श्री दीपक तांबोळी

? जीवनरंग ?

☆ उधारी… भाग- ३ ☆ श्री दीपक तांबोळी

(त्याच्याभोवती बसलेलं त्याचं कुटुंब सुबोधला पहाताच उठून उभे राहिले.शामरावच्या वडिलांनी हात जोडले तर धाकटा भाऊ पाया पडायला लागला.सुबोधने त्याला उठवलं तर तो रडायला लागला.) — इथून पुढे —

” डाॅक्टर साहेब तुमचे खुप उपकार आहेत.तुमच्यामुळे माझा भाऊ आज आम्हांला डोळ्यासमोर दिसतोय”

” अरे बाबा मी निमित्त आहे.त्या देवानेच हे घडवून आणलं “

“दादा तुमीच आमचे देव” शामरावचे वडील म्हणाले.त्यांच्या डोळ्यातून अश्रू वहात होते ” दादा दादा समद्या नातेवाईकाकडे भीक मागत फिरलो.एकानेबी एक रुपया काढून देला न्हाई.आणि तुमी ना आमच्या जातीचे ना पातीचे,ना नात्यातले ना गोत्यातले.आम्हांले ओळखतबी न्हाई तरी तुम्ही दिड लाख काढून दिले.मंग सांगा तुमी देव नाही तर काय आमचे.सुनबाई पाया पड या दादांच्या.त्यांच्यामुळे तुह्यं कुकू साबुत हाये”

शामरावाची बायको पाया पडायला लागली तसा सुबोध एकदम बाजुला होत म्हणाला “अहो नको नको.शामरावांची काळजी घ्या.नवीन जन्म मिळालाय त्यांना”

“डाॅक्टरसाहेब तुमचे पैसे व्याजासहीत आम्ही लवकरच परत करु “शामरावचा भाऊ म्हणाला

“अरे व्याज कमावण्यासाठी थोडीच मी तुम्हांला पैसे दिले.आणि मला काही घाई नाही. तुमच्या फुरसतीने पैसे परत करा.शामरावांना चांगलं ठणठणीत बरं होऊ द्या मग परत करा.ओके?बरं मी निघू?काळजी घ्या” 

त्या सर्वांना नमस्कार करुन सुबोध बाहेर पडला.मगाशी ” पैसे परत केले नाही तरी हरकत नाही” हे ओठावर आलेलं वाक्य बोलू दिलं नाही याबद्दल त्याने देवाचे आभार मानले.

सहा सात महिने झाले तरी शामरावच्या भावाचा फोन आला नाही तेव्हा सुबोधच्या लक्षात आलं की ही उधारीही आपली बुडाली आहे.त्याच्याकडे शामरावच्या भावाचा फोन नंबर होता पण का कुणास ठाऊक त्याला फोन लावून पैसे मागायला त्याचं मन धजावेना.शामराव शेतकरी होता.शेतकऱ्यांच्या आत्महत्यांच्या बातम्या तो वर्तमानपत्रात वाचत होताच.आपण पैशासाठी तगादा लावावा आणि शामरावाने त्या काळजीपोटी आत्महत्या केली तर?त्या विचाराने तो शहारायचा.’जाऊ दे.देतील तेव्हा देतील.नाही दिले तर नेहमीप्रमाणे बुडाले असं समजून घेऊ’ या विचाराने तो चुप बसला.

एक दिवस तो सकाळी क्लिनीकमध्ये येऊन बसला.नेहमीप्रमाणेच पेशंटनी दवाखाना तुडूंब भरला होता.देवाच्या फोटोची पुजा करुन पहिल्या पेशंटला तो आत बोलावणार तेवढ्यात रिसेप्शनिस्ट दरवाजा ढकलून आत आली.

” सर ते सोयगांव बुद्रुकची माणसं आलीहेत.तुम्हांला फक्त भेटायचं म्हणताहेत”

“सोयगांव बुद्रूक?”त्याच्या डोक्यात काही प्रकाश पडेना

” काय नाव त्यांचं?”

” शामराव पाटील “

एकदम त्याच्या लक्षात आलं

“ओके ओके पाठव त्यांना”

शामराव आणि त्याचे वडील आत आले

” नमस्कार डाॅक्टर साहेब”शामराव हात जोडून म्हणाला

” या या नमस्कार. अरे वा ठणठणीत बरे झालेले दिसताय”

” साहेब सगळी तुमची कृपा आहे “सुबोधचे हात हातात घेत शामराव म्हणाला.सुबोध हसला.न बोलता त्याने देवाचे फोटोकडे हात केला आणि हात जोडले

“कर्ता करविता तो आहे” त्याने असं म्हंटल्यावर त्या दोघांनीही देवाला हात जोडले

” बोला.सगळं ठिक आहे ना?”

“दादा तुमचे पैसे द्यायला आलतो” म्हातारा म्हणाला आणि त्याने शामरावाला इशारा केला.तसं शामरावाने खिशातून पैसे काढून टेबलवर ठेवले.सुबोध डोळे विस्फारुन त्या पैशांकडे बघत राहिला.आजपर्यंत त्याने अनेक जणांना त्यांच्या संकटसमयी पैशाची मदत केली होती.पण कुणीही त्याला अनेक वेळा मागुनही इमानदारीने पैसे आणून दिले नव्हते.किंबहूना परतच केले नव्हते.काम झालं की लोक उपकार विसरतात हेच तो आजपर्यंत पहात आला होता.” याला म्हणतात उपकाराची खरी जाण” त्या पैशांकडे बघत त्याच्या मनात विचारलं.

” मोजून घ्या डाॅक्टरसाहेब.पुर्ण दिड लाख आहेत.”

” राहू द्या.तुमच्यावर विश्वास आहे माझा.खुप खुप धन्यवाद” असं म्हणत सुबोधने ते पैसे ड्राॅवरमध्ये टाकले.

“चला येऊ दादा?”म्हातारा हात जोडत म्हणाला

“अहो थांबा.चहा घेऊन जा”

सुबोधने रिसेप्शनिस्टला बोलावून तीन चहा पाठवायला सांगितलं.

” काय म्हणतं यंदाच पीक पाणी?चांगलं उत्पादन झालेलं दिसतंय”

सुबोधने असं म्हणताच दोघांचे चेहरे काळवंडले.

” साहेब शेतकऱ्याचं नशीब इतकं कुठं चांगलं आहे?तीन वर्षात झालं नाही असं जोरदार पीक यंदा झालं होतं.पण कापणीला आलेलं सगळं पीक अवकाळी पावसानं खराब करुन टाकलं”

शामराव म्हणाला.सुबोधने पाहीलं म्हातारा उपरण्याने भरुन आलेले डोळे पुसत होता

“अरे बापरे!बरोबर. पंधरा दिवसापूर्वी तीन चार दिवस पाऊस वेड्यासारखा कोसळत होता.आता हे काय पावसाचे दिवस आहेत?” 

मग अचानक काहीतरी सुचून त्याने विचारलं “हंगाम पुर्ण वाया गेला म्हणताय मग हे पैसे कुठून आणलेत?सावकाराकडून?”

दोघा बापलेकांनी एकमेकांकडे पाहिलं.काहीतरी नजरांनी इशारे केले.

” नाही साहेब.तुम्ही …तुम्ही काही बोलू नका.मी काही सांगणार नाही”

शामराव गडबडीने म्हणाला

“अहो सांगा ना!मी तुमच्या घरचाच आहे असं समजा.सांगा,सांगा”

शामराव चुप बसला.पण म्हातारा बोलू लागला.

” दादा नातीच्या लग्नासाठी पैपै करुन साठवले होते पैसे.शाम्याचा ॲक्सीडंट झाला.लई पैसे त्यात खर्च झाले.आधीच बँकेचं कर्ज.सावकारही समोर उभा करेना.शेतीचा तुकडा विकला तवा दवाखान्याचे पैसे भरता आले.पण काई घोर नव्हता.पीक पाणी उत्तम होतं.त्याचा पैसा आला की नातीचं लग्न उरकवून टाकू असं ठरवलं होतं.पण पावसाने समदं शेत उजाडून टाकलं.तुमचे पैसे तर द्यायचे होते.म्या म्हनलं नातीचं लग्न पुढे ढकलू पण डाॅक्टर साहेबांचे पैसे द्यावेच लागतीन…”

सुबोधला धक्का बसला.त्याचे वडिलही शेतकरीच होते.त्यांचे शेतीसाठी झालेले हाल त्याला आठवले.

” मग आता कधी होईल तिचं लग्न?आणि त्यासाठी कुठून आणणार पैसे?”

दोघा बापलेकांनी परत एकदा एकमेकांकडे पाहिलं.मग शामराव म्हणाला

“बघू साहेब.पुढच्या वर्षी करु तिचं लग्न”

” मुलाकडचे तयार आहेत का?”

” नाही तयार झाले तर सोडून देऊ हे स्थळ.दुसरा मुलगा पाहू” शामराव हे म्हंटला खरा पण त्याचे भरुन आलेले डोळे सुबोधच्या नजरेतून सुटले नाहीत.त्याने क्षणभर विचार केला आणि ड्राॅवरमधून दिड लाख काढून शामरावसमोर ठेवले

” हे घ्या शामराव.मुलीचं लग्न पुढे ढकलू नका”

दोघंही एकदम गडबडले.शामराव उठून उभा राहीला.त्याने ते पैसे उचलून सुबोधच्या हातात कोंबले

” नाही साहेब.याकरीताच मी तुम्हांला काही सांगत नव्हतो.पण आमच्या बाबांना काही रहावलं गेलं नाही. हे पैसे तुम्हांला घ्यावेच लागतील.शपथ आहे तुम्हांला.आणि आम्ही आता निघतो”

दोघंही जायला लागले तसं सुबोधने शामरावचा हात धरुन त्याला खाली बसवलं

” शामराव ऐका माझं.तुमची मुलगी म्हणजे माझी मुलगी.माझ्या मुलीचं लग्न असं लांबणीवर टाकलेलं मला आवडणार नाही. हे पैसे ठेवा.मला पुढच्या वर्षी द्या.दोन वर्षांनी द्या.मी कुठे आताच मागतोय पैसे”

” नाही दादा.शेतीचा काय भरंवसा.दोनतीन वर्ष तुमचे पैसे देणं जमलं नाही तर आमाले घास गिळवणार नाही.तुम्हाले हे पैसे ठेवणंच पडीन”म्हातारा म्हणाला

” ठिक आहे.नका देऊ मला पैसे” सुबोध एकदम बोलून गेला “मला गरज नाही या पैशाची.देवकृपेने माझ्याकडे भरपूर आहे.”

दोघा बापलेकांनी त्याच्याकडे आश्चर्याने पाहिलं.मग दोघांचे चेहरे नाराजीने भरुन गेले.

” डाॅक्टर साहेब तुम्ही मला जीवन दिलं.तुमच्याकडूनच पैसे घ्यायचं पाप मी कसं करु?”

” शामराव हे पैसे मी तुम्हांला देतच नाहिये.माझ्या मुलीला देतोय “त्याच्या हातात पैसे कोंबत सुबोध म्हणाला.हातातले पैसे शामराव बघत राहिला आणि मग एकदम बांध फुटल्यासारखा ढसाढसा रडू लागला.सुबोध खुर्चीतून उठून पुढे आला.शामरावला जवळ घेऊन त्याच्या पाठीवर थोपटत राहिला.

चहा आला.तो पिऊन दोघांनी

त्याला नमस्कार केला आणि निघाले

” साहेब मुलीच्या लग्नाला या बरं.मी लवकरच पत्रिका घेऊन येतो.आणि तुम्ही आशिर्वाद दिल्याशिवाय मी तिला सासरी पाठवणार नाही. तेव्हा जरुर जरुर या “

दोघं गेले.सुबोध परत आपल्या खुर्चीत बसून विचार करु लागला.ज्योतिषी म्हंटला होता ते परत एकदा खरं ठरलं होतं.त्याची उधारी परत एकदा बुडीत खात्यात गेली होती.पण यावेळी ती बुडायला तो स्वतःच जबाबदार होता.पण गंमत अशी होती की यावेळी त्याची त्याला ना खंत होती ना राग.उलट समाधानाने त्याचं मन भरुन आलं होतं.

— समाप्त —

© श्री दीपक तांबोळी

जळगांव

मो – 9503011250

≈संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित /सौ. मंजुषा मुळे/सौ. गौरी गाडेकर≈

image_printPrint
0 0 votes
Article Rating

Please share your Post !

Shares
Subscribe
Notify of
guest

0 Comments
Oldest
Newest Most Voted
Inline Feedbacks
View all comments