श्रीमती उज्ज्वला केळकर
☆ जीवनरंग ☆ पार्सल (भाग -2) (अनुवादीत कथा) ☆ श्रीमती उज्ज्वला केळकर☆
प्रेमाच्या या लाल-गुलाबी-निळ्या-पिवळ्या चंद्राला अचानक ग्रहण लागलं. त्यावेळी रोहित सुट्टीवर होता. त्याच्या प्रेमाला पाच महीने झाले होते. कुठल्या तरी पार्टीच्या वेळी मीनाक्षीशी ओळख झाली आणि ही पहिली भेटच प्रेमाच्या अंतहीन कहाणीचा आरंभ होती. मीनाक्षीने या गोर्या-चिट्ट्या, सडसडीत सैनिकापुढे जसा काही आपला जीव आंथरला होता. कॉलेजमधल्या आपल्या मित्रांमध्ये मोठी तोर्यात मिरवायची. दररोज तिचा हॉस्टेलचा लॅंड-लाईन रात्री अकरा वाजल्यानंतर तिच्या फौजीच्या येणार्या कॉलसाठी आरक्षित असायचा. दर दुसर्या-तिसर्या दिवशी आर्ची आणि हॉलमार्क्सच्या कार्डांसोबत लांबच लांब पत्रं पाठवणं मीनाक्षीचा एकमेव उद्योग झाला होता. पहिल्या भेटीनंतर पाच महिन्यांनी रोहितला सुट्टी मिळाली, तेव्हा त्याच्या येण्याने मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यातली तापणारी संध्याकाळ, मीनाक्षीला थंडगार झुळुकीचा सुखद गारवा देऊन गेली. त्या सुखद गारवयाचा प्रभाव चार दिवसच केवळ राहिला. रेडियो आणि टेलिव्हिजनवर सगळ्या फौजींची सुट्टी रद्द केलेल्याचे संदेश येऊ लागले आणि त्यांना आपआपल्या बटालियनला रिपोर्ट करण्याचे निर्देश मिळाले.
अडीच महीने होऊन गेले होते. फोनवरसुद्धा बोलणं होत नव्हतं. पत्रांचे मात्र ढीग लागत होते. विशेषत: मीनाक्षीची पत्रे. त्याला येणारे रोजचे लिफाफे सगळ्या बटालियनच्या चर्चेचा विषय झाले होते. जेव्हा त्या विशेष मिशनवर जाण्याचं नक्की झालं, तेव्हा नियमांनुसार कमांडिंग ऑफिसरने त्याला काही पत्र लिहून ठेवण्याविषयी सांगितलं. जर मिशनहून परत येणं झालं नाही तर ती पत्रे पाठवली जातील. रोहितने मम्मी आणि मीनाक्षीसाठी एक एक पानभर पत्र लिहून ठेवलं होतं. आता या परतीच्या प्रवासात तो हसत होता. ही पत्रे खूप… खूप वर्षांनंतर तो आपल्या मुला-मुलीला दाखवणार होता.
तीन तासांचा तो प्रवास जेव्हा संपला, तेव्हा सकाळची कोवळी किरणे दूरवर पसरलेल्या त्या वळवंटाला एक वेगळीच चमक प्रदान करत होती. बेसच्या प्रांगणात कमांडिंग ऑफिसर आणि सगळे जवान त्याच्या टीमच्या स्वागतासाठी उभे होते. रोहितला हसू आलं. आत्ता पाचच दिवसांपूर्वी सगळ्यांनी गळ्यात गाळे घालून त्याच्या टीमच्या जवानांना निरोप दिला होता. न जाणे पुन्हा भेट होईल की नाही? कमांडिंग ऑफिसरने पुढे होत रोहीतला गळामिठी घातली आणि म्हणाले, ‘वॉर इज ओवर… बॉय… वेल काम बॅक.’
सगळ्या औपचारिकता संपवून थकला-भागला रोहीत आपल्या टेंटमध्ये… तंबूमध्ये परतला, तेव्हा एक मोठसं पॅकेट चारपाईवर त्याची वाट बघत होतं॰ ते पहाताच थकला-भागला रोहीत एका नव्याच जोशाने, उत्साहाने भारला गेला. रायफलच्या नळीवर लावलेलं लांब, धारदार बॉनेट, शत्रूवर वार करू शकलं नव्हतं, ते सध्या पॅकेटला लावलेल्या सगळ्या टेप्स उस्कटण्यात व्यस्त होतं आणि पॅकेट उघडताच रोहीतच्या हैराणीला पारावार राहिला नाही. ‘शी हॅज गॉन क्रेजी..ऑर व्हॉट..’ असं बडबडत तो पॅकेटमध्ये असलेल्या वस्तूंकडे एकटक बघत राहिला. त्यात तीन-चार ब्रेडचे डबे, दोन-तीन जॅमच्या बाटल्या, बोर्नविटा आणि कॉम्प्लानचा एक एक जार, मॅगीची खूपशी पॅकेटस आणि चॉकलेट्सचा ढीग. पॅकेटच्या एका कोपर्यात एक छोटंसं पत्रही होतं. रडाव्या अक्षरात त्यात लिहीलं होतं,
‘शोना, मला खूप वाईट वाटतं, पाकिस्तानी मीडिया रोज दाखवतेय, इंडियन आर्मीला खायला मिळत नाहीये… तुम्ही लोक रोज फक्त डाळ-भात खाऊन रहाताय. मला माहीत आहे, ही गोष्ट तू मला कधीच सांगणार नाहीस आणि इंडियन मीडिया खरी माहिती देणार नाही. आजपासून मीसुद्धा फक्त डाळ-भातच खायला सुरुवात केलीय. तुझ्यासाठी खाण्याचं काही सामान पाठवते आहे. तुझ्यापर्यंत ते सगळं पोचेल की नाही, मला चिंता वाटतेय. ‘आय अॅम वेरी वरीड अबाऊट यू! प्लीज संधी मिळेल तेव्हा फोन कर. … आय मिसिंग यू लाइक हेल!’
. . . . . . . . . . .
पत्र वाचून रोमिओ टॅंगोचं गडगडाटी हसणं, त्याच्या तंबूमधून बाहेर पडून सार्या बटालियनला आपल्या कवेत घेऊ लागलं.
मूळ कथा – ‘पार्सल’ – मूळ लेखक – श्री गौतम राजऋषि
अनुवाद – श्रीमती उज्ज्वला केळकर
176/2 ‘गायत्री’, प्लॉट नं 12, वसंत साखर कामगार भवन जवळ, सांगली 416416 मो.- 9403310170
≈ ब्लॉग संपादक – श्री हेमन्त बावनकर/सम्पादक मंडळ (मराठी) – श्रीमती उज्ज्वला केळकर/श्री सुहास रघुनाथ पंडित ≈