सौ. उज्ज्वला केळकर
जीवनरंग
☆ चार बालकांची कथा – हिन्दी लेखक : श्री घनश्याम अग्रवाल ☆ भावानुवाद – सौ. उज्ज्वला केळकर ☆
(असं म्हणतात की ज्या दिवशी मूल जन्माला येते, त्याच दिवशी त्याची आई पण जन्म घेते. त्यामुळेच जेव्हा ‘मदर्स डे’ असतो, त्याच दिवशी अघोषित असा ‘शिशु दिवस’ही असतो. त्याला अनुलक्षून ही व्यंग कथा. चार मुलांच्या वेगवेगळ्या कथा, पण एकाच सूत्रात गुंफलेल्या.)
श्री घनश्याम अग्रवाल
भल्ला मॅडमच्या किटी पार्टीची सगळ्यांनाच उत्सुकता होती. दोघी-चौघी जणी जरा चिंतीत होत्या. कारण त्यांची मुले 3-4 महिन्यांची होती पण भल्ला मॅडमनी ती पण व्यवस्था केली होती. पार्टीच्या शेजारच्या खोलीत मुलांना दूध पाजून झोपवायचं. म्हणजे मग एखादं मूल रडलं, तर त्याची आई लगेच येऊन त्याला घेऊ शकेल.
शेजारच्या खोलीत चार शिशू झोपले होते. पार्टीत अडथळा येऊ नये, म्हणून त्यांच्या आयांनी मुलांच्या तोंडात रबरी निपल्स घातली होती. म्हणजे मुलं स्तन समजून ते चोखत राहतील आणि चूपचाप पडून राहतील.
इकडे पार्टी सुरू झाली आणि तिकडे चारी मुले आपापसात बोलू लागली. ‘बघितलत, आपल्या मम्मींकडे… मोठ्या हुशार समजतात स्वत:ला. रबराचं निपल घातलय तोंडात. निपलचा चिपचिपितपणा आणि स्तनाचा उबदारपणा आम्हाला काय समाजत नाही?’ एकदा तर त्यांच्या मनात आलं, आशा आयांना चांगली शिक्षा दिली पाहिजे. जेव्हा पार्टी अगदी ऐन भरात येईल, तेव्हा मोठमोठ्याने रडायला सुरुवात सुरुवात करायची आणि जोपर्यंत ओरिजनल स्तन मिळत नाही, तोपर्यंत रडत रहायचं. पण मग पुन्हा त्यांनी विचार केला, मोठं झाल्यावर परंपरेनुसार आपण तिला सतावणारच. आता आपण अगदी लहान आहोत. जाऊ दे झालं.
पहिला म्हणाला, ‘ मी गप्प आहे कारण भविष्यात मला पॉलिटिक्समध्ये जायचय. मी जेव्हा मोदीजींना भेटेन… ‘
‘हे मोदीजी कोण आहेत?’ बाकीच्या दोघांनी विचारले. ’
‘मोदी माहीत नाहीत? अरे तेच मोदी… मागे काही दिवसांपूर्वी आईने मांडीवर घ्यावे म्हणून रडत, किंचाळत गोदी… गोदी… म्हणत होतो आणि आपली आई त्याला मोदी.. मोदी समजून आपल्याला मांडीवर घेत होती आणि तिच्या डोळ्यात तिला तिचा नरेंद्र मोदी दिसत होता. तेच मोदी… हं! तर जेव्हा मी मोदींना भेटेन, तेव्हा त्यांना सांगेन, ‘या दिवसात तुमचा ‘मन की बात’चा टी. आर. पी. खालावत चाललाय आणि का खालावला जाणार नाही. ? तुम्ही ‘मन की बात’ विचारपूर्वक आणि लिहून करता, तेही मोठ्या लोकांकडून. ‘मन की बात’ करायचीच असेल, तर ती आमच्याशी करा, आमच्याकडे मनाशिवाय दुसरं काहीच असत नाही. मोदीजी मी आपल्याला सांगतो, भ्रष्टाचाराची मुळं कुठे आहेत! पण माझी एक अट आहे. जेव्हा केव्हा आपल्याला अमीत शहांसाठी विकल्प शोधाची वेळ येईल, तेव्हा या मुलाकडे लक्ष असू दे किंवा मग मला मिनिस्टर बनवा. मी घोटाळा करेन. सी. बी. आय. शोध घेईल आणि शोध ईमानदारीने झाला, तर बोट माझ्याकडे नाही, माझ्या आईकडे दाखवलं जाईल कारण तिने स्तनाच्या जागी रबराचं निपल देऊन मला भ्रष्टाचाराची घुटी पाजली होती. एक राजकारणी दुसर्याच्या कमजोरीचा तोपर्यंत फायदा उठवत नाही, जोपर्यंत तो स्वत: कमजोर होत नाही.
‘यावर तिन्ही मुलांनी टाळ्या वाजवल्या आणि म्हणाली, ‘जेव्हा आम्ही मोठे होऊ, तेव्हा तुलाच मत देऊ. ’
‘माझ्या गप्प राहण्याचं कारण थोडं वेगळं आणि रोमॅँटिक आहे. ’ दुसरा म्हणाला. ‘माझी आई माझ्यावर नाराज असते. तिला असा संशय आहे की माझ्या जन्मानंतर तिची फिगर बिघडली. लोक म्हणे तिला रखा म्हणायचे. आता मम्मीला कोण समजावणार की दोन भुवयांच्या मध्ये कुंकवाचा टिळा लावल्याने काही कुणी रेखा होत नाही. मम्मी आपल्याला कुणी सांगितलं की मुलाच्या जन्मामुळे आईची फिगर बिघडते. आम्ही तर मागच्या जन्मापासून ऐकत आलोय, की ज्या क्षणी स्त्री आई होते, त्या क्षणी तिचं सगळं सौंदर्य प्रकट होतं. आई बनल्याशिवाय सौंदर्याच्या परिपूर्णतेला कुणीच स्पर्श करू शकत नाही. हां! रेखाची गोष्ट वेगळी. तिचं सौंदर्य पूर्णपणे तिच्यातच प्रगत होतं म्हणून तर ती इतकी मोठी कलाकार आहे. मी रेखावर जबरदस्त फिदा आहे. मी तर देवाला सांगणार आहे, पुढल्या जन्मी मला रेखा मिळणार असेल, तरच मला जन्माला घाल. मग ती प्रेमिकेच्या रूपात मिळो की आईच्या रूपात, तुझी मर्जी असेल तसं. माझ्या मम्मीला कुणी रेखा म्हणत नाही. तीच तेवढी स्वत:ला रेखा समजते. तिच्या या आशा चुकीच्या समजण्यामुळेच मी या घरात जन्माला आलो. तसाही या संपन्न घरात मी सुखी आहे. एकुलता एक वारस आहे ना!’
‘आत्ता तर तू तीन महिन्यांचा आहेस. आत्तापासूनच कसं म्हणू शकतोस की तू एकुलता एक वारस आहेस?’ बाकीची मुलं म्हणाली.
‘म्हणू शकतो. माझ्या मम्मी आणि डॅडींचा विवाह दोन वर्षे लांबला कारण डॅडींना दोन मुले हवी होती आणि मम्मीला एकदेखील नको होते. शेवटी खूप चर्चा झाल्यावर, तिला समजवल्यावर दोघांनीही एका मुलावर शिक्कामोर्तब केले. त्याचा परिणाम म्हणजे मी रडलो, तर मम्मी डॅडींवर राग काढेल. डॅडी इतर डॅडींप्रमाणेच दबकू आहेत. चूक मम्मीची असली, तरी पुन्हा पुन्हा तेच तिची समजूत काढणार. तिची मनधरणी करणार. मम्मीला समजावण्याच्या चक्करमध्ये पुन्हा माझा कुणी भाऊ येऊ नये, मी कुठलीच रिस्क घेऊ इच्छित नाही म्हणून मी गप्प आहे. माझ्यासाठी शानदार घर आणि जनदार रेखा एवढं पुरेसं आहे. ’
‘यार, पुढल्या जनमाता तुला रेखा मिळेल, तेव्हा आम्हाला तिचा ऑटोग्राफ घेऊन दे. सांग की हे माझे मागच्या जन्मीचे दोस्त आहेत. ’ मुले म्हणाली.
आता तिसरा म्हणाला, ’ मी तर शायराना वृत्तीचा आहे. मी जेव्हा पोटात होतो, तेव्हा माझी मम्मी आणि पापा कायम मुशायरे ऐकायला जायचे. त्यामुळे मुशायरेचे शेर मी अभिमन्यूप्रमाणे गर्भातच म्हणू लागलो होतो. जन्माला येताच मुनव्वर राणाचा फॅन झालो.
‘हे मुनव्वर राणा कोण?‘ मुलांनी विचारले.
‘अरे, मुनव्वर राणाला कोण ओळखत नाही. कसं माहीत असणार? कधी मुशायर्यांना गेला नाही आहात ना! तोच मुनव्वर राणा, ज्याने आईवर इतके शेर म्हंटलेत, इतके शेर म्हंटलेत की जर त्याने आपल्या प्रेयसीवर शेर म्हंटला, तर समोर बसलेला त्यातही आपली आई शोधू लागतो. मला कधी भेटलाच, तर सांगेन त्याला, ‘हे मादरेआजम, तू आईच्या ममतेवर किती तरी शेर लिहिलेस. दोन चार शेर आशा मम्मींवर पण लिही, जे आपल्या मुलाच्या तोंडात स्तनाच्याऐवजी निप्पल कोंबतात. काहीही म्हणा पण, मुनव्वर राणा मोठा शायर आहे. आईच्यावर त्याने हजारो शेर म्हंटले, जे लाखो लोकांनी ऐकले. मला तर वाटतं, त्यांचे शेर ऐकूनच, ते आठवत एखादा आपल्या म्हातार्या आईला पाणी देतो, तेव्हा मला वाटतं, मुनव्वर राणा आपली सगळी शायरी जगले. लहान तोंडी मोठा घास होईल कदाचित, की प्रत्येक शायर फक्त एक शेर म्हणण्यासाठी जन्माला येतो. बाकी शायरी ही त्या शेरापर्यंत पोचण्याचा मार्ग असतो. हे शेर त्यांच्या शायरीचा असा पुरस्कार आहे, की ते इच्छा असूनही मिळवू शकत नाहीत आणि इच्छा असूनही परत पाठवू शकत नाहीत. मी मुनव्वर राणाच्या त्या शेराला सलाम करत गप्प बसतोय. कुणी आई आपल्या मुलाला धोका देऊ शकते? ‘बेंनीफिट्स ऑफ डाउट’ तर अपराध्यालाही मिळतो. मग या तर आपल्या आयाच आहेत. जर आईनं दिलाय, तर निप्पल नाही, स्तनच असणार.
‘वा: वा: वा: वा:.. ’ बाकीची तीन मुले म्हणाली.
शेवटी चौथा मुलगा, जो मळक्या, फाटक्या कपड्यात होता, म्हणाला, ‘माझी आई आपल्या आयांप्रमाणे पार्टीत मजा करायला आलेली नाही. ती पार्टीत काम करायला आली आहे. भल्ला मॅमने आधी नको म्हणून सांगितलं होतं, पण आईने खात्रीपूर्वक सांगितलं की माझा मुलगा समजूतदार आहे. तो मुळीच रडणार नाही. गुपचुप पडून राहील. माझ्या आईने केवढा विश्वास ठेवला माझ्यावर. मी रडून तिचा विश्वासघात करू शकत नाही. मला माहीत आहे, माझी आई तुमच्या आयांची खरकटी भांडी घासेल, सगळं स्वच्छ करेल, तेव्हा भल्ला मॅम तिला काही पैसे देईल. त्या पैशाने माझी आई काही तरी खाईल. त्या खाण्याने जे दूध बनेल, ते दूध माझी आई मला पाजेल. निप्पलने नाही. तिच्या स्तनाने पाजेल. ’
‘यू आर ए लकी बॉय!’ बाकीची तीन मुले म्हणाली. ‘हं! आमची आईसुद्धा भांडी -कुंडी, साफ-सफाईची कामं करत असती तर…. ’
पार्टीमधला आवाज वाढत चालला होता॰ मुले कंटाळली. गालिब जसं म्हणाला होता, ‘दिल को बहलाने को गालिब ये खयाल अच्छा है… ’ मुले निप्पलची वस्तुस्थिती जाणूनसुद्धा स्वत:ला रमवत…
एक मोदीला, एक रेखाला, एक मुनव्वर राणाला आणि एक आपल्या आईला आठवत झोपी गेले.
मूळ कथा – चार शिशुओं की कथा
मूळ लेखक : श्री घनश्याम अग्रवाल, मो. – 9422860199
☆☆☆☆☆
अनुवादिका – सौ. उज्ज्वला केळकर
संपर्क – 176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – सौ. उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈