असे एकट्याने उठून जंगलात भटकणे त्याला आता शोभत नाही. पण त्या पिसाचे कुतुहल मात्र त्याला आजही तिथे घेऊन जाते.

पण बहुतेक आजी आणि जीवाला त्याबद्दल माहिती आहे कारण पिसाबद्दल,  तो जेव्हा कळकळीने बोलतो तेव्हा त्या दोघी आपसात डोळे मिचकावून हसतात.

(एका नाॅर्वेजियन लोककथेचा स्वैर अनुवाद)

© डॉ. मंजुषा देशपांडे

≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈

image_print
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments